||श्री||
ओळखा पाहू ? आणि वास्तवातील राधिका, गुरुनाथ.
एका ज्योतिष विषयी अभ्यास ग्रुप वर एक कुटप्रश्न
दिला गेला. पती पत्नीची कुंडली जन्मटिपण न देता मोजकीच ग्रह स्थिती दिली गेली व
कोणती कुंडली कोणाची हे ओळखायचे होते. ज्योतिषशास्त्री परीक्षेत असा प्रश्न हमखास
असतो, पण तेथे पूर्ण कुंडली असते. पूर्ण कुंडली तपासावी लागेल, मला यांव माहिती
पाहिजे अन त्यांव माहिती पाहिजे मग पुढे बोलल अस म्हणता येईल पण असाही अभ्यास
करायला काय हरकत? इथे भाकीत थोडी करायचे आहे. असो, कुटप्रश्न त्यांच्याच शब्दात
प्रथम देतो व पुढे मग तो उकलतो, कसे.
गेल्या महीन्यात माझ्याकडे
एका पती-पत्नीच्या वैवाहीक जीवनातल्या समस्यां बद्दल ची केस आली होती. ह्या
उभयतांचा विवाह आठ वर्षापूर्वी झाला पण लग्ना नंतर अवघे सहा महीने जोडी एकत्र
राहीली त्यानंतर पती नव्या नोकरी निमित्त एकटाच लांब अंतरावरच्या शहरात गेला आणि
तिथून तसाच परदेशात !
इकडे पत्नी एकटी राहीली. पती
दोन वर्षे परदेशात होता, त्या काळात पत्नीला चांगली नोकरी
मिळाली. पती परदेशातून परत आल्या नंतर त्याला दुसर्या एका लांबच्या शहरात कामावर
रुजू व्हावे लागले , पतीने पत्नीला तिकडे बदली करून घे
असे सुचवले खरे पण दुर्दैवाने पत्नीची बदली नवरा आहे त्या गावात होणे अशक्य होते , पत्नी ने पतीलाच बदली करुन घ्यावी असे सुचवले पण तेही शक्य नव्हते.
यातून काही मार्ग निघेल या आशेवर जोडी तशीच सक्तीने लादलेल्या विभक्त अवस्थेत वर्ष
भर राहीली.
दोघे एकमेकांना ‘बदली होत
नसेल तर नोकरी सोडुन दुसरी पहा’ असा आग्रह करु लागले पण हातातली नोकरी सोडायला
दोघेही तयार नव्हेत. आता तणाव वाढू लागला, जिव्हाळा आत्मियता कमी होऊ
लागली , पूर्वी दर पंधरा दिवसांत भेटणारे हे जोडपे आता तीन तीन महीन्यात
एकमेकांचे तोंड देखील पाहात नव्हते , रोज होणारा फोन कॉल आता
केव्हातरी , काही काम असेल तरच होऊ लागला.
पुढे नवरोबांच्या आयुष्यात
‘शनाया’ आली ! आणि मग पुढे काय झाले असावे याचा अंदाज आपण बांधू शकता.
असो या दोघांच्या पत्रिका
विलक्षण बोलक्या आहेत , जातकाची माहीती उघड करायची नाही
म्हणून संपुर्ण पत्रिका मला देता येणार नही , मोजकीच ग्रहस्थिती दाखवतो , बघा ग्रहयोग कशी फळें दाखवतात…
( यातली गुरुनाथची पत्रिका
कोणती ?)
भाग १:-
पहिली पत्रिका मिथुन लग्नाची :-
उपलब्ध करून दिलेली ग्रहस्थिती:-
चतुर्थात मंगळ, षष्ठात वक्री नेपच्यून, व्ययात शुक्र.
विश्लेषण:- मंगळाची स्थिती दिली आहे
त्यामुळे सहाजीकच मंगळ दोषाकडे लक्ष जाते. विवादित असले तरी पारंपारिक नुसार मंगळ
दोषाचा समाचार घेवून मग पुढे जातो. दोन्ही कुंडलीत चतुर्थात मंगळ आल्याने वैवाहिक
दृष्ट्या दोषदायक स्थानात तो आला. पण दोन्ही कुंडलीत तो प्रचलित नियमा नुसार निर्दोष
होतो आहे. तरी या पुराव्या वरून वाटते कि विवाह जमवतांना मंगळाला मंगळ हा विचार
केला गेला असावा (कारण काही जन तो निर्दोष होतो असे मानत नाहीत.) व इतर ग्रहस्थिती
अभ्यासली गेली नसावी.
मंगळ:- मिथुन लग्नाला मंगळ हा उपचय स्थानांचा
स्वामी. शुभ मंगळ हा कर्तृत्व, कार्यतत्पर, कर्म, बाहुबल, पराक्रम, यश यांचा
भोक्ता. हा या लग्नाला उपचय स्थानांचा स्वामी असल्याने उपजतच कर्माला महत्व
देण्याची वृत्ती असते. त्यात तो चतुर्थात आल्याने त्याची दशम या कर्म, अधिकार, पद,
उच्चदर्जा दर्शविणाऱ्या स्थानावर दृष्टी असल्याने या साठी धडपड, श्रम घेणारा आहे.
लाभातील स्वराशीवर त्याची दृष्टी त्यामुळे जास्तीत जास्त लाभ, कमाई करणे हे माझे
जन्मसिध्द उद्दिष्ट आहे व ते मी साध्य करून दाखवणारच हा आक्रमकपणा, त्या प्रती समर्पनता दिसणार. चतुर्थ या
मातृभूमी स्थानात तो स्थानापन्न झाला असल्याने हे सर्व करण्यासाठी त्याला देशाटन करण्याची
आवश्यकता वाटणार नाही. या कुंडलीत त्याचा व्ययाशी संबंध येत नाही, नक्षत्रानेही. (अरेरे,
सर तुम्ही मर्यादित माहितीचा खटका पाडून अभ्यासाचे इंजिन पारंपारिक लोहमार्गावर
वळविले. उपनक्षत्र, उपउपनक्षत्र स्टेशनांना तुम्ही फाटा दिला.) तर हा मंगळ आपली
जागा सोडायला तयार होणाऱ्यातला काही वाटत नाही, निदान दुसऱ्याच्या सांगण्यावरून
तरी. ह्या मंगळाची सप्तमावर दृष्टी त्यामुळे वैवाहिक जोडीदाराला हा जुमानणार नाही,
हुकमाचा ताबेदार होणार नाही. त्याच्या सूचनांचे पालन करण्या ऐवजी “मग तूच का हे
करत नाही” असे फर्मान सोडणारा. येथील मंगळ सबंध वैवाहिक जीवनात कलह निर्माण
करणारा, विरह, विभक्तता देणारा. वरील सर्व कारकत्व पाहता वैवाहिक जीवनात नोकरी
बदलीत आत्मसन्मानाचा मुद्दा कलहाचे कारण याच मंगळा मुळे आहे. सप्तमेश गुरु व मंगळ
यांच्या संबंधावर हे ठरेल कि तह करणार कि बचेंगे तो और भी लडेंगे, तसेच बुधाचा
सप्तमाशी संबंधावरही.
नेपच्यून:- जलतत्वाचा हा ग्रह गूढ, विचार, विकारांच्या
लहरी, अगम्य, सामान्यरेषेच्या वरची फले देणारा. जलतत्वाच्या राशीत असल्याने
राशीबली. वृश्चीकेचे जलतत्व हे प्रवाही नाही तर साचलेले आहे. त्यात हा मंदगती ग्रह
षष्ठ या नोकरीदर्शक स्थानात त्यामुळे नेपच्यून येथे शनि सारखी फळे देणार. त्यात हा
नेपच्यून वक्री, हे हि बल त्याला प्राप्त. त्यामुळे हा नेपच्यून नकारात्मक फले
देवू शकतो. पण बालावास्थेतील हा वरूण कुणाच्यातरी प्रभावाखाली त्याची फलाची दिशा
ठरवणार. उपलब्ध कुंडली नुसार दोघांचा प्रभाव आपणास तपासता येईल. एकतर त्यावर दिप्तांश
मर्येदेत दृष्टी ठेवणारा प्रतियोगातील शुक्र व दुसरा त्याचा स्वामी मंगळ. शुक्रामुळे
तो वैवाहिक सुखात, शैयासुखात बाधा उत्पन्न करणार तर मंगळामुळे नोकरी, व्यवसाया वर
प्रभाव टाकणार. ‘खालच्या पातळीवर शुक्र जे काम करतो तेच काम नेपच्यून वरच्या
पातळीवर करतो.’ असे कुंडलीची भाषा खंड-२ मध्ये विधान केले आहे.
शुक्र:- शुक्राला फक्त सप्तमभावाचे नैसर्गिक
कारकत्व आहे. मिथून लग्नाल तो पंचम व व्यय भावाचा मालक होतो. पंचम स्थान प्रेम, प्रणय,
कला, मनोरंजन तर व्यय स्थान भोगभाग्य हे तर मुळात शुक्राचे प्रांत, आणि शुक्राला
येथे त्याचीच मालकी मिळाली. त्यात लग्नेश बुध नैसर्गिक मित्र. म्हणजे शुक्र खर तर
खुशीत हवा व त्याने भरभरून फले द्यायला हवे. विचाराधीन कुंडलीत तर त्याने मेहेरनजर
करायला हवी होती. “इतक मेहेरबान होण्यासारखे आहे काय?” म्हणताय. सायबानु शुक्र
व्ययात स्वराशीत आहे. “आहे, मग त्याने काय झाले?” विमला योग झालाना महाराज. हा
विमला योग काही पापग्रहाने झालेला नाही तर शुभग्रहाने झालेला हाये. सुख, ऐश्वर्य,
विलास, सौभाग्य, भोगभाग्य देणाऱ्या शुक्राने तो केलाय. “राजे, तुम्ही एवढे म्हणताय
तर या शुक्राला अडवलं कुणी, का दिली नाही भरभरून फळे?” आडवल! आहो हा शुक्र धाकात
आहे. वरती नेपच्यून चे विश्लेषणात लीवलना ते. आता अजून कुणाचा धाक आहे, विशेषता शनि महाराज डोळे
रोखून आहेत का? हे काही आपल्याला उपलब्ध कुंडली वरून समजणार नाही. असू द्या. शुक्रही
बाल्यावस्थेत आहे तो धाकात राहणार. निदान नेपच्युनचा तरी प्रभाव माहित असणे
आपल्याला पुरेसे आहे. शुक्र नेपच्यून प्रतियोग, केंद्रयोग हा काही शुभ योग नाही.
व्यय (परदेश, त्याग, बंधने) व षष्ठ (नोकरी, जोडीदारचे व्यय) ह्या स्थानातून तो होत
असल्याने या बाबतीत नेपच्यूनच्या वृत्ती नुसार सामान्य स्ताराच्या वर त्याने
नकारात्मक फले वैवाहिक सुखाच्या बाबतीत दिली. विमलायोग पावित्र्य, शुध्दता,
शुचिर्भूतताही देतो.
निष्कर्ष :- वरील देशाटनाला अनास्था दाखवणारा मंगळ व नेपच्यून,
शुक्राचा मूड पाहता विशेषत: शुक्र विवेचनातील शेवटची ओळ लक्षात घेता मी या
निष्कर्षाप्रत आलोय की मिथुनलग्नाची हि कुंडली राधीकावहीनींची आहे.














