मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

प्लॉट खरेदी - १/२

|| श्री ||


प्लॉट खरेदी १/२ 

मागील भागात आपण पाहिले कि श्री. सुहास गोखले सरांनी पाश्चात्य पद्धत वापरून विश्लेषण केले होते. या भागात आपण वाचणार आहोत त्यांनी याच प्रश्नाचे कृष्णमुर्ती पद्धतीने केलेले विश्लेषण.

भाग-२ 

प्रश्न: जातक एक जागा (प्लॉट) खरेदी करु ईच्छीतो आणि त्या संदर्भात त्याची जागा मालकाशी (विक्रेता) बोलणी चालू आहेत. हा व्यवहार होईल का, जागा खरेदी करता येईल का?

आता याच प्रश्नाची उकल आपण नक्षत्रपद्धतीने करण्याचा प्रयत्न करु:
जातकाने ज्या क्षणी प्रश्न विचारल्या त्या क्षणाची आणि ठिकाणाची निरयन, भावचलीत , प्लॅसीडस पद्धतीची पत्रिका शेजारी दिली आहे.
14 Oct 2019 , 16:41:36 , Nasik 73e48'00 19n59'00
Geocentric, Nierayan, Placidus, Meane Node, Ayanamsha: 24:02:35

नक्षत्र पद्धतीत सर्वप्रथम ‘चंद्रा’ ची साक्ष काढण्याचा प्रघात आहे. या चंद्राच्या स्थितीतून म्हणजेच चंद्राच्या कार्येशत्वा वरुन प्रश्न विचारते वेळी जातकाच्या मनात नेमके काय घोळत होते याचा काहीसा बोध होतो, जर चंद्राचे कार्येशत्व जातकाच्या प्रश्नाशी काहीसे मिळते जुळते असेल तर जातकाने प्रश्न अगदी मनापासून आणि तळमळीने विचारला आहे असे मानतात. यालाच पत्रिका ‘रॅडीकल’ आहे असे समजतात.  
अर्थात हे असे असले तरी ही काही अगदी निर्णायक अशी तपासणी नाही. प्रश्न विचारते वेळी जातकाच्या मनात  इतरही अनेक विचार असू शकतात, प्रश्न विचारणारा काळजीत असतो, काहीसा निराश असतो त्यामुळे स्वाभाविकच त्याच्या मनात एकाच वेळी अनेक विचारांचे / पर्यायांचे काहूर माजलेले असणे शक्य असते त्यामुळे कदाचित प्रश्नाच्या वेळी त्याच्या मनात दुसरा कोणतातरी प्रबळ विचार (डॉमिनंट थॉट) असला तरी त्यामुळे मूळ प्रश्नाचे गांभिर्य कमी आहे असे म्हणणे काहीसे अन्यायाचे ठरेल.
इथे चंद्र लग्नात आहे (१) , चंद्राची कर्क रास षष्ठम (६) स्थानावर आहे, चंद्र केतू च्या नक्षत्रात आहे आणि केतू दशमात आहे, चंद्राचे कार्येशत्व  १०/१/-/६ असे आहे.
आता जातक जागा खरेदी करणार आहे म्हणजे चतुर्थ  (४), लाभ (११) आणि व्यय (१२) भाव विचारात घ्यायचे.
चंद्राचे कार्येशत्व बघितले तर त्याचा मेळ ४,११, १२ शी बसत नाही. म्हणजे जातकाने तळमळीने प्रश्न विचारला नाही असे समजायचे का? चंद्राची साक्ष अशी प्रतिकूल असेल तर अनेक ज्योतिर्विद केस लगेचच बंद करतात, जातकाला काही काळानंतर, मन शांत करुन, प्रश्नावर मन केंद्रीत करुन प्रश्न विचारा असे सुचवतात.


मी चंद्राची साक्ष जरुर घेतो पण त्याचा फारसा ‘बाऊ’ करत नाही.  प्रश्न करते वेळी जातकाच्या मनात नेमके काय विचार चालू होते ही माहीती आपल्याला कळली आहे ही त्या प्रश्ना बाबतच्या पार्श्वभूमी चा एक भाग आहे असे समजून केस लगेच बंद न करता संशयाचा फायदा जातकाला देऊन पुढचे अ‍ॅनालायसीस करतो.    

जागेची खरेदी हा मुद्दा असल्याने चतुर्थ (४) भाव हा प्रमुख भाव म्हणून विचारात घ्यायचा, आता या पायरीवर या चतुर्थ भावाचा ‘सब’ तपासायचा. इथे चतुर्था (४) चा सब आहे ‘बुध’, या बुधाचे कार्येशत्व तपासायला लागेल.
बुध अष्टमात (८) आहे, बुधाची मिथुन राशी पंचम (५) भावावर तसेच चतुथ (४) भावावर पण आहे तर बुधाची दुसरी राशी , कन्या ही या पत्रिकेत लुप्त आहे त्यामुळे बुधाला फक्त मिथुनेचेच स्वामीत्व लाभलेले आहे. बुध गुरुच्या नक्षत्रात आहे, गुरु नवम (९) स्थानात असून , गुरु ची धनु राशी दशम (१०) आणि लाभ (११) स्थानांवर आहे  गुरुची दुसरी राशी , मीन ही या पत्रिकेत लुप्त आहे त्यामुळे गुरू ला फक्त धनेचेच स्वामीत्व लाभलेले आहे.
बुधाचे कार्येशत्व: ९ / ८ / --. १० , ११ / --,
“घटनेच्या संदर्भातल्या प्रमुख भावाचा ‘सब’ हा घटने साठी विचारात घेतलेल्या भावां पैकी एकाचा तरी कार्येश असावा.”
घटने संदर्भातल्या प्रमुख भावाचा म्हणजेच चतुर्थ (४) भावाचा सब ‘बुध’ हा ९, ,१०,११ , ५  या भावांचा कार्येश आहे आणि घटने साठी विचारत घेतलेले भाव ४, ११, १२ असे आहेत म्हणजे बुध हा चतुर्थ (४) आणि लाभ (११)  कार्येश असल्याने घटने संदर्भातल्या दोन भावांचा कार्येश आहे. याचा अर्थ घटने संदर्भातल्या प्रमुख भावाच्या सब चा होकार आहे.

सब चा होकार आहे असे असले तरी घटना घडणारच असा कयास आपल्याला निश्चितच करता येणार नाही.
नक्की काय याचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्याला आगामी काळात येणार्‍या दशा- अंतर्दशा आणि विदशा त्याच बरोबर ट्रांसिट्स पण तपासायला लागतात, हे सगळे जुळून आले तरच घटना घडेल असे म्हणता येईल. प्रश्नकुंडलीत, प्रश्न विचारते वेळी, केतू ची महादशा, रवीची अंतर्दशा चालू आहे.
महादशेचा प्रथम विचार करु. केतू महादशा १७ जानेवारी २०२५ पर्यंत चालणार आहे.
केतू दशमात (१०) आहे, केतूला राशी स्वामित्व नसते. केतू शुक्राच्या नक्षत्रात आहे, शुक्र अष्टमात (८) आहे , शुक्राच्या राशी त्रितिय (३) आणि अष्टम (८) स्थानावर आहेत , केतू गुरुच्या राशीत आहे आणि शनीच्या राश्यात्मक युतीत आहे. त्यामुळे गुरु आणि शनीचे कार्येशत्व देखील केतू ला मिळणार आहे.
केतू: ८ / १० / ३ , ८ / --
युती शनि: ८/ १० / ३ , ८ / १, १२
राशी स्वामी गुरु:  ८ / ९ / ४ , ५ / १०, ११ 
महादशा स्वामी केतू राहू च्या सब मध्ये आहे.
राहू चे कार्येशत्व:
राहू:  ४ / ४ / -- / --
दृष्टी  शनि: ८/ १० / ३ , ८ / १, १२
राशी स्वामी बुध: : ९ / ८ / --. १० , ११ / --,
महादशा स्वामी केतू चा सब राहू हा चतुर्थ (४) , लाभ (११) आणि व्यय (१२) अशा घटने संदर्भातल्या सर्वच भावांचा कार्येश होत आहे, ही एक चांगली बाब आहे. पण स्वत: महादशा स्वामी केतू घटने संदर्भातल्या लाभ (११) आणि व्यय (१२) स्थानांचा अगदी क्षीण असा कार्येश आहे, हे काही फार चांगले लक्षण मानता येणार नाही.
केतू महादशा फलदायी ठरेलकेतू कडे क्षीण कार्येशत्व तर आहे आणि सब राहू चांगला अनुकूल आहे, शिवाय महादशेची तब्बल पाच वर्षे शिल्लक आहेत, या महादशेत घटना घडू ही शकतेतेव्हा या संशयाचा फायदा जातकाला देऊन पुढे सरकू,
आता अंदर्दशा तपासायच्या .
प्रश्न करते वेळी रवीची अंतर्दशा चालू आहे आणि ती २१ डिसेंबर २०१९ पर्यंत चालणार आहे, हा कालवधी प्रश्न विचारल्या पासून सुमारे सव्वा दोन महीने आहे. जागेचा व्यवहार या सव्वा दोन महिन्यात होऊ शकतो.
अंतर्दशा स्वामी रवी चे कार्येशत्व: ७ / ७ / २ , ९ / ७
रवी गुरुच्या सब मध्येगुरु:   :  ८ / ९ / ४ , ५ / १०, ११ 
आता इथे अंतर्दशा स्वामी रवी स्वत: प्रश्ना संदर्भातल्या एकाही भावाचा कार्येश नाही आणि रवीचा सब गुरु जरी प्रश्ना संदर्भातल्या लाभ (११) आणि व्यय (१२) भावांचा कार्येश असला तरी ते अत्यंत दुबळे, क्षीण कार्येशत्व आहे. इतक्या कमकुवत आधारावर ही रवी अंतर्दशा फलदायी ठरेल? शक्यता नाही !
त्यामुळे आपण रवी अंतर्दशा सोडून देऊन पुढच्या चंद्र अंतर्दशेचा विचार करु.

ही चंद्र अंतर्दशा २२ जुलै २०२० पर्यंत चालणार आहे.
अंतर्दशा स्वामी चंद्राचे कार्येशत्व आपण या आधीच तपासले आहे:
चंद्र:  १०/१/-/६
चंद्र रवीच्या सब मध्ये आहे, रवी: ७ / ७ / २ , ९ / ७
इथे अंतर्दशा स्वामी चंद्र  प्रश्ना संदर्भातल्या एकाही भावाचा कार्येश नाही आणि त्याचा सब रवी पण प्रश्ना संदर्भातल्या एकाही भावाचा कार्येश नाही म्हणजे कोणत्याही अंगाने ही चंद्र अंतर्दशा फलदायी ठरणार नाही !
चंद्र अंतर्दशा सोडून देऊन पुढच्या मंगळाच्या अंतर्दशेचा विचार करावयाचा का?
चंद्र अंतर्दशा २२ जुलै २०२० पर्यंत चालणार आहे, म्हणजे हा कालावधी प्रश्न विचारल्या पासुन नऊ महिन्यां इतका आहे. मंगळाची अंतर्दशा त्यानंतर सुरु होईल.
साधारणत: प्रश्न कुंडलीचा आवाका तीन ते सहा महिने इतकाच असतो (ठेवावा) काही अपवादात्मक परिस्थितीत हा कालवधी वर्ष- दीड वर्ष इतका लांबवता येतो ही उदा: संतती विषयक प्रश्न, पण जातकाचा प्रश्न जागा खरेदी संदर्भात असल्याने त्या साठी नऊ महीन्यां पेक्षा जास्त कालावधीचा (म्हणजे मंगळ, राहू अंतर्दशां) विचार करण्याची आवश्यकता नाही. घटना घडणारच असेल तर ती रवी किंवा चंद्र अंतर्दशेतच घडेल अन्यथा नाही.

आपण बघितले की या रवी आणि चंद्र दोन्ही अंतर्दशा अनुकूल नाहीत, फलदायी नाहीत. त्यामुळे जातकाला अपेक्षीत असलेली घटना घडणार नाही.

जातकाला दिलेला निर्णय: जागा खरेदी होणार नाही.

शुभं भवतु 

पुढील लेख लवकरच.....  


सोमवार, २३ डिसेंबर, २०१९

प्लॉट खरेदी

|| श्री||


प्लॉट खरेदी १/१ 

ज्योतिष कुटप्रश्न ग्रुपवर बोलणी चालू असलेली जमीन खरेदी होईल का? असा एक प्रश्न विचारला होता. जातकाने मला प्रश्न विचारला तेव्हा त्यावर खूप काही काम मला करावे लागले नाही. जातकाला हवा त्या पेक्षा प्लॉट काहीशा कमी आकाराचा होता पण सध्या राहत असलेल्या परिसरातच असल्याने या बाबतीत तडजोडीची जातकाची तयारी होती. कागदपत्रांची तपासणी झाली होती. आता एवढे सगळे झाले होते म्हणजे जातकाची आर्थिक तजवीज असाणार हे उघड आहे आणि त्या प्रमाणे होते. खरे तर अश्या वेळी कुणी ज्योतिषाला प्रश्न विचारात नाही. पण प्रश्न आला होता आणि खोल विचार करण्याची आवशक्यता न पडता हा प्लॉट खरीदी होणार नाही हे मी दिलेले उत्तर बरोबर आले होते. नेहमी प्रमाणे ग्रुपवर उत्तर द्यायचा फारासा कुणी प्रयत्न केला नाही. श्री.संदीप काळे हे एकमेव प्रतिसाद देणारे ठरले. असो.
ग्रुप चे संस्थापक श्री. सुहास गोखालेसर यांनीही या प्रश्नावर विचार केला होता पण मुदतीत त्यांच्या कडून पोष्ट करायचे राहून गेले. त्यांनी ते मला वैयक्तिक पाठवले. त्यांनी पाश्च्यात्य व के.पी. दोन्ही पद्धतीने विस्तृत विवेचन केले. ते ग्रुप मध्ये तोडून तोडून द्यावे लागले असते. ब्लॉग वर देण्यास त्यांची हरकत नसल्याने सलग वाचण्या कराता मी ते येथे देत आहे त्यांच्याच शब्दात. 

भाग -१ 
जागा खरेदी होईल का?
ज्या प्लॉट बाबत बोलणे चालू आहे तो खरेदी होईल का?
१४/१०/२०१९ वेळ-१६:४१:३६
 प्रश्न पाहिला- १४/१०/२०१९, वेळ-१८:२८:११
के.पी. अयनांश:-२४/०२/१३, स्थानांश-७३/४८/१० पु. २०/०२/२३ उ.


प्रश्न: जातक एक जागा (प्लॉट) खरेदी करु ईच्छीतो आणि त्या संदर्भात त्याची जागा मालकाशी (विक्रेता) बोलणी चालू आहेत. हा व्यवहार होईल का, जागा खरेदी करता येईल का?

प्रथम या प्रश्नाची उकल आपण पाश्चात्त्य होरारी पद्धतीने करण्याचा प्रयत्न करु:

जातकाने ज्या क्षणी प्रश्न विचारल्या त्या क्षणाची आणि ठिकाणाची सायन, भावचलीत , प्लॅसीडस पद्धतीची पत्रिका शेजारी दिली आहे.
14 Oct 2019 , 16:41:36 , Nasik 73e48'00 19n59'00 Geocentric, Tropical, Placidus, True Node


काही प्रारंभिक तपासण्या;

१) जन्मलग्न २२ मीन ४६  आहे त्यामुळे ‘अर्ली असेंडं’ट किंवा ’लेट असेंडंट’ नाही.
२) शनि दशमात आहे ( म्हणजे तो लग्नी किंवा सप्तमात नाही !)
३) चंद्र व्हॉईड ऑफ कोर्स आहे का?
चंद्र २७ मेष २१ वर आहे आणि हा चंद्र त्याच्या सध्याच्या स्थितीतून मेष रास ओलांडे पर्यंत कोणत्याही ग्रहाशी कसलाही योग करत नाही म्हणजेच हा चंद्र व्हॉईड ऑफ कोर्स आहे.

चंद्र व्हॉईड ऑफ कोर्स आहे याचा सरळ अर्थ परिस्थिती जातका च्या हाता बाहेर गेली आहे, या परिस्थितीत जातका कडून करण्यास सारखे काहीही राहलेले नाही किंवा प्रश्नाचे उत्तर नकारार्थी मिळण्याची शक्यता जास्त आहे.
आता जातकाच्या प्रश्नाच्या अनुरोधाने पत्रिका अभ्यासू :
प्रश्न जागेच्या खरेदीचा आहे म्हणजे यात जातक (खरेदीदार) , विक्रता आणि जागा असे तीन तरी घटक विचारत घ्यावेच लागतील.

जातकाने “जागा खरेदी होईल का” हा प्रश्न विचारला आहे हे लक्षात घ्या म्हणजे ही जागा घेण्याचे जातकाने जवळजवळ निश्चितच केले आहे आणि आता फक्त हा व्यवहार होईल का नाही हे त्याला जाणून घ्यायचे आहे. काही वेळा जातक “ ही जागा विकत घेऊ का?’ असा प्रश्न विचारतो त्या वेळी जातकाच्या मनात त्या जागे बद्दल साशंकता असते, त्या धोका वाटत असतो म्हणजे जागा चांगली नसणे, जागे बाबत मह्त्त्वाची माहिती दडवलेली असणे, जागेचे मूल्य बाजारभावा पेक्षा जास्त असणे, जागेच्या कागदपत्रांत गडबड असणे असे अनेक बारकावे असू शकतात, त्यावेळी आपल्याला खरेदीदार , विक्रेता आणि जागा या बरोबर वर उल्लेख केलेले घटक पण विचारात घ्यावे लागतात. पण सध्या तरी आपल्याला त्याची आवश्यकता नाही, व्यवहार होणार का नाही इतकेच आपल्याला तपासायचे आहे,
आता आपण हया खेळात कोण कोण सहभागी आहेत याची एक यादी तयार करु.
प्रश्नकर्ता: (खरेदीदार) 
प्रश्नकर्ता नेहमीच लग्न स्थानावरुन पाहतात, लग्नेश आणि लग्नातले ग्रह प्रश्नकर्त्याचे प्रतिनिधीत्व करतात. त्याच बरोबर चंद्र हा जात्याच प्रश्नकर्त्याचा नैसर्गिक प्रतिनिधी म्हणून काम करतो. इथे जन्म लग्न ‘मीन’ आहे त्यामुळे मीनेचा स्वामी ‘गुरु’  हा प्रश्नकर्त्याचे म्हणजेच जातकाचे प्रतिनिधित्व करेल. लग्नात ‘चंद्र’ आहे त्यामुळे तो ही जातकाचे प्रतिनिधीत्व करणार आहे, तसा ही चंद्र जातकाचा नैसर्गिक प्रतिनिधी म्हणून येणार आहेच. लग्नात चंद्रा खेरीज इतर कोणताही ग्रह नाही. म्हणजेच लग्नेश गुरु आणि चंद्र हे दोघे जातकाचे प्रतिनिधत्व करतील.

जागा मालक (विकेता):
जागा विकत घेण्याच्या दृष्टीने जातक सध्या ज्या व्यक्तीशी बोलणी करत आहे ती व्यक्ती म्हणजेच विक्रेता, हा नेहमीच सप्तम (७)  स्थाना वरुन पाहतात. सप्तमेश आणि सप्तमातले सर्व ग्रह विक्रेत्याचे प्रतिनिधीत्व करतील. इथे सप्तम स्थानावर बुधाची कन्या रास आहे म्हणजे सप्तमेश ‘बुध’ विक्रेत्याचे प्रतिनिधीत्व  करेल. सप्तमात  ‘मंगळ’ आणि  ‘रवी’ पण आहेत म्हणजे ते दोघे ही विक्रेत्याचे प्रतिनिधीत्व करु शकतील. म्हणजे इथे विक्रेत्यासाठी बुध , रवी आणि मंगळ असे तीन प्रतिनिधी झाले आहेत. या पैकी एकाची निवड आपल्याला करावी लागेल.

इथे आपल्याला काही तारतम्य भाव वापरावा लागेल. विक्रेत्या बद्दल जर काही माहीती उपलब्ध असेल तर तिचा उपयोग इथे करता येईल. म्हणजे विक्रेत्या कोण आहे, कसा आहे, त्याचे व्यक्तीमत्व कसे आहे, त्याचा नोकरी व्यवसाय काय आहे हे जर कळले तर या तीन ग्रहां पैकी कोणत्या ग्रहाचे वर्णन आणि विक्रेत्याचे वर्णन जास्त जुळते ते पाहून आपल्याला या तीन पैकी नेमका एक ग्रह विक्रेत्याचा प्रतिनिधी म्हणून निवडता येईल. उदाहरणार्थ : विक्रेता प्रत्यक्षात सरकारी नोकरीतला, सरकारी कंत्राटदार, उच्चपदस्थ, राजकारणातला, धनाढ्य, सुखवस्तु असा असेल तर स्वाभाविकच ‘रवी’ त्या विक्रेत्याचे प्रतिनिधीत्व अधिक समर्पक रित्या करु शकेल, जर विक्रेता साधारण मंगळाच्या गुणधर्माचा, व्यक्तीमत्वाचा असेल म्हणजे काहीसा दांडगट, क्रुर, गुंड प्रवृत्तीचा किंवा पोलीस, लष्कर, तुरुंग, मशीनरी  अशा क्षेत्राशी संबंध असलेला किंवा जमीन खरेदी-विक्री , लँड डेव्हलपमेंट अशा क्षेत्रात काम करणार असेल, शेतकरी असेल, मुकादम, डॉक्टर , पशुवैद्यक असेल तर इथे ‘मंगळ’ जास्त समर्पक राहील. विक्रेता जर व्यापारात असेल किंवा लेखन , प्रकाशन , व्यवस्थापन, मार्केटींग अशा क्षेत्राशी संबधीत म्हणजेच ज्याला आपण बुद्धीजीवी वर्ग समजतो अशा क्षेत्रातला असेल तर असेल तर ‘बुध’ जास्त समर्पक होईल. पण विक्रेता कसा आहे याची माहीती उपलब्ध नाही. त्यामुळे या मार्गाने प्रतिनिधी निश्चित करणे शक्य होणार नाही. त्यामुळे सध्या हे तीनही प्रतिनिधी आहेत असे समजू , याबाबतचा अंतिम निर्णय आपण पत्रिकेतली इतर ग्रहस्थिती आणि ग्रहयोग पाहून काही काळाने घेऊ.

जागा:
जातक जी जागा विकत घेऊ ईच्छितो ती चतुर्थ (४) स्थानावरुन पाहतात, चतुर्थेश आणि चतुर्थातले ग्रह या जागेचे प्रतिनिधीत्व करतील. इथे चतुर्था वर मिथुन राशी आहे त्यामुळे मिथुनेचा स्वामी’ बुध’ जमीनीचे प्रतिनिधीत्व करेल. चतुर्थात राहू आहे पण पाश्चात्त्य होरारी अ‍ॅनालायसीस मध्ये  राहू आणि केतू या छाया ग्रहांचा वापर फारसा होत नसल्याने राहू ला जागेचा प्रतिनिधी मानता येत नाही. म्हणजे फक्त चतुर्थेश ‘बुध’ हा एकमेव ग्रह जागेचा प्रतिनिधी म्हणून येईल.
आता बुध हा जागेचा प्रतिनिधी झाल्यामुळे त्याला आता विक्रेत्याच्या प्रतिनिधी मंडळातले स्थान गमवावे लागेल. म्हणजेच आता मंगळ आणि रवी हे दोनच ग्रह विक्रेत्याचे प्रतिनिधीत्व करतील.

आता जरा या जातका कडे पाहा, गुरु आणि चंद्र हे जातकाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत, पत्रिकेकडे निट पाहीले तर लक्षात येते की जातकाचा प्रतिनिधी गुरु आणि विक्रेत्याचा एक प्रतिनिधी रवी यांच्यात अगदी नुकताच लाभ योग होऊन गेला आहे. विक्रेत्याचा दुसरा प्रतिनिधी मंगळ आणि जातकाचा प्रतिनिधी गुरु यांच्यात असे काही योग झालेले नाहीत. याचा अर्थ ‘रवी’ हाच ग्रह विक्रेत्याचे प्रतिनिधीत्व करेल. कारण जागेच्या बाबतीत जातकाचे आणि विक्रेत्याचे बोलणे नुकतेच झाले आहे, गुरु आणि रवी यांच्यात होऊन गेलेला लाभ योग हे त्याचेच द्योतक आहे. जातकाचा नैसर्गिक प्रतिनिधी चंद्र २७ मीनेवर आहे पण हा चंद्र २० मीने वर असताना त्याचा प्रतियोग विक्रेत्याचा प्रतिनिधी रवी शी झाला होता, म्हणजेच जातक आणि विक्रेता यांच्यामध्ये काहीतरी संवाद , वाटाघाटी झाल्या असाव्यात. रवी हाच विक्रेत्याचा प्रतिनिधी कसा यासाठीचे हे आणखी एक समर्थन.

आता जर ही जागा जातकाला खरेदी करता येणार असेल म्हणजे जागेचा व्यवहार होणार असेल तर जातकाचा प्रतिनिधी आणि जागेचा प्रतिनिधी यांच्यात कोणता न कोणता योग होणे आवश्यक आहे.
जातकाचे दोन प्रतिनिधी आहेत, गुरु आणि चंद्र या पैकी चंद्र हा व्हॉईड ऑफ कोर्स आहे म्हणजे चंद्र त्याची सध्याची मेष रास ओलांडे पर्यंत कोणत्याच ग्रहाशी कसलाही योग करत नाही त्यामुळे आपण फक्त जातकाचा दुसरा प्रतिनिधी गुरु आणि जमीनीचा एकमेव प्रतिनिधी बुध यांच्यात काही योग होत आहेत का तपासायचे . हा योग हे दोन्ही ग्रह आपापल्या राशीत असतानाच  होणे महत्त्वाचे.
जातकाचा प्रतिनिधी गुरु हा २० धनू १३ वर आहे तर जमीनीचा प्रतिनिधी बुध हा १४ वृश्चिक ४० वर आहे, या दोन ग्रहात फक्त एका राशीचे अंतर आहे, बुध जलद गतीचा ग्रह असल्याने तो लौकरच २०  वृश्चिक १३ वर येईल आणि तेव्हा तेव्हा या दोन ग्रहांत ३० अंशाचा योग होईल पण हा अगदी क्षुल्लक योग असल्याने होरारी मध्ये या योगाची दखल घेतली जात नाही म्हणजेच जातकाचा प्रतिनिधी गुरु आणि जमीनीचा प्रतिनिधी बुध यांच्यात कोणताही योग होत नाही. योग नाहीत म्हणजेच जातक व विक्रेता यांच्यात व्यवहार होणार नाही, जातकाला ही जागा खरेदी करता येणार नाही.

या प्रश्ना कडे आणखी एका अंदाजाने बघता येईल. समजा जातक ही जागा खरेदी करेल तर जातकाला त्या विक्रेत्याला पैसे मोजावे लागतील. म्हणजेच जातकाच्या पैशाचा प्रतिनिधी आणि विक्रेत्याच्या पैशाच्या प्रतिनिधी यांच्यात योग होतो आहे का असेही पहाता येईल. इथे द्वितीय स्थानावरुन जातकाचा पैसा आणि अष्टम स्थानावरुन विक्रेत्याचा पैसा बघायचा, द्वितिशेय मंगळ जातकाचा पैसा दाखवेल तर अष्टमेश शुक्र विक्रेत्याच्या पैशाचे प्रतिनिधीत्व करेल. मंगळ ६ तूळेवर आणि शुक्र ७ वृश्चिकेवर आहे त्यामुळे या दोघांत कोणताही योग होत नाही. म्हणजे या मार्गानेही आपल्याला नकारार्थी उत्तर मिळत आहे.

जातकाला दिलेला निर्णय: जागा खरेदी होणार नाही.