सोमवार, २४ जून, २०१९

शैक्षणिक त्रासदी - १

|| श्री || 


शैक्षणिक त्रासदी - १


एका ज्योतिष ग्रुप वर अभ्यास,सरावा साठी हि कुंडली दिली होती.
जातक – मुलगी, जन्म तारीख – ६/१०/२०००, जन्मवेळ – दुपारी ४:३२, जन्मस्थळ – नासिक ( ७३/४८ पु, १९/५९ उ. )
प्रश्न –  या मुलीने बारावीची परीक्षा मार्च २०१९ च्या सत्रात दिली. या मुलीची शैक्षणिक प्रगती आत्ता पर्यंत कशी आहे?  हिने कोणत्या शाखेत १२वीत शिक्षण घेतले?  १२वीत पास झाली का कसे?
कोणती पद्धत वापरायची याचे बंधन नाही. (केपी / अष्टकवर्ग वापरणार असाल व पास असे उत्तर येत असेल तर किती टक्के मिळतील असे वाटते ते हि जमल्यास लिहावे.) स्थानांश मी दिले तेच घ्यावेत असेही बंधन नाही. जन्मवेळ जातकाच्या आईने दिलेली तिच्या समजुती प्रमाणे बरोबर असलेली आहे. जन्मवेळ शुद्धीकरण केलेली नाही याची नोंद घ्यावी.

शिक्षणा करता चतुर्थस्थान, चतुर्थेश, कारक गुरु यांचा व यांच्याशी संबंधित ग्रहांचा विचार केला जात असला तरी व्दितीय, चतुर्थ, पंचम, नवम हि स्थाने, त्यांचे स्वामी, त्यातील ग्रह व कारक गुरु यांचा विचार सामन्यत: केला जातो. यात व्दितीय भाव हा जातकपारिजात व उत्तरकालामृत ग्रंथात विद्याभाव म्हणून उल्लेखला असल्याने घेतला जातो. तथापि दाक्षिणात्य चतुर्थस्थान हे प्रमुख विद्या स्थान समजतात. यात सध्या शिक्षणाचा विचार करतांना मात्र थोडा वेगळा विचार केला जातो. माध्यमिक शिक्षणाचा विचार चतुर्थां वरून, उच्चमाध्यमिक व स्नातक पर्यंत पंचम तर उच्चशिक्षण, परदेशातील शिक्षण यांचा विचार नवमा वरून करतात. ज्या प्रश्नांचा विचार आपल्याला येथे करायचा आहे त्या नुसार चतुर्थ, पंचम भाव, भावेश व संबंधित ग्रहांचा विचार करावा लागेल



१)या मुलीने बारावीची परीक्षा मार्च २०१९ च्या सत्रात दिली. या मुलीची शैक्षणिक प्रगती आत्ता पर्यंत कशी आहे? = १२ वी संदर्भात पुढे प्रश्न आहेत म्हणजे येथे आपल्याला माध्यमिक सत्राचा विचार करायाचा आहे. वर्गोत्तम कुंभ लग्न असल्याने बौद्धिक क्षमता चांगली. लग्नेश चतुर्थात कुंभ नवमांशी या दृष्टीने चांगला. येथे तो बौद्धिक रास मिथुन नवमांशी असलेल्या कारक गुरु युक्त आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षण चांगले झाले. चतुर्थेश शुक्र हाही नवमात तुला या स्वत:च्या बौद्धिक राशीत आहे पण तो मेष नवमांशी आहे त्या मुळे प्रगती उच्च दर्जाची नसली तरी प्रथम दर्जाची आहे. जातक हुशार विद्यार्थ्यान मध्ये गणली गेली. २०१६-१७ मध्ये जातक दहावीला होती. या दरम्यान मंगळाची महादशा होती. मंगळ कलाप्रिय सिंह राशीत असला तरी कन्या या बौद्धिक नवमांशी असल्याने चतुर्थां संबंधित शैक्षणिक योगास फार प्रतिरोध करणार नाही. ६ जुलै २०१६ पर्यंत राहू तर त्या नंतर गुरु अंतर्दशा होती. राहू शैक्षणिक स्थान पंचमात उच्चीचा मानल्या गेलेल्या मिथुन या बौद्धिक राशीत आहे नवमांश मात्र त्याला कला रास वृषभेचा मिळाला, तर गुरु चतुर्थात वृषभेचा असला तरी नवमांश मिथुनेचा आहे. म्हणजे दशाभूक्तीने सहिष्णुता बाळगून चतुर्थ भावानुरूप फळे दिले अस म्हणता येईल कारण जातक दहावीला ७३ गुणांनी म्हणजे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली.


२)हिने कोणत्या शाखेत १२वीत शिक्षण घेतले? = जातकाने १२वी ची परीक्षा दिल्याचे स्पष्ट म्हटले आहे त्यामुळे डिप्लोमा वगैरेचा विचार करण्याची गरज नाही. १२ वी म्हटल्यावर कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनच शाखांचा विचार करायचा आहे. आता ही मुलीगी १२वी विज्ञान शाखेत होती हे मला माहित असल्याने वरील संकल्पने प्रमाणे पंचम स्थान दर्शवत आहे का? पाहायचे आहे. इतरांना मात्र हे ठरवायचे होते. पंचमात मिथुन हि शास्त्रीय राशी आहे, पंचमेश बुध हा तुला या शास्त्रीय राशीत नवमात नवमेश युक्त आहे. पंचमातील राहू हा आधुनिक मानसशास्त्राचा कारक म्हणजे विज्ञानाशी संबंधित म्हणता येईल, अन्यथा त्याचे कार्येक्षेत्रे वेगळे.


)  १२वीत पास झाली का कसे? = खरे तर या मुलीला कलाशाखेत प्रवेश घ्यायची ईच्छा होती पण आईने बळजबरी विज्ञानशाखेत घातले. तो राग हिच्या मनात होता. मला मार्क जास्त पडले म्हणून इकडे घातले असा विचार करून हि काहीसा अळम टळम करू लागली. नापास व्हायचे नाही म्हणून जेमतेम अभ्यास करू लागली. मेहनत करयाची नाही असे ठरवून टाकले. अभ्यास करावा म्ह्णून आईने घरातील केबल कनेक्शन कट करून टाकले पण फायदा झाला नाही. बारावीत जातकाला ५६% मिळाले. तसे बघितले तर जास्तच मिळाले, ४०-४५% तिच्या विचारसरणी नुसार पडायला हवे होते. मंगळ दशा बुध भुक्ती होती. बुध चा संबंध नवमाशी आल्याने हे सहज भाग्याचे फळ म्हणायचे दुसरे काय? मंगळ दशेने हा झगडा, अविचार केला. लग्न व चंद्र शनीच्या राशीत असल्याने असच व्हायला पाहिजे नाहीतर नाही अशी बंडखोरी न करता, तडका फडकी निर्णय न लावता दीर्घ योजना बद्धतेने दोन वर्ष एका प्रकारे आईचा छळवाद केला, तिने लादलेल्या निर्णयाचे माप दीर्घकाळ पदरात घातले.

आता या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर कोणी प्रश्न विचारला त्यानुसार वेगळे आले असते. समजा आईने प्रश्न विचारला असता की मुलगी पास होईल का? किती टक्के मिळतील?” व मोघम उत्तर द्याचे असेल तर पास पण अपेक्षे पेक्षा कमी असे उत्तर कदाचित आले असते. आणि जर मुलीने स्वत: प्रश्न विचारला असता “ मी पास होईल का? किती टक्के मिळतील?” तर पास होईल अपेक्षे पेक्षा जास्त मिळतील असे उत्तर कदाचीत आले असते. आणि दोघींनी वेगवेगळ्या ज्योतिषां कडे जावून विचारले असेल तरीही दोघांची उत्तरे तसे बघितले तर बरोबर म्हणावी लागतील पण “ज्योतिषाचे काही खरे नाही एक कमी, एक जास्त म्हणतो. कशात काही नाही.” असा शेरा मिळाला असता.