|| श्री ||
मासांत
एका धार्मिक ग्रुपवर खालील पोष्ट आज
वाचण्यात आली त्या अनुसंगाने काही लिहित आहे. खालील पोष्ट ग्रुपवर होती.
अर्थ:- माघ
महिन्या पासून प्रत्येकी दोन दोन महिन्यांचा शिशिर इत्यादी ऋतू क्रमाने येतात. चंद्रमास अमावाश्येला समाप्त होतो. (दर्शावधि
याची दर्श + अवधी अशी फोड होते. दर्श म्हणजे अमावश्या व अवधी म्हणजे काळ.) सौरमास
संक्रातीला समाप्त होतो आणि सावनमास ३० दिवसांनी पूर्ण होतो असा या श्लोकाचा अर्थ
आहे.
यात आपल्या चर्चित विषयाला महत्वाचा
संदर्भ मिळाला तो म्हणजे ‘चांद्रो दर्शावधि’ या नुसार महाराष्ट्रातील पंचांग मास
समाप्ती ही अमावश्येला करतात. ग्रहलाघवी ग्रंथही या साठी वापरत. उत्तरभारतात सूर्य
सिद्धांत हा संहिता ग्रंथ अधिक प्रचलित आहे. लोकमान्य टिळकांनी दृकप्रत्ययतुल्य
पद्धतीच्या अवलंबाचा पुरस्कार केल्यावरही तिकडे अजूनही काही पंचांग गणित सूर्यसिद्धांतावर
करतात. त्यात कदाचित पौर्णिमांत मास दिले असावे. हे ग्रंथ माझ्या कडे नाहीत
त्यामुळे संदर्भासहित स्पष्टीकरण नाही देवू शकत.
आता या बाबत माझा तर्क
देतो तो असा. आमांत मासाचा पुरस्कार करणाऱ्यांनी कदाचित हा विचार केला असावा कि
अमावश्येला चंद्राची एकही कला शिल्लक नसते म्हणजे शेवट, म्हणून महिना समाप्ती. पोर्णिमांत मासाचा पुरस्कार करणाऱ्यांनी
पौर्णिमेला चंद्र १६ कला पूर्ण असतो म्हणजे चंद्राचे तेजपूर्णत्व होते म्हणून महिना
पूर्ण असा विचार केला असावा.
या पोष्ट मध्येच एक कमेंट आली जी शंका
अजूनही काही जणांना होती ती अशी – “मला कोणी सांगू
शकेल का श्रावण महिन्यात कृष्ण जन्माष्टमी hi कृष्ण पक्षात असतें मग
हिंदी पंचांगा नुसार ती शुक्ल पक्षात येते असं का?”
- नाही, असा पक्ष बदल होत नाही. या बाबत असे आहे कि महिन्याचा शेवट अमावश्या कि
पौर्णिमा असा भेद आहे. पण महिन्याचे पक्ष बदलत नाही, कारण ते दृश्य चंद्रावर
आधारित आहे. पूर्ण चंद्र म्हणजे पौर्णिमा तर अदृश्य चंद्र म्हणजे अमावश्या. अमावश्ये
नंतर पोर्णिमे पर्यंत चंद्रतेज कला कला ने वाढते तो शुक्लपक्ष (शुद्ध) तर पोर्णिमे
नंतर अमावाश्ये पर्यंत कला कलाने चंद्रतेज कमी होतो तो कृष्णपक्ष हे दोन्ही मतात
तसेच असतात ते बदलत नाहीत. महाराष्ट्रात महिन्याची सुरवात हि शुक्ल प्रतीपदे पासून
म्हणजे शुक्ल पक्षात होते तर उत्तरभारतात महिन्याची सुरवात कृष्ण प्रतीपदे पासून
म्हणजे कृष्ण पक्षात होते. पौर्णिमा, अमावश्या किंवा कोणतीही तिथी हि दोन्ही कडे सारख्याच
वेळा असते. त्यामुळे दिवाळी, कृष्ण जन्माष्टमी इ. सारखे सन एकाच वेळी येतात. आता
ज्या वरून चर्चा चालू झाली ते श्रावणी सोमवार हे तिथीप्रधान नाहीत तर मास व वार या
वर आधारित आहे, त्या मुळे ते महाराष्ट्रा पेक्षा एक पक्ष लवकर तिकडे सुरु होतात.
हा लेख वाचल्यावर आता या वरही एक शंका निर्माण होऊ शकते ती काय असू शकते आणि
त्याचे समाधानही पुढे करतोच आहे.
“ठीक आहे मासांत भानगड
समजली, पण तरीही मी काय म्हणतो उत्तरभारतात आधीच महिना सुरु का होतो? नाही म्हणजे
अमावास्या पौर्णिमा हे चक्र चालूच राहते ना, मग महाराष्ट्रात अमावश्ये नंतर महिना
चालू झाल्यावर त्यानंतर येणाऱ्या पोर्णिमे नंतर ते त्यांचा महिना का सुरु करत
नाहीत, आधीच का?”
हाच, हाच तो श्लोक (कलम ८४) ज्या मुळे
उत्तरभारतीयांना आपल्या अगोदर महिना सुरु करण्याचा विशेषाधिकार मिळाला. काय म्हणतो
हा श्लोक? हा श्लोक आपल्याला पौर्णिमेचे व हिंदू महिन्याचे नामकरण नियम सांगतो.
तन्नक्षत्र – त्या नक्षत्रात, पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्या
नक्षत्राच्या नावावरून ती पौर्णिमा व हि पौर्णिमा समावलेला महिनाही त्या
नक्षत्राच्या नावावरून ओळखला जावा.
उदा. या वर्षी १६/७/२०१९ च्या पौर्णिमे नंतर उत्तरभारतीयांचा
महिना बदलला त्या मुळे हि पौर्णिमा या नवीन महिन्यात येणार नाही हे ओघाने आलेच, तर
१/८/२०१९ च्या अमावाश्ये नंतर महाराष्ट्रातील महिना बदलेल बरोबर. १७/७/२०१९ ते
१५/८/२०१९ दरम्यान हा उत्तरभारतीयांचा हिंदू
महिना तर २/८/२०१९ ते ३०/८/२०१९ दरम्यान महाराष्ट्रीयांचा हिंदू महिना. ज्या वरून
महिन्याचे नाव ठरते ती कोणती पौर्णिमा या दोन्ही मतांच्या महिन्यात येते तर ती आहे
१५/८/२०१९ ची पौर्णिमा. या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात आहे म्हणून दोघांनीही
नियमानुसार त्यांच्या महिन्याचे नाव श्रावण ठेवले. इति.






