|| श्री ||
मागीललेख:- रवीपुत्र यमाग्रज
“सोमवार
नंतर मंगळवारच का येतो?”
आपल्या हिंदू परंपरेत बऱ्याच गोष्टी (सगळ्याच
नाही म्हणत मी) ह्या विचार पूर्वक केल्या आहेत. त्या मागे सुसंगती, निरीक्षण,
सारासार विचार, निसर्गचक्र, विज्ञान यांची सांगड घातलेली असते. परकीय आक्रमणकारींनी
त्यांचा धर्म विस्तार करण्यासाठी, त्याचे पाय या भूमीत ठामपणे व निरंतर रोवण्यासाठी
आपली परंपरा, आपले ज्ञान हे अवैज्ञानिक, संदर्भहीन आहे हे आपल्यावर बिंबवीत गेले. आपल्या
नित्याच्या अगदी सहज गोष्टींमागे देखील बऱ्याचदा शारीरिक, भौगोलिक, मानसिक किंवा
इतर काही न काही पैकी वैज्ञाणिक कारण असते.
आता हेच बघाना आपल्या नित्यातील एक
बाब. कधी ना कधी हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात नक्की येत असेल कि बाबा हे रविवार
नंतर सोमवार नंतर मंगळवार.... असेच का? हे दिनसंबोधन जेव्हा केव्हा पासून सुरु
झाले असेल ते केवळ कुणी सांगितले व आज्ञा प्रमाण म्हणून ते वर्षा मागून वर्षे चालत
आले, असे नाहीये. या मागे काही सुसंगत विचार नक्कीच आहे. एका ज्योतिष समुहावर असा
प्रश्न विचारला गेला तो असा कि “सोमवार नंतर मंगळवारच
का येतो?” आता हा प्रश्न विचारण्या मागे त्यांची भावना किंवा अविर्भाव
म्हणा हव तर काहीही असो. जर प्रश्न विचारण्यामागचा त्यांचा भाव चुकीचा वाटला असेल
तर त्या बाबत त्यांना बोला लावा, स्पष्टीकरण विचार त्याचे नक्कीच त्यांनी स्वागत केले
असते. पण या वर उत्तरे काय आली तर नमुना दाखल काही देतो.
कारण सोमवार हा रविवार नंतर
येतो.....
कारण नंतर बुधवार असतो😀....
तसं शास्त्र असतंय!....
आमच्या इथे तर शुक्रवार येतो....
तुम्ही रविवार पण आणू शकतात....
येतो की मंगळवारानंतर सोमवार, आपल्या मराठी शब्दकोशात.....
एखाद्या विनोद, हास्यरस समुहावर अशी
उत्तरे आली असती तर काही वाटले नसते. पण ज्योतिष अभ्यासक समुहावर अशी उत्तरे आली
याचे वाईट वाटते. तरीही काही अभ्यासकांनी याचे उत्तर दिले. त्या मुळे खरे तर मी
आता उत्तर देण्याची आवशक्यता नाही पण मी उत्तर देईल असे म्हटले होते म्हणून हा
प्रपंच. परत कुणी हा प्रश्न विचारला तर कळलेखनात वेळ घालवण्या पेक्षा दुवा देणे
सोपे म्हणून येथे लिहित आहे. इतर ठिकाणीही याचा वापर करता येईल म्हणून ब्लॉग वर
लिहित आहे.
वारांना ग्रहांची नावे दिली गेली आहेत.
वारांचा क्रम हा ग्रहांच्या तेजस्वीते नुसार नाही हे प्रथम स्पष्ट करतो. तसे असते
तर सोमवार नंतर शुक्रवार यायला हवा होता. तसे तर शुक्र हा सर्वात तेजस्वी ग्रह
म्हणता येईल. चंद्र हा सूर्या पासून १२ अंश गेल्यावर दिसू लागतो पण शुक्र हा रवी
पासून ७.५ अंश गेल्यावर दिसू लागतो.
वारांचा क्रम हा पृथ्वी सापेक्ष
त्यांच्या कोणीय गती नुसार ठरवला आहे. पृथ्वीसापेक्ष व कोणीय हे महत्वाचे आहे.
कारण ज्या शनीला आपण मंद म्हणतो त्याची रेषीय गती जास्त आहे.
आ मंदात शीघ्र पर्यंतम्
होरेशा: || - आर्यभट्ट
या नुसार मंद ग्रहा पासून शीघ्र ग्रहा
पर्यंत क्रम लावला आहे. म्हणजे शनी, गुरु, मंगळ, रवी, शुक्र, बुध, चंद्र असा क्रम.
पण सरळ असा क्रम उचलून वारांना दिला गेला नाहीये. आपल्या कडे दिवसाचे ६० भाग केलेत
ज्याला घटिका असे म्हटले जाते. प्रत्येक घटीला स्वतंत्र संबोधन नाहीये. म्हणजे
अद्याप माझ्या तरी वाचनात नाही आले. दिवसातील भागांना संबोधण करण्यासाठी या
क्रमाचा विचार केला गेला असावा. या साठी दिवसाचे २४ भाग केले गेले व या भागांना
होरा असे म्हटले. होरा हा शब्द अहोरात्र यातील मधल्या दोन अक्षरांवरून घेतला आहे.
या होऱ्याना संबोधण्या साठी वरील क्रमाचा वापर केला. समजा सूर्योदयाचा पहिला होरा
सर्वात मंद ग्रहाचा म्हणजे शनिचा नंतर गुरु, मंगळ, रवी, शुक्र, बुध, चंद्र असे सात
होरे झाले. नंतर परत शनी पासून सुरुवात करून होरे. असे एका अहोरात्रीत सात
ग्रहांचे तीन अवर्तने होऊन परत शनी, गुरु, मंगळाचे होरे झाले कि पुढच्या रविच्या
होऱ्यात पूढच्या दिवसाचा सूर्योदय होतो. या अव्याहत क्रमाने ज्या दिवसाचा सूर्योदय
ज्या होऱ्यात होईल त्या होऱ्याचे नावाने तो वार. समजण्यासाठी ज्या दिवसी आपण पहिला
होरा शनिचा घेतला तो दिवस शनिवार व दुसऱ्या दिवशी ज्या होऱ्यात सूर्योदय झाला (रवी
होरा) तो रविवार. होरा कोष्टक पंचांगात दिलेले असते. तरी येथे देतो.

यावर एक प्रश्न एका कमेंट वर केला
गेला. त्याचेही उत्तर द्यावे म्हणून तो येथे घेत आहे.
“पण एक प्रश्न पडतो कि...
अश्याने प्रत्येक दिवसाचा सुर्योदय एकाच वेळेला येईन... पण कधी सुर्योदय 6:05
वाजता पण असतो..तर कधी 7:00 वाजता असतो...
प्रत्येक ग्रहाचा एकच होरा
पकडला तर प्रत्येक दिवशी त्याचवेळी सुर्योदय येईन .. जे शक्य नाही.
कदाचित वरील माहीती परीपूर्ण
करण्यासाठी होराची वेळ सुर्योदय आणि सुर्यास्ताला धरून असावी.”
या वर उत्तर असे आहे कि:-
बरोबर आहे. आपल्या कडे हे जे दिवसाचे २४ होरे केले गेले ते दिवसमानाचे म्हणजे एका
सुर्योदया पासून दुसऱ्या सुर्योदया पर्यंत. हिंदू दिवसाचे २४ होरे व पाश्चात्यांचे
दिवसाचे २४ तास या मुळे एक होरा म्हणजे एक तास असा समज होतो. हे ढोबळ मानाने
समजुती करता ठीक आहे. पण हिंदू गणिता नुसार सूर्योदय ते सूर्यास्त (याला दिनमान
म्हणतात) व सूर्यास्त ते पुढचा सूर्योदय (याला रात्रीमान म्हणतात) याचे बारा बारा भाग
केले जाते. त्या मुळे रोजचा एक होरा पाश्चात्य मानाने बरोबर एक तासाचा असेलच असे
नाही तो तासाच्या प्रमाणात कमी जास्त असतो दिनमान व रात्रीमानानुसार. हिंदू
जास्तीत जास्त नैसर्गिक व भौगोलिक घटनांचा आधार घेत. ‘तास’ हे इंग्रजांनी येथे रूढ
केले. त्या पूर्वी आपल्या कडे यांत्रिक रीत्या कालमापन करण्यासाठी घटीयंत्र असे. एक
होरा म्हणजे अडीच घटी म्हणजेच २ घटी ३० पळे हे मध्यम मानाने आहे. दिनमान व रात्रीमाना
नुसार यातही कमी जास्त पणा होतो. दिनमान रात्रीमानाच्या कमी जास्तपणाला पृथ्वीचा
कललेला अक्ष जबाबदार आहे.
खाली कमेंट मध्ये विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर तिथेच दिले आहे. तर एका प्रश्नाचे उत्तर सविस्तर असल्याने वेगळा लेखात समावेश केला आहे. तास(Hour) आणि होरा बाबत प्रश्न होता. पुढील लेखावर क्लिक केल्यास तो वाचता येईल.
पुढील लेख:- Hour आणि होरा.