||श्री||
मागील लेख:- गुरु शनि - ग्रह युद्ध
ज्योतिष विदुषीची कुंडली.
महाराष्ट्र ज्योतिष परिषदेने या वर्षी निबंधा
साठी ज्योतिषी हा विषय दिला आहे. ज्योतिष शास्त्री पदवी प्राप्त व किमान दहा वर्ष
या व्यवसायात असलेल्यांच्या कुंडल्या घ्यायच्या हि अट आहे. ज्योतिष वर्गातील
विद्यार्थ्यांचे परदेशातील कुंडलीचे गणित घ्यायचे होते म्हणून मग मी हि अमेरिकेतील
ज्योतिष विदुषीची कुंडली उदाहरण म्हणून घेतली. गणितही होईल व निबंधा साठी उदाहरण
होईल असा दुहेरी हेतू.
सुश्री.कॅटी स्वीटमन, जन्म तारीख – १७/११/१९७८,
सका.९:४९ (प्रमाण वेळेत), लीवोनिया, मिशिगन, अमेरिका.
यांच्याकडे ज्योतिषशास्त्र वंशपरंपरागत
असावे कारण त्या स्वत: म्हणतात कि “मला आठवायला लागल्या पासून ज्योतिषशास्त्रात
रुची आहे. मी घरातील जीर्ण ज्योतिषशास्त्राच्या पुस्तकां सोबतच वाढले.” २०१० पासून
त्यांनी ‘सशक्तीकारक ज्योतिषशास्त्र’ घोषवाक्याने व्यवसायाला सुरवात केली. या
स्वत:ला परामानस माध्यम म्हणवतात. चला तर यांच्या कुंडलीतील योग बघुयात.
निरायन लग्न वृश्चिकेत २९०/३३’/४४” आहे. धार्मिक/अध्यात्मिकतेचे स्थान भाग्याचा स्वामी चंद्र जो मनकारक आहे तो गूढत्वाचे कारक स्थान अष्टमात असल्याने जातकाला ज्योतिष सारख्या गूढ गोष्टींची आवड निर्माण झाली. धर्म त्रिकोणातील लग्न व पंचम भावाचे स्वामी धर्म त्रिकोणात क्रमश: लग्न व भाग्य भावात आल्याने ज्योतिषशास्त्रास पूरक झाले. पूर्वपुण्याई/साधनेचे स्थान पंचमाचा स्वामी भाग्यात उच्चीचा हा एक उत्तम योग या दृष्टीने कुंडलीत झालेला आहे. या मुळे धर्म त्रिकोण बलवान झाला आहे. हा गुरु मित्र नवमांशी नवमांशातही भाग्य स्थानी आहे. गुरु व्दितीयेश,पंचमेश असून नवमात चतुर्थेश शनीच्या नक्षत्री असल्याने विद्या दर्शक २,४,५,९ या सर्वच भावांशी गुरुचा संबंध येतो आहे. भारतीय मान्यते नुसार ज्योतिष वेदाचे अंग आहे व वेदविद्येवर गुरुचा अंमल असल्याने जातकाने ज्योतिषविद्या यशस्वी रीत्या प्राप्त केली आहे.
ज्योतिष विद्येचा दुसरा मुख्य कारक ग्रह बुध हा गूढत्वाचा कारक
नेपच्यूनच्या अंशात्मक युतीत लग्नेश युक्त लग्नी असून बलवान गुरूशी नवपंचम योगात
आहे. येथे बुध हा गूढस्थान अष्टमाचा स्वामी असून स्वनक्षत्री आहे व तो लग्न भावमध्या
जवळ आहे. गुरूशी संबंधा मुळे सहजता आलेली
आहे. फलज्योतिषात बुध नेपच्यून युतीलाही महत्व आहे. नवमांशात हि युती वायू
तत्वाच्या कुंभ या ज्योतिषास पोषक नवमांशात आहे, तसेच दशमांशात हि कुंभ दशांशी लाभात
आहे. भावचलीतात हि युती लग्नभावमध्या जवळ आल्याने विशेष महत्वाची आहे.
जलतत्वाचा नेपच्यूनला वृश्चिक हि रास नैसर्गिक अनुकूल आहे. ज्योतिषाला वायू तत्वात असणे अनुकूल असले तरी भावचलीतात लग्नमध्यात आल्याने व वायू नवमांश, दशांश लाभल्याने नेपच्यून पोषक ठरतो आहे व बुध युती, व्दितीयेश गुरु शुभयोगात या मुळे फलज्योतिषात वाक् सिद्धीस तो अनुकूल झाला.
ज्योतिषाच्या कुंडलीत हर्शल वायूतत्वाच्या राशीत असणे चांगले असते, तसा तो या कुंडलीत तुळेत आहे. हा हर्षल नवमातील उच्च गुरुच्या नक्षत्रात विमला योगातील शुक्र युक्त आहे. क्षेत्र कुंडलीत जरी तो व्ययात असला तरी भावचलीतात तो लाभात आल्याने फलज्योतिषीचा व्यवसाय जातकास लाभदायक ठरला.
शुक्र हा मंत्र,तंत्र कारक मानला गेला आहे जो ज्योतिष व्यवसायास पूरक आहे. येथे तो विमला योगात असल्याने एकप्रकारे राजयोग निर्माण करत आहे. शुक्र हि भावचलीतात लाभात गेल्याने व दशमांशांत उच्च दशांशी भाग्यसहम युक्त असल्याने जातकास सहजगत्या या व्यवसायात चांगले लाभ करून देत असणार.
धार्मिक/अध्यात्मिक अंग असणाऱ्या या ज्योतिष व्यवसायात जातकाला यश
मिळण्याचे एक कारण म्हणजे भाग्यसहम भाग्यात उच्च गुरु युक्त आहे. भावचलीतात जरी हि
जोडी अष्टमात गेली असली तरी अष्टमस्थान गूढस्थान असल्याने फारसे काही बिघडत नाही.
चंद्र हा ज्योतिष कारक बुधाच्या वायूतत्वाच्या मिथुन राशीत लग्नेश मंगळाच्या नक्षत्री आहे जो ज्योतिषशास्त्रा सारख्या गूढशास्त्राची आवड जातकात निर्माण करतो आहे. चंद्र-बुध, चंद्र-मंगळ यात षडाष्टक सारखा अशुभ योग होतो आहे जो ज्योतिष गणिता करीता चांगला नाही, परंतु लग्नेश मंगळ युक्त लग्नातील बुधाने हि कमतरता भरून काढली आहे. शिवाय चंद्र नवमांश कुंडलीत भाग्यात मंगळाच्या नवमांशी आहे तर दशमांश कुंडलीत स्व दशांशी रवी युक्त चतुर्थात आहे.
ज्योतिष व्यवसायाचा विचार करता दशमेश रवी, लाभेश बुध हे लग्नी लग्नेश मंगळाच्या सहवासात आहे. या त्रिग्रही च्या नवपंचमात पंचमेश उच्च गुरु भाग्यात असल्याने लग्न, भाग्य, दशम, लाभ हि स्थाने सांधली जाऊन यश प्राप्त होत आहे.
दशमांश कुंडली:- दशमेश रवि कर्क नवमांशी उपासनेचे स्थान पंचमात आहे. दशमांशातही रवि कर्क दशांशी चतुर्थात चंद्र युक्त आहे. दशमांश दशमावर रवीची दृष्टी आल्याने जन्म दशमेश दशमांश दशमाशी संबंधित झाला तर दशमांश दशमेश शनि जन्मकुंडलीत दशमात आहे. व्यवसाय दर्शक सप्तमावर शनिची दशम दृष्टी आहे. दशमांशात शनि लाभात आहे. दशांश लग्नेश मंगळ भाग्यात, भाग्येश गुरु पंचमात व त्याची नवम अमृत दृष्टी लग्नावर व पंचम अमृत दृष्टी लग्नेश मंगळ आणि स्वदशांशा वर आहे. त्या मुळे जन्मकुंडली प्रमाणेच दशमांशातही धर्म त्रिकोणातील स्वामी मंगळ, गुरु धर्मत्रिकोणा संबंधित झाल्याने धर्मत्रिकोण बलवान होऊन जातक ज्योतिष व्यवसायात कार्यरत आहे. दशमांशातही ज्योतिष विद्या कारक गुरु धर्मस्थान व दशमाशी संबंधित झाला आहे. येथे तो नवमेश असून दशमेश शनीशी प्रतियोग/दृष्टी परिवर्तनात असल्याने (दशमांशात धर्मकर्माधी योग झाला असे म्हणता येईल. पण हे योग जन्मकुंडलीत पाहिले जातात.) धर्म कर्म स्थाने सांधली जाऊन जातक ज्योतिष व्यवसायात आहे.
Empowering Astrology या शीर्षकाखाली जातकाने २०१० साली व्यवसाय चालू केला. गुरु महादशेत चंद्र भुक्ती १८/१०/२००९ ते १७/०२/२०११ दरम्यान होती. गुरु जन्मकुंडलीत नवमात उच्चीचा, नवमांशात नवमात मित्र नवमांशी तर दशमांशात नवमेश असून पंचमात मित्र दशांशी आहे. भूक्तेश चंद्र जन्म अष्टमात, नवमांशात नवमात गुरु युक्त तर दशमांशात स्वदशांशी चतुर्थात पंचमेश रवी युक्त आहे. दशमांशात गुरु दशमेश शनीच्या दृष्टीत तर चंद्राची दशमावर दृष्ट या मुळे गुरु दशा चंद्र भूक्तीत ज्योतिष व्यवसायाचा शुभारंभ झाला.
गुरु २०१० साली कुंभ व मीन राशीत होता. २ मे ला
तो मीनेत आला व २ नोव्हे. ला वक्री गुरु कुंभेत आला तर ६ डिसें. ला परत मीनेत.
दोन्ही गुरु जातकाला अनुकूल होते. कुंभेतील गोचर गुरु चतुर्थात असल्याने दशमावर
दृष्टी असलेला दहावा गुरु होता तर मिनेतील गोचर गुरु पंचमात असल्याने भाग्य,
लाभावर दृष्टी असलेला आकरावा गुरु होता. दोन्ही कडून गुरु व्यवसाय दृष्ट्या अनुकूल
होता. शनी या वर्षी कन्येत होता. त्याची दशमेश रवि, पंचम स्थान, भाग्येश चंद्रा वर
दृष्टी होती. शनि जन्मदशमस्थ आहे. BA in
Communications and Studio Art पदवी
घेतलेली जातक वेब व ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत होत्या. गोचर शनि ची जन्मस्थ
दशमेश रवि वर दृष्टी ने व्यवसायात बदल घडवत जन्मस्थ अष्टमातील नवमेश चंद्र व
पंचमावरील दृष्टी संबंधातून ज्योतिष व्यवसायात आल्या. धन्यवाद.


