गुरुवार, ९ मे, २०१९

जनमत-२०१९ भाग ३

|| श्री ||




मीन संक्रमणातील पहिले चरण हे सत्ताधारी गटाला काहीसे झुकते माप देईल हे आपण पहिल्या भागात पाहिले. तर दुसऱ्या भागात मेष संक्रमणात मतदानाचे पाच चरण येतात व यात जरी विरोधी गट प्रबळ होत जातांना दिसत असला तरी सत्ताधारी गटाला यात घवघवीत, दैदिप्यमान यशाची संभावना जास्त आहे हे आपले अनुमान निघते. आता शेवटचे मतदान चरण जे वृषभ संक्रमणात येते ते जनमताचा कौल काय दाखवतो चला तर ते बघू.
३) वृषभ संक्रांत :- १५/५/२०१९, सका.११:००

   कर्क लग्न १५ अंश ५१ कलांवर वृषभ संक्रांत होते आहे. या संक्रमणात मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडून मतमोजणी होऊन सरकार स्थापन होणार आहे. तसे बघितले तर मेष संक्रमण जास्त महत्वाचे आहे. या कुंडलीत शुक्र दशमात आल्याने या चरणात विरोधी गट सरसी मारेल असे प्रथम दर्शनी वाटत असले तरी शुक्र चंद्र षडाष्टक योग तर चंद्र मंगळ केंद्र योग असल्याने दोघांनाही प्रतिकूल आहे. त्यामुळे असे वाटते कि एकतर मतदानाची टक्केवारी घटेल किंवा नोटा चा वापर जास्त होईल. पण फायदा मात्र विरोधी गटाला होईल. कारण १९ मे ला सातव्या चरणातील मतदानाच्या दिवशी तर चंद्र शुक्र व मंगळ दोघांशीही षडाष्टक योग करतो आहे, पण शुक्र दशमात हर्षलशी युती करता आहे. शुक्र दशमात असल्याने या चरणातील कला, मनोरंजन, क्रीडा क्षेत्राशी संबंधित तसेच स्त्री उमेदवार यांना यश मिळण्याची शक्यता जास्त आहे.

अनुमान :- मीन,मेष,वृषभ या तीन संक्रमणाचा विचार करता सत्ताधारी गटाला बहुमत मिळेल.
मतमोजणी साठी कुंडली पहायची गरज नाही. कारण झालेले मतदानच  मोजले जाणार आहे. सरकार स्थापणे साठी फारतर आपण विचार करू शकतो म्हणजे पंतप्रधानपद परत श्री.मोदींना मिळेल का ? कारण मुळात हि निवडणूक सत्ताधारी व विरोधी गटाने श्री.मोदीं भोवती केंद्रित केली आहे हे आपण पहात आहोच. विरोधी गट सत्ताधारी गटाला हरवण्यासाठी नव्हे तर केवळ श्री.मोदींना पायउतार करण्यासाठी निवडणूक लढत असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मी जो प्रयोग करतो आहे त्या नुसार वृषभ संक्रमणाची कुंडली श्री.मोदींच्या चहात्यांना धक्का देवू शकते. मी हे अगोदरच स्पष्ट केले आहे कि मेदनियेत सामान्यता जसा विचार केला जातो त्यात मला सुचलेला किंचित बदल करून विश्लेषण करत आहे. मलाही हे विचित्र वाटतेय पण या कल्पने नुसार जे आकलन होतेय ते मांडले पाहिजे.
तर मित्रांनो भावनेला मुरड घालून प्रायोगिक अनुमाना कडे येतो. या संक्रांत कुंडली नुसार (जर या संक्रमणात पंतप्रधान पदाचा निर्णय झाला तर) पंतप्रधानपदी अन्य कुणाची निवड होऊ शकते. भारताच्या पंतप्रधानपदी परत महिला विराजमान होण्याचे संकेत हि कुंडली देते आहे. नाही नाही विरोधी गटातील चेहऱ्यांकडे पाहू नका, तर सत्ताधारी गटातूनच हे होईल. असे झाले तर विरोधी गटाला नीती आणि नैतिक विजय झाला असे म्हणता येईल, नाही तरी ते NDA नाही तर श्री.मोदींना हरवण्यासाठीच लढतायेत. पण पण जर हा पंतप्रधान पदाचा निर्णय मिथुन संक्रमणा पर्यंत पुढे गेला तर मात्र चित्र वेगळे असेल.
छे, कशाला हे करत बसलो असे वाटू लागलाय. त्या पेक्षा “.....शेवटी येणार तर मोदीच” हे सुखद वाटत.

मंगळवार, ७ मे, २०१९

जनमत २०१९ भाग २

|| श्री||




“मागील भागात आपण पहिल्या चरणाचा विचार केला. एक स्पष्टीकरण पुन्हा देतो कि हे प्रायोगिक तत्वावर आहे. किंचित वेगळ्या प्रकारे इथे आपण विचार करत आहोत, भारताचे कर्क लग्न मकर रास घेवून. मतदानाच्या सात चरणांपैकी पाच चरण हे मेष संक्रमणात होत आहेत हे आपण पाहिले आहे.”

२)  मेष संक्रांत :- १४/४/२०१९, दु.२:०८.

  चंद्र मंगळ लाभ योग तर चंद्र शुक्र षडाष्टक योग आहे. अंशात्मक पाहायचे झाले तर १४ ला पहाटे ४:३० च्या आसपास लाभ योग झाला आहे तर दुसऱ्या दिवशी पहाटे ४:०० च्या आसपास षडाष्टक योग होतो आहे. या वरून इतके म्हणता येईल कि पहिल्या चरणा नंतर दरम्यानच्या काळात जनमत हे सत्ताधारी गटाला अधिक अनुकूल अगोदरच झाले आहे तर विरोधी गटाला ते अजून प्रतिकूल होणार आहे. सत्ताधारी गटाचा प्रतिनिधी मंगळ दशमस्थान सोडून लाभात आल्याने फारसे बिघडणार नाही. लोकसभेचा विचार लाभावरून होतो व येथील मंगळाची निवडणूक स्थानावर पूर्ण दृष्टी राहणार असल्याने २ ते ५ या चार चरणातील मतदानावर सत्ताधारी गटाचा चांगलाच प्रभाव, दबदबा असणार आहे.
 १६ एप्रिल ला शुक्राचा उच्चराशित प्रवेश झालेला आहे. तरी राजकारक चंद्र, रविशी त्याचे प्रतिकूल योग आहेत. रविशी व्दिर्दादर्शक तर चंद्राशी षडाष्टक योगातून बाहेर पडला असला तरी त्याच्या प्रत्यक्षवैर दृष्टीत आहे. १८ एप्रिलच्या दुसऱ्या चरणातील मतदानाच्या दिवशी चंद्र मंगळ मध्ये नवपंचम हा शुभ योग होतो आहे. जरी रविचा शुक्र व मंगळ दोघांशी असलेला अशुभ योग चुरस निर्माण करीत असला तरी रवी सत्ताधारींच्या स्थानात असल्याने ते बाजी मारून जातील. या चरणातील विरोधीगटाचे बालेकिल्ले ते हस्तगत करू शकतील.

  सत्तेचा कारक रवी दशमात उच्चीचा झाल्याने व हर्शल सारख्या ग्रहाशी आठऐक दिवसात युती करायला जाता असल्याने व उच्चांशा जवळ असल्याने २३ एप्रिलला झालेल्या तिसऱ्या चरणाच्या मतदानातील जागांपैकी काही जागांवर तर उत्तुंग यश सत्ताधारी गटाला मिळण्याची शक्यता आहे. पण २३ एप्रिल पूर्वी झालेले चंद्र मंगल प्रतियोग व चंद्र शुक्र नवपंचम योग काही जागांवर विरोधी गटाला भरपाई करून देतील. २९ एप्रिलच्या चवथ्या चरणात सत्ताधारी गटाला चंद्रा पेक्षा रवी यश मिळवून देईल.

  १ मे ला मंगळाचा वक्री शनी, केतूशी झालेला षडाष्टक व ५ मे ला वक्री गुरूशी झालेला प्रतियोग गुप्त शत्रू, अंतर्गत गटबाजी, धर्म, न्याय विरोधामुळे ६ मे च्या पाचव्या चरणा दरम्यान सत्ताधारी गटाला काही फटका बसू शकतो.

 आजच ७ मे ला मंगळाचा मिथुन प्रवेश झाला असल्याने तो व्ययात आला. मंगळ दशम, लाभात असल्याने सत्ताधारी गटाला जी विन पोझिशन मिळाली होती त्याचा सपोर्ट आता नाही. गुरु शनी केतू शी असणारे त्याचे अशुभ योग राहणार आहेतच. त्यामुळे धार्मिक विरोध, गुप्त शत्रुंचा त्रास, न्यायसंस्थेचे अडथळे प्रतिकूलता वाढवू लागतील.  १० तारखेला शुक्र मेषेत दशमात आल्याने विरोधी गटाला आघाडी मिळण्यास पोषक. १० मे ला चंद्र मंगळ व्दिर्दादर्शक योग तर चंद शुक्र केंद्र योग होऊन जातील. व्दिर्दादर्शक पेक्षा केंद्र योग बरा. तरी रवी दशमात असल्याने १२ मेच्या सहाव्या चारणात सत्ताधारी गटाची घोडदौड बरी असेल.

एकंदरीत दशमातील रवी हर्शल या पाच चरणात सत्ताधारी गटाला घवघवीत, प्रचंड यश मिळवून देवू शकतात.

सोमवार, ६ मे, २०१९

जनमत – २०१९ भाग १

||श्री||






खरे तर मला लोकसभा निवडणुकीवर भाष्य करायचे नव्हते. दोन कारणे होती, दुसरे कारण म्हणजे या साठी कुंडली कोणती घ्यावी? चैत्र शुद्ध प्रतिपदा मराठी नववर्ष कि वसंत संपात दिन २१ मार्च की १४ एप्रिल मेष संक्रांती कि १६\१७ जुलै चे खंडग्रास चंद्रग्रहण विचारात घ्यावे हा निर्णय करू शकत नव्हतो. मेदनियेत ग्रहणाचा प्रभाव मागे पुढे ६,६ महिने धरावा असा प्रघात आहे. पहिले कारण असे कि कुंडली पहायची उठाठेव तरी का करावी जर शेवटी येणार तर मोदीच आहे. (..........शेवटी येणार तर मोदीच आहे. अशी ओळ कमेंटच्या शेवटी सोशल मिडीयात लिहिली जातेय म्हणून म्हटलं, असो.) असे आहे तर मग हे अग अग म्हशी.... मी का करतोय? दोन कारणे आहेत. दुसरे म्हणजे मागच्या लेखात (राष्ट्रशल्य) मी कर्क व मकर राशी बाबत मला जे सुचले त्याचा वापर करून पहावा असे वाटले. निष्कर्ष जे काही निघतील ते बघावे. बरोबर चूक काही येवो. विचार जो काही सुचलाय त्याचे परीक्षण स्वत:च करायला हवे ना? नुसते विधान करून काय उपयोग? पहिले कारण म्हणजे मोदी पुन्हा पंतप्रधान होतील कि नाही? काय म्हणते ज्योतिष अशी विचारना मेसेंजरवर होतेय. अनेक ज्योतिषांनी लिहिलंय पण तुमच मत काय? कतुहल म्हणा, कुचेष्टा म्हणा कि परीक्षा म्हणा पण विचारले जातेय. जातक व मेदनिय या दोन वेगळ्या शाखा आहेत हे सांगूनही विचारणा होतेय. तेव्हा बघू तर खर म्हणून लागलो कामाला. 


लोकसभा - २०१९ निवडणूक हि ११ एप्रिल ते १९ मे २०१९ दरम्यान ७ चरणात घेतली जाणार. 

१) ११/४/२०१९      २) १८/४/२०१९      ३) २३/४/२०१९      ४) २९/४/२०१९ ५) ६/५/२०१९      ६) १२/५/२०१९      ७) १९/५/२०१९ 
असे सात चरण ठरले आहेत व २३/५/२०१९ ला मत मोजणी होणार आहे. सात पैकी पाच चरण हे मेष संक्रमणात होणार आहेत. पहिले चरण मीन संक्रमणात तर सातवे चरण वृषभ संक्रमणात होणार आहे. माझा जो विचार आहे त्या नुसार भारताचे कर्क लग्न व मकर रास असा असल्याने कर्क लग्नाच्या कुंडलीचे गोचर वरून विश्लेषण करावे लागेल. यात आपण जनमताचा कौल बघणार आहोत, पण सत्ताधारी अथवा विरोधी यांना जागा जास्त मिळतील अस्या अर्थाने. सरसगट एका बाजूचे उमेदवार निवडून येतील असा नाही कारण वैयक्तिक उमेदवाराचेही ग्रहमान आहेतच ना.

मीन संक्रांत :- १५/३/२०१९ सका. ५:३३, संसद(रेखांश-७७/१२/२९ पु, अक्षांश-२८/३७/०२ उ.)



या कुंडलीचा विचार आपण पहिल्या चरणातील मतदाना साठी करणार आहोत. मीन संक्रांत कुंभ लग्न ८ अंश १८ कलांवर झाली आहे. लग्नेश चंद्रच असल्याने जनतेचा प्रतिनिधी म्हणून अन्य ग्रहाचा विचार करण्याची अवशक्यता नाही. सताधारी पक्षाचा प्रतिनिधी मंगळ तर विरोधी पक्षाचा प्रतिनिधी शुक्र आहे. मंगळ दशमात स्वराशीत आहे त्यामुळे सत्ताधारी मजबूत आहे. चंद्र हा मंगळाशी लाभ योग करणार आहे तर शुक्राशी षडाष्टक. याचा फायदा सत्ताधारी गटाला मिळून पहिल्या चरणातील मतदान असलेल्या जागांपैकी सत्ताधारी गट जास्त जागा मिळवील. २२ मार्चला मंगळ वृषभेत म्हणजे लाभात प्रवेश करेल पण त्याचा प्रतिकूल परिणाम होईलसे वाटत नाही. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी चंद्र मंगळ व्दिर्दादर्शक योग रात्री उशिरा झाला आहे. त्याच्या परिणामामुळे सत्ताधारी व विरोधी गटाला मिळाणाऱ्या जागा संखेतील अंतर कमी होण्याची शक्यता आहे. पण एकंदर पहिल्या चरणात जनमताचा कौल हा वर्तमान सत्ताधारी गटा कडे असेल.