बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

बोलकी कुंडली -१

 ||श्री||

मागील लेख :- सत्वपराभास - Gender dysphoria


बोलकी कुंडली -१




जातकाचे सध्या वय ३८व७मा आहे. लग्नेश रवी अष्टमात गेला आहे. रवीला अष्टमेशत्वचा दोष नसला तरी अष्टमात असल्यास दुषित होतो. येथे तो अष्टमेश नसून अष्टमात आहे त्यामुळे तो दोषदायक आहे, पण लग्नेश असल्याने त्याला पापग्रह म्हणता येणार नाही. जीवनात संघर्ष करावे लागतात. रवी हा भावेश गुरूशी त्रिकोणात असल्याने गुरुच्या पंचम दृष्टीत येतो आहे त्यामुळे जीवन बरचसे सुसाह्य होते. रवी मित्र राशीत असला तरी मकर नवमांशी आल्याने काहीसा कमकुवत झाला. रवीची महादशा ६ ते १२ वया दरम्यान असल्याने या काळात शारीरिक त्रास झाला असावा. जातकास पायात काही व्यंग आहे, जन्मजात आहे.

चंद्र पंचमात धनु राशीत आहे. त्यामुळे स्वभाव उदार, उत्साही, आशावादी, आनंदी असतो तितकाच स्वाभिमानीही असतो. शनी चंद्राच्या लाभात असला तरी त्याची दृष्टी चंद्रावर पोहचत नाही, निदान प्रभावीपणे पोहचत नाही असे म्हणता येईल कारण १३ अंशाचे अंतर दिप्तांश म्हणता येणार नाही. त्यामुळे नैराश्य, एकलकोंडेपणा स्वभावात येणार नाही. व्ययात गुरु आल्याने अनफा योग होत असला तरी हा शकट योग होत आहे. हा योग काही प्रमाणात कुंडलीचा दर्जा कमी करतो आहे. बाकी शनि तृतीयात उच्चीचा, योगकारक मंगळ भाग्यात स्वराशिचा या मुळे कुंडलीचा दर्जा चांगलाच सुधारला आहे.

शनि मंगळ प्रतियुती चांगली मानली जात नाही पण कुंडलीला बलवत्ता देणारे ते ग्रह असल्याने त्या बाबत थोडा वेगळा विचार करावा लागेल. भाग्येश भाग्यात हा अत्यंत शुभ योग आहे तर उपचय स्थानातील पापग्रह चांगली फले देतात. शनी येथे उच्चराशीत आहे. त्यामुळे जातक स्वकर्तृत्व चांगले दाखवू शकेल. या शनि मंगळ योगामुळे जातकाने तसे कमी वयात कर्तृत्व गाजवले व त्याला किर्तीही लाभली आहे. धर्मकर्माधीप हा राजयोग कुंडलीत असल्याने जातकाच्या कष्टाचा सन्मान न होता तर नवल. जातकास बेस्ट एंप्लोई राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त असून बेस्ट ओव्हरस्टॅडींग, अचीव्हर अवॉर्ड, बेस्ट इंडिवीज्युअल विथ डीसेबॅलीटी अवॉर्ड हे इतर तीन पुरस्कारही प्राप्त आहेत.

जातकाचे शिक्षणही उत्तम झाले आहे. जातक उच्चविद्याविभूषित आहे. चतुर्थातील मित्र राशीतील स्वनवमांशातील हर्षल युतीतील गुरूची हि किमया आहे.

जातकाने CA/ CS / MBF; DISA इ. पदव्या मिळवल्या आहेत. विद्याकारक गुरु चतुर्थ या विद्या दर्शक स्थानात आहे व बलवान आहे. पंचम या विद्यास्थानाचा तो स्वामी आहे. गुरु विद्याकारक बुधाच्या नक्षत्रात असून बुध हि विद्या दर्शक व्दितीयाचा स्वामी असून उच्चविद्या दर्शक नवमस्थानात आहे. म्हणजे विद्याकारक गुरु बुध विद्या दर्शक स्थानांशी संबंधित आहे. गुरु तर २,४,५,९ या सर्व स्थानांशी संबंधित होत आहे. कुंडलीत सरस्वती योग झाला आहे. चतुर्थस्थान केतू शनीच्या पापमध्यात असल्याने शालेय जीवनात काही प्रतीकुलाता संभव होती, पण चतुर्थेश नवमात असल्याने व स्वराशीवर दृष्टी आल्याने एक प्रकारे संरक्षण मिळून संघर्ष करून त्यावर मात केली असेल. १२ ते २२ वय वर्षा दरम्यान पंचामातील चंद्राची व त्या नंतर नवमातील नवमेश मंगळाची दशा असल्याने शैक्षणिक काळात अतिशय अनुकूल दशा आल्या. 

अर्थशास्त्र दर्शक गुरु हा अर्थशास्त्र दर्शक बुधाच्या नक्षत्रात असून व्दितीयस्थानाचा संबंध येत असल्याने जातकाचे शिक्षण व चरितार्थ हे अर्थशाखेत आहे. बुध वर्गोत्तम असल्याने तो व्दितीय, लाभ व भाग्य स्थाने बळकट करतो आहे. लाभात उच्चीचा राहू, लाभेश दशमेश भाग्यात भाग्येश युक्त व उच्च शनीने दृष्ट त्यामुळे नोकरीत उत्कर्ष चांगला. याला महत्वाची जोड म्हणजे चतुर्थातील गुरुची दशममध्यावर दृष्टी. कहाल योग जातकाला नेतृत्वगुण देत असल्याने नोकरीत ग्रुप लीडर म्हणून उत्तम काम करू शकतो. २९ ते ४७ जातकाला राहू महादशा आहे. राहू उच्चराशीत लाभात आहे हे आपण पाहिले आहेच. राशी स्वामी बुध हि भाग्यात वर्गोत्तम आहे. राहू महादशेत बुध अंतर्दशा २७/०९/२०२२ पर्यंत आहे, जी उत्तमच जाणार आहे. जातकाला मिळालेल्या पदव्या व पुरस्काराच्या नेमक्या तारखा आपल्या कडे नाही. अंतर्दशा, विदशेचा अनुभव घेता आला असता.  

जातकास आता आस आहे ती सहचरनीची. जातकाचा त्याच संबंधी प्रश्न होता. सप्तमेश शनी वक्री असून तो कारक शुक्राला वेध करीत आहे. व्ययात शनिपुत्र आहे, व्ययावर शनिची भाव दृष्टी, लग्नेश अष्टमात, चंद्र केतू युक्त या मुळे विवाहास विलंब, अडचणी. कुंडलीतील राजयोगाला राजग्रह रवी चंद्र दृष्टी लावत आहेत. रवी अष्टमात व त्याच्या केंद्रात पापग्रह तर चंद्र केतू युक्त व त्याच्याही केंद्रात पापग्रह. असो प्रत्येक कुंडलीत काही तरी दोष असतोच. पण हाच रवि लग्नेश व मंगळ बलवान असल्याने त्यांनी जातकाला महत्वाकांक्षी, ध्येयवादी, कार्यप्रवीण, तडफदार, आत्मविश्वासू, धैर्यशील, स्वतंत्री, आत्मनिर्भर, स्वाभिमानी हे गुण हि दिलेत, तर गुरूने गौरव. जातकाचे मनोवांछित लवकर पूर्ण होवो व भावी जीवनास शुभेच्छा.   

पुढील लेख:- मकर संक्रमण २०२२ – नाशिक


सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

सत्वपराभास - Gender dysphoria

||श्री||

मागील लेख:- हुलकावणी


सत्वपराभास - Gender dysphoria



एका ज्योतिष समुहावर एका सदस्यांनी पुढील प्रश्न विचारला होता.

"या मुलाच्या वागणुकीत 6 महिन्या पासून बदल झाला आहे आणि तो मुली सारखे वागत आहे. कोणी यावर मार्गदर्शन करेल का? ३१/०८/२००७, वेळ १९:१२, कोल्हापूर."

नुकतेच महिन्यापूर्वी १५ व्या वर्षात पदार्पण या मुलाने केले आहे. शुक्र महादशेत (१२/०३/२०१९ ते ११/०३/२०३९) शुक्र अंतर्दशा (११/०७/२०२२ पर्यंत) शनि विदशा (०१/०५/२०२१ ते १०/११/२०२१) चालू आहे. सहा महिन्या पूर्वी म्हणजे मार्च २०२१ पासून या मुलाच्या वागण्यात बदल झाला आहे, म्हणजे गुरु विदशेत हा बदल निदर्शनास आला असे म्हणता येईल. खरे तर पोस्ट कर्ताने जन्म तारीख ३१/०८/२०१२ दिली होती पण एका सदस्याने “तुम्ही दिलेली कुंडली चुकली असून जी कुंडली दिली आहे ती २००७ ची आहे.” असे लिहिल्यावर त्यांनी कुंडली तीच ठेवली व तारीख ३१/०८/२००७ केली आहे. या मुळे कुंडलीची विश्वासहार्ता संशयात येते, पण असो या नुसार बघुया.

हा जो प्रकार आहे यात शरीर आणि भावना यात विसंगती निर्माण होत जाते. हा आजार फक्त विचार, भावना अर्थात मनाशी निगडीत नाही तर शारीरिक पातळीवरही सबंधित आहे. सत्वपराभास होण्याचे एकच एक कारण नाही. संप्रेरकांची (Hormones) मुख्य भूमिका असली तरी चुकीचे वर्तन, कुसंगती, उबग, लैंगिक शोषण हि कारणीभूत होऊ शकते. (तर क्वचित अध्यात्मिक धुंदी, स्वत:ला कृष्णाची गोपिका समजून स्त्री वेशात राहणारा एक पंथ आपल्या कडे आहे. पण यात संप्रेरकांचा संबंध वाटत नाही.) संप्रेरकांच्या भुमिके मुळे याची गणना फक्त मनोविकार म्हणून करणे चुकीचे होईल. वैद्यकीय क्षेत्रात याला ‘जेंडर डिसफोरिया’ असे म्हणतात.

Gender dysphoria (GD) is the distress a person feels due to a mismatch between their gender identity—their personal sense of their own gender—and their sex assigned at birth.

अगोदर Gender identity disorder (GID) म्हणत पण आता Gender dysphoria (GD) असे म्हटले जाते. जन्मत: असलेली शारीरिक ठेवण व वयात येतांना निर्माण झालेल्या भिन्न संप्रेरकांमुळे निर्माण होणाऱ्या भावना, जाणीवा यांच्या विसंगती मुळे हा विकार निर्माण होतो. ज्योतिष शास्त्रात याचा कसा विचार करता येईल ते पाहू.

या कुंडलीत लक्षणीय बाब म्हणजे लग्न कुंभेत २२°/३०’/०८” वर आहे तर हर्षल कुंभेत २३°/१२’/१०” वर आहे. हर्षल प्रथम भावारंभावर असून तो वक्री आहे. त्यामुळे असे रुढीबाह्य, परंपरेला छेद देणारे, विक्षिप्त, अनाकलनीय, चाकोरीबाह्य वर्तन जातका कडून घडणे हा प्राथमिक निष्कर्ष निघतो. येथे विषम-सम भावात विषम-सम राशी आल्या आहेत, पण शेकडा ५० मध्ये हे येणारच त्यामुळे विशेष असे काही म्हणता येणार नाही. वायू तत्वाचा हर्षल वायू तत्वाच्या राशीत असल्याने खरे तर त्याचे शुभत्व प्रगट व्हायला हवे, त्यात हा हर्षल गुरुच्या नक्षत्रात आहे. हर्षल हा लग्नी विषम राशी विषम नवमांशात आहे, तो पुरुषत्व प्रगट करतो. तनु भावावर सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या या हर्शल मुळे जातकाची शारीरिक ठेवण पुरुषा सारखी आहे. रसायनांचा कारक मंगळाच्या मेष नवमांशी आहे. संप्रेरकाचा कारक मंगळ होईल.


शारीरिक ठेवण जरी प्रथमा वरून पाहिली तरी जननेंद्रीय ज्या वरून जन्मता: जातकाचे लिंग 
(
Gender) ठरवले जाते त्याचा विचार कुंडलीत अष्टमा वरून करतात. अष्टमात वंध्या राशी आली आहे, त्यात ती समराशी आहे. हा एक पूरक योग म्हणता येईल. कारण साधारण ८% कुंडल्यात हि राशी अष्टमात येणार. पण जन्मत: जातकाला काही शारीरिक व्यंग या अनुसंगाने होते का? हि शंका मात्र निर्माण हा योग करेल. शिवाय चंद्र या स्त्रीग्रहाची पूर्ण दृष्टी अष्टमावर आहे, जो नपुंसकग्रह बुधाच्या रेवती या पुरुष नक्षत्री मीन या स्त्री राशीत आहे. येथे चंद्र राशीचा भाव जास्त प्रगट करेल कारण चंद्र राशी अंती फळ देतो. अष्टमात स्त्री राशी, अष्टमावर स्त्री राशीतील स्त्रीग्रह चंद्र ची दृष्टी, जो नपुंसक बुधाच्या नक्षत्रात आहे, अष्टमेश बुध हि वंध्या राशीत अस्तंगत आहे. त्या मुळे हि केस Gender nonconformity ची असावी व त्यावेळी डॉक्टर निदान करू शकले नसावे असे वाटते. या वर आधानकुंडली प्रकाश टाकू शकेल. बघू पुढे मागे जमले तर.


आता संप्रेरकांचा विचार करू याचे कारकत्व मंगळाकडे जाईल. मंगळ हा चतुर्थात गुरुच्या दृष्टीत असला तरी राशीस्वामी शुक्र षष्ठात आहे व मंगळ षष्ठेश चंद्राच्या नक्षत्रात चंद्राच्याच नवमांशात (नीच नवमांशी) आहे. मंगळ सम राशीत सम नवमांशी आहे. मंगळाचा षष्ठाशी संबंध आल्याने संप्रेरकांचा विकार उद्भवू शकतो. षष्ठातील शुक्र लैंगिक विकार देवू शकतो जो अष्टमेश बुधाच्या नक्षत्रात आहे. लग्नेश सप्तमात असला तरी तो शत्रू राशीत प्रबळ शत्रू रवी युक्त आहे व शनि अस्तंगत आहे. त्यामुळे लग्नेश बलवान नाही. त्या मानाने षष्ठेश चंद्र बलवान म्हणावा लागेल.

हि कुंडली व्यसनाधीनताही दर्शविते. मादक पदार्थांचे व्यसन लागले असावे किंवा तशी शक्यता आहे. षष्ठ व्दितीयात जलराशी असून त्यात जलतत्वाचे ग्रह आहेत. षष्ठातील जलराशीतील शुक्र व्यसनाधीनता देतो. शुक्रा बरोबरच नेपच्यून व्ययात जलांशात आहे जो मादक पदार्थांचे व्यसन देवू शकतो. शुक्र नेपच्युनचा षष्ठ व्ययातून समसप्तक योग लैंगिक व्यसन/मादक पदार्थांचे व्यसन देवू शकतो. जलराशीतील व्दितीयेश गुरू, चंद्र, शुक्राच्या त्रिकोण योगात आहेत, हा गुरु काही प्रमाणत सांभाळून घेवू शकतो. जातकाच्या या वर्तनामागे मादक पदार्थांचे व्यसन तर नाही? काही उत्तेजक द्रव्यांच्या सेवानातून शरीरात अंतर्भाव तर होत नाही? गोनाडल स्टिरॉइड्स (Gonadal steroids) संप्रेराकां (Hormones) मध्ये गडबड, फेरफार करू शकतात, खास करून इस्ट्रोजेन (Estrogen). जातकाला नेमकी शुक्र महादशेत शुक्र भुक्ती चालू आहे.


पुढील लेख:-  बोलकी कुंडली -१

 


मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१

हुलकावणी

 ||श्री||

मागील लेख:-ज्योतिष विदुषीची कुंडली.


हुलकावणी



आईची सुटका केव्हा?

एक सत्तरीच्या विधवा जातक त्यांचा आई विषयी प्रश्न विचारण्यास आल्या होत्या.(३०/०८/२०२१ सायं ०७:३७:२२, स्थानांश – २०°/०२’/२३”N, ७३°/४८’/१०”E) त्यांच्या आईला ८ दिवसा पासून शेवटची घरघर लागली होती पण प्राण सुटत नव्हते. हालचाल, खाणे एवढेच काय पाणी देखील त्या ८ दिवसां पासून घेत नव्हत्या. आधी हि असे दोनदा झाले होते. दीड वर्षा पूर्वी तर १५ दिवस पाणी न घेताही त्या तगल्या होत्या. पण आता शरीर अधिकच जर्जर झाले होते एक हात काम करत नव्हता. पोट दुखत होते. चमच्याने पाणी तोंडात सोडले तरी गिळत नव्हत्या. त्यांचे हाल पाहवत नव्हते, त्यामुळे यातून आईची सुटका कधी होणार असा जातकाचा प्रश्न होता. एरवी दोघी माय लेकीच घरी असतात व जातकाचीही प्रकृती आता हवी तशी साथ देत नाही. त्यामुळे चिंता होती व आईची यातनातून सुटका व्हावी असे वाटत होते.

त्या दिवशी मला इतर कामे असल्याने मी ज्योतिष विषय बाजूला ठेवला होता. थकलोही होतो त्या मुळे कोणाचा काही प्रश्न पाहण्याची इच्छा नव्हती. पण त्यांनी परिस्थिती सांगातील्या मुळे व आग्रह धरल्या मुळे या म्हटले. त्यामुळे हा दिवसाचा पहिलाच प्रश्न आहे. खरे तर कुंडली मांडल्यावर त्या दिवसाच्या थकव्या ने म्हणा कि अजून काही मला काही उमजेना. मला असे वाटत होते कि आज काही मी उत्तर देवू शकत नाही असे सांगून त्यांना उद्या बोलवावे पण त्यांची तगमग पाहून तसे बोलू शकलो नाही. दिवसाचा पहिलाच प्रश्न असल्याने मी शासक ग्रहांआधारे उत्तर द्यायचे ठरवले. 

L

S

चं

R

शु(रा)

D

चं



परिस्थितीची गंभीरता बघता तसेच शासक ग्रहात मृत्यू कारक शनि उपस्थित असून चंद्र ही होता म्हणजे मृत्यूची घटना लवकरच घडणार होती हे ते दर्शवित होते. त्यामुळे चंद्राचे भ्रमण पाहायचे निश्चित केले. शनी स्वत: वक्री असला तरी तो चंद्राच्या नक्षत्रात असल्याने काही समस्या नव्हती. शासक ग्राहातले सगळेच ग्रह चंद्राच्या नक्षत्रात होते, अगदी चंद्र हि स्वनक्षत्री होता. त्यामुळे चंद्र बलवान होता व शासकग्रहात तो दोनदा होता. त्यामुळे चंद्र काही डोक्यातून जात नव्हता. राहू जरी शासक ग्रहात असला तरी त्याचा विचार नक्षत्र स्वामी म्हणूनच करता येणार होता. राहू चंद्र युती होती म्हणजे राहू प्रबळ दावेदार ठरत होता कारण “Nods are stronger than planets” हाही एक मुद्दा होताच. म्हणजे मिथुन, तूळ आणि कुंभ पैकी चा विचार करावा लागला असता. त्यातले त्यात शुक्र शासक ग्रहात असल्याने त्याचा प्रथम विचार झाला असता (१०,११ सप्टें.) व नंतर शनि वक्री असला तरी तो शासक ग्रहात असल्याने त्याच्या कुंभ राशीचा विचार झाला असता. १८,१९ सप्टें. ला चंद्र कुंभेत राहूच्या शततारका नक्षत्रात असणार होता. पण माझी नजर चंद्रा वरच स्तंभित झाली होती. ( तसेही १९,२० दिवस म्हणजे खूप झाले असते, आधीच ८ दिवस झाले होते.) मी चंद्राच्या कर्क राशीचा विचार केला व शासक ग्रहातील शनिचे नक्षत्र कर्केत होतेच त्यामुळे कर्क रास डावलण्याचा प्रश्न नव्हता व मी ४ सप्टें. हि तारीख सांगितली. प्रत्यक्षात त्या माऊलीची जडदेहातून मुक्ती ०७/०९/२०२१ रोजी पहाटे ३:१५ वाजता (सोमवार) झाली. सिंह रास शुक्राचे नक्षत्र होते. शुक्र शासक ग्रहात होता पण रवि? रवि प्रश्नलग्नाला पाहत असला तरी रवी १३°/२२’ तर लग्न २८°/५९’ वर म्हणजे १५° चे अंतर होते आणि प्रमुख शासक ग्रह उपलब्ध असतांना अतिरिक्त शासक ग्रहांचा विचार करण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे हा अपवाद म्हणावा लागेल कि राहूची फसवणूक?

पुढील लेख:- सत्वपराभास - Gender dysphoria


गुरुवार, २९ जुलै, २०२१

ज्योतिष विदुषीची कुंडली.

 ||श्री||

मागील लेख:- गुरु शनि - ग्रह युद्ध

ज्योतिष विदुषीची कुंडली.



महाराष्ट्र ज्योतिष परिषदेने या वर्षी निबंधा साठी ज्योतिषी हा विषय दिला आहे. ज्योतिष शास्त्री पदवी प्राप्त व किमान दहा वर्ष या व्यवसायात असलेल्यांच्या कुंडल्या घ्यायच्या हि अट आहे. ज्योतिष वर्गातील विद्यार्थ्यांचे परदेशातील कुंडलीचे गणित घ्यायचे होते म्हणून मग मी हि अमेरिकेतील ज्योतिष विदुषीची कुंडली उदाहरण म्हणून घेतली. गणितही होईल व निबंधा साठी उदाहरण होईल असा दुहेरी हेतू.

सुश्री.कॅटी स्वीटमन, जन्म तारीख – १७/११/१९७८, सका.९:४९ (प्रमाण वेळेत), लीवोनिया, मिशिगन, अमेरिका.

यांच्याकडे ज्योतिषशास्त्र वंशपरंपरागत असावे कारण त्या स्वत: म्हणतात कि “मला आठवायला लागल्या पासून ज्योतिषशास्त्रात रुची आहे. मी घरातील जीर्ण ज्योतिषशास्त्राच्या पुस्तकां सोबतच वाढले.” २०१० पासून त्यांनी ‘सशक्तीकारक ज्योतिषशास्त्र’ घोषवाक्याने व्यवसायाला सुरवात केली. या स्वत:ला परामानस माध्यम म्हणवतात. चला तर यांच्या कुंडलीतील योग बघुयात.

निरायन लग्न वृश्चिकेत २९/३३’/४४” आहे. धार्मिक/अध्यात्मिकतेचे स्थान भाग्याचा स्वामी चंद्र जो मनकारक आहे तो गूढत्वाचे कारक स्थान अष्टमात असल्याने जातकाला ज्योतिष सारख्या गूढ गोष्टींची आवड निर्माण झाली. धर्म त्रिकोणातील लग्न व पंचम भावाचे स्वामी धर्म त्रिकोणात क्रमश: लग्न व भाग्य भावात आल्याने ज्योतिषशास्त्रास पूरक झाले. पूर्वपुण्याई/साधनेचे स्थान पंचमाचा स्वामी भाग्यात उच्चीचा हा एक उत्तम योग या दृष्टीने कुंडलीत झालेला आहे. या मुळे धर्म त्रिकोण बलवान झाला आहे. हा गुरु मित्र नवमांशी नवमांशातही भाग्य स्थानी आहे. गुरु व्दितीयेश,पंचमेश असून नवमात चतुर्थेश शनीच्या नक्षत्री असल्याने विद्या दर्शक २,४,५,९ या सर्वच भावांशी गुरुचा संबंध येतो आहे. भारतीय मान्यते नुसार ज्योतिष वेदाचे अंग आहे व वेदविद्येवर गुरुचा अंमल असल्याने जातकाने ज्योतिषविद्या यशस्वी रीत्या प्राप्त केली आहे.

ज्योतिष विद्येचा दुसरा मुख्य कारक ग्रह बुध हा गूढत्वाचा कारक नेपच्यूनच्या अंशात्मक युतीत लग्नेश युक्त लग्नी असून बलवान गुरूशी नवपंचम योगात आहे. येथे बुध हा गूढस्थान अष्टमाचा स्वामी असून स्वनक्षत्री आहे व तो लग्न भावमध्या जवळ आहे.  गुरूशी संबंधा मुळे सहजता आलेली आहे. फलज्योतिषात बुध नेपच्यून युतीलाही महत्व आहे. नवमांशात हि युती वायू तत्वाच्या कुंभ या ज्योतिषास पोषक नवमांशात आहे, तसेच दशमांशात हि कुंभ दशांशी लाभात आहे. भावचलीतात हि युती लग्नभावमध्या जवळ आल्याने विशेष महत्वाची आहे. 


जलतत्वाचा नेपच्यूनला वृश्चिक हि रास नैसर्गिक अनुकूल आहे. ज्योतिषाला वायू तत्वात असणे अनुकूल असले तरी भावचलीतात लग्नमध्यात आल्याने व वायू नवमांश, दशांश लाभल्याने नेपच्यून पोषक ठरतो आहे व बुध युती, व्दितीयेश गुरु शुभयोगात या मुळे फलज्योतिषात वाक् सिद्धीस तो अनुकूल झाला.

ज्योतिषाच्या कुंडलीत हर्शल वायूतत्वाच्या राशीत असणे चांगले असते, तसा तो या कुंडलीत तुळेत आहे. हा हर्षल नवमातील उच्च गुरुच्या नक्षत्रात विमला योगातील शुक्र युक्त आहे. क्षेत्र कुंडलीत जरी तो व्ययात असला तरी भावचलीतात तो लाभात आल्याने फलज्योतिषीचा व्यवसाय जातकास लाभदायक ठरला.

शुक्र हा मंत्र,तंत्र कारक मानला गेला आहे जो ज्योतिष व्यवसायास पूरक आहे. येथे तो विमला योगात असल्याने एकप्रकारे राजयोग निर्माण करत आहे. शुक्र हि भावचलीतात लाभात गेल्याने व दशमांशांत उच्च दशांशी भाग्यसहम युक्त असल्याने जातकास सहजगत्या या व्यवसायात चांगले लाभ करून देत असणार.

धार्मिक/अध्यात्मिक अंग असणाऱ्या या ज्योतिष व्यवसायात जातकाला यश मिळण्याचे एक कारण म्हणजे भाग्यसहम भाग्यात उच्च गुरु युक्त आहे. भावचलीतात जरी हि जोडी अष्टमात गेली असली तरी अष्टमस्थान गूढस्थान असल्याने फारसे काही बिघडत नाही.       

चंद्र हा ज्योतिष कारक बुधाच्या वायूतत्वाच्या मिथुन राशीत लग्नेश मंगळाच्या नक्षत्री आहे जो ज्योतिषशास्त्रा सारख्या गूढशास्त्राची आवड जातकात निर्माण करतो आहे. चंद्र-बुध, चंद्र-मंगळ यात षडाष्टक सारखा अशुभ योग होतो आहे जो ज्योतिष गणिता करीता चांगला नाही, परंतु लग्नेश मंगळ युक्त लग्नातील बुधाने हि कमतरता भरून काढली आहे. शिवाय चंद्र नवमांश कुंडलीत भाग्यात मंगळाच्या नवमांशी आहे तर दशमांश कुंडलीत स्व दशांशी रवी युक्त चतुर्थात आहे.

ज्योतिष व्यवसायाचा विचार करता दशमेश रवी, लाभेश बुध हे लग्नी लग्नेश मंगळाच्या सहवासात आहे. या त्रिग्रही च्या नवपंचमात पंचमेश उच्च गुरु भाग्यात असल्याने लग्न, भाग्य, दशम, लाभ हि स्थाने सांधली जाऊन यश प्राप्त होत आहे.  

दशमांश कुंडली:- दशमेश रवि कर्क नवमांशी उपासनेचे स्थान पंचमात आहे. दशमांशातही रवि कर्क दशांशी चतुर्थात चंद्र युक्त आहे. दशमांश दशमावर रवीची दृष्टी आल्याने जन्म दशमेश दशमांश दशमाशी संबंधित झाला तर दशमांश दशमेश शनि जन्मकुंडलीत दशमात आहे. व्यवसाय दर्शक सप्तमावर शनिची दशम दृष्टी आहे. दशमांशात शनि लाभात आहे. दशांश लग्नेश मंगळ भाग्यात, भाग्येश गुरु पंचमात व त्याची नवम अमृत दृष्टी लग्नावर व पंचम अमृत दृष्टी लग्नेश मंगळ आणि स्वदशांशा वर आहे. त्या मुळे जन्मकुंडली प्रमाणेच दशमांशातही धर्म त्रिकोणातील स्वामी मंगळ, गुरु धर्मत्रिकोणा संबंधित झाल्याने धर्मत्रिकोण बलवान होऊन जातक ज्योतिष व्यवसायात कार्यरत आहे. दशमांशातही ज्योतिष विद्या कारक गुरु धर्मस्थान व दशमाशी संबंधित झाला आहे. येथे तो नवमेश असून दशमेश शनीशी प्रतियोग/दृष्टी परिवर्तनात असल्याने (दशमांशात धर्मकर्माधी योग झाला असे म्हणता येईल. पण हे योग जन्मकुंडलीत पाहिले जातात.) धर्म कर्म स्थाने सांधली जाऊन जातक ज्योतिष व्यवसायात आहे.       

Empowering Astrology या शीर्षकाखाली जातकाने २०१० साली व्यवसाय चालू केला. गुरु महादशेत चंद्र भुक्ती १८/१०/२००९ ते १७/०२/२०११ दरम्यान होती. गुरु जन्मकुंडलीत नवमात उच्चीचा, नवमांशात नवमात मित्र नवमांशी तर दशमांशात नवमेश असून पंचमात मित्र दशांशी आहे. भूक्तेश चंद्र जन्म अष्टमात, नवमांशात नवमात गुरु युक्त तर दशमांशात स्वदशांशी चतुर्थात पंचमेश रवी युक्त आहे. दशमांशात गुरु दशमेश शनीच्या दृष्टीत तर चंद्राची दशमावर दृष्ट या मुळे गुरु दशा चंद्र भूक्तीत ज्योतिष व्यवसायाचा शुभारंभ झाला.

गुरु २०१० साली कुंभ व मीन राशीत होता. २ मे ला तो मीनेत आला व २ नोव्हे. ला वक्री गुरु कुंभेत आला तर ६ डिसें. ला परत मीनेत. दोन्ही गुरु जातकाला अनुकूल होते. कुंभेतील गोचर गुरु चतुर्थात असल्याने दशमावर दृष्टी असलेला दहावा गुरु होता तर मिनेतील गोचर गुरु पंचमात असल्याने भाग्य, लाभावर दृष्टी असलेला आकरावा गुरु होता. दोन्ही कडून गुरु व्यवसाय दृष्ट्या अनुकूल होता. शनी या वर्षी कन्येत होता. त्याची दशमेश रवि, पंचम स्थान, भाग्येश चंद्रा वर दृष्टी होती. शनि जन्मदशमस्थ आहे. BA in Communications and Studio Art पदवी घेतलेली जातक वेब व ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत होत्या. गोचर शनि ची जन्मस्थ दशमेश रवि वर दृष्टी ने व्यवसायात बदल घडवत जन्मस्थ अष्टमातील नवमेश चंद्र व पंचमावरील दृष्टी संबंधातून ज्योतिष व्यवसायात आल्या.  धन्यवाद.

पुढील लेख:- हुलकावणी