मंगळवार, ३१ डिसेंबर, २०२४

श्री. एकनाथ शिंदे. जन्मवेळ संशोधन

 

||श्री||

मागील लेख:- काका पुतने लढत. 

श्री. एकनाथ शिंदे. जन्मवेळ संशोधन



महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात २०२४ ची विधानसभेची निवडणूक महायुतीने लढवली. महायुतीचा प्रचंड विजय झाला. पहिल्या पासूनच राजकीय विश्लेषक व बहुतांशी ज्योतिष वर्ग श्री.शिंदे हेच परत मुख्यमंत्री होतील असे सांगत होते. मी एका ज्योतिष अभ्यास समुहावर १५ आक्टोंबर २०२४ रोजी ज्यावेळी २० नोव्हेंबर हि   मतदानाची तारीख जाहीर झाली त्यावेळीच भाकीत केले होते की महायुती जिंकेल पण श्री.शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत. ५ डिसेंबरला श्री.फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर काही जणांच्या पोष्ट वरून मला असे वाटू लागले कि बहुधा मी एकमेव असा होतो ज्याने श्री.शिंदे मुख्यमंत्री होऊ शकणार नाही असे भाकीत वर्तविले होते. महायुती जिंकेल हे तर बहुतांशी ज्योतिषांनी सांगितलेच होते. सुप्रसिद्ध व्यक्तींचे जन्मटिपण समाजमाध्यमात बहुधा खरे किंवा परिपूर्ण नसते. पण याच वरून भाकीत वर्तवण्या खेरीज इलाजही नसतो ज्यामुळे भाकीत चुकते.

ज्योतिषशास्त्रात नष्टजातक म्हणून एक प्रकरण आहे म्हणजेच जन्मवेळ संशोधन. एखाद्या व्यक्तीचे जन्मटिपण नसेल तर ते शोधण्याचा हा पर्याय आहे पण शेवटी पर्यायाच तो. यालाही काही नियम, मर्यादा या असतातच. ऊठसुठ करत बसण्याचा हा मार्ग नाही. एका जातकाने साधारण दीड दोन वर्षा पूर्वी माझ्या कडून जन्मवेळ संशोधन करून घेतले होते पण त्यापूर्वी त्याने अन्य दोन तीन जणांकडून जन्मवेळ संशोधन करून घेतले होते. माझ्या नंतरही अजून कुणा कडून केले असेल. एवढ करूनही त्यांची तक्रार होती कि कुणाच्याच वेळे प्रमाणे काढलेल्या कुंडली वरून भविष्य प्रत्ययास येत नाहीये. ज्योतिषी त्याला ज्ञात पद्धती, ज्ञान व अभ्यासा प्रमाणे काम करत असतो. नियमा नुसार मी जन्मवेळ संशोधना नंतर आयुष्यातील काही घटना ताडून पाहिल्या होत्या असेच अन्य ज्योतिषांनीही केले असणार. असो.

तर या वरून संकल्प आला कि श्री.शिंदे यांचे जन्मवेळ संशोधन करून पहावे. केवळ अभ्यास, सरावासाठी बाकी कोणताही दावा मला करायचा नाही. समाजमाध्यमा मध्ये श्री.शिंदे यांची जन्मतारीख ०९/०२/१९६४ अशी आढळली. जन्मस्थान अहिर. जन्मवेळ दिलेली नाही. श्री.शिंदे तळागाळातून पुढे आलेले व्यक्तीमत्व आहे. एक रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा प्रवास झालेला आहे. त्यामुळे सर्वसाधारण तर्काने कुंडलीत राजयोग हवेतच तेही दशमात. ०९/०२/१९६४ च्या मेष लग्न कुंडलीत दशमात बुध, रवी, मंगळ आहेत आणि योगायोग पहा आत्ताची कुंडलीही मेष लग्नाची आहे. झाले तर मग मिटला विषय. श्री.शिंदेंचा जन्म दु. १२ च्या आसपास आहे, नाही का? असा लघुमार्ग हा धोकादायक ठरू शकतो. तसेही आज सवड आहे. आपल्याला योगायोगाने नाही तर योग्ययोगाने प्रयत्न करायचे आहेत. प्रथम शासकग्रह मांडून घेवू या. दिनांक ०७/१२/२०२४, १५:४९:२९ चे शासक खालील प्रमाणे.

LS

शु

L

मं

S

मं

R

D

 

९ तारखेला रविवार होता. वारस्वामी शासकग्रहात नाही. अगोदरचा शनि शासकग्रहात आहे. मग जन्मतारीखही चुकीची आहे का? ती ०८/०२/१९६४ अशी आहे का? शासक शनिची दिप्तांश दशम दृष्टी रविवर असल्याने जन्मवार बरोबर आहे. रवि किंवा चंद्र शासकग्रहात नसल्याने जन्म संधीकाळात झाला असावा. सकाळ कि संध्याकाळ? आता परत शनिची दशम दृष्टी आपल्या मदतीला आली. तर सकाळची वेळ प्रथम तपासून पाहू. ७:०९ चा सूर्योदय होता. मकरलग्न ०५:३२ ते ०७:२३ दरम्यान होते. मकरेचा स्वामी शनि शासकग्रहात आहेच. मकरेत मंगळाचे धनिष्ठा नक्षत्र सका. ०६:५९:२४ ते ०७:२२:३८ दरम्यान होते. यात शनिचा सब हा ०७:१५:२२ ते ०७:२२:३८ दरम्यान होता. मंगळाचा सब सब हा ०७:२०:१० ते ०७:२०:३५ दरम्यान होता. शुक्राचा सब सब सब याचा मध्य ०७:२०:३० घेवूया.  


 
 
      

तारीख खरी आहे असे गृहीत धरून चाललो आहोत. तसे तर शासक शनिने बरोबर असल्याची ग्वाही दिली आहे मग गृहीत का धरतोय? तर शासकग्रह जन्मवेळ करता घेतले होते, जन्मतारखे करता नाही. ठीक आहे आता जी वेळ आपण काढली आहे त्यातील बलस्थाने पाहूयात. जन्मदिनाच्या आदल्या रात्री म्हणजे ८ फेब्रु. ला चंद्र रात्री १०:२१ ला धनुत गेला ते ९ फेब्रु. ला मध्यरात्री १२:५५ पर्यंत तो मूळ नक्षत्री होता. म्हणजे रास आणि नक्षत्राचा प्रश्न नाही. या दिवसी मंगळ, शुक्र उच्चीचे तर गुरु शनि स्वराशीचे होते त्यामुळे कोणतेही लग्न असले तरी राजयोग पक्का आहे. भरीत भर राहू केतू उच्चीचे आहेत. राहू छत्रयोग देतो. येथे तर तो उच्चीचा आहे. म्हणजे पराक्रमी, महत्वाकांक्षी, प्रभावी, यशस्वी असे व्यक्तिमत्व जन्मास घालण्याच्या मूड मध्ये नियती होती तर. यात चार मंदगती तर दोन शीघ्रगती ग्रह आहेत. शनि गुरु सारखे बलाढ्य ग्रह आहेत. शनिची कृपा दृष्टी तर ०७/१०/१९६१ ते ०९/०४/१९६६ तब्बल साडेपाच वर्ष बरसत होती. या दरम्यान गुरुही ०७/०३/१९६३ ते १५/०३/१९६४ एक वर्ष पंचमहापुरुष योग देत होता. गुरुच्या या वर्षात मंगळ १६/१०/१९६३ ते २६/११/१९६३, ०४/०१/१९६४ ते १२/०२/१९६४ दरम्यान. शुक्र १८/०४/१९६३ ते १३/०५/१९६३, ०७/०६/१९६३ ते ०२/०७/१९६३, ०७/१०/१९६३ ते ३१/१०/१९६३, ०५/०२/१९६४ ते ०१/०३/१९६४ या काळात. बुध ३०/०६/१९६३ ते १५/०७/१९६३, २०/०८/१९६३ ते २३/०९/१९६३, ०५/१०/१९६३ ते २५/१०/१९६३ या काळात पंचमहापुरुष योग देत होते. स्पष्टच आहे कि या काळात हजारो/लाखो मनुष्य प्राणी या भूतलावर जन्म घेते झाले असणार. मग ते सर्वच यशस्वी, प्रभावी व्यक्तीमत्वे झाले का नाही? पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे कर्मे व दुसरी म्हणजे दशाही तश्या यायला हव्यात. पण एखाद्याने कितीही जमीन कसली तरी जमीन सुपीक असेल तर फरक पडणारच आणि दोन्ही असेल पण वरुण राजाची कृपा नसेल तर व्यर्थ. त्यामुळे दैवाच्या भागभांडवलाची महती नाकारून चालणार नाही. डेटा शोधावा लागेल या काळात जन्मलेल्या किती व्यक्ती कोणत्या का होईना क्षेत्रात यश शिखरावर पोहचल्या आहेत.


प्रस्तुत कुंडलीत लाभेश मंगळ लग्नी रूचक योग करतो आहे जो त्यांना अधिपत्य, अधिकार, वर्चस्व देतो आहे. श्री. शिंदे १८ व्या वर्षा पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जात असे सांगीतले जाते. त्या दरम्यान कुणावर तरी झालेल्या अन्याय विरुद्ध लढतांना त्यांचा सामना स्वर्गीय श्री. आनंद दिघेंशी झाला. जातक त्यांच्या नजरेत भरला व त्यांनी जातकावर किसननगर, ठाणे शाखेचा प्रमुख म्हणून जबाबदारी दिली. हि घटना १९८४ ची २१ व्या वर्षाची सांगितली जाते. त्या वेळी त्यांना उच्चीच्या दशमेश शुक्राची महादशा चालू होती. अंतर्दशा बहुतेक स्वगृहीच्या लग्नेशाची असावी. शनि अंतर्दशा ३०/०९/१९८४ पर्यंत होती. कुंडलीत भाग्येश बुध लग्नी आहे हा एक उच्चदर्जाचा योग होतो आहे. निर्दोष योगकारक उच्चीच्या शुक्राची भाग्यावर दृष्टी, स्वगृहीच्या गुरूची भाग्यावर, लाभावर दृष्टी. असे भाग्यवर्धक योग कुंडलीत झालेले आहेत. शुक्र बलवान शनिच्या नक्षत्री तर गुरु भाग्येश बुधाच्या नक्षत्री. २५ व्या वर्षा पर्यंत शुक्र महादशा होती. दुसरा मैलाचा दगड म्हणजे १९९७ साली ३४ व्या वर्षी पहिल्यांदा नगरसेवकाचे तिकीट मिळाले व निवडून आले. चंद्र महादशेत राहू अंतर्दशा ३१/०८/१९९७ पर्यंत होती. चंद्र भाग्यसहम युतीत आहे. भावचलीतात हि युती लाभभावमध्यावर आहे. राहू षष्ठात उच्चीचा.

तिसरा मैलाचा दगड म्हणजे २००४ साली प्रथम विधानसभेचे तिकीट मिळाले. १३/१०/२००४ मतदान होऊन १७/१०/२००४ निकाल लागला व निवडून आले. मंगळ म.द. मंगळ अ.द. राहू विदशा ०९/१० ते ३१/१०/२००४ होती. रूचक मंगळाची महादशा, अंतर्दशा होती. या मंगळाची कमाल म्हणजे २००५ मध्ये शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. याचे महत्व म्हणजे शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा आमदार असणाऱ्या व्यक्तीला असे महत्वाचे पद मिळाले होते. त्यानंतर सलग २००९,२०१४,२०१९,२०२४ अश्या विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या. मंत्रीपद हि मिळाले. २००४ व २००९ च्या विधानसभा निवडणुका या मंगळ महादशेत झाल्या. मंगळ महादशा ऑक्टोंबर २०११ मध्ये संपली. चौथा मैलाचा दगड म्हणजे ३०/०६/२०२२ रोजी मुख्यमंत्री झाले व शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे अध्यक्षही. निवडणूक चिन्हंसहित पक्षावर आधिपत्य हे अचंभित करणारे यश लाभले ते राहू महादशेत केतू अंतरदशेत. षष्ठातील उच्चीच्या राहूची करामात.    

त्या काळात पाच पैकी चार ग्रह पंचमहापुरुष योग करण्यास सक्षम होते. त्यामुळे कोणतेही लग्न असले तरी किमान एक पंचमहापुरुष योग होणारच होणार. दशांचा क्रमहि तोच राहणार. मग हेच लग्न का? कोणतेही लग्न असले तरी वरील घटना त्याबर हुकुम सिद्ध करता येतील. तर मास्टर स्ट्रोक असा आहे कि वैदिक ज्योतिषात एक विधान आहे ‘व्ययातील केतू जातकाला आयुष्यात एकदा तरी प्रचंड वैफल्यग्रस्तता, वैराग्य देतो’. हे सर्वश्रुत आहे कि ०२/०६/२००० रोजी दोन आपत्यांचा डोळ्या समोर मृत्यू झाल्यावर श्री.शिंदे प्रचंड वैफल्यग्रस्त झाले होते. त्यांनी बाह्यजगाशी संबंध तोडले होते. दिघे साहेबांनी त्यांना यातून बाहेर काढले होते. मकर लग्नाला केतू व्ययात येतो. उपलब्ध माहितीच्या आधारे जन्मवेळ शोधण्याचा मी फक्त एक प्रयत्न केला आहे.

अनुमान:- श्री. शिंदे यांची जन्मवेळ सका. ०७:२०:३० असावी.  

पुढील लेख :- चुकीला माफी नाही.