||श्री||
आमिष भाग -१

"त्या सटवी ला जाळ्यात ओढायला
माझाच पोरगा सापडावा का?" वृद्धा अतिशय संतापून बोलत होती, आधीच दुबळी असलेली ती माता तिच्या
आवाजात एरवी असलेला कंप अधिकच जाणवत होता. हात पाय थरथरत असले तरी डोळ्यात संताप
होता आणि भीतीही. मुलाच्या जीवनात काही तरी अघटीत घडते आहे त्याची दहशत एकंदरीत
दिसत होती. "सगळं काही संपलेला आहे, मी खात्री देतो ती आता परत येणार नाही, हे फायनल आहे." अवसान आणून तिचा मुलगा बोलत
होता. माध्यमातून आपण अशा अनेक घटना आता बघत असतो, वाचत असतो तरीसुद्धा यांच्या गळाला
मासा हा लागतो आणि आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी तो अजूनच त्यांच्या जाळ्यात फसत
जातो. एक मध्यमवयीन गृहस्थ हा आता गृहस्थ म्हणायचे लग्न जरी झाल नसल तरी वय तर
वाढलेलच आहे. सतराव्या वर्षी निमोनिया झाला त्यातून बरे झाले पण तब्येतीवर जो
परिणाम झाला त्यात कधी सुधारणा झाली नाही सव्वा पाच फूट उंची असली तरी तब्येत खूप
अशक्त होती पाठीत किंचितसा बाक आलेला. शिक्षण ठीक होते, एका सरकारी विभागात लिपिकाचे
काम (कंत्राटी) करीत होते. पगार पाणी तसं ठीक होते, घरची परिस्थिती उत्तम होती.
मोठ्या भावाच लग्न होऊन गेले तो स्वतंत्र राहत होता. यांच्या नावावर गावात मुख्य
ठिकाणी दुकान होते जे भाड्याने दिले होते. स्वतःचा फ्लॅट आहे अशी सगळी परिस्थिती
असूनही जातकाच काही लग्न होऊ शकल नाही. बराच वधूचा शोध केला गेला एखादे स्थळ
जमण्यासारखे वाटत असले तर काही वेळा यांच्याकडन पसंती होत नव्हती. सुरुवातीला
अपेक्षाही बऱ्याच असाव्यात असे वाटते आणि अशा रीतीने विवाह रखडत गेला. वाट बघून मग
लहान भावाचाही विवाह उरकला हे मात्र तसेच राहिले. तरीही वधूचा शोध चालू होता. विवाहा
नंतर लहान भाऊही वेगळा राहू लागला. वडील वारलेले असल्याने आता आई व हे गृहस्थ
दोघेच होते.
सकाळी उठून नित्य कर्म आटपून
कार्यालयात जाणे, सुट्टी झाली की येताना मध्ये थांबून गावातील प्रसिद्ध मंदिरात
जाऊन दर्शन घेऊन थोडा वेळ थांबून घरी येणे हा नित्यक्रम होता. अशातच एकदा
मंदिरामध्ये एका महिलेची ओळख झाली म्हणजे तिने स्वतःहूनच ओळख करून घेतली. उगीच
आपलं काहीतरी बोलायला सुरुवात केली. ती समाज कार्य करते असे तिने सांगितले.
पोलिसांच्या शांतता कमिटीवर ती आहे अशी स्वत:ची माहिती बोलण्याच्या ओघात तिने
दिली, आणि मग एके दिवशी विचारल भाऊ तुम्ही नेहमी मंदिरात येतात मी तुम्हाला नेहमी
बघते तुम्ही एकटेच असतात. काही दिवसांचा परिचय झालेला असल्यामुळे यांनी सांगितले
की मी अविवाहित आहे त्यावर त्या महिलेने सांगितले कि मी एक समाजसेवा म्हणून वधू वर
सूचक मंडळ चालवते, मी काही व्यवसाय वगैरे करत नाही. ओळखीपाळखीत कोणाचही कल्याण
व्हावं म्हणून सुचवते आपलं. तुम्ही तुमची माहिती माझ्याकडे द्या माझ्या संपर्कात
जर कोणी आलं तर मी तुम्हाला नक्की सुचवेल. त्यामुळे यांनी तिच्याकडे आपली माहिती
दिली.
काही दिवस गेले मंदिरात रोज भेट होतच होती परंतु त्यांनी काही विषय काढला
नाही. एके दिवशी एक मुलगी आहे ४० च्या आसपास आहे अविवाहित आहे, तेव्हा तुम्ही तिला
बघून घ्या आणि एक दिवशी बघण्याचा कार्यक्रम ठेवू असं बोलून तो विषय तिथेच संपला.
दोन-चार दिवसांनी हे खरेदीसाठी बाजारात फिरत असताना अचानक त्या महिलेशी भेट झाली.
त्यावर तिने सांगितले की काय योगायोग बघा जी मुलगी तुम्हाला दाखवायची होती ती आज
माझ्या बरोबरच आहे असं म्हणून जवळच काहीतरी खरेदीसाठी बघत असलेल्या एका महिलेला
तिने आवाज दिला आणि तिथे बाजारातच दोघांची ओळख करून दिली. मुलगी यांच्या उंचीला
साजेशी व सडपातळ (खरेत तर अशक्त), सावळी पण नाकी डोळी निट नेटकी होती. आपली
मंदिरात भेट होतेच हिचा बायोडाटा व फोटो घेऊन मी तुम्हाला देईल. त्याप्रमाणे दोन
एक दिवसांनी त्या महिलेने तिचा बायोडाटा व फोटो या गृहस्थांना दिला. मुलीला फक्त
आई आहे, तिचेही वडील वारले असून भाऊ, बहिण नाही. दोघांच्या मध्ये जाती विविधता
होती. या गृहस्थांची आई यासाठी काही तयार नव्हती. त्यावर त्या महिलेने यांना
सांगितलं की आता तुमचं वय पण खूप झालेला आहे कुठे जात पात पाहत बसतात. मुलीची काही
हरकत नाहीये तिला तुम्ही पसंत आहात, ती स्वतः कमावती आहे तेव्हा ही संधी आलेली आहे.
असं स्थळ तुम्हाला परत मिळणार नाही. बघा मी काय सांगते त्यावर तुम्ही विचार करा,
तुमची आई जुन्या मताची आहे परंतु तुम्ही तर या गोष्टीचा थोडासा विचार करून पाहायला
हवा. तुम्ही तुमच्या आईची समजूत काढा. मुलगी शिकलेली आहे, कमावती आहे तेव्हा बघा
तिला अनेक स्थळ सांगून येत आहे, त्यातील बहुतेक विधुर, घटस्फोटीत आहेत. एखादे
अविवाहित स्थळ आलेच तर नोकरी/धंदापाणी व्यवस्थित नाही. तुमच वय जास्त असल तरी
तुम्ही अविवाहित, सेटल आहात म्हणून तुम्हाला प्रार्थमिकता आहे. तुमचा निर्णय लवकर कळवा.
आईची तयारी नसल्यामुळे
त्या महिलेला घरी जाऊन रीतसर बघण्याचा कार्यक्रम काही झाला नाही. दरम्यान मध्यस्थ महिलेची
व या गृहस्थांची मंदिरात नेहमी प्रमाणे भेट होत होती. हे गृहस्थ ही नकार देऊ शकले
नाही, यांचीही घालमेल होत होती. त्यावर त्या मध्यस्थ महिलेने सांगितले की तुम्ही
दोघेजण एकदा भेटून घ्या, बोलून घ्या आणि मग आपण बघू काय करता येईल. त्याप्रमाणे त्यांची बाहेर भेट झाली,
मुलीने सांगितले की मला तुम्ही पसंत आहात. मध्यस्थ महिलेने सांगितले की तुम्हाला
मुलगी पसंत असेल तर आम्ही काही दिवस इतर स्थळ बघत नाही तुम्ही तुमच्या आईच मत वळवा.
दरम्यान त्या मुलीचं आणि या गृहस्थांच फोनवर बोलणे चालू झाले, बाहेर एक दोन गाठीभेटी
ही झाल्या आणि त्यानंतर काही दिवसांनी अचानक संपर्क तुटला. ती मध्यस्थ महिलाही
मंदिरात दिसली नाही आणि चार-पाच महिन्यांनी ती मध्यस्थ महिला पुन्हा यांना भेटली
भेटल्यानंतर ती यांना दमात घेऊ लागली. तुम्हाला जी मुलगी दाखवली होती तिने
आत्महत्या केली आहे व चिठ्ठी मध्ये तुमचे नाव लिहून ठेवलेले आहे. तुम्ही तिची
फसवणूक केल्याच म्हटलेल आहे. तिने लग्नासाठी बनवलेले सात-आठ लाखाचे दागिने तुमच्या
कडे दिले होते ते तुम्ही लंपास केले व विवाहाला नकार दिला. त्यामुळे नैराश्य मध्ये
तिने आत्महत्या केली असे यांना सांगितले. यांना एकदम धक्का बसला असे काही झालेच
नव्हते. हे गृहस्थ घाबरून गेले होते हे काय झाले. त्या मुलीची आई आता निराधार झाली
आहे, तुमच्यावर केस झालेली आहे आणि ती मध्यस्थी महिला यांच्याकडे पैशाची मागणी करू
लागली. नेमका त्या दिवशी पगार झालेला असल्यामुळे त्या महिलेने जवळजवळ तो यांच्याकडून
हिसकावूनच घेतला आणि परत भेटते अस सांगून ती निघून गेली.
नंतर दोन-तीन दिवसांनी ती
मध्यस्थ महिला यांना परत भेटली व तुमच्या विरुद्ध पुरावे असल्याच सांगू लागली. फोन
कॉलचे डिटेल, चॅट, हे त्या मुलीला नेहमी सार्वजनिक ठिकाणी भेटलेले होते त्या वेळी मध्यस्थ
महिलेने आणि तिच्या साथीदाराने यांचे गुपचूप फोटो काढलेले होते ते फोटो दाखवले. आता
हे घाबरून गेले, पण त्यात काही आक्षेपहार्य नाही असे म्हणताच तिने आवाज चढवला.
तुम्ही तिला भेटत होते, तिच्या संपर्कात होते हे दिसतंय ना. तिला लग्नाचे वचन
देवून तुम्ही लुबाडले. दागिन्यांची मागणी करू लागली. तिच्या बरोबर असलेल्या व्यक्तीने
यांची गच्ची धरून यांना ओढत मंदिरा बाहेर घेवून गेले. यांचे हातपाय लटपटू लागले.
“तुला मी चांगला माणूस समजले होते, म्हटलं आस्तिक, पापभिरू माणूस आहे, तू तर
भाड्या निघाला.” ती मध्यस्थ महिला एकेरीवर आली व शिवीगाळ करू लागली. तिने कोणाला
तरी फोन लावला व यांना बोलायला सांगितले. फोन वरील मनुष्य तो पोलीस असल्याचे सांगू
लागला. त्यानेही दम भरला, तुम्ही सुशिक्षित, नोकरपेशा व्यक्ती असल्याने मी नुसता
अर्ज घेतला आहे FIR केली नाही. तुमची नोकरी जाईल. दागिने परत करा व बाहेरच्या
बाहेर प्रकरण मिटवून घ्या. नाहीतर मला तुम्हाला अटक करावी लागेल. तुमच्या विरुद्ध
पुरावे आहेत, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तुमचे नाव व दागिण्याचा उल्लेख
आहे. त्या मध्यस्थ महिलेने दागिने अथवा ७ लाखांची मागणी केली व काही दिवसांची मुदत
दिली. तिच्या बरोबर असलेल्या व्यक्तीने यांचा मोबाईल व पाकिटातले पैसे काढून
घेतले.
तरीही दोनतीन दिवसांनी ती मध्यस्थ महिला अजून एका महिले सोबत यांच्या घरी
गेली. घरी आई एकटीच होती. बरोबरची महिला मुलीची आई असल्याचे सांगितले. तिने रडून
गोंधळ घातला. हिला दुसरा आधार नाही, तिचे हाल होत आहेत असे सांगून त्या दोघींनी
शिवीगाळ केली, अॅस्ट्रोशिटीची धमकी दिली, खर्चाला पैसे मागितले. आईने घरात असलेले
७/८ हजार दिले. यांनी ७ लाख देतो असे सांगितले, जमवा जमावी करावी लागेल असे
सांगितले. मध्यस्थ महिलेचे, तिची आई म्हणवनाऱ्या महिलेचे, पोलिस म्हणवनाऱ्याचे
मधून मधून धमक्यांचे फोन येत. ७ लाखांची व्यवस्था होई पर्यंत मुलीच्या आईला
खर्चाला महिन्याला १५ हजारांची मागणी केली. काही महिने यांनी पैसे दिले. पैसे
घेण्यासाठी ती मध्यस्थ महिला यांना बाहेर बोलवत. सुरवातीला दोन तीन वेळा यांना मी
अमुक पोलीस स्टेशनाला माझ्या समाजकार्या निमित्ताने आली आहे, पैसे घेवून ये, माझे
काम आटपतच आले मी बाहेर येते असे सांगत असे. हे गेल्यावर फोन केल्यावर कधी पोलीस
स्टेशनच्या आवारातून बाहेर येई तर कधी बाहेरच एखाद्या पोलिसाशी बोलत असल्याचे
दिसे. हिची पोलिसात वट असल्याच्या समजुतीतून आपण अधिक अडकून जाऊ या भीतीने हे
गृहस्थ या टोळी विरुद्ध तक्रार करायला घाबरत. पैसे देत असूनही नंतर ती मध्यस्थ
महिला यांच्या कार्यालयातही दोन एक व्यक्ती बरोबर जावून चढ्या आवाजात बोलणे, ७
लाखाचा तगादा लावणे असे प्रकार करू लागली. मुलीची आईही घरी जाऊन धमक्या देणे, तगादा
लावणे व दोनपाच हजार तरी आल्या सरशी परत घेवून जाणे असे करू लागली.
याला कंटाळून
यांनी एकदाचे मोकळे व्हावे म्हणून त्यांच्याच सल्ल्याने ७ लाख कर्ज काढून दिले. पण
प्रकरण संपले नाही. ही तर दागिन्यांची रक्कम आहे. आमच्या सोन्या सारख्या मुलीचा
जीव गेला, कमावती होती. तिच्या आईचे कसे होणार? असे म्हणून नुकसान भरपाईचे १० लाख
मागितले. चारपाच महिने झाले असतील बहुतेक परत १५ हजार महिना व पूर्वी सारखा
सिलसिला चालू झाला. त्या मध्यस्थ महिलेनेच “कुठून मला दुर्बुद्धी झाली व तुझी त्या
लेकराशी ओळख करून दिली. हे असले नीच धंदे करतो काय तू. माझी समाजसेवा माझ्या
चांगल्या गळयाशी आणली तू. तुझ्या मुळे माझी इमेज खराब होत आहे.” असा कांगाव केला. मी
आडलेल्यांचे कर्जाचे प्रकरण करून देत असते. परत कर्ज काढून त्या बिचाऱ्या माऊलीला
दे. माझ्या ओळखीत करून देते. कुठल्याश्या पतसंस्थेत तिने अर्ज करायला सांगितले.
त्यांनी ७ लाख कर्ज दिले. मी समजावते तिला एवढे घेवून मिटवून टाक म्हणून. असे
सांगून ते ७ लाख त्या मुलीच्या आईला द्यायला सांगितले. या ला हायसे वाटले. पण कसले
काय तीन लाखा साठी परत चालू झाले. काही महिन्यांनी परत महिना खर्चा साठी घरी, कार्यालयात
दबाव चालू झाला. माझा पगार हप्त्या पोटी जातो मी कुठून देवू? यावर xxx आधी विचार
का नाही केला, दागिने लुबाडले, पोरीचा जीव गेला तरी अजून तुझे समाधान नाही झाले
का? तिच्या आईचे काही बरे वाईट झाले तर तिची माणसे तुला जिता नाही सोडणार. माझ्या
समाजकार्याचे वजन वापरून मी तुला वाचवते आहे. पण किती दिवस, आता माझ्यावर येवू
लागले आहे. तुझ्या मुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मी दुकानाला गिऱ्हाईक
बघते. त्यातून तीन लाख देवून टाक. हे ऐकताच त्यांचे पार अवसान गळाले.
दुकान माझ्या
नावावर नाही असे म्हणताच मग घर विक असे सांगितले. आता मात्र याने घाई करून दुकान वाहिनीच्या
नावावर केले. त्या मध्यस्थ महिलेने मुलीच्या आईसह दुकानावर जाऊन गोंधळ घातला.
भाडेकरूने दुकान खाली करत असल्याचे सांगितले. त्यांच्या धमक्या, दबाव वाढले. घरावर
कब्जाच्या धमक्या सुरु झाल्या. शेवटी हिंमत करून यांनी पोलिसात तक्रार केली. आम्ही
तपास करतो, या फोटोत काही दम नाही. त्या मुलीने खरोखर आत्महत्या केली असती तर
केव्हाच तुम्हाला उचलले असते. अस काही नसेल. असे सांगून यांना परत पाठवले. तक्रार
झाल्याचे तिला समजले असावे दोन तीन दिवसांनी कहर झाला. ती मध्यस्थ महिला त्या
मुलीच्या आईसह अजून दोनचार महिला व पुरुषांना घेवून संध्याकाळच्या आसपास घरी
धडकली. त्या दिवशी सुट्टी असल्याने गृहस्थ घरीच होते. घर मालकाने मुलीच्या आईला
घरा बाहेर काढले आहे त्यामुळे ती आता इथेच राहील. यांनी नकार देताच सोबतचे लोक जे
बाहेर उभे होते त्यांनी सोसायटीत धिंगाणा घालायला सुरुवात केली. मोठ मोठ्याने
शिव्या देवू लागले. मुलीच्या आईने या गृहस्थांची गच्ची धरून यांना घरा बाहेर
ओढायला सुरवात केली. बाहेर घेवून चांगली कुटते, चपलेने पूजा घालते असे म्हणू
लागली. यांच्या आईने कसेबसे यांना एका खोलीत ढकलून दरवाजा बंद केला. दरम्यान
सोसायटीतील लोक जमा झाले तर त्यांना याने पोरीचा खून करून या बाईला रस्त्यावर आणले
असे सांगून मध्ये पडाल तर बघा. या बाईला तुम्ही संभाळणार का? सोसायटीतील कुणीतरी
पोलिसांना फोन करून दहाबारा महिला पुरुष येथे येवून दंगा करत असल्याचे कळवले.
पोलीस व्हॅन आल्यावर त्यातील महिला अधिक आक्रमक होऊन पुढे आल्या. पण महिला पोलीस
सोबत होतेच. पोलिसांनी त्यांना या गृहस्थांना आम्ही ताब्यात घेतो असे सांगून
परिस्थिती शांत केली. यांना पोलीस जीप मध्ये तर त्या सर्व मंडळींना व्हॅन मध्ये
टाकून घेवून गेले.
यांना एकट्यालाच वेगळ्या खोलीत बसवण्यात आले व बाकीच्यांचे
दुसऱ्या खोलीत जबाब घेण्याचे काम चालू केले. पण तिकडे काय चालले आहे यांना काही
समजत नव्हते. बहुतेक आपल्यला आता अटक होईल अशी यांना भीती वाटत होती. अर्ध्या एक
तासात त्यातील बहुतेक सारी मंडळीना हळू हळू पोलीस स्टेशन मधून काढून देण्यात आले.
मध्यस्थ महिला, मुलीची आई व एक पुरुष एवढ्याच जणांना तिथे थांबू दिले. अधून मधून
पोलीस यांच्या कडे येवून उलट सुलट प्रश्न विचारीत, तुमचे संबंध नव्हते तर पैसे का
दिले? म्हणजे तुमच्या कडून काही तरी घडले आहे, काय आहे ते आत्ताच कबुल करा जास्त
त्रास होणार नाही. वगैरे बोलून यांना अधिकच घाबरवत होते. मधेच एखादा जेष्ठ पोलीस
येवून “ओ साहेब घसरला असेल पाय तुमचा मी समजू शकतो ते मॅटर मॅनेज झाल असत, पण
आत्महत्या बेक्कार मॅटर.” हे ऐकून यांच्या पायाखालची जमीनच हादरली, अरे बापरे! देवा
रे देवा आता हे काय काढले अजून. ते तर दागीन्यांचा मॅटर म्हणत होते आणि हे तर.. बाप
रे बाप!. यांनी वकिलाचा विषय काढताच “तुम्ही तर काही गुन्हा केला नाही म्हणता मग
वकील कशाला? नाही देवू ना, देवू तुम्हाला वकील, देवू बर का.” तीन चार तास असे चालू
होते.
आता तर त्या तिघांनाही सोडून देण्यात आले. त्या नंतर दहा पंधरा मिनिटे हे
एकटेच होते. यांना बसवलेल्या खोलीत कुणीच आले नाही. हे फार अस्वस्थ झाले. बी.पी
वाढल्या सारखे वाटू लागले. यांची पाणी मागायचीही हिम्मत होईना. “तुम्हाला
साहेबांनी बोलावले” असी यांना हाळी दिली. उठल्यावर यांना गरगरल्या सारखे झाले. कसा
बसा धीर एकटवून हे साहेबां पुढे गेले. साहेबांच्या चेहऱ्यावर हास्य होते, पण तरीही
यांना घाम फुटला. चलबिचल वाढली. साहेबांच्या हास्याने यांच्या मनात उलट कुशंकाच येवू
लागल्या. “बसा बसा साहेब, शांत व्हा. अरे यांना पाणी द्या रे.” असे साहेबांचे
बोलणे एकूण त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसले. पाच एक मिनिटे साहेब काहीच बोलले
नाही. मोबाईलवर काही तरी पाहत राहिले. मग मोबाईल बाजूला ठेवून. “काय तुम्ही साहेब आं!
आहो आधीच तुम्ही तक्रार का केली नाही? तुमच्या सारखे सुशिक्षित लोक असे करतात आणि
डिपार्टमेंट बदनाम होते. हुशार, शहाणी, सुशिक्षित मानस तुम्ही आणि अमिषाला बळी
पडतात, आं!” यांना काही बोलायचे सुचत नव्हते व धीरही नव्हता. “घे रे तो पेपर इकडे.”
असे म्हणताच कारकुनाने एक पेपर साहेबांच्या हातात दिला. तो पेपर यांना देत साहेब म्हणाले
“आता इथून पुढे ते तुम्हाला कशलाही त्रास देणार नाही. त्यांनी तसे लिहून दिले आहे.
अन परत जर काही केले तर त्यांना सोडणार नाही, आत घालील xxxxना. आणि हो तुमचा वकिलाचा
व कोर्टाचा खर्च वाचवला बरका आम्ही हॅ हॅ हॅ हॅ... बर निघा आता तुम्ही.” फुटलेला
हुंदका कसाबसा आवरला तरी डोळ्यात पाणी तराळलेच. यांच्या कडूनही सहमतीने तोडगा
काढला असून मला तो मान्य असल्याने तक्रार मागे घेत असल्याचे लिहून घेतले. साहेबांचे
आभार मानून उठले पण अजूनही हातापायात त्राण नव्हते. बाहेर आले तर भाऊ व एकदोन परिचित
यांची वाट पाहत होते. घरी आल्यावर हाश हुश झाल्यावर "त्या सटवी ला जाळ्यात
ओढायला माझाच पोरगा सापडावा का?" इती आई. "सगळं काही संपलेल आहे, मी खात्री देतो ती आता परत येणार नाही, हे फायनल आहे." असे म्हणून
गृहस्थांनी तो पेपर आईला दाखवला. पेपर वाचल्यावर “हे ठीक आहे पण १७/१८ लाख गेले
असतील त्याचे काय? ते मिळतील ना? पेपरात तर या विषयी काहीच नाही.” असे म्हणून आई
भावंडांच्या तोंडा कडे पाहू लागली आणि भावंडे काही न बोलता आईच्या तोंडा कडे पाहत राहिली.
क्रमश:
पुढील भाग वाचण्या साठी खालील पुढील
लेखावर क्लिक करा, पण तत्तपूर्वी आलेला तणाव घालवण्या साठी, विरुंगुळ्यासाठी एक सुमधुर गाण्याचा आस्वाद घ्या सोबतच्या फोटोवर क्लिक करून. पुढील लेख :- आमिष भाग -२.