रविवार, २९ जून, २०२५

अचानक

||श्री||

मागील लेख:- यंदा कर्तव्य आहे.

 अचानक



संजय कपूर :- १५/१०/१९७१, दिल्ली. मृत्यू १२/०६/२०२५, लंडन.

कपूर हे उच्चशिक्षित होते. त्यांनी प्रथम देहरादून येथील द डून स्कूलमधून आणि नंतर मुंबईतील द कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी परदेशात गेले. त्यांनी लंडनमधून कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आणि एचआरमध्ये बीबीए केले. यानंतर त्यांनी एमआयटी आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून प्रतिष्ठित कार्यनिष्‍पादनपरक अभ्यासक्रम (executive courses) पूर्ण केले.

पहिला विवाह -  नंदिता महतानी (Nandita Mahatani) – विवाह १९९६, घटस्फोट २०००.

दुसरा विवाह – करिष्मा कपूर विवाह २९/११/२००३, मुलगी समायरा (samiera) ११/०३/२००५, मुलगा कियान (Kiaan) १२/०३/२०१०. कियानच्या जन्मा नंतर करिष्मा मुंबईत आई कडे आली. त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा उठू लागल्या ज्या खऱ्या ठरल्या. २०१४ मध्ये परस्पर सहमतीने घटस्फोटाचा अर्ज केला व १३/०६/२०१६ मध्ये घटस्फोट झाला.

तिसरा विवाह – प्रिया सचदेवा विवाह १३/०४/२०१७. मुलगा अजारीयस (Azarius) डिसेंबर २०१८.

कपूर हे ऑटो कंपोनेंट बनवणाऱ्या सोना कॉमस्टारचे अध्यक्ष होते. या कंपनीची स्थापना १९९७ मध्ये त्यांचे दिवंगत वडील सुरिंदर कपूर यांनी केली होती, जे भारतातील वाहनांचे सुटेभाग उद्योगातील एक अग्रणी होते. २०१५ मध्ये वडिलांच्या निधनानंतर संजयने व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे स्वीकारली. सोना कॉमस्टारचे भारत, चीन, मेक्सिको, सर्बिया आणि अमेरिकेत नऊ कारखाने आहेत. ही कंपनी इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी सुटे भाग पुरवते.

 

अमेरिकन नागरिकत्व असलेल्या संजय यांनी २०२२ मध्ये जगातील अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले. फोर्ब्सच्या मते, त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांची एकूण संपत्ती १.२ अब्ज डॉलर्स (म्हणजेच १०,३०० कोटी) होती. यातील मोठा वाटा गुरुग्राम येथील मुख्यालय असलेल्या सोना कॉमस्टारकडून येतो. ही कंपनी १२ उत्पादनांची निर्मिती करते. ही कंपनी भारत, चीन, मेक्सिको, सर्बिया आणि अमेरिकेत ५,००० हून अधिक लोकांना रोजगार पुरवते

१२ जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो सामन्यादरम्यान कोसळून त्यांचे निधन झाले. मृत्यू समयी ते ५३ वर्षांचे होते. पोलो खेळत असताना मधमाशी तोंडात गेल्याने अचानक मृत्यू झाल्याचे टेलिग्राफने वृत्त दिले आहे. एक मधमाशी अनवधानाने त्याच्या तोंडात शिरून चावल्याने त्यांना अ‍ॅनाफिलेक्टिक शॉक आला होता.



आपल्याकडे प्रभावशाली, वलयांकित व्यक्तीमत्वे म्हणजे फक्त अभिनय क्षेत्रातली ते हि बॉलीवूड मधीलच असतात असा समाज माध्यमांचा समज आहे कि काय असे वाटते. तरी बरे यांची व्दितीय पत्नी अभिनेत्री आहे. यांच्या कुंडलीचे विश्लेषण करावे म्हणून जन्म टिपण शोधत होतो, पण मिळेनाच. विकिपीडिया वर जन्मतारीख व स्थान मिळाले. पण कुंडलीसाठी जन्मवेळाही हवी असते. संजय कपूर नावाने सर्च केले कि अभिनेता संजय कपूरचेच समोर येत होते. फोर्ब्जच्या यादीत असलेले एक उद्योगपती असतांना व नुकताच त्यांचा मृत्यू जागतिकस्तरावर चर्चेचा विषय झालेला असतांना हि अवस्था. बर मी businessmen sanjay Kapoor असेही सर्च केले, त्यांची तारीख मिळाली होती म्हणून Birth chart of Indian businessmen bron in 1971 असेही शोधले, पण हाती काही लागेना. दोन दिवस शोधत होतो. एका ज्योतिषाने विर भगत नावाने एक लेख लिहलेला आढळला. त्यांनी धनु लग्न घेतले होते, पण जन्मवेळ दिली नव्हती. धनु लग्न जन्मजात नेतृत्वगुण देते या एवढ्या एका गृहीतीकावर धनु लग्न घेतले होते. व्दितीयातील राहू अफाट संपत्ती देतो हे हि एक गृहीत त्यामागे होतेच. एखादे फलित फक्त एखादी विशिष्ट ग्रहस्थितीच देते असे फलज्योतिषात नाहीये. त्यामुळे त्यांनी जो विचार केला तो पूर्णपणे चुकीचा आहे असे मला म्हणायचे नाहीये, त्या साठी हा प्रपंच नाहीये. तर धनु लग्न हा त्यांचा अंदाज आहे खात्रीलायक जन्मवेळे वरून नाही.



आता लग्न कोणते असावे याचा अंदाज घेतांना मी मृत्युच्या घटनेला प्रथम महत्व दिले. मधमाश्यांच्या डंखाने मृत्यू झाल्याच्या तुरळक घटना घडतात पण केवळ एका माशीच्या डंखाने तडका फडकी मृत्यू हि दुर्मिळ घटना आहे व तेही एका अतिशय उच्चस्तरीय व्यक्तीचा मृत्यू म्हणजे असाधारण घटना. उपचाराला देखील वेळ मिळालेला दिसत नाही. एका मधमाशीचे विष इतके घातक ठरू शकते? घश्यात डंख मारल्याने घातक ठरले. विषारी कीटकाच्या डंखाने मृत्यू त्यामुळे माझे लक्ष क्षणात षष्ठ अष्ट संबंधा कडे गेले. उपलब्ध जन्मतारखेला असा संबंध केवळ मिथुन लग्न असताच होतो आहे. साधारण रात्री ०९:४३ ते १२:०० दरम्यान दिल्लीला मिथुन लग्न उदित होते. षष्ठातील वृश्चिक या कीटक राशीचा अधिपती मंगळ अष्टमात विषाचा कारक राहू युक्त आहे. अष्टमातील अंगारक दोष अपघाती मृत्यूस कारणीभूत होऊ शकतो. येथील मंगळ तडका फडकी व वेदनादायी मृत्यू देतो. घसा व्दितीया वरून पाहतात. व्दितीयात केतू असून षष्ठेश मंगळ व अष्टमेश शनिची संयुक्त दृष्टी त्यावर आहे. व्दितीय स्थान मोठ्या प्रमाणात पाप संबंधी झाले.

जातकाचा मृत्यू मध्यायू मर्यादेत झाला आहे. उपलब्ध जन्मतारखेचे मिथुन लग्न ढोबळ मानाने दीर्घायू दर्शवितो कारण लग्नेश बुध पंचमात पंचमेश शुक्र युक्त आहे. पण कक्षाऱ्हास वगैरे बारा भानगडी असतात. कक्षाऱ्हास करण्यासाठी लग्न, लग्नेश पापमध्यात व शुक्राला असलेल व्ययेशत्व हि कारणे सध्या तरी पुरेशी वाटतात, शिवाय लग्नेश बुध षष्ठेश मंगळाच्या नक्षत्री वृश्चिक नवमांशी आहे.

जातकाचे तीन विवाह झाले. फार खोलात न जाता चर दाराकारक बुध नै. दाराकारक युक्त असल्याने हे फलित संभव आहे. दोन घटस्फोट झाले आहेत. सप्तमेश गुरु षष्ठात आहे. अष्टमात तीव्र मंगळदोष आहे. सप्तमस्थान नेपच्यून व राहुच्या पापकर्तरीत आहे. व्दितीय भार्येने काडीमोडी च्या वेळी त्यांच्या वर जे आरोप केले त्यामुळे जातकाची केवळ खलप्रवृत्ती दिसून येत नाही तर दोन्ही घराची प्रतिष्ठा, मान, संस्कार धुळीस मिळाली. मिथुन लग्नाला अंतस्थ खलप्रवृत्ती निदर्शक तृतीयात स्वभाव, विचार प्रवृत्तक मनकारक चंद्र पाप मध्यात अंगारक मंगळाच्या दिप्तांश अष्टम दृष्टीत असणे जातकाल हीन अभिरुची देवू शकतो. कारक शुक्र व प्रणयस्थानही रवि, हर्षल, प्लुटो व नेपच्युनच्या पाप मध्यात आहे. येथील राहुच्या नक्षत्रातील शुक्र बरेच काही सुचवून जातो आणि त्यात बुध अस्तंगत. तेव्हा अधिक काय बोलणे.

पुढील लेख:- जपान संभाव्य त्रासदी.

 

 

 

 


रविवार, १५ जून, २०२५

यंदा कर्तव्य आहे.

||श्री||

मागील लेख :- चुकीला माफी नाही.

यंदा कर्तव्य आहे.



कुंडलीत सप्तमावर सर्वात बलवान प्रभाव शनिचा असून मंगळदोषही आहे. त्यामुळे विवाह उशीर समजू शकतो. पण इतका उशीर? कारण शनि तृतीयेश असल्याने २५ ते ३६ या वयोगटात विवाह व्हायला हवा. या गटात २८,२९,३० हि वर्षे मिळत होती किंवा अजून उशीर म्हटले तरी ३२ वे वर्ष होतेच. २८ व्या वर्षी मंगळ म.द. राहू अ.द. २७व २ मास पर्यंत होती. राहू अंतर्दशेतील रवि, चंद्र, मंगळ विदशा २८ व्या वर्षाच्या सुरवातीला होत्या व तिघेही अनुकूल कार्येश आहेत. चंद्र विदशा योग्य होती. मंगळ २,११ चा कार्येश आहे व त्याची महादशा ३३ व्या वर्षा पर्यंत होती. शनि केतू वगळता बाकी ग्रह अनुकूल स्थानांचे कार्येश आहेत. शनिची अंतर्दशा २९ व्या वर्षी व ३० व्या वर्षातील ३ महिने होती. तर केतू अंतर्दशा ३१ व्या वर्षातील ५ महिने होती. शनि १/११/२०१४ ते २५/०१/२०१७ दरम्यान वृश्चिकेत होता. शनीचे हे गोचर जे २८,२९ व्या वर्षी होते जे विवाह अनुकूल होते. यात ३० व्या वर्षातील सुरुवातीचा साधारण दीड मास येतो. २२ जून ते २५ ऑक्टो. २०१७ मध्ये लगेचच वक्री शनि परत वृश्चिकेत होता, म्हणजे साधारण ४ एक मास. ३० व्या वर्षातील ६ मास शनि अनुकूल होता. तसा धनुचाही शनि विवाहानुकुल होता. म्हणजे २८,२९,३० व्या वर्षी विवाहास गोचर शनिची अडचण नव्हती. पण शनि राशीला नव्हता. वृश्चिकेचा शनि पनौती होता. १८/०६/२०१४ ते १३/०७/२०१५ गुरु कर्केत होता जो विवाहानुकुल होता. २८ व्या वर्षातील शेवटची ६ महिने व २९ व्या वर्षाची सुरवातीचे ७ महिने धरा. पण गुरुही राशीला नव्हता. सिंहेचा गुरु काही अनुकूल नव्हता. ११/०८/२०१६ ते ११/०९/२०१७ दरम्यान गुरु कन्येत होता. कन्येचा गुरु अनुकूल होता व राशिलाही बरा होता. तुळेचाही गुरु अनुकूल व राशीला उत्तम होता. ०३/०३/२०१७ ते २८/०२/२०१८ मंगळ म.द. बुध अंतर्दशा होती. बुध २,७ चा कार्येश आहे. ०३/०३/२०१७ ते २२/०६/२०१७ २५/१०/२०१७ ते ०२/१२/२०१७ हे ३० व्या वर्षातील काळ विवाहानुकुल होते.

(जातक स्त्री - ०३/१२/१९८७, ०७:४५, सांगवी, ता- बारामती.) 


 

पण विवाह काही झाला नाही. लग्नेश सप्तमेश अंशात्मक लाभयोग आहे. अनुकूलता असूनही विवाह झाला नाही कारण प्रयत्न, जपजाप्य कमी पडले असतील किंवा मानसिकता अडथळा ठरला असेल. चंद्र मंगळ समसप्तक, प्रभावी नसलेला चांडाळयोग आहे. (ते काही असले तरी)पण आपल्याला यामागे ग्रहताऱ्यांचा अडथळा शोधायचा आहे. कारण ३७ व्या वर्षी ज्या राहू म.द. गुरु अ.द. केतू विदशेत विवाह झाला ती विदशा विवाहानुकुल नव्हती. राहू २,७, गुरु २ चा कार्येश असले तरी विरोधी भावही आहेत. काहीजन ८ ला विवाह पूरक मानतात केतू त्याचा कार्येश आहे तेवढेच समाधान. अन्यथा केतू १,६,१०,१२ या विरोधी भावांचा कार्येश आहे. पण विवाह झाला हे तर खरे. ज्यावेळी दशा गोचर अनुकूल होते त्या वेळी विवाह झाला नाही व ज्यावेळी विदशा (खरे तर)अनुकूल नव्हती त्यावेळी विवाह झाला?

सर्वाष्टकात व्दितीयात, सप्तमात फक्त २१ बिंदू आहेत. ३० व्या वर्षी जो काल विवाहानुकुल म्हणून काढला ज्यावेळी दशा गोचर अनुकूल होते. त्यावेळी शनिचे धनुतून गोचर होते जे सप्तमेशावरून होते, तसे अनुकूल होते. भिन्नाष्टकात शनिला येथे फक्त दोनच बिंदू आहेत जे कमी आहेत. गुरुचे कन्या, तुळेतून भ्रमण होते. भिन्नाष्टकात दोन्हीतही गुरूला ५,५ बिंदू आहेत जे बरे आहेत. भिन्नाष्टकात गुरु तर बलवान होता पण शनि नाही. ३७ व्या वर्षी ज्या वेळी विवाह झाला त्यावेळी शनि कुंभेत तर गुरु वृषभेत होता. भिन्नाष्टकात कुंभेत शनीला ५ बिंदू आहेत तर वृषभेत गुरूला ६ बिंदू आहेत. दोघेही बलवान गोचरीत होते.



मंगळ महादशेत विवाह झाला नाही कारण भिन्नाष्टकात मंगळ स्थित राशीत त्याला केवळ २ च शुभबिंदू आहेत तर सप्तमात ३ बिंदू. गोचर शनि धनुत होता. शनि भिन्नाष्टकात येथे दोनच बिंदू आहेत हे आपण पाहिले आहेच, पण महादशानाथ मंगळाला भिन्नाष्टकात येथे १ च बिंदू आहे. गोचर गुरूला मंगळ भिन्नाष्टकात कन्येत ५ बिंदू आहेत त्या मुळे प्रयत्नाने कदाचित या काळात विवाह होऊ शकला असता. पुढे तुळेत मंगळ भिन्नाष्टकात २ च बिंदू आहेत.

महादशानाथ राहू गुरुच्या राशीत आहेत आणि सर्व ग्रहात सप्तमात गुरु भिन्नाष्टकात सर्वाधिक बिंदू आहेत तेही ६ बिंदू म्हणजे उत्तम आहे. दुसरे म्हणजे राहू भिन्नाष्टकात सप्तमात ५ बिंदू सह व्दितीय क्रमांकावर आहे. राहू गुरु दोघेही पंचमात आहेत व येथे स्वभिन्नाष्टकात प्रत्येकी ४,४ बिंदू मध्यम आहेत. गोचर शनि कुंभेत होता व भिन्नाष्टकात ५ बिंदू होते तर गोचर गुरु वृषभेत ६ बिंदूसह होता. गोचर राहू मीनेत होता. विवाह राहू महादशेत गुरु भूक्तीत २४/०६/२०२४ रोजी झाला. विदशा केतूची होती. केतूला भिन्नाष्टकात सप्तमात ३ बिंदू म्हणजे कमी होते पण गोचर केतूने हि कमी भरून काढली. केतुला कन्येत ५ शुभबिंदू आहेत. केतू राशीस्वामी बुधालाही भिन्नाष्टकात सप्तमात ३ तर कन्येत ५ बिंदू आहेत.

विवाह झाला त्या वेळी शनि कुंभेत २५ अंशावर होता. शनिला प्रस्ताराष्टकात गुरु, मंगळ, रवि, चंद्र, लग्न यांनी शुभबिंदू दिले आहेत. गोचर शनि चंद्राच्या कक्षेतुन जात होता. गुरु वृषभेत १३ अंशावर होता म्हणजे रविच्या कक्षेत. गुरु प्रस्ताराष्टकात शनि, बुध वगळता इतर सर्व ग्रहांनी शुभबिंदू दिलेत. शनि व गुरु दोघेही शुभ कक्षेतुन जात होते.

३० व्या वर्षी शनि धनुत होता. धनुत त्याला मंगळ व रवि बिंदू देत आहेत. २५ जाने. ते २९ मार्च २०१७ शनि धनुत स्वकक्षेत होता. नंतर गुरुच्या कक्षेत असतांना तो ६ एप्रिलला वक्री झाला. २२ जूनला तो वृश्चिकेत लग्नाच्या कक्षेत आला ते २५ ऑग.ला लग्न कक्षेतच तो मार्गी झाला. २५ ऑक्टो.ला तो परत धनुत स्वकक्षेत आला. वृश्चिकेत लग्नाने शनिला शुभबिंदू दिला आहे. आपण दशे नुसार जो काल काढला ३ मार्च ते २२ जून त्या दरम्यान शनि धनुत स्वकक्षेत होता. धनुत शनिने स्वत:ला शुभबिंदू दिलेला नाही. नंतर २५ ऑक्टो. ते २ डिसें.२०१७ दरम्यानचा दशाकाळ विवाह अनुकूल होता. या काळात शनि स्वकक्षेत व गुरु च्या कक्षेत होता. त्या मुळे शुभ फले दिले नाहीत. २२ जून ते २५ ऑक्टो. २०१७ शनि शुभकक्षेत होता. या दरम्यान गुरु २८ जुलै पर्यंत बुधाच्या, २२ ऑग. पर्यंत चंद्राच्या व नंतर ११ सप्टें. २०१७ पर्यंत लग्नाच्या कक्षेत होता. कन्येत बुध आणि लग्नाने गुरूला शुभबिंदू दिलेले आहेत. म्हणजे गुरूची चंद्र कक्षा वगळता या कालावधीत शनि व गुरु दोघेही शुभकक्षेत होते. पण हा दशाकाळ अनुकूल नव्हता ना महाराजा. ग्रहगणिता आधारे एखादे भाकीत करणे ते हि अचूक इतके सोपे नाही. खूप माथापच्ची करावी लागते, वेळ द्यावा लागतो, संयम, एकाग्रतेचा कस लागतो. यावर परत धार्मिक, सामाजिक, भौगोलिक व प्रासंगिक घटक परिणाम करतात ते वेगळेच. ते हि अवधान बाळगावे लागते.     

या प्रकरणात असे दिसून येते कि आपण नुसत कर्तव्य आहे असे म्हणून होत नाही तर ग्रह गोचरीची NOC असल्या खेरीज कर्तव्य पार पडत नाही.   

पुढील लेख लवकरच ....