गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

गुरु शनि - ग्रह युद्ध

 || श्री ||

मागील लेख:- Hour आणि होरा.


गुरु शनि - ग्रह युद्ध






नुसत्या डोळ्यांनी गुरु शनि युती अशी दिसली. (वरील चित्रात पिवळ्या वर्तुळात.) शनीची कडा दुर्बिणीतून दिसते. त्या मुळे शनिची कडा स्पष्ट दिसणारे फोटो हे बनावट आहेत. निदान मोबाईल किंवा साध्या कॅमेरात तरी शनीची कडा येणार नाही. युती पूर्वीचा एक फोटो खाली देत आहे. दोन्ही फोटो इंटरनेट वरून साभार.  





आज दिनांक २१/१२/२०२० ला गुरु शनी युतीची ज्योतिष वर्तुळात चर्चा चालू आहे. आपणही या वर काही बाही लिहावे असे स्फुरण चढल्याने लिहिता झालो. शनी गुरूची हि युती क्रांतीसाम्यासह आहे. गुरु शनीची हि नुसती युती नाही तर हे ग्रह युद्ध आहे. जेव्हा दोन ग्रहांची युती होते व परस्परांच्या बिंबमध्यात दक्षिणोत्तर अंतर हे एक अंशा पेक्षा कमी असते तेव्हा ग्रह युद्ध झाले असे म्हणतात. गुरु शनीच्या बिंबमध्यात आज ६ कलांच्या आसपास इतके कमी अंतर आहे. त्यामुळे आज जी युती झाली ती ग्रहयुद्ध आहे. कोणत्याही युद्धा प्रमाणेच या युद्धातही कोणीतरी जयी होणार आहे. याचेही काही नियम आहेत. उत्तरे कडील ग्रह हा जयी असतो. गुरूची दक्षिण क्रांती २०/३०/४८ तर शनीची दक्षिण क्रांती २०/२४/४९ आहे अशी माहिती मिळाली. म्हणजे यात शनि उत्तरे कडे आल्याने तो जयी झाला. थांबा अजून अंतिम निर्णय झाला नाही. दुसरा नियम असा आहे कि जर दक्षिणेकडचा ग्रह जास्त तेजस्वी असेल तर तो जयी होतो. गुरु हा शनि पेक्षा जास्त तेजस्वी आहे त्यामुळे या ग्रहयुद्धात गुरु हा जयी झाला. मेदनिय ज्योतिषात ग्रह युद्धाकडे भूतलावरील युद्धाचे प्रातिनिधिक म्हणून पाहिले जात. 

ग्रहयुद्धांचे परिणाम लगेचच दिसतील असे नाही. ग्रहणाच्या फलिते ग्रहणाच्या आधी नंतर सहा सहा मिहीने कालावधीत अनुभवास येतात असे जाणकारांचे म्हणणे आहे. ग्रहयुद्धांचेही असेच समजायला हरकत नाही.

जातक पारिजात अध्याय दुसरा श्लोक १८ मध्ये ग्रहांच्या अवस्थांचे वर्णन करतांना ग्रहाभिभूतस्त्वतिपीडित  असे म्हटले आहे. ग्रहाभिभूत म्हणजे ग्रहाने झाकलेला. यानुसार एखादा ग्रह दुसऱ्या ग्रहाने झाकलेला असल्यास तो ग्रह पिडीत होतो. एक ग्रह दुसऱ्या ग्रहाने ग्रहयुद्धात झाकला जातो. म्हणजे शनि फक्त पराजित नसून पिडीतहि आहे. ग्रह युद्धाचे जे चार प्रकार आहेत, त्यातील सर्वात परिणामकारक भेदग्रहयुद्ध शनी गुरु मध्ये झाले आहे. ग्रह सूर्या भोवती भ्रमण करतात, या क्रियेत त्यांचे एकमेका मधील अंतर कमी जास्त होणे अपरिहार्य आहे, त्यात एवढे काथ्याकुट का करायचा असे वाटणे स्वाभाविक आहे. पण येथे आपण केवळ खगोलशास्त्राच्या दृष्टीने पाहत नाही तर आपला मंच ज्योतिषशास्त्राचा आहे तेव्हा त्या दृष्टीने पहाणार. या अगोदर १६२३ मध्ये अशी युती झाली होती, म्हणजे ३९७ वर्षांनी अशी युती होते आहे. दुर्मिळ खगोलीय घटनांचे परिणाम जातकात पाहण्या पेक्षा मेदनियेत पाहिले जात असत. सध्या पूर्ण जगापुढे असलेले संकट म्हणजे कोरोना महामारी. या दृष्टीने हि युती काय परिणाम करू शकते? त्याचा अंदाज लावू या. शनी हा मृत्यूकारक आहे तर गुरु हा जीव कारक. शनी गुरुच्या या युद्धात गुरु जयी आहे हे आपण आधी पाहिले आहेच. नेमके हि युती होण्या पूर्वी काहीच दिवस आगोदर या रोगाचे लसीकरण काही देशात चालू झाले. ज्या संस्था लस तयार करीत आहेत त्यातील बहुतांशी संस्थांनी संशोधन पूर्ण झाले असून वापरास तयार असल्याचे सांगितले आहे. जयी गुरुचा हा परिणाम म्हणता येईल. पण ज्या राशीत हि युती झाली त्या मकर राशीत गुरु नीचेचा आहे. कालपुरुष कुंडलीत हि रास दशम केंद्रात आली त्यामुळे गुरु निचभंग योगात आहे. रविच्या उत्तराषाढ नक्षत्रात कुंभ नवमांशी हि युती झाली आहे. त्या मुळे गुरु जरी जयी व निचभंग योगात असला तरी शनिचा प्रभाव आहेच. लसीकरण सुरु होतेय तोच युतीच्या एकदोन दिवस आधीच ब्रिटन मध्ये या कोरोणा संसर्गाचा नवीन घातक प्रकार उदयास आल्याची बातमी आली व आजच (२३/१२/२०२०) हा लेख लिहित असतांना अफ्रिकेतही या रोगाने आपले स्वरूप बदलले असल्याचे निदर्शनास आल्याची  बातमी आली. संशोधित लसी या नवीन प्रकारांवर परिणाम कारक ठरतील का? हि एक चिंता निर्माण झाली. पण मला वाटते या लसी काही बदल करून उपयुक्त ठरतील, कारण जीवकारक गुरु जयी असून त्याची षष्ठावर दृष्टी आहे. दुसरे म्हणजे ज्या नक्षत्रात हे ग्रहयुद्ध झाले तो रवी पंचमेश असून षष्ठेश बुध त्याच्या अंशात्मक युतीत असल्याने अस्तंगत आहे.  पंचमेश रवी व जीव कारक गुरु बली झाल्याने जागतिक कोरोणा महामारीवर संशोधित लसी यशस्वी होतील असा अंदाज आहे. गुरु जरी जयी असला तरी तो दक्षिणे कडे असल्याने शनि च्या प्रभावामुळे कोरोणाचे नवे प्रकार येत असले तरी शेवटी जयी तो जयी असल्याने त्यावरही मात होईल. अर्थात येथे आपण एकांगी विचार करतो आहोत पण आजचा आपला विषय गुरु शनि ग्रहयुद्ध असल्याने असे करणे क्रमप्राप्त आहे. गुरु शनि दोघेही न्याय, कायदा यांचे कारक आहे. त्यामुळे जागतिक न्याय, कायदे कानून यांवर नेमका काय परिणाम होईल सांगणे अवघड जातेय. सामान्यात: गुरु कायदे करणारा तर शनि त्या नियम कायदे बर हुकुम पालन व दंडाधिकारी असे म्हटले जाते. त्यामुळे कायदे कानून पालन यशस्वी न झाल्याने नवे कायदे कानून निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचे कारण मकरेचा शनि वादविवाद करणारा असतो तर मकरेचा गुरुच्या त्याच्या कारकत्वात दांभिकत्व येते. प्रादेशिक कायदे व धार्मिक कायदे यांत उल्लेखनीय संघर्ष संभवता.


ग्रह युद्धाकडे भूतलावरील युद्धाचे प्रातिनिधिक म्हणून पाहिले जात अस मी वरती म्हटले आहे. यात साधा सरळ हिशोब असतो तो म्हणजे जयी ग्रहाच्या अमंलाखालील देशाचा विजय होतो. जगभरातील कोणते देश प्रदेश शनीच्या व गुरुच्या अमंलाखाली आहेत त्यांची यादी करून त्यांच्यात जर काही संघर्ष मग कोणताही असो व्यापारी, सामरिक त्याचा अंदाज करता येईल. पण हे काम सोपे नाही. कारण देश-प्रदेशाच्या राशी यात मतांतर आहेत. आपआपल्या अनुभवा वरून त्या ठरवल्या गेल्यात. कुण्या एके काळी आपल्या कडे प्रदेशाच्या शासकाच्या राशी वरून या बाबत अंदाज वर्तवित. दुसरा मार्ग म्हणजे खगोलीय घटना घडली त्या वेळची त्या त्या प्रदेशातील क्षेत्र कुंडली बनवून अंदाज वर्तवणे. या पदधतीने बऱ्याचदा खगोलीय घटनेचे वेग वेगळ्या प्रदेशात भिन्न भिन्न अनुभव का येतात याचे उत्तर मिळते. तर आपण आता भारता कडे वळू.


गुरु शनी युती हि भारतात सुर्यास्ता नंतर साधारण १ तास दिसली. पण अंश कला विकलात्मक गणितागत युती भारताची राजधानी दिल्ली (७७/१२/२९पु. २८/३७/०२उ.) येथे रात्री ११:४०:४३ ला दाखवते. त्या वेळी सिंह क्षेत्र कुंडली येते. म्हणजे राजधानीच्या षष्ठात हि युती झाली. देशाचे शत्रू प्रबळ होऊन धूर्त खेळी करण्याची शक्यता असेल. कपट कारस्थान होईल. अचानक एखादे आर्थिक संकट, कोंडी शत्रू कडून केली जाऊ शकते. या वर पारंपारिक नीती, ज्ञान विद्वत्ता, बल या व्दारे मात केली जाईल. पाकिस्तान पेक्षा चीन वर बारीक लक्ष ठेवावे लागेल. कारण सनातन भारत हा शनीच्या अंमलाखाली येतो असे बहुतेक ज्योतिर्विदांचे मत आहे. तर चीन गुरुच्या अंमलाखाली येतो. भारताच्या धनु व मीन राशी मानणारे हि आहेत म्हणजे गुरुच्या अंमलाखाली. भारताची विद्वत्ता, शहाणपण, ज्ञान यामुळे असे मानले जाते. पण स्वतंत्र भारताची रास कर्क आहे म्हणून मी सनातन भारताची रास (धनु/मकर/मीन) मकर आहे असे म्हटले. ग्रहयुद्धात शनी पराजीत झाल्यावर भारताला नुकसान झाल्याचा अनुभव फेब्रुवारी २०१९ मध्ये आला आहे. ब्लॉग वरील ‘राष्ट्रशल्य’ हा लेख वाचावा. (लिंक - https://parisastrologer.blogspot.com/2019/02/18.html ) त्या वेळी शनी शुक्रा कडून पराजीत झाला होता. चीनची तूळ रास हि काही जन सांगतात, असो. आताच्या सिंह क्षेत्र कुंडलीत ६,८,१२ स्थाने संबंधित झाली आहेत त्यामुळे त्रासातून सुख, वाईटातून चांगले असा अनुभव संभवतो. शासकांना त्यांच्यातील काही जणांनकडून विरोध होऊ शकतो. विरोधकांना काही नुकसान संभवते. कर्क लग्ना नुसार शेतकरी आंदोलनातून जनतेला दिलासा मिळेल असे वाटते. २४ डिसेंबर नंतर सरकार या बाबत काही धाडशी निर्णय घेण्याची शक्यता आहे. काही कार्यवाही घडू शकते. गुरु शनि ग्रहयुद्धाचा परिणाम २/४/२०२१ पर्यंत संभवतो. धन्यवाद

पुढील लेख:- ज्योतिष विदुषीची कुंडली.
  



गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०

Hour आणि होरा

 

 || श्री ||

मागील लेख:- सोमवार नंतर मंगळवारच का?

Hour आणि होरा

आपल्या या समुहात मी लिहिलेल्या वारांचा क्रम असाच का? अश्या स्वरूपाच्या प्रश्नाच्या उत्तरा दाखल लिहिलेल्या लेखावर एक माहिती वजा प्रश्न केला गेला. तसे तर या प्रश्नावर चार दोन ओळी लिहिल्या होत्या. पण या वर अजून लिहिता येण्या सारखे आहे असे वाटल्याने ते भाष्य (comment) पुसून टाकले व स्वतंत्र लेख लिहिला. प्रथम प्रश्न सांगतो.

“hour हा शब्द होराचा अपभ्रंश असावा काय?”

= श्रीमान असू शकतो. पण एका होराचा कालमान हा दिनमानानुसार रोज बदलत असतो, तर एका Hour चा कालमान नित्य असतो जसे हिंदू घटी नित्य आहे. पाश्चात्य Hour व हिंदू घटी यांचे कालमान नित्य असले तरी यांचे कालभाग भिन्न आहे, तर पाश्चात्य hour व हिंदू होरा यांचा हि कालभाग भिन्न आहे. मात्र विषुवदिनी पाश्चात्य hour व हिंदू होरा यांचा कालभाग समान येतो.

Hour हा शब्द लॅटीन भाषेतून घेतला आहे. आणि लॅटीन भाषेत Hour हा ग्रीक भाषेतील Hora चे अपभ्रंश आहे. ग्रीक भाषेत Hora हे HORAI /Horae (होराई) या शब्दा वरून आले आहे. होराई ही निसर्ग न्यायदेवता आहे, आपल्या कडील वनदेवी प्रमाणे. वनदेवी प्रमाणेच होराई एक संज्ञा आहे. वेग वेगळ्या होराई आहेत. त्यांच्या संख्या बाबत एक मत नाही पण मुख्य १० सांगतात. तशी थोडी गुंतागुंत हि आहे. होराई हे नैसर्गिक गुणांचे व्यक्तीकरण(मूर्तीकारण) आहे असेही म्हणतात. यात काही ऋतुंच्या देवता आहेत. थेरोस(Theros) हि उन्हाळ्याची होराई आहे, ऐर(Eiar) हि पावसाळ्याची. दिवसातील वेग वेगळ्या भागांवर त्यांचा अधिकार सांगतात. उदा. ऑगे(Auge) ही तांबड फुटण्याची होराई आहे.(आपल्या कडे सूर्यदेवाचे सारथी अरुण या भागाचे देवता आहे.) अँटोलीया (Anatole or Anatolia) हि सूर्योदया काळाची होराई आहे. मेसेम्ब्रीया (Mesembria) हि मध्यान्हाची होराई आहे. अश्या १२ होराई आहेत.


 हिंदू पुराणा प्रमाणेच ग्रीक पुराण हि रोचक व उत्कंठावर्धक आहे. Hour ची नाळ ग्रीक सभ्यतेशी जोडत असले तरी एका गोष्टी मुळे तो हिंदू होरातून आल्याच्या दाव्याला प्रबळ पुष्टी मिळते. मागील लेखात (सोमवार नंतर मंगळवारच का येतो?) आपण पाहिले कि हिंदू ज्योतिषात होराचे स्वामित्व हे मंदात शिघ्र या क्रमाने दिले आहे. Hour ला हि पाश्चात्यांनी असे स्वामित्व दिले आहे, त्याच बरोबर त्यांनी प्रत्येक Hour चे व्यक्तिमत्वकरण / मूर्तरूपकरणही केले आहे. त्यांनी ग्रहांचा क्रम रवी, शुक्र, बुध, चंद्र, शनि, गुरु, मंगळ असा घेतला आहे. हा क्रम घेण्या मागचा त्यांचा तर्क काय या बाबत माहिती नाही. पण या ग्रहांचा मूर्तरूपकरणात वापर केला आहे. उदा. पहिल्या Hour चे वर्णन पहा. याचा शासक ग्रह सूर्य आहे.

Represented as a young girl, her head adorned with light flowing hair; she is clad in a short dress of rose-colour, resembling the tints of the clouds before the rising of the sun; her wings are like those of a butterfly, and she holds the Sun and a bunch of full-blown roses.

युवती प्रतीचित्रित आहे. तिचे डोके तलम मुलायम केशारंभाने सुशोभित झाले आहे. उगवत्या सूर्या समोर पसरलेल्या ढगांवरील रंगछटे सदृश्य गुलाबी रंगाचा अखूड पेहराव तिने परिधान केला आहे. फुलपाखरा सारखे तिचे पंख आहेत. तिने सूर्य व पूर्ण उमललेल्या गुलाबांचा गुच्छ धारण केला आहे.

दुसऱ्या Hour चे वर्णन पहा, याचा शासक ग्रह शुक्र आहे.

Appears to have wings like the preceding; her hair is of a darker hue, and her dress of a deep gold colour; she is surrounded by light clouds, indicating the vapours which the sun exhales from the earth; her attributes are the planet Venus and a sunflower.

मागच्या Hour प्रमाणे पंख असलेली. तिचे केस गडद रंगाचे आहेत आणि तिचे वस्त्रही गडद सोनेरी रंगाचे आहेत. हलक्या ढगांनी तिला वेढले आहे जे सूर्याने पृथ्वी वरून शोषलेल्या बाष्पाचे प्रतिक आहे. तिचे गुणधर्म हे शुक्र ग्रहा प्रमाणे व सूर्यफुला प्रमाणे आहेत.

आपल्या हिंदू होरा प्रमाणे सात दिवस सूर्योदयी वेग वेगळे होरास्वामी नसून १ ते २४ Hour स्वामी रोज तेच असतात.

आता गंमत बघा पाश्चत्य सभ्यतेत दिवसाची सुरुवात मध्यरात्री पासून करतात. बरोबर ना?  पण पहिला Hour हा सूर्योदयाचा आहे. जर Hour हा शब्द ग्रीक मधून लॅटीन मार्गे आला आहे तर ग्रीक कालमापनात दिवसाचे १२ च भाग होते. Hour तर हिंदू होरा प्रमाणे २४ आहेत. आहे कि नाही गंमत? आणि आपल्या कडचे त्यांच्या कडचे शिकून शहाणे झालेले पुरोगामी आपल्याला प्रतिगामी, गावंढळ, अवैज्ञाणिक, तर्कहीन, अंधश्रद्धाळू संबोधतात. ना इकडचा अभ्यास ना तिकडचा.

पुढील लेख:- गुरु शनि - ग्रहयुद्ध 

 

 

 

रविवार, १३ डिसेंबर, २०२०

“सोमवार नंतर मंगळवारच का येतो?”

 || श्री ||

मागीललेख:- रवीपुत्र यमाग्रज


“सोमवार नंतर मंगळवारच का येतो?”


आपल्या हिंदू परंपरेत बऱ्याच गोष्टी (सगळ्याच नाही म्हणत मी) ह्या विचार पूर्वक केल्या आहेत. त्या मागे सुसंगती, निरीक्षण, सारासार विचार, निसर्गचक्र, विज्ञान यांची सांगड घातलेली असते. परकीय आक्रमणकारींनी त्यांचा धर्म विस्तार करण्यासाठी, त्याचे पाय या भूमीत ठामपणे व निरंतर रोवण्यासाठी आपली परंपरा, आपले ज्ञान हे अवैज्ञानिक, संदर्भहीन आहे हे आपल्यावर बिंबवीत गेले. आपल्या नित्याच्या अगदी सहज गोष्टींमागे देखील बऱ्याचदा शारीरिक, भौगोलिक, मानसिक किंवा इतर काही न काही पैकी वैज्ञाणिक कारण असते.

आता हेच बघाना आपल्या नित्यातील एक बाब. कधी ना कधी हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात नक्की येत असेल कि बाबा हे रविवार नंतर सोमवार नंतर मंगळवार.... असेच का? हे दिनसंबोधन जेव्हा केव्हा पासून सुरु झाले असेल ते केवळ कुणी सांगितले व आज्ञा प्रमाण म्हणून ते वर्षा मागून वर्षे चालत आले, असे नाहीये. या मागे काही सुसंगत विचार नक्कीच आहे. एका ज्योतिष समुहावर असा प्रश्न विचारला गेला तो असा कि “सोमवार नंतर मंगळवारच का येतो?” आता हा प्रश्न विचारण्या मागे त्यांची भावना किंवा अविर्भाव म्हणा हव तर काहीही असो. जर प्रश्न विचारण्यामागचा त्यांचा भाव चुकीचा वाटला असेल तर त्या बाबत त्यांना बोला लावा, स्पष्टीकरण विचार त्याचे नक्कीच त्यांनी स्वागत केले असते. पण या वर उत्तरे काय आली तर नमुना दाखल काही देतो.

कारण सोमवार हा रविवार नंतर येतो.....

कारण नंतर बुधवार असतो😀....

तसं शास्त्र असतंय!....

आमच्या इथे तर शुक्रवार येतो....

तुम्ही रविवार पण आणू शकतात....

येतो की मंगळवारानंतर सोमवार, आपल्या मराठी शब्दकोशात.....


एखाद्या विनोद, हास्यरस समुहावर अशी उत्तरे आली असती तर काही वाटले नसते. पण ज्योतिष अभ्यासक समुहावर अशी उत्तरे आली याचे वाईट वाटते. तरीही काही अभ्यासकांनी याचे उत्तर दिले. त्या मुळे खरे तर मी आता उत्तर देण्याची आवशक्यता नाही पण मी उत्तर देईल असे म्हटले होते म्हणून हा प्रपंच. परत कुणी हा प्रश्न विचारला तर कळलेखनात वेळ घालवण्या पेक्षा दुवा देणे सोपे म्हणून येथे लिहित आहे. इतर ठिकाणीही याचा वापर करता येईल म्हणून ब्लॉग वर लिहित आहे.


वारांना ग्रहांची नावे दिली गेली आहेत. वारांचा क्रम हा ग्रहांच्या तेजस्वीते नुसार नाही हे प्रथम स्पष्ट करतो. तसे असते तर सोमवार नंतर शुक्रवार यायला हवा होता. तसे तर शुक्र हा सर्वात तेजस्वी ग्रह म्हणता येईल. चंद्र हा सूर्या पासून १२ अंश गेल्यावर दिसू लागतो पण शुक्र हा रवी पासून ७.५ अंश गेल्यावर दिसू लागतो.

वारांचा क्रम हा पृथ्वी सापेक्ष त्यांच्या कोणीय गती नुसार ठरवला आहे. पृथ्वीसापेक्ष व कोणीय हे महत्वाचे आहे. कारण ज्या शनीला आपण मंद म्हणतो त्याची रेषीय गती जास्त आहे.

आ मंदात शीघ्र पर्यंतम् होरेशा: || - आर्यभट्ट 

या नुसार मंद ग्रहा पासून शीघ्र ग्रहा पर्यंत क्रम लावला आहे. म्हणजे शनी, गुरु, मंगळ, रवी, शुक्र, बुध, चंद्र असा क्रम. पण सरळ असा क्रम उचलून वारांना दिला गेला नाहीये. आपल्या कडे दिवसाचे ६० भाग केलेत ज्याला घटिका असे म्हटले जाते. प्रत्येक घटीला स्वतंत्र संबोधन नाहीये. म्हणजे अद्याप माझ्या तरी वाचनात नाही आले. दिवसातील भागांना संबोधण करण्यासाठी या क्रमाचा विचार केला गेला असावा. या साठी दिवसाचे २४ भाग केले गेले व या भागांना होरा असे म्हटले. होरा हा शब्द अहोरात्र यातील मधल्या दोन अक्षरांवरून घेतला आहे. या होऱ्याना संबोधण्या साठी वरील क्रमाचा वापर केला. समजा सूर्योदयाचा पहिला होरा सर्वात मंद ग्रहाचा म्हणजे शनिचा नंतर गुरु, मंगळ, रवी, शुक्र, बुध, चंद्र असे सात होरे झाले. नंतर परत शनी पासून सुरुवात करून होरे. असे एका अहोरात्रीत सात ग्रहांचे तीन अवर्तने होऊन परत शनी, गुरु, मंगळाचे होरे झाले कि पुढच्या रविच्या होऱ्यात पूढच्या दिवसाचा सूर्योदय होतो. या अव्याहत क्रमाने ज्या दिवसाचा सूर्योदय ज्या होऱ्यात होईल त्या होऱ्याचे नावाने तो वार. समजण्यासाठी ज्या दिवसी आपण पहिला होरा शनिचा घेतला तो दिवस शनिवार व दुसऱ्या दिवशी ज्या होऱ्यात सूर्योदय झाला (रवी होरा) तो रविवार. होरा कोष्टक पंचांगात दिलेले असते. तरी येथे देतो.


यावर एक प्रश्न एका कमेंट वर केला गेला. त्याचेही उत्तर द्यावे म्हणून तो येथे घेत आहे.

“पण एक प्रश्न पडतो कि... अश्याने प्रत्येक दिवसाचा सुर्योदय एकाच वेळेला येईन... पण कधी सुर्योदय 6:05 वाजता पण असतो..तर कधी 7:00 वाजता असतो...

प्रत्येक ग्रहाचा एकच होरा पकडला तर प्रत्येक दिवशी त्याचवेळी सुर्योदय येईन .. जे शक्य नाही.

कदाचित वरील माहीती परीपूर्ण करण्यासाठी होराची वेळ सुर्योदय आणि सुर्यास्ताला धरून असावी.”

या वर उत्तर असे आहे कि:- बरोबर आहे. आपल्या कडे हे जे दिवसाचे २४ होरे केले गेले ते दिवसमानाचे म्हणजे एका सुर्योदया पासून दुसऱ्या सुर्योदया पर्यंत. हिंदू दिवसाचे २४ होरे व पाश्चात्यांचे दिवसाचे २४ तास या मुळे एक होरा म्हणजे एक तास असा समज होतो. हे ढोबळ मानाने समजुती करता ठीक आहे. पण हिंदू गणिता नुसार सूर्योदय ते सूर्यास्त (याला दिनमान म्हणतात) व सूर्यास्त ते पुढचा सूर्योदय (याला रात्रीमान म्हणतात) याचे बारा बारा भाग केले जाते. त्या मुळे रोजचा एक होरा पाश्चात्य मानाने बरोबर एक तासाचा असेलच असे नाही तो तासाच्या प्रमाणात कमी जास्त असतो दिनमान व रात्रीमानानुसार. हिंदू जास्तीत जास्त नैसर्गिक व भौगोलिक घटनांचा आधार घेत. ‘तास’ हे इंग्रजांनी येथे रूढ केले. त्या पूर्वी आपल्या कडे यांत्रिक रीत्या कालमापन करण्यासाठी घटीयंत्र असे. एक होरा म्हणजे अडीच घटी म्हणजेच २ घटी ३० पळे हे मध्यम मानाने आहे. दिनमान व रात्रीमाना नुसार यातही कमी जास्त पणा होतो. दिनमान रात्रीमानाच्या कमी जास्तपणाला पृथ्वीचा कललेला अक्ष जबाबदार आहे.  

खाली कमेंट मध्ये विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर तिथेच दिले आहे. तर एका प्रश्नाचे उत्तर सविस्तर असल्याने वेगळा लेखात समावेश केला आहे. तास(Hour) आणि होरा बाबत प्रश्न होता. पुढील लेखावर क्लिक केल्यास तो वाचता येईल.   

पुढील लेख:- Hour आणि होरा.



 

गुरुवार, १० डिसेंबर, २०२०

रवीपुत्र यमाग्रज

 || श्री||

मागील लेख :- स्कीझोफ्रेनिया आणि कुंडली भाग-१.


रवीपुत्र यमाग्रज




एका ज्योतिष समुहावर खालील प्रश्न विचारला गेला. यावर खरे तर दोनचार ओळीत लिहून विषय संपवणार होतो पण लिहिता लिहिता वाढोणी लेख झाला.  

खगोलशास्रीय कारण सांगितले तर काही प्रश्न उपस्थित होतील. उदा.

१) जर हे संदर्भीय मानले तर इतर ग्रह हे पौराणिक दृष्ट्या रवी पुत्र का नाही?

२) पौराणिक रवी च्या इतर पुत्रांचे खगोलीय संदर्भ लावलेत का? उदा. रवीपुत्र विवस्वान ज्याच्या वंशात श्रीराम जन्मले. तसेच भाग्यदेव हि रविपुत्र आहेत.

३) पौराणिक कथे नुसार यम आणि यमी (उर्फ-यमुना) हे जुळे भावंड आहेत. मग यम जर खगोलीय पिंडाच्या संदर्भात पाहिला तर यमुना नदी कशी?

४) यम व शनी खगोलशास्त्रीय कारण मिमांशा नुसार पाहिले तर यम व शनीच्या खगोलस्थिती मध्ये दोन दानवांचा पौराणिक संदर्भ काय?

अर्थात वरच्या सारखे प्रश्न मी जे अनुमान लावत आहे त्या नुसार पडतील. अजून दुसरे काही अनुमान कोणी लावत असेल तर त्या नुसार कदाचित नसतील ही. ठीक आता माझे अनुमान सांगतो.

सूर्यमालेतील बटूग्रह (हो बटूग्रह संज्ञेत याला घातलं आहे, ग्रहातून त्याला वगळण्यात आलेय.) प्लुटो याचे भारतीय नामकरण यम करण्यात आले आहे. सूर्यमालेतील कायपरच्या पट्ट्यातील सर्वात मोठा बटुग्रह. प्लुटोचे यम असे भारतीय नामकरण करण्या मागे खरे तर भारतीय पौराणिक कथा नाही तर रोमन पौराणिक कथा कारण आहे. ग्रीक पाताळभूमीची देवता हेडेस चे दुसरे नाव प्लुटो आहे. या हेडेसदेवतेचे कार्य मृत्यूदेवता म्हणून सांगितले गेले आहे. काळ्या व थंड ग्रहासाठी सुचविले गेलेले हे नाव लॉवेल वेधशाळेला आवडले. वेधशाळेचे संस्थापक पर्सिव्हाल लॉवेल यांच्या नावाचे अद्याक्षर यात येतात हे दुसरे एक कारण. असो मुद्या कडे वळू. मृत्युदेवतेचे नाव असल्याने अर्थात आपल्याकडे (इतर काही संस्कृती मध्ये हि त्यांच्या कथांप्रमाणे ) या ग्रहाला यम हे नाव योजले गेले. यम व यमी या जुळ्या भावंडाच्या त्वचेचा वर्ण काळा सांगितला गेला आहे.

यम व शनी हे भारतीय पौराणिक कथे नुसार रवी पुत्र आहेत. शनी यमाचे मोठे बंधू आहेत म्हणून व्यासांनी त्यांचा उल्लेख यमाग्रज असा केला आहे. खगोलीय दृष्टीकोनातून शनीचे स्थान रवी पासून प्लूटोच्या अगोदर आहे. त्यामुळे त्याला अग्रज म्हणता येईल. दुसरी गोष्ट शनीचे आकारमान व वस्तुमान प्लूटोच्या कैकपट जास्त आहे. प्लुटो शनीच्या एका चंद्र पेक्षाही लहान आहे (आपल्या चंद्रा पेक्षाही प्लुटो लहान आहे.) असे म्हणतात. आकारमान, वस्तुमान, चंद्रांची संख्या या नुसार शनी दादा आहे. 

पुराणात यमाची जुळी बहिण यमिला नदी सांगितले आहे. प्लुटोला तीन चंद्र आहे. त्यातील एक चेरॉन. पण शास्त्रज्ञ त्याला प्लुटोचा चंद्र मानण्या बाबत संभ्रमात आहेत. चेरॉन प्लुटोपेक्षा थोडा मोठा आहे. चेरॉन प्लुटो हे व्दिमान प्रणालीतले (binary systems) आहेत त्यामुळे शास्त्रज्ञ त्यांना बटु जुळे ग्रह म्हणतात.

आपल्या सूर्यमंडलातील चार ग्रहांना वायू दानव म्हटले जाते. गुरु, शनी, हर्षल(अरुण/इंद्र/प्रजापती), नेपच्यून(वरुण) हे ते चार वायू दानव ग्रह आहेत. शनी आणि प्लुटो(यम) दरम्यान हे अरुण, वरुण हे दोन दानव ग्रह आहेत. पौराणिक कथे नुसार मात्र हे चारीही दानव नाहीत तर देवता आहेत. ग्रीक पुराना नुसारही हे दानव नाहीत तर देवता आहेत. हर्षल व नेपच्यून यांची संरचना बरीचशी मिळती जुळती आहे. मग यम व यमी म्हणजे हे हर्षल व नेपच्यून मानले तर? शनी वायू तत्वाचा ग्रह आहे व आधुनिक खगोल शास्त्रज्ञांच्या वायू दानव समुहात आहे. हर्षल, नेपच्यून याच समुहात असले तरी हर्षल वायू तत्वाचा व नेपच्यून जलतत्वाचा ग्रह ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या आहे. हिंदू अथवा ग्रीक पुराणात यांना देवताच मानले आहे. या ग्रहांची नावे (हर्षल, नेपच्यून, प्लुटो) आपल्याकडे जागतिक खगोल संघटनांनी यांना दिलेल्या ग्रीक देवतांच्या कार्याशी अनुरूप दिली गेली आहेत. हर्षला आपल्याकडे एक वाक्यता नाही. त्याला प्रजापती हे नाव दिले जे ब्रम्हाचे पुत्र आहेत. अरुण हे नाव कशा आधारे योजले ते कळले नाही. अरुण हे सूर्याचे सारथी आहे ते सूर्यपुत्र नाहीत. इंद्र हे नाव युरेनस या ग्रीक देवतेशी साम्यधर्मावरून दिले आहे. हर्षलाला अवकास आणि स्वर्गाची अधिपती युरेनस या ग्रीक देवतेचे नाव दिले आणि हिंदू मान्यते नुसार स्वर्गाची देवता इंद्र आहे. हिंदू पुराणानुसार शनी रवीपुत्र आहे पण ग्रीक पुराणानुसार शनी इंद्रपुत्र आहे, तर गुरु शनीपुत्र आहे. नेपच्यून हे रोमन पुराणातील समुद्र देवतेचे अर्थात जलदेवतेचे नाव आहे. हिंदू धर्मात वरुण हे जलदेवता आहेत.  ग्रीक पुराना नुसार वरुण (नेपच्यून) हे गुरु (ज्युपिटर) व यम(प्लुटो) यांचे भाऊ आहेत म्हणजे शनी पुत्र आहेत.

व्यासांनी शनीला निलांजल म्हटलं आहे शनि, हर्शल, नेपच्यून या तिन्ही ग्रहांचा खगोलीय वर्ण निळा आहे. टंकलेखनाला विराम देता देता दोन गोष्टी अजून सांगतो. एक म्हणजे नुसत्या डोळ्यांनी पाहू शकणारा सूर्यमालेतील शेवटचा ग्रह शनि नसून हर्षल आहे. खूपच मंद का होईना पण कधी काळी तो नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत होता म्हणे. पण त्याला ग्रह न समजता प्राचीन लोक एक तारा समजत होते. दुसरी गोष्ट म्हणजे प्लुटोला (यम) बटूग्रहातूनही काढून टाकण्याचा काही विभूतींचा प्रयत्न चालू आहे म्हणे. त्याला उपग्रहाचा दर्जा देण्याचा विचार आहे, तो म्हणजे प्लुटो हा आपल्या पूर्ण सूर्यमालेचा चंद्र आहे असे म्हणणे आहे. कारण इतर ग्रहांची सूर्या भोवती कक्षा हि साधारणता एका प्रमाण प्रतलात आहे. ज्याला इलिप्टिक(ecliptic) प्रतल असे म्हणतात. पण प्लुटोची कक्षा हि या प्रतलाला छेद देणारी आहे (१७ अंश) जसा एखाद्या ग्रहाचा उपग्रह(चंद्र) ची कक्षा हि त्या ग्रहाच्या सूर्यभ्रमण कक्षेला छेद देणारी असते त्या प्रमाणे. प्लुटोला काही कुणी एका खुर्चीवर बसू देत नाही ब्वॉ.


 

पुढील लेख:- सोमवार नंतर मंगळवारच का येतो?