बुधवार, १२ जुलै, २०२३

जन्मवेळ निश्चिती -२ #Rectification of Birth

||श्री|| 

मागील लेख:- घटस्फोट केव्हा?


जन्मवेळ निश्चिती -२ #Rectification of Birth

 


जातक:- पुरुष, १८/०७/१९७५, दिल्ली गेट, अहमदनगर. 19°05'50.7"N 74°43'54.0"E (19.097417, 74.731656) जन्मवेळ माहित नाही. होरारी नं. – ०९/०७/२०२३, १८:४८ – ४७

१९:१९:१४è जातकाने या अगोदर दोन वेळा जन्मवेळ संशोधन केले आहे पण जातकाचे समाधान झाले नाही. त्यामुळे परत एकदा त्यांनी जन्मवेळ संशोधन करण्याचा निर्णय घेतला. जातकाचे आई वडील दोघेही हयात नाही. लहानपणी बनवलेली कुंडली काही कारणाने हरवलेली आहे आणि जातकाला जन्मतारीख व ठिकाण फक्त माहित आहे जन्मवेळ नाही. काही नातेवाईक १८ तारखेला रात्री जन्म झाला असे सांगतात तर काही सकाळी. या कालावधीत किमान ६ कुंडल्या तरी बनू शकतील. अगोदरच्या ज्योतिर्विदांनी केलेले जन्मवेळ संशोधन चुकीचे केले असे मी मुळीच म्हणणार नाही कारण अंदाजे काळ हा बराच मोठा आहे. बाकी काही माहिती घेण्या अगोदर मी होरारी नंबर वापरून संशोधन करायचे ठरवले नंतर काही घटना ताडून पाहता येतील.

L – बु, S – , R – गु, D – . शनि स्वता वक्री आहे पण मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात आहे. प्रथम हे निश्चित करावे लागेल कि जन्म सायंकाळी, रात्री कि सकाळी. शासक ग्रहात चंद्राचा दुरान्वयेही संबंध येत नाही. जरी तो शासक ग्रहात असता तरी वगळावा लागला असता कारण तो वक्री शनि च्या नक्षत्रात आहे. त्यामुळे रात्री जन्म नाही हे निश्चित झाले. रवि शासक ग्रहात असल्याने दिवसा जन्म आहे असा निष्कर्ष लगेच काढू नका कारण जातकाने तसे तर सायंकाळ पासून चा कालावधी सांगितला आहे. दिवसाचा जन्म नाही हे मी केवळ जातकाच्या सांगण्यावर म्हणत नाही तर शासक ग्रहात शनि असून तो संधी प्रकाश काल दर्शवितो. तसे तर ग्रहशिलात संध्याकाळी राहू कालबळी तर केतू प्रात:काली कालबली असतो असे सांगितले गेले आहे. याचा काही उपयोग करता येतो का पाहू. राहू शासक गुरु युक्त असल्याने जन्म संध्याकाळी झाला असावा. आता होरारी कुंडलीत रवि लग्नी असल्याने आपण असे म्हणू शकतो कि जन्म प्रात:काली झाला असावा आणि याला आधार देण्या साठी शासक गुरुच्या सप्तमात केतू आहेच. बुध होरारी लग्नेश असल्याने जन्म बुधाच्या लग्नात झाला असावा असा तर्क करता येईल. बघुया त्या वेळी त्या ठिकाणी बुधाचे लग्न कधी होते. मिथुन लग्न पहाटे ३:४८ ते ६:०० व कन्या लग्न सका. १०:२२ ते १२:२८ दरम्यान होते. सूर्योदय साधारण ६:०६ होता. त्यामुळे प्रथम मिथुन लग्नाचा विचार करू या. मिथुनेत मंगळ, राहू, गुरूची नक्षत्रे आहेत. या पैकी फक्त गुरु शासकग्रहात आहे. गुरुचे नक्षत्र पहाटे ५:१५:१६ ते ६:००:०८ दरम्यान होते. यात रविचा सब घेवू. रविचा सब पहाटे ५:५४:३९ ते ५:५७:३८ दरम्यान उदित होते.

घटना तपासून पाहण्या अगोदर एका नियमाधारे वरील वेळ तपासून पाहू या. प्रश्न वेळेचे चंद्राचे सहशासक हे जन्मवेळचे लग्नाचे सहशासक असतात व प्रश्नवेळचे लग्नाचे सहशासक हे जन्मवेळच्या चंद्राचे सहशासक असतात. खूपच खात्रीशीर असा हा नियम आहे असे म्हणता येणार नाही.

प्रश्न वेळचे चंद्र सहशासक – गुरु, शनि, गुरु. प्रश्न वेळचे लग्न सहशासक – बुध, मंगळ, चंद्र.

जन्म वेळचे लग्न सहशासक – बुध, गुरु, रवि. जन्म वेळचे चंद्र सहशासक – शुक्र, गुरु, रवि.

हा नियम तंतोतंत लागू करायचा म्हटले तर एकतर आपल्याला जन्मतारीख बदलावी लागेल किंवा जन्मवेळ. कारण जन्म चंद्र व प्रश्न लग्न यांचे एकही सहशासक जुळत नाही. १९ जुलैला या वेळी चंद्राचे सहशासक होते मंगळ, शनि, मंगळ. निदान मंगळ तरी जुळेल. दुसरी जन्मवेळ चाचपडायाची म्हटले तर शनि विचारात घ्यावा लागेल. गुरूला प्राधान्य दिले तर धनुत गुरु आणि शनिचे नक्षत्र नाही, मीनेचाच विचार करावा लागेल. मिनेतही गुरुच्या नक्षत्रात शनिचा सब नाही, शनीच्या नक्षत्रात गुरुचा सब आहे. मीनेत शनिच्या नक्षत्रात गुरुच्या सब मध्ये लग्नबिंदू रात्री ११:१४ ला उदित असेल. चंद्र या वेळी वृश्चिकेत शनिच्या नक्षत्रात असल्याने ठीक आहे पण रात्रीचा जन्म शासकग्रहांनी आधीच खारीज केलेला आहे. कुंभेत गुरुचे नक्षत्र व सब असला तरी कुंभ लग्न रात्री ८:५० पासून आहे आणि मकर लग्न सायंकाळी ७:०० पासून असले तरी त्यात गुरुचे नक्षत्र नाही, शिवाय प्रश्न वेळी शनि वक्री आहे. तंतोतंतचा आग्रह सोडून तारतम्याने घ्यायचे म्हटले तर गुरुचे धनु लग्नातील रविचे नक्षत्र घेता येईल जे सायं. ०६:४७:०८ ते ०७:००:२५ दरम्यान उदित होते. असे केल्याने जन्मलग्न शासक गुरु, रवित येईल तर प्रश्न चंद्राचा सहशासक गुरु जुळेल. तसेच शासक गुरु राहू युक्त असल्याने सायंकाळ हि सिद्ध होईल. तसेच सूर्यास्त ७:०८ चा असल्याने त्याच्या थोड अगोदर जन्मवेळ येत असल्याने शासकातील शनि, रवि हे हि सिद्ध होतील. या वेळी जन्म चंद्र वृश्चिकेत असल्याने तोही प्रश्न लग्नाच्या सहशासकाशी संबंधित होईल. यात एक अडचण येते ती म्हणजे धनुत उत्तराषाढात ना बुधाचा सब येत ना शनिचा. अश्या वेळी उदित ताऱ्याची मदत घेता येईल. प्रश्नवेळी मंगळ उदिततारा आहे आणि मंगळचा सब धनुत उत्तराषाढात सायं ६:५४:१५ ते ६:५७:१९ दरम्यान उदित होते. तुम्हाला फारच वाटत असेल कि शासक बुधावर अन्याय होतो आहे तर बुधाचा सब सब घेवूनच टाका. उगीच माझ्या पोस्ट वर ट्रोलिंगचे मोर्चे काढत बसू नका बुधाला डावलले म्हणून. बुधाचा सब सब ६:५५:४८ ते ६:५६:१३ दरम्यान उदित होता. जन्मवेळ यातील मध्य म्हणजे सायं. ६:५६ घेवूया. ठीक आहे ना? यात शासक ग्रहांना प्रतीनिधीत्व मिळाले, सहशासकां मधले काही आले. राहू केतू पैकी एकाचा मान ठेवला. सगळे खुश ना? या वेळी प्रश्न लग्नाचे दोन सहशासक मंगळ, बुध हे जन्मचंद्राचे सहशासक होतात, त्यामुळे हि जन्मवेळ असावी याचा भरोसा जास्त वाटतो. 

सायंकाळची वेळ घेतल्याने त्या तिकडून होरारी लग्नात बसलेले शासक रवि महोदय मला म्हणतायेत “म्हणजे आम्ही यडे का?” का गरिबाला छळताय अध्यक्षमहोदय. तस नाहीये ओ. अजून घटना तपासायच्या आहेत, तेव्हा शिक्का मोर्तब होईल. आणि अध्यक्षमहोदय सकाळची वेळ घेतली तरी तुम्ही क्षितिजावर आहात कुठे, उलट सायंकाळी तुम्ही क्षितिजावर आहात.

आता एखादी घटना ताडून पाहू. मी अजून जातकाशी या वर चर्चा केलेली नाही. आई वडील दोघेही हयात नसल्याचे जातक बोलून गेला आहे. त्यावर विचार करण्या पेक्षा मी जातकाचा विवाह केव्हा झालेला असू शकतो या वर १८/०७/१९७५, १८:५६ च्या कुंडली नुसार अंदाज बांधून मग जातकाशी चर्चा करायचे ठरवले. या कुंडली नुसार सप्तमाचा सब रवि २,७ चा बलवान कार्येश आहे तो विरोधी १,१२ चाही कार्येश आहे त्यामुळे वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग येतील पण सब रवि विवाह देईल. रवि शनिच्या युतीत सप्तमात आहे. सप्तमावर शनिचा चांगला प्रभाव आहे, शनि सप्तमबिंदू अंशात्मक युती आहे. त्यामुळे विवाहाला उशीर झाला असणार हे नक्की. वयाच्या १५ ते ३२ पर्यंत बुध महादशा आहे. बुध ११ चा कार्येश आहे. ३० च्या आसपास विवाह संभव असल्याने गुरूची किंवा शनि अंतर्दशा विचाराधीन होती. गुरु ७ चा तर शनि २,७,११ चा कार्येश असल्याने शनि अंतर्दशा नक्की केली. शनि २,७,११ तिन्हीचा कार्येश असल्याने त्याचीच विदशा घेतली. ती २२ एप्रिल ते २५ सप्टेंबर २००४ दरम्यान होती. गोचरीचा जुजबी विचार करून मे/जून २००४ मध्ये विवाह झाला असावा असा अंदाज बांधला व जातकाला फोन केला. त्यांना सायंकाळी ६:५६ ची वेळ सांगितली व विवाहाचा अंदाज सांगितला. त्यांनी विवाह २९/०२/२००४ रोजी झाल्याचे सांगितले. त्या नंतर इतर काही बाबींचा पडताळा घेतला. ते सर्व काही इथे लिहित नाही. किती लिहिणार ना? सर्व काही अचूक जुळणार नाही हे त्यांना तसे आधी सांगितले होतेच. त्यांना एक आजार होऊन गेला तो मात्र नाही सांगता आला. जवळ पास ६० ते ७०% जुळले असे म्हणता येईल.  

जन्मतारीख - १८/०७/१९७५, जन्मवेळ - सायं. ०६:५६, जन्मस्थान - अहमदनगर 19°05'50.7"N 74°43'54.0"E,  अयनांश - के.पी. २३°/२५'/०८". 

जन्मलग्न - धनु २८°/५३'/०८". जन्मचंद्र - वृश्चिक ०६°/३१'/२४".


या अगोदर जातकाने दोनदा जन्मवेळ संशोधन केले होते. मी जन्मवेळ संशोधन केल्यावर मागचे त्यांनी पाठवले ते १)सायं. ०७:४४:५६. २)सायं. ०४:५४. 


पुढील लेख:- पुर्व संचित -१