बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५

AI Astro बाबत शंका.

||श्री||

मागील लेख:- जपान संभाव्य त्रासदी? 

AI Astro बाबत शंका.




सध्या नुसत्या जन्मतारखे वरून ज्योतिष शास्त्रावर विश्वास नसलेल्या व्यक्तीला तो अमुक अमुक काळा पासून एका व्यक्तीच्या प्रेमात व संबंधात आहे व एका वर्षा नंतर त्या व्यक्तीशी तुझा विवाह होईल, सोडून गेलेला प्रियकर/प्रियेशी परत तुझ्या कडे येईल. असे सांगून त्या व्यक्तीला अचंभित करून ज्योतिष शास्त्रावर त्याचा विश्वास बसवणारी अश्या आशयाच्या एका AI अॅपच्या जाहिरातीचा माझ्यावर भडीमार केला जातो आहे. अनेकांनीही हि जाहिरात पाहिली असेलच. संयोगाने अंकशास्त्राच्या नियमाचा एक व्हिडियो माझ्या पाहण्यात आला ज्यात जन्मतारखे वरून जातकाचा व्यवसाय/नोकरी कशात उत्कर्ष होईल त्याचे ठोक टाळे दिले होते. माझा थोडा फार अभ्यास असल्याने एक जन्मतारखेवर तो किती लागू होतो ते तपासून पाहिले. अर्थात एखाद्या उदाहरणा वरून लगेच काही निष्कर्ष काढणे योग्य नाही. राहिले AI अॅपचे तर त्यांना तुमचा सगळा डेटा उपलब्ध होतो. त्या वरून तुम्ही कुणाशी रिलेशनशिप मध्ये आहात/होता, कुठे माती खाल्ली हे कळने त्यांना अवघड आहे का? काहीजन आपले उत्पादने विकण्यासाठी थातुर मातूर ज्योतिष शिकून तेच 101% बरोबर असल्याचा दंभ मिरवत असतात.  त्याची जरा चिकित्सा करण्यासाठी हा प्रपंच. झोलाछाप ज्योतिषांची कमी होती आता त्यात भर टाकायला AI वाले आले. तुम्ही कुणाशी, काय बोलता, कधी पासुन बोलता, कुणाला कुठे भेटता, तुमचे खाजगी (असा तुमचा गैरसमज असलेले) फोटो, व्हीडोओ इ. माहिती यांना तुमच्या फोन च्या माध्यमातून मिळते. आत्ताच काही दिवसांपूर्वी असाच एक सिद्ध पुरुष गजाआड गेला जो त्याच्या कडे येणाऱ्या लोकांचा मोबाईल हॅक करून त्यांच सर्व खाजगी, सार्वजनिक पाहून त्यांना बोटं तोंडात घालायला लावायचा म्हणे. हे झाले AI अॅपचे. ‘चुहे को मिली हल्दी, मैं बडा पंसारी’ असे काही ज्योतिषी आपल्याला दिसतातच, मोठे मोठे (फक्त) दावे करतांना. व्हिडीओ करणारे तज्ञ असतातच याची काय हमी? आजकाल Like मिळवण्यासाठी कुणीही काहीही व्हिडीओ टाकतात. तर त्या व्हिडीओ नुसार मुलांक जर ७,,४ असेल तर व्यवसायात चांगले यश मिळते. सुरवात केल्या नंतर ५ ते ७ वर्षात मोठ्या धनलाभाची संधी मिळते. जर मुलांक १,,८ असेल तर नोकरीत यश मिळते. ३० च्या आत मनासारखी नोकरीचे योग येतात. एका मता नुसार १,,,,६ हे व्यवसायाचे अंक आहेत. तर एका व्यक्तीची तरी जन्म तारीख पाडताळून पाहू या. ज्याने त्याने आप आपली तापासून पहावी व वरील नियम जुळतो का नाही ते कमेंट मध्ये टाकावे. उगाच जन्मतारखांचा पाऊस पाडून माझ सांगा, माझ सांगा करू नका. मी उत्तर (फुकटात) देणार नाही. माझ्याच कडून विश्लेषण हव असेल तर त्याचे मोल अगोदर द्यावे लागेल. असो.         

 


     

या व्यक्तीच्या लोशो ग्रीड मध्ये ५ अंक नाही. पदवी परिक्षा दिल्या बरोबर २१ व्या वर्षी मार्च मध्ये जातक नोकरीला लागला. सप्टें. २००३ पासून जातकाने स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. मुलांक २ व भाग्यांक ९ आहे. म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय दोन्हींचाही अंक नाही. व्यवसाय सुरु केल्यावर अल्पावधीतच उत्कर्ष झाला. एक प्रकारे अश्रित असलेल्या या व्यक्तीचे ७ वर्षांत स्वत:चे घर झाले. घर घेतल्यावर ६ महिन्यातच विवाह केला. विवाहा नंतर २१ महिन्यात कन्या रत्न प्राप्त झाले. मुलीच्या जन्मा नंतर ४/५ महिन्यात दुसरे घर केले. स्वत:चे वाहन वगैरे झाले. भाड्याचे असलेले दुकान स्वत:चे झाले नंतर दुसरा गाळा घेवून विस्तारही केला. ग्रीड मध्ये क्रॉस होत नाहीये. गोल्डन अँरो तर पूर्ण रिकामा आहे. व्यवसाया साठी जो अँरो महत्वपूर्ण मानला जातो तोच रिकामा आहे. अजातशत्रू अंक ग्रीड मध्ये नाहीये. अंक शास्त्रा नुसार व्यवसायात अडचनी, बेरोजगारी असे फलित निघते.


मित्रांनो या व्यक्तीची जन्मकुंडली बलवान आहे. सिंह लग्न २९ अंशावर आहे. [काही सॉफ्टवेअर मध्ये कन्या लग्न येते. पण त्यामुळे ग्रहयोग अधिक बलवान होतात.] दशमेश शुक्र लाभात लाभेश युक्त. धनेश लाभेश बुध लाभात. योगकारक धनात. गुरु महादशा शनि अंतर्दशेत व्यवसाय सुरु केला. गुरु लग्नी आहे तर शनि व्दितीयात. गोचर गुरु लग्नी तर शनिचे लाभातून शुक्र बुधा वरून भ्रमण होते.


नक्षत्र गोचरीचा विचार केला तर जन्मस्थ गुरु हा नैधन नक्षत्री आहे. या गुरुच्या दशेत अचंभित करणारा आर्थिक उत्कर्ष झाला कसा? तर नक्षत्र स्वामी लाभात आहे. म्हणजे ग्रहाचा भाव संबंध प्रभावी ठरला. व्यवसाय सुरु केला तेव्हा गोचर गुरु साधन नक्षत्री होता परंतु साधारण २३ दिवसांनी तो गोचर गुरुही नैधन नक्षत्री आला. गुरु एका नक्षत्रात जवळपास ५ महिने असतो. त्यातच नेमका गुरु नैधन नक्षत्राच्या शेवटच्या अंशात असतांना वक्री झाला व ५ महिन्यांनी नैधन नक्षत्राच्या पहिल्या चरणाच्या अंतिम अंशात मार्गी झाला. म्हणजे व्यवसाय सुरु केल्या नंतर काही दिवसातच गुरु नैधन नक्षत्री आला व वर्षभर नैधन नक्षत्रीच होता. नक्षत्र गोचरी नुसार वर्षभर जातकाचा व्यवसायात जम बसायला नको होता. आर्थिक समस्या यायला पाहिजे होत्या. पण उलट जातकाचा उत्कर्षाचा आलेख चढताच होता. याच काळात जातकाने जुनी का होईना दुचाकी घेतली होती. जन्मस्थ ग्रहस्थितीने गोचरीवर मात केली असे म्हणावे लागेल. अंक ज्योतिष असो वा नक्षत्र गोचरी हे काही समग्र ज्योतिष नाही. ज्योतिष वटवृक्षाच्या फांद्या आहेत. काही ज्योतिषी जन्मस्थ ग्रहस्थिती कुचकामी मानतात तर काही अगदीच निरुपयोगी मानतात. एखाद्या पारंबीला लोंबकळून त्यालाच वटवृक्ष मानतात. गोचरीची महत्ता काहीच नाही असे मला म्हणायचे नाही. गोचरीची साथ मिळाली असती तर जातकाने जे काही मिळवले त्यात अजून भर पडली असती. पण फक्त नक्षत्र गोचरी किंवा अंक ज्योतिषाचा विचार केला तर चित्र नकारात्मक दिसते. 

पुढील लेख लवकरच......     

 


शनिवार, ५ जुलै, २०२५

जपान संभाव्य त्रासदी?

 

||श्री||

मागील लेख:- अचानक.

जपान संभाव्य त्रासदी?




एका भविष्यवाणी मुळे गेल्या तीन चार दिवसां पासून जपान मध्ये प्रचंड तणाव, दहशत आहे. या जागतिक स्तारावर पडसाद उमटले आहे. जपान कडे जाणारी हवाई उड्डाणे बहुतेक देशांनी रद्द केली आहेत. पर्याटक जपान सोडत आहे. जपान मध्ये ५ जुलै २०२५ ला भयंकर भूकंप होऊन मोठा विध्वंश व जीवितहानी ची भविष्यवाणी केली गेली. जपान भूकंप प्रणव देश आहे. पण गेल्या चार पाच दिवसात ९०० हून अधिक छोटे छोटे भूकंप आल्याने (अशी बातमी आहे) जपान मध्ये अफरातफरी आहे. रियो तात्सुकी नावाच्या स्वप्नदृष्टा महिलेने २०२१ साली लिहिलेल्या ‘The Future I see’ पुस्तकात ५ जुलै २०२५ ला जपानला मोठ्या त्सुनामीचा तडाखा बसेल असे भाकीत वर्तवले आहे. त्यांनी २०११ च्या त्सुनामी बाबतही ईशारा दिला होता असे सांगितले जाते.

हे भाकीत काही ग्रह स्थिती आधारे नाहीये. आपल्या कडे ज्योतिषाची जी पद्धत वापराली जाते ती जपान मध्ये प्रचलित नाही. जपान मध्ये इटो (Eto) गणना वापरली जाते जी चीनच्या राशीचक्राचे बारा विभागावर आधारित आहे. या पद्धतीत बारा विभागांचे (राशींचे) अधिपत्य ग्रहांना दिलेले नसून प्राण्यांना दिलेले आहे. पण तुलान होणार नाही, कारण आपले राशीचक्र हे प्रत्यक्ष आकाशातील क्रांतीमार्गाशी निगडीत आहे तर जपानी राशीचक्र हे काळाशी निगडीत आहे. आपल्या कडे फारसे प्रचलित नसणारे पण शास्त्रात असलेले एक वर्ष प्रकार म्हणजे ‘बृहस्पती वर्षा’ प्रमाणे हे असल्याचे सांगत असले तरी तसेही नाहीये. जपानचे हे राशीचक्र बारा वर्षांचे आहे, पण गुरूशी संबंधित वाटत नाही. २०२५ हे हेबी (Hebi) वर्ष सर्प वर्ष आहे. २०२५ मध्ये जन्मलेल्या सर्व व्यक्तींची सर्प रास असेल. व्यक्ती गुणदर्शक फलिते वेगळी आहे, राष्ट्राचा विचार करता एका फलित लक्ष वेधून घेते (सध्याच्या पार्श्वभूमीवर) ते म्हणजे कायपालट. हे सर्पवर्ष जानेवारी २०२५ च्या मध्याच्या आसपास सुरु झाले आहे. गुरु राशी पालट तर मे मध्ये झाला आहे. त्यामुळे त्यांचे राशीचक्र सरळ सरळ गुरूशी संबंधित नाही. आपल्याकडील साठ संवत्सर चक्रा प्रमाणे जपानचे पारंपारिक ६० वर्षाचे चक्र आहे. स्वार्गीय दहा खांब व हे १२ वर्षांचे राशीचक्र यांची सांगड घालून ते बनते. पण ते आता जपान मध्येच फारसे प्रचलीत नाही. आपल्याकडचे गुरुमाना वर आधारित साठ संवत्सर चक्र पारंपारिक पंचांगा मुळे प्रचलित आहे. असो थोडक्यात जपानची भविष्य वर्तवण्याची पद्धत ग्रहाधारित नाही असे माजे ढोबळ मत तयार झाले आहे. बाकी जास्त काही त्यांच्या पद्धतीचा अभ्यास नाही.

काही जनांनी आग्रह केला कि जपान भाकिता बाबत तुमचे मत काय? त्यामुळे उशिरा का होईना इतर कामे बाजूला सारून लिहायला बसलोच शेवटी. आमचा प्रांत कुंडलीचा आहे, त्यातही जातकात. मेदनिय मध्ये कधीतरी फेर फटका मारतो. आता जपानची कुंडली शोधन क्रमप्राप्त झाले. निकोलस कैपीयान व्दारा लिखित ‘The book of world horoscopes’ नुसार जपानी इतिहासाचा हवाला देत असे सांगितले जाते कि ११ फेब्रु. ६६० इसा पूर्व  प्रथम सम्राट जीम्मू च्या राज्यरोहणा पासून जपानी राज्य स्थापना मानली जाते, (अरे देवा! आता इसापूर्व ची कुंडली कोणत्या संगणक प्रणाली मध्ये बनणार?) आणि याला जपानची पहिली आधार कुंडली मानावी असे सुचवले आहे. इसवीसनच्या पहिल्या शतकात अमेरीकन कमांडरचे जपान मध्ये आगमन झाले त्या वेळची कुंडली काही जन घेतात. (बापरे, आता ह्या आगमनाची तारीख, वेळ नोंदवली व सांभाळली गेली?) ११ फेब्रु. १८८९ ला आधुनिक मेईजी / मीजी संविधानाची घोषणा जपान मध्ये झाली. ती कुंडलीहि घेतात. २८ एप्रिल १९५२ ला रात्री १०:३० वाजता टोक्यो येथील कुंडली काही जन घेतात. या दिवशी जपान चीन सैन फ्रांसिस्को शांती संधी लागू झाली.......

हे सगळ झंझट सोडून कुडमुडी नामराशी घ्यावी आणि प्रकरण आवरत घ्यावे या मतावर मी आलो. जपानची नामराशी मकर येते उत्तराषाढ तृतीय चरण. लग्नी प्लुटो सारखा प्रचंड विध्वंश करणारा ग्रह वक्री आहे. एका राशीतून प्लुटो काही लगेच मुक्काम हलवणाऱ्यातला ग्रह नाही. त्यामुळे त्याच्या आधारावर सुक्ष्म निर्णय करता येणार नाही. दुसरी लक्षवेधि म्हणजे अष्टमात असेलेले मंगळ केतू या दृष्टीने घातक आहे. मंगळ ६ जून ते २८ जुलै पर्यंत अष्टमात असणार आहे. या दरम्यान २३ जुलैला मंगळ केतू अंशात्मक युती पूर्वा नक्षत्रात चतुर्थ चरणात होईल. अग्नी तत्व जास्त प्रभावी आहे त्यामुळे ज्वालामुखी उद्रेक वगैरे समजू शकतो. शुक्र नक्षत्र जलतत्व त्यात सामील करत आहे. त्यामुळे वडवानलाचा धोका समजू शकतो. पण भुकंपा साठी तर पृथ्वी तत्व हवे ना? तात्सुकींनी समुद्रा खालील धरणी दुभंग सांगितला आहे. हा संकेत वडवानलाचा असेल तर पुष्टी होते आहे. जलतत्वाचा मोठा विध्वंशक प्रकोप नेपच्यूनच्या सहभागा शिवाय होईल? नेपच्यून नेमका मंगळ केतूच्या षडाष्टकात समुद्र दर्शक राशी मीनेत आहे. नेपच्यून नेमका कालच वक्री झाला आहे. शनि नेपच्यून दिप्तांश युती आहे. शनि लग्नेश व्दितीयेश असल्याने हानी संभवते. मकर रास अजूनही काही देशांची आहे मग त्यांनाही धोका संभवतो. तात्सुकिंच्या स्वप्नदृष्टांताला जपानची मकर रास मानली तर ग्रहस्थिती पुष्टी करते आहे एवढेच मला म्हणायचे आहे. ५ जुलैच अस मी म्हणू शकत नाही. 

पुढील लेख:- AI Astro बाबत शंका.                          

 

 

रविवार, २९ जून, २०२५

अचानक

||श्री||

मागील लेख:- यंदा कर्तव्य आहे.

 अचानक



संजय कपूर :- १५/१०/१९७१, दिल्ली. मृत्यू १२/०६/२०२५, लंडन.

कपूर हे उच्चशिक्षित होते. त्यांनी प्रथम देहरादून येथील द डून स्कूलमधून आणि नंतर मुंबईतील द कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी परदेशात गेले. त्यांनी लंडनमधून कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आणि एचआरमध्ये बीबीए केले. यानंतर त्यांनी एमआयटी आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून प्रतिष्ठित कार्यनिष्‍पादनपरक अभ्यासक्रम (executive courses) पूर्ण केले.

पहिला विवाह -  नंदिता महतानी (Nandita Mahatani) – विवाह १९९६, घटस्फोट २०००.

दुसरा विवाह – करिष्मा कपूर विवाह २९/११/२००३, मुलगी समायरा (samiera) ११/०३/२००५, मुलगा कियान (Kiaan) १२/०३/२०१०. कियानच्या जन्मा नंतर करिष्मा मुंबईत आई कडे आली. त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा उठू लागल्या ज्या खऱ्या ठरल्या. २०१४ मध्ये परस्पर सहमतीने घटस्फोटाचा अर्ज केला व १३/०६/२०१६ मध्ये घटस्फोट झाला.

तिसरा विवाह – प्रिया सचदेवा विवाह १३/०४/२०१७. मुलगा अजारीयस (Azarius) डिसेंबर २०१८.

कपूर हे ऑटो कंपोनेंट बनवणाऱ्या सोना कॉमस्टारचे अध्यक्ष होते. या कंपनीची स्थापना १९९७ मध्ये त्यांचे दिवंगत वडील सुरिंदर कपूर यांनी केली होती, जे भारतातील वाहनांचे सुटेभाग उद्योगातील एक अग्रणी होते. २०१५ मध्ये वडिलांच्या निधनानंतर संजयने व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे स्वीकारली. सोना कॉमस्टारचे भारत, चीन, मेक्सिको, सर्बिया आणि अमेरिकेत नऊ कारखाने आहेत. ही कंपनी इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी सुटे भाग पुरवते.

 

अमेरिकन नागरिकत्व असलेल्या संजय यांनी २०२२ मध्ये जगातील अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले. फोर्ब्सच्या मते, त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांची एकूण संपत्ती १.२ अब्ज डॉलर्स (म्हणजेच १०,३०० कोटी) होती. यातील मोठा वाटा गुरुग्राम येथील मुख्यालय असलेल्या सोना कॉमस्टारकडून येतो. ही कंपनी १२ उत्पादनांची निर्मिती करते. ही कंपनी भारत, चीन, मेक्सिको, सर्बिया आणि अमेरिकेत ५,००० हून अधिक लोकांना रोजगार पुरवते

१२ जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो सामन्यादरम्यान कोसळून त्यांचे निधन झाले. मृत्यू समयी ते ५३ वर्षांचे होते. पोलो खेळत असताना मधमाशी तोंडात गेल्याने अचानक मृत्यू झाल्याचे टेलिग्राफने वृत्त दिले आहे. एक मधमाशी अनवधानाने त्याच्या तोंडात शिरून चावल्याने त्यांना अ‍ॅनाफिलेक्टिक शॉक आला होता.



आपल्याकडे प्रभावशाली, वलयांकित व्यक्तीमत्वे म्हणजे फक्त अभिनय क्षेत्रातली ते हि बॉलीवूड मधीलच असतात असा समाज माध्यमांचा समज आहे कि काय असे वाटते. तरी बरे यांची व्दितीय पत्नी अभिनेत्री आहे. यांच्या कुंडलीचे विश्लेषण करावे म्हणून जन्म टिपण शोधत होतो, पण मिळेनाच. विकिपीडिया वर जन्मतारीख व स्थान मिळाले. पण कुंडलीसाठी जन्मवेळाही हवी असते. संजय कपूर नावाने सर्च केले कि अभिनेता संजय कपूरचेच समोर येत होते. फोर्ब्जच्या यादीत असलेले एक उद्योगपती असतांना व नुकताच त्यांचा मृत्यू जागतिकस्तरावर चर्चेचा विषय झालेला असतांना हि अवस्था. बर मी businessmen sanjay Kapoor असेही सर्च केले, त्यांची तारीख मिळाली होती म्हणून Birth chart of Indian businessmen bron in 1971 असेही शोधले, पण हाती काही लागेना. दोन दिवस शोधत होतो. एका ज्योतिषाने विर भगत नावाने एक लेख लिहलेला आढळला. त्यांनी धनु लग्न घेतले होते, पण जन्मवेळ दिली नव्हती. धनु लग्न जन्मजात नेतृत्वगुण देते या एवढ्या एका गृहीतीकावर धनु लग्न घेतले होते. व्दितीयातील राहू अफाट संपत्ती देतो हे हि एक गृहीत त्यामागे होतेच. एखादे फलित फक्त एखादी विशिष्ट ग्रहस्थितीच देते असे फलज्योतिषात नाहीये. त्यामुळे त्यांनी जो विचार केला तो पूर्णपणे चुकीचा आहे असे मला म्हणायचे नाहीये, त्या साठी हा प्रपंच नाहीये. तर धनु लग्न हा त्यांचा अंदाज आहे खात्रीलायक जन्मवेळे वरून नाही.



आता लग्न कोणते असावे याचा अंदाज घेतांना मी मृत्युच्या घटनेला प्रथम महत्व दिले. मधमाश्यांच्या डंखाने मृत्यू झाल्याच्या तुरळक घटना घडतात पण केवळ एका माशीच्या डंखाने तडका फडकी मृत्यू हि दुर्मिळ घटना आहे व तेही एका अतिशय उच्चस्तरीय व्यक्तीचा मृत्यू म्हणजे असाधारण घटना. उपचाराला देखील वेळ मिळालेला दिसत नाही. एका मधमाशीचे विष इतके घातक ठरू शकते? घश्यात डंख मारल्याने घातक ठरले. विषारी कीटकाच्या डंखाने मृत्यू त्यामुळे माझे लक्ष क्षणात षष्ठ अष्ट संबंधा कडे गेले. उपलब्ध जन्मतारखेला असा संबंध केवळ मिथुन लग्न असताच होतो आहे. साधारण रात्री ०९:४३ ते १२:०० दरम्यान दिल्लीला मिथुन लग्न उदित होते. षष्ठातील वृश्चिक या कीटक राशीचा अधिपती मंगळ अष्टमात विषाचा कारक राहू युक्त आहे. अष्टमातील अंगारक दोष अपघाती मृत्यूस कारणीभूत होऊ शकतो. येथील मंगळ तडका फडकी व वेदनादायी मृत्यू देतो. घसा व्दितीया वरून पाहतात. व्दितीयात केतू असून षष्ठेश मंगळ व अष्टमेश शनिची संयुक्त दृष्टी त्यावर आहे. व्दितीय स्थान मोठ्या प्रमाणात पाप संबंधी झाले.

जातकाचा मृत्यू मध्यायू मर्यादेत झाला आहे. उपलब्ध जन्मतारखेचे मिथुन लग्न ढोबळ मानाने दीर्घायू दर्शवितो कारण लग्नेश बुध पंचमात पंचमेश शुक्र युक्त आहे. पण कक्षाऱ्हास वगैरे बारा भानगडी असतात. कक्षाऱ्हास करण्यासाठी लग्न, लग्नेश पापमध्यात व शुक्राला असलेल व्ययेशत्व हि कारणे सध्या तरी पुरेशी वाटतात, शिवाय लग्नेश बुध षष्ठेश मंगळाच्या नक्षत्री वृश्चिक नवमांशी आहे.

जातकाचे तीन विवाह झाले. फार खोलात न जाता चर दाराकारक बुध नै. दाराकारक युक्त असल्याने हे फलित संभव आहे. दोन घटस्फोट झाले आहेत. सप्तमेश गुरु षष्ठात आहे. अष्टमात तीव्र मंगळदोष आहे. सप्तमस्थान नेपच्यून व राहुच्या पापकर्तरीत आहे. व्दितीय भार्येने काडीमोडी च्या वेळी त्यांच्या वर जे आरोप केले त्यामुळे जातकाची केवळ खलप्रवृत्ती दिसून येत नाही तर दोन्ही घराची प्रतिष्ठा, मान, संस्कार धुळीस मिळाली. मिथुन लग्नाला अंतस्थ खलप्रवृत्ती निदर्शक तृतीयात स्वभाव, विचार प्रवृत्तक मनकारक चंद्र पाप मध्यात अंगारक मंगळाच्या दिप्तांश अष्टम दृष्टीत असणे जातकाल हीन अभिरुची देवू शकतो. कारक शुक्र व प्रणयस्थानही रवि, हर्षल, प्लुटो व नेपच्युनच्या पाप मध्यात आहे. येथील राहुच्या नक्षत्रातील शुक्र बरेच काही सुचवून जातो आणि त्यात बुध अस्तंगत. तेव्हा अधिक काय बोलणे.

पुढील लेख:- जपान संभाव्य त्रासदी.

 

 

 

 


रविवार, १५ जून, २०२५

यंदा कर्तव्य आहे.

||श्री||

मागील लेख :- चुकीला माफी नाही.

यंदा कर्तव्य आहे.



कुंडलीत सप्तमावर सर्वात बलवान प्रभाव शनिचा असून मंगळदोषही आहे. त्यामुळे विवाह उशीर समजू शकतो. पण इतका उशीर? कारण शनि तृतीयेश असल्याने २५ ते ३६ या वयोगटात विवाह व्हायला हवा. या गटात २८,२९,३० हि वर्षे मिळत होती किंवा अजून उशीर म्हटले तरी ३२ वे वर्ष होतेच. २८ व्या वर्षी मंगळ म.द. राहू अ.द. २७व २ मास पर्यंत होती. राहू अंतर्दशेतील रवि, चंद्र, मंगळ विदशा २८ व्या वर्षाच्या सुरवातीला होत्या व तिघेही अनुकूल कार्येश आहेत. चंद्र विदशा योग्य होती. मंगळ २,११ चा कार्येश आहे व त्याची महादशा ३३ व्या वर्षा पर्यंत होती. शनि केतू वगळता बाकी ग्रह अनुकूल स्थानांचे कार्येश आहेत. शनिची अंतर्दशा २९ व्या वर्षी व ३० व्या वर्षातील ३ महिने होती. तर केतू अंतर्दशा ३१ व्या वर्षातील ५ महिने होती. शनि १/११/२०१४ ते २५/०१/२०१७ दरम्यान वृश्चिकेत होता. शनीचे हे गोचर जे २८,२९ व्या वर्षी होते जे विवाह अनुकूल होते. यात ३० व्या वर्षातील सुरुवातीचा साधारण दीड मास येतो. २२ जून ते २५ ऑक्टो. २०१७ मध्ये लगेचच वक्री शनि परत वृश्चिकेत होता, म्हणजे साधारण ४ एक मास. ३० व्या वर्षातील ६ मास शनि अनुकूल होता. तसा धनुचाही शनि विवाहानुकुल होता. म्हणजे २८,२९,३० व्या वर्षी विवाहास गोचर शनिची अडचण नव्हती. पण शनि राशीला नव्हता. वृश्चिकेचा शनि पनौती होता. १८/०६/२०१४ ते १३/०७/२०१५ गुरु कर्केत होता जो विवाहानुकुल होता. २८ व्या वर्षातील शेवटची ६ महिने व २९ व्या वर्षाची सुरवातीचे ७ महिने धरा. पण गुरुही राशीला नव्हता. सिंहेचा गुरु काही अनुकूल नव्हता. ११/०८/२०१६ ते ११/०९/२०१७ दरम्यान गुरु कन्येत होता. कन्येचा गुरु अनुकूल होता व राशिलाही बरा होता. तुळेचाही गुरु अनुकूल व राशीला उत्तम होता. ०३/०३/२०१७ ते २८/०२/२०१८ मंगळ म.द. बुध अंतर्दशा होती. बुध २,७ चा कार्येश आहे. ०३/०३/२०१७ ते २२/०६/२०१७ २५/१०/२०१७ ते ०२/१२/२०१७ हे ३० व्या वर्षातील काळ विवाहानुकुल होते.

(जातक स्त्री - ०३/१२/१९८७, ०७:४५, सांगवी, ता- बारामती.) 


 

पण विवाह काही झाला नाही. लग्नेश सप्तमेश अंशात्मक लाभयोग आहे. अनुकूलता असूनही विवाह झाला नाही कारण प्रयत्न, जपजाप्य कमी पडले असतील किंवा मानसिकता अडथळा ठरला असेल. चंद्र मंगळ समसप्तक, प्रभावी नसलेला चांडाळयोग आहे. (ते काही असले तरी)पण आपल्याला यामागे ग्रहताऱ्यांचा अडथळा शोधायचा आहे. कारण ३७ व्या वर्षी ज्या राहू म.द. गुरु अ.द. केतू विदशेत विवाह झाला ती विदशा विवाहानुकुल नव्हती. राहू २,७, गुरु २ चा कार्येश असले तरी विरोधी भावही आहेत. काहीजन ८ ला विवाह पूरक मानतात केतू त्याचा कार्येश आहे तेवढेच समाधान. अन्यथा केतू १,६,१०,१२ या विरोधी भावांचा कार्येश आहे. पण विवाह झाला हे तर खरे. ज्यावेळी दशा गोचर अनुकूल होते त्या वेळी विवाह झाला नाही व ज्यावेळी विदशा (खरे तर)अनुकूल नव्हती त्यावेळी विवाह झाला?

सर्वाष्टकात व्दितीयात, सप्तमात फक्त २१ बिंदू आहेत. ३० व्या वर्षी जो काल विवाहानुकुल म्हणून काढला ज्यावेळी दशा गोचर अनुकूल होते. त्यावेळी शनिचे धनुतून गोचर होते जे सप्तमेशावरून होते, तसे अनुकूल होते. भिन्नाष्टकात शनिला येथे फक्त दोनच बिंदू आहेत जे कमी आहेत. गुरुचे कन्या, तुळेतून भ्रमण होते. भिन्नाष्टकात दोन्हीतही गुरूला ५,५ बिंदू आहेत जे बरे आहेत. भिन्नाष्टकात गुरु तर बलवान होता पण शनि नाही. ३७ व्या वर्षी ज्या वेळी विवाह झाला त्यावेळी शनि कुंभेत तर गुरु वृषभेत होता. भिन्नाष्टकात कुंभेत शनीला ५ बिंदू आहेत तर वृषभेत गुरूला ६ बिंदू आहेत. दोघेही बलवान गोचरीत होते.



मंगळ महादशेत विवाह झाला नाही कारण भिन्नाष्टकात मंगळ स्थित राशीत त्याला केवळ २ च शुभबिंदू आहेत तर सप्तमात ३ बिंदू. गोचर शनि धनुत होता. शनि भिन्नाष्टकात येथे दोनच बिंदू आहेत हे आपण पाहिले आहेच, पण महादशानाथ मंगळाला भिन्नाष्टकात येथे १ च बिंदू आहे. गोचर गुरूला मंगळ भिन्नाष्टकात कन्येत ५ बिंदू आहेत त्या मुळे प्रयत्नाने कदाचित या काळात विवाह होऊ शकला असता. पुढे तुळेत मंगळ भिन्नाष्टकात २ च बिंदू आहेत.

महादशानाथ राहू गुरुच्या राशीत आहेत आणि सर्व ग्रहात सप्तमात गुरु भिन्नाष्टकात सर्वाधिक बिंदू आहेत तेही ६ बिंदू म्हणजे उत्तम आहे. दुसरे म्हणजे राहू भिन्नाष्टकात सप्तमात ५ बिंदू सह व्दितीय क्रमांकावर आहे. राहू गुरु दोघेही पंचमात आहेत व येथे स्वभिन्नाष्टकात प्रत्येकी ४,४ बिंदू मध्यम आहेत. गोचर शनि कुंभेत होता व भिन्नाष्टकात ५ बिंदू होते तर गोचर गुरु वृषभेत ६ बिंदूसह होता. गोचर राहू मीनेत होता. विवाह राहू महादशेत गुरु भूक्तीत २४/०६/२०२४ रोजी झाला. विदशा केतूची होती. केतूला भिन्नाष्टकात सप्तमात ३ बिंदू म्हणजे कमी होते पण गोचर केतूने हि कमी भरून काढली. केतुला कन्येत ५ शुभबिंदू आहेत. केतू राशीस्वामी बुधालाही भिन्नाष्टकात सप्तमात ३ तर कन्येत ५ बिंदू आहेत.

विवाह झाला त्या वेळी शनि कुंभेत २५ अंशावर होता. शनिला प्रस्ताराष्टकात गुरु, मंगळ, रवि, चंद्र, लग्न यांनी शुभबिंदू दिले आहेत. गोचर शनि चंद्राच्या कक्षेतुन जात होता. गुरु वृषभेत १३ अंशावर होता म्हणजे रविच्या कक्षेत. गुरु प्रस्ताराष्टकात शनि, बुध वगळता इतर सर्व ग्रहांनी शुभबिंदू दिलेत. शनि व गुरु दोघेही शुभ कक्षेतुन जात होते.

३० व्या वर्षी शनि धनुत होता. धनुत त्याला मंगळ व रवि बिंदू देत आहेत. २५ जाने. ते २९ मार्च २०१७ शनि धनुत स्वकक्षेत होता. नंतर गुरुच्या कक्षेत असतांना तो ६ एप्रिलला वक्री झाला. २२ जूनला तो वृश्चिकेत लग्नाच्या कक्षेत आला ते २५ ऑग.ला लग्न कक्षेतच तो मार्गी झाला. २५ ऑक्टो.ला तो परत धनुत स्वकक्षेत आला. वृश्चिकेत लग्नाने शनिला शुभबिंदू दिला आहे. आपण दशे नुसार जो काल काढला ३ मार्च ते २२ जून त्या दरम्यान शनि धनुत स्वकक्षेत होता. धनुत शनिने स्वत:ला शुभबिंदू दिलेला नाही. नंतर २५ ऑक्टो. ते २ डिसें.२०१७ दरम्यानचा दशाकाळ विवाह अनुकूल होता. या काळात शनि स्वकक्षेत व गुरु च्या कक्षेत होता. त्या मुळे शुभ फले दिले नाहीत. २२ जून ते २५ ऑक्टो. २०१७ शनि शुभकक्षेत होता. या दरम्यान गुरु २८ जुलै पर्यंत बुधाच्या, २२ ऑग. पर्यंत चंद्राच्या व नंतर ११ सप्टें. २०१७ पर्यंत लग्नाच्या कक्षेत होता. कन्येत बुध आणि लग्नाने गुरूला शुभबिंदू दिलेले आहेत. म्हणजे गुरूची चंद्र कक्षा वगळता या कालावधीत शनि व गुरु दोघेही शुभकक्षेत होते. पण हा दशाकाळ अनुकूल नव्हता ना महाराजा. ग्रहगणिता आधारे एखादे भाकीत करणे ते हि अचूक इतके सोपे नाही. खूप माथापच्ची करावी लागते, वेळ द्यावा लागतो, संयम, एकाग्रतेचा कस लागतो. यावर परत धार्मिक, सामाजिक, भौगोलिक व प्रासंगिक घटक परिणाम करतात ते वेगळेच. ते हि अवधान बाळगावे लागते.     

या प्रकरणात असे दिसून येते कि आपण नुसत कर्तव्य आहे असे म्हणून होत नाही तर ग्रह गोचरीची NOC असल्या खेरीज कर्तव्य पार पडत नाही.   

पुढील लेख लवकरच ....

 

 


सोमवार, १२ मे, २०२५

चुकीला माफी नाही.




 

||श्री||

मागील लेख:- श्री. एकनाथ शिंदे जन्मवेळ संशोधन.

 

चुकीला माफी नाही.



 

लग्न पहावे करून...असे उगाच म्हटले नाही. काल काय आजही लग्न करणे म्हणजे काही सोपी बाब नाही, एक दिव्यच असते. काल आणि आज मध्ये फार तर भूमिका अदलाबदल झाली असे म्हणता येईल. आज वरपक्षाचा वरचष्मा राहिला नाही तर हळू हळू वधुपक्ष वरचढ होतो आहे.    

 

श्री. अरुण खंडारे सरांनी नाशिकला १ मे ला ज्योतिषसंमेलन घेतले होते. आम्ही काही वर्षा पासून फेसबुक मित्र आहोत. या निमित्ताने त्यांची भेटही होईल म्हणून मी संमेलनात सहभागी झालो. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे संमेलन घेतले. संमेलनात एका अभ्यासकांनी एका महिलेचे ६ महिन्यात दोन विवाह झाले असल्याचे सांगितले. दोन्ही पारंपारिक विवाह आहेत. वेळे अभावी संमेलनात कुंडली अभ्यासासाठी घेता आली नाही. पण ६ महिन्यात दोन विवाह म्हणाल्याने संभ्रममिश्रीत उत्सुकता होती म्हणून समुहात ती कुंडली चर्चेसाठी घेतली. त्या वेळी कळाले कि ६ महिन्यात दोन विवाह नसून पहिल्या घटस्फोटा नंतर साधारण ६ महिन्यांनी दुसरा विवाह झाला. पण दोन्ही वेळेस ‘चट मंगनी पट ब्याह फट विच्छेद’ असल्याने अभ्यासमूल्य आहेच म्हणून हा प्रपंच. समुहात श्री. अरुण खंडारे सरांनी वैवाहिकसौख्य नसण्याची कारणमिमांशा केलीच होती. त्या व्यतिरिक्त ग्रहयोगा अधारेच या बाबतीतील जातकाच्या स्वभाव वैशिष्ट्याचा मुद्दा मी विचारात घेत आहे.  

स्त्री २४/०२/१९९०, १६:३०, धुळे.

०२/०५/२०२५, १७;१७:४५ è सप्तमाचा सब गुरु शासक ग्रहात आहे. बु(के), गु, बु(के), शु. त्यामुळे जन्मवेळ बरोबर आहे. जातकाचे आज वय ३५व २मा ८दि आहे. सप्तमाचा सब गुरु मिथुनेत असून न.स्वा. राहू बुधाच्या दिप्तांश युतीत आहे. सब गुरु २,११ पैकी ११ चा कार्येश आहे. त्यामुळे कुंडलीत अधिक विवाहाचे योग आहेत.

राहू महादशा २१व ५मा पर्यंत आहे. सप्तमात शनिची रास, कारक शुक्र व शनि युती भावचलीतात षष्ठात असल्याने राहू महादशेत विवाह होणे जरा कठीण वाटते, जरी राहू २,७ चा कार्येश असला तरी. राहू किंवा त्याचा नक्षत्रस्वामी व्दिस्वभाव राशीत नाही पण राहू बुध युती मात्र आहे. राहू महादाशेचा विचार करायचाच असला तर व्दिस्वभाव राशीत असलेल्या २१,२२ व्या वर्षी आलेल्या मंगळाच्या अंतर्दाशेचा विचार करावा लागेल. परंतु मंगळ अनुकूल भावांचा बलवान कार्येश नाही.

३८ व्या वर्षाच्या मध्या पर्यंत गुरु महादशा आहे. गुरुचे विवेचन वरती केले आहेच. गुरु अनुकूल ७,११ चा व विरोधी ६,१०,१२ चा कार्येश आहे. त्यामुळे गुरु दशेत दोन विवाह झाले असणार. इथ पर्यंत पोहचतो नाही तोच समुहात खालील संदेश आला.

१७:४४ ता.क. à प्रथम विवाह २३/११/२०१९, दु.१२:४०, नाशिक. १२/०१/२०२० नंतर सासरी गेलीच नाही. ५० दिवस फक्त नांदली. कोर्टात केस दाखल – २१/०१/२०२१. नोंदणी – २२/०१/२०२१, निकाल – १३/०७/२०२१.

दुसरा विवाह – १९/०२/२०२२, दु.१२:१५, नाशिक. फक्त १५ दिवस नांदली. नंतर व्यवसायामुळे शनिवार रविवार जाणे येणे केले. ०२/१०/२०२२ पासून पूर्ण विभक्त. दाखल – २१/०७/२०२३, नोंदणी – २१/०७/२०२३, निकाल – ११/०९/२०२३.

दोन्ही वेळेस जातकानेच न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च केला.  






पहिला विवाह २३/११/२०१९ (वय - २९व ८मा २९ दि) ला गुरु महादशेत शुक्र अ.द. शुक्र विदशेत झाला. शुक्र विदशा २०/०६/२०१९ ते २९/११/२०१९ दरम्यान होती. शुक्र २,७,११ या अनुकूल तर ६,१०,१२ या विरोधी भावांचा कार्येश आहे.

ढोबळ मानाने गोचर शनीचे जन्म शनि वरून भ्रमण. तसेच गुरूचेही. नुकताच ११ गुरु लागला होता जो विवाहास अनुकूल होता. रवि विदशेत विभक्त झाली. रवि २,७ या अनुकूल व ६,१०,१२ या विरोधी भावांचा कार्येश आहे. रवि बुधाच्या युतीतील राहुच्या नक्षत्री आहे.

दुसरा विवाह (वय- ३१व ११मा २५दि) गुरु म.द. रवि अ.द. रवि विदशेत (१८/०२/२०२२ ते ०४/०३/२०२२) झाला. विभक्त ०२/१०/२०२२ ते १९/१०/२०२२ केतू विदशा होती. केतू बुधाच्या नक्षत्री असून ७ व १,६,१०,१२ चा कार्येश आहे. घटना दशासंधी मध्ये घडली आहे. बुध ७ व ६,१० चा कार्येश असून मंगळाच्या नक्षत्री आहे.

पहिल्या विवाहा वेळी फक्त ५० दिवस नांदली. ठीक आहे कि सप्तमाचा सब बहुविवाह दाखवतो पण फक्त ५० दिवसात काडीमोडीकडे वाटचाल, पुरे दोन महिने सुद्धा नाही. सप्तमेश शनि घटस्फोट दर्शवितो पण इतक्या जलद हलचाली करणाऱ्यातला तो नाही. सप्तमेश शनि चरागतीचा आहे हे एक कारण देता येईल पण चरागतीचा ग्रह शुक्रा प्रमाणे ऐश्वर्यदायक असतो. आपण विवाहा विषयी बघतो आहोत. शुक्र कारक आहे. शुक्र व शनि दोघेही वर्गोत्तम आहेत. सामान्यात: वैवाहिक सुख चांगले मिळायला हवे होते. पण दोन्ही वेळा अल्पावधीत विभक्त झाली. चरगतीच्या सप्तमेशा व्यतिरिक्त एक कारण अजून आहे ते म्हणजे मंगळ. 


नाही मंगळ दोष नाही तर सप्तमेश शनि व मंगळ दिप्तांश युती. मंगळाची घिसडघाई तर माहितीच आहे त्यात तोही चरागतीचा. मंगळ आणि चरागती हे शनिला दट्टा देतायेत. शनि नकारात्मक असल्याने अल्पावधीत घटस्फोट झाले. सप्तमभावही हर्षल रवि इ. च्या पापमध्यात आहे. सप्तमात पापग्रह आहे. सप्तमाचा ६,८,१२ शी संबंध असता वैवाहिक जीवन त्रासदायक असते. पारंपारिक नुसार दुसरा विवाह नवमा वरून पाहतात. नवमावर षष्ठातील मंगळाची दृष्टी. नवमेश गुरु व्ययात शत्रूगृही राहुच्या नक्षत्री. नवमांशात तो सुधारतो आहे पण जन्मकुंडलीत त्याच्या सप्तमात चार पापग्रह आहेत. या व्यतिरिक्त जातकाचा स्वभाव. चंद्र कुंभेचा असला तरी अष्टमात अमावास्या योगात. लग्नी केतू सारखा ग्रह. चंद्र मंगळाच्या नक्षत्री जातकाचा स्वभाव चिडचिडा, कुरबूऱ्या असावा. त्यात कोदंड शनि तोही वर्गोत्तम त्यामुळे चुकीला(जातकाच्या दृष्टीने) माफी नाही, लगेच डोक्यात तिडीक आणि तिरीमिरीत निर्णय. हि वृत्ती वैवाहिक जीवनात घातक ठरली.

पुढील लेख:- यंदा कर्तव्य आहे.