|| श्री ||
व्याधी
– १
ज्योतिष
ग्रुपवर एका महिलेने आपल्या आजारा संदर्भात वक्तव्य केले होते. या जातकाला
गर्भाशयाचा कर्करोग झाला आहे. १ फेब्रुवारी २०१६ ला शस्त्रक्रीया करून गर्भाशय काढून टाकला त्या वेळी समजले की
कर्करोग अवती भोवती पसरला आहे. मग किमोथेरपी, रेडीओथेरपी हे सर्व झाले. उपचारामुळे
कर्करोगावर मात केली पण त्याचे दु:परिणाम अजूनही त्रासदायक असावेत असे त्यांच्या
विधाना वरून वाटते. त्यांचे जन्म टिपण खालील प्रमाणे आहे.
तारीख- ४/११/१९५५, वेळ- सकाळी
९:००, जन्मस्थान- डोंगरी जेल रोड, मुंबई.
स्थानांश- ७२/५०/११ पु. १८/५७/३७
उ. जातका कडून जेवढी माहिती उपलब्ध झाली त्यावरून विश्लेषण करत आहे. लहरी अयनांश –
२३/१४/२५ घेतले आहे.
लग्नी जलराशी आरोग्याच्या बाबतीत फारसी
चांगली नसते. नाजूक प्रकृती, जीवनशक्ती व रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यातच
लग्नात पापग्रह राहू आला. लग्न अग्नीतत्वाच्या नवमांशात आहे जे जलतत्वाच्या
विरुध्द फळ देते. लग्नेश पृथ्वीतत्वात अग्नीतत्वाच्या खालोखाल चांगले आरोग्य देतो,
पण तो हि नवमांशात जलतत्वात आहे. लग्न लाग्नेशावर शुभग्रहाची दृष्टी नाही. आरोग्य
कारक रविचा निचभंग होत असला तरी व्ययात आहे व स्वामी शुक्र मारकेश आहे. तुळेचा रवी
सामान्यत: आरोग्य चांगले देत नाही. म्हणजे
एकंदर शरीर प्रकृती काहीशी कमजोर दाखवतो.
चंद्र वायूतत्वाच्या
राशीत सहनशक्ती कमी देतो, मनही दुबळे असते, पण या कुंडलीत चंद्र मकर या नवमांशी
असल्याने हा दोष कमी होतो. व्ययेश लग्नी असता शरीर प्रकृती अशक्त असते, मनही दुबळे
असते. म्हणजे जातक फार कणखर नाही.
कर्करोगाचा विचार करतांना प्रथम गुरुचा विचार करावा लागतो तसेच
कर्करासही विचारात घेतात. कर्करोग म्हणजे पेशींची अनियंत्रीत वाढ व अशी वाढ दुषित
गुरु करतो. असा गुरु अग्नितत्वाच्या राशीत असता शक्यता अधिक वाढते. विचाराधीन
कुंडलीत गुरु व्दितीय मारकेश असून सिंहेत आहे. तो पापग्रह प्लुटो च्या अंशात्मक
युतीत आहे.
गर्भाशयाची शस्त्रक्रिया का?
शस्त्रक्रियेचा कारक मंगळ आहे हे सर्वांना माहित आहेच. षष्ठेश मंगळाची पंचमावर
दृष्टी आहे. स्त्री कुंडलीत पंचमस्थान हे गर्भाशयाचे स्थान आहे. पंचमेश गुरु दुषित
आहे हे आपण पाहिले. पंचमेश स्वस्थाना पासून षष्ठात आहे. या मुळे गर्भाशयाची
शस्त्रक्रिया झाली. काहींच्या मते भावातभाव नुसार भावेशाला बल प्राप्त होते.
षष्ठेश मंगळ षष्ठात आहे. स्वस्थानावर त्याची दृष्टीही आहे. पण हे बल शुभ कि घातक? मंगळाने
अशुभ फळ दिले असेच म्हणावे लागेल कारण एक अंग काढून टाकावे लागले. येथे मंगळ
लग्नेशही आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाली असे म्हणता येईल.
१ फेब्रु. २०१६ ला म्हणजे
वयाच्या ६१ व्या वर्षी शस्त्रक्रिया झाली. तशी उत्तर आयुष्यात ती झाली कारण व्ययातून
उच्च शनीची षष्ठावर दृष्टी. पण याचा एक परिणाम म्हणजे दीर्घकाळ दू:परिणामही
मिळतात. शस्त्रक्रियेच्या वेळी बुध महादशेत गुरु भूक्तीत शुक्र विदशा होती.
अष्टमेशाच्या दशेत गंडांतर, जीवावरचे दुखणे, शस्त्रक्रिया इ. काही प्रसंग येण्याची
शक्यता असते. बुध अष्टमेश असून व्ययात आहे. गुरु मारकेश असून त्याचा पंचमाशी संबंध
आहे. शुक्र मारकेश, व्ययेश आहे.
गोचरीचा विचार करता शस्त्रक्रियेच्या
वेळी गोचर हर्शल पंचमात होता. मूळ हर्शल अष्टमातील चंद्राच्या राशीत व्ययातील शनीच्या
नक्षत्रात आहे. दुसरे म्हणजे गोचर केतू चतुर्थात आहे पण चतुर्थात तो नुकताच दोन
दिवसापूर्वी आला होता. गर्भाशयाचा कर्करोगाचे निदान केव्हा झाले ? या प्रश्नाचे
जातकाने उत्तर दिले नाही. पण मला वाटते याचे उत्तर हा केतू देतो. केतू पंचमात १२/७/२०१४
ते ३०/१/२०१६ दरम्यान होता.
आता ज्योतिष अभ्यासक म्हणतील
कि “जातकाच्या
आयुष्यात केतू पंचमात वरील कालावधीत एकदाच आला का? नाही ना! मग या अगोदर असे फळ का
नाही?” बरोबर
केतू वयाच्या तिसऱ्या वर्षी जन्मत: राहू महादशेत, २२ व्या वर्षी गुरु महादशेत, ४१
व्या वर्षी शनी महादशेत पंचमात होता. मग बुध महादशेतील पंचमातील केतूने असे फळ का
द्यावे? इथे आपल्या मदतीला आरीष्टाचा ज्या वरून विचार होतो ती त्रिशांश कुंडली
येते. त्रिशांश कुंडलीत बुध षष्ठेश आहे.



