सोमवार, १६ मार्च, २०२०

साठी उत्तरकांड भाग-३

||श्री||

मागील लेख :- साठी उत्तरकांड भाग-२ 


साठी उत्तरकांड भाग -३


दुसऱ्या भागात आपण पहिला विवाह प्रेम विवाह का झाला? याची कुंडलीत शोधाशोध केली. दुसरा विवाहही प्रेम विवाहच झाला. आता दुसरा विवाह होणे विशेष नाही, नाही झाला तर चिंता केली जाते. मग तुम्ही म्हणाल एवढे तीन तीन भागात लिहिण्या सारखे काय आहे, जर पहिला विवाह अयशस्वी झाला तर दुसरा विवाह करणे आता सामान्य बाब आहे. वय, मंडळी जातकाचे वय. जातकाने दुसरा विवाह केला त्यावेळी या स्त्री जातकाचे वय साधारण ६१ वर्षे होते. ना या विधवा होत्या ना परित्यक्त. या निराधार असतील असेही नाही, कारण यांनी घटस्फोट घेवून सहा महिन्यातच ७५ वर्षाच्या व्यक्तीशी दुसरा प्रेम विवाह केला. त्या मुळे आयुष्याच्या संध्याकाळी एकटेपणा खायला उठत असेल व काळजी घेणार कुणी सोबती असावं म्हणून दुसरा विवाह केला असा विचार करण्या सारखी परिस्थिती दिसत नाही. कदाचित सून/जावाई, नातवंडांच्या भरल्या घरातल्या असतील. पहिला विवाह अगदीच अयशस्वी झाला अस म्हणण्या इतकी यांच्या वैवाहिक जीवनाची माहिती नाही साधारण ४० एक वर्षाचे यांचे सहजीवन राहिले असेल कारण घटस्फोट ६० व्या वर्षी झाला. शिवाय पहिला विवाह हा प्रेम विवाह होता. यांच्या पतीची कुंडली उपलब्ध झाली नाही त्यामुळे थोडा एकांगी विचार करावा लागेल.

घटस्फोटाचे पहिले पाऊल मानसिक तयारी असते. उतार वयात दीर्घ प्रेम सहजीवना नंतर हि गोष्ट इतकीही सहज वाटत नाही. (८० च्या दशकातील त्या काळी असाच एक खळबळजनक ठरलेल्या डॅनी डेन्झोप्पा, झीनत अमान, संजय खान अभिनित 'धुंध' चित्रपटातले एक गाणे आठवले “उलझन सुलझे ना, रस्ता सूझे ना, जाऊं कहां मैं जाऊं कहां” त्याची व्हीडीओ लिंक वरती दिली आहेच.)

वृश्चिक रास साहसी निर्णय घेणारी, दबाव झुगारणारी, परंपरा मोडणारी, रिती रीवाजाची/नीती अनीतीची पर्वा न करणारी, तमा न बाळगणारी. त्यात चंद्र व चंद्र लग्नेश मंगळ युती राहू शनीच्या पापमध्यात अस्थिर मानसिकता देणाऱ्या बुधाच्या नक्षत्रात व व्दिस्वभाव मीन नवमांशी. चंद्र कुंडलीत तीव्र मंगळ दोष. (गुण मेलनात सहसा असा विचार केला जात नाही, पण येथे अशी ग्रहस्थिती आहे.) सप्तमेश गुरु वैवाहिक जीवनात बाधा आणणारा म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या मंगळाच्या नक्षत्रात व त्याच्या पूर्ण सप्तम दिप्तांश दृष्टीत आहे. सप्तमेश गुरुच्या व्दितीयात केतू, सप्तमात मंगळ, अष्टमात राहू तर कारक शुक्राच्या अष्टमात शनी असे पापग्रह आहेत. पंचमेश शनी व सप्तमेश गुरु हे प्रीती षडाष्टकात, तर मंगळावर गुरूची दृष्टी यामुळे दीर्घ सहजीवना नंतर या प्रेम विवाहाची परिणीती घटस्फोटात झाली.


घटस्फोटाचे जे काही कारणे असतील त्यात एक दुसरे प्रेम (प्रेम त्रिकोण) असावे अशी शंका येते, असो. पारंपारिक मध्ये दुसरा विवाह हा नवमा वरून पाहिला जातो तर कृष्णमुर्ती मध्ये तो व्दितीयाच्या सब वरून. दुसरा विवाह पारंपारिक कि प्रेम या बद्दल ज्योतिष शास्त्रात चर्चा आढळत नाही. याचे कारण पहिल्या भागात आले आहेच. पहिल्या विवाह संबंधित योगांचे धागे पकडूनच विचार करू. चंद्र कुंडलीत पंचमेश गुरु व नवमेश चंद्र समसप्तकयोग. क्षेत्र कुंडलीत नवमेश व कारक शुक्रा पासून पंचमेश नवमेश चंद्र मंगळ युती. पंचमेश शनी व नवमेश शुक्र नवमांशात युती. असा संबंध लावता येतो.



आपण तब्बल तीन भाग वेळ काढून वाचले या बद्दल आपले आभार.

बुधवार, ११ मार्च, २०२०

साठी उत्तरकांड भाग-२

|| श्री ||


साठी उत्तरकांड भाग -२ 

दुसरा विवाह होईल व तो हि प्रेम विवाह असे घटना पूर्व भाकीत कुंडली पाहून केले असते? पारंपारिक नुसार कुंडली पाहता क्षणी असे भाकीत केले असते? दुसऱ्या विवाहाचे सोडा पहिला विवाह प्रेम विवाह होईल असे भाकीत केले असते? “दोन्ही ही प्रेम विवाहच केले. ते कसे?” या विचारलेल्या प्रश्नावर ‘ज्योतिर्विदांचा प्रश्न नेमका आहे’ यावर मी पहिला भाग खर्ची (पाल्हाळ लावून लावून) घातला तो या साठी. हा भाग ब्लॉगवर प्रकाशित करून आठवडा उलटला माझे दुसरा भाग लिहिणे लाबंत गेले पण दरम्यान या प्रश्नाचे उत्तर समुहावर इतर कुणीही दिले नाही हे आश्चर्य.

नक्षत्रप्रकाश ज्योतिष समुहावर हा प्रश्न विचाराला गेला आहे.

या स्री जातकाने वयाच्या ६१ व्या वर्षी घटस्फोट घेतला लगेच दुसरा विवाह केला ७५ वर्षाच्या व्यक्तींशी. दोन ही प्रेम विवाहच केले. ते कसे?
स्त्री :- २६/३/१९५४, सायं ७:३०, डहाणू रोड
स्थानांश:- ७२/४४/५० पूर्व, १९/५९/२१ उत्तर घेतले आहे. अयनांश:- २३/१२/०९ (चित्रापक्ष).

 तर सप्तमस्थान हे विवाहाचे स्थान आहे, समाजमान्य विवाहाचे. पंचमस्थान हे प्रेमाचे, प्रणयाचे स्थान हि झाली प्रार्थमिक माहिती. या सप्तम स्थानाचे पंचामाशी संबंध आल्यास प्रेमविवाहाची शक्यता वर्तवली जाते. प्रस्तुत कुंडलीत प्रथमदर्शनी असा संबंध येत नाही. शनी व गुरु मध्ये योग नाही. पंचमेश सप्तमेश राशी परिवर्तन अथवा नक्षत्र परिवर्तन नाही, ना या दोघात दृष्टी संबंध. पंचम सप्तमाशी येनेकेने प्रकरणे संबंधित मंगळ शुक्र युती नाही. तरीही दोन प्रेम विवाह झाले? उलट सप्तमेश धर्मेश राशी परिवर्तन, विवाह कारक शुक्र सप्तमात उच्चीचा, पावित्र्य, नैतिकता, शुचिर्भूतता यांचा गुरुच्या खालोखाल कारक मानला गेलेल्या रवी युक्त हा शुक्र आहे. हे योग खचीतच प्रेम विवाह दर्शवित नाही. पण प्रेम विवाह तर झालाय. आकाशस्थ कोणत्या ग्रहयोगाने हि गाठ बांधली? चला शोधू या. 


याचे खरे उत्तर मला चंद्र कुंडलीत सापडले. प्रेम निर्व्याज्य असते, प्रेम म्हणजे आत्ममिलन, प्रेम हे निर्विकार असते इ.इ. पण असे लाखात एखादे आढळते. प्रेम हि भावना आहे, चंचल, विकारलब्ध आहे व ती मनाशी निगडीत असते त्यामुळे असेल कि याचे उत्तर चंद्र कुंडलीत सापडले. वृश्चिक चंद्रलग्न असलेली हि कुंडली. वृश्चिक रास बऱ्याच प्रमाणात विकारवशही मानली जाते. येथे पंचमेश गुरु व सप्तमेश शुक्र राशी परिवर्तनाने पंचम सप्तम स्थान संबंध प्रस्थापित झाला. गुरु शुक्र दिप्तांशात त्रीरेकादशयोग, उच्चांशा जवळील शुक्र यामुळे याला बल प्राप्त झाले. नवमांशात गुरु शुक्र समसप्तकयोग आहे. कलत्र कुंडलीचा लग्नेश चंद्रच आहे व आपसूकच जन्मचंद्र रास तेथे पंचमात आली. जन्मपंचमेश व सप्तमेश गुरु शनी कलत्र कुंडलीत समसप्तमात आहेत. मंगळाच्या सहाय्या शिवाय हे धाडस कसे होणार? चंद्र मंगळ अंशकलात्मक युती आहे. शिवाय चंद्र पंचमेश गुरुशी या युतीचा दिप्तांश समसप्तक, त्या मुळे प्रेमाचे आकर्षण, मनात प्रेमांकुर पल्लवित झाला तर नवल का? कृतीशील मंगळा मुळे हि मनोराज्यातील लीला न राहता भौतिकात आली व गुरु मुळे यशस्वी झाली. यासाठी जन्मलग्न कुंडलीतील सप्तमेशावर या युतीचा प्रभावही पूरक झाला. सप्तमातील व्ययेश रवी हा पंचमेशाच्या नक्षत्रातील एकमेव ग्रह आहे हे हि लक्षात घ्या.

मंडळी आजून एक भाग लिहावा लागणार आहे. जमेल तितक्या लवकर पुढचा भाग प्रस्तुत करतो.

बुधवार, ४ मार्च, २०२०

साठी उत्तरकांड भाग -१

|| श्री ||


साठी उत्तरकांड भाग -१


नक्षत्रप्रकाश ज्योतिष समुहावर हा प्रश्न विचाराला गेला आहे.
या स्री जातकाने वयाच्या ६१ व्या वर्षी घटस्फोट घेतला लगेच दुसरा विवाह केला ७५ वर्षाच्या व्यक्तीशी. दोन ही प्रेम विवाहच केले. ते कसे?
स्त्री :- २६/३/१९५४, सायं ७:३०, डहाणू रोड
नक्की तारखा माहित नाहीत परंतु दुसऱ्या विवाहास एप्रिल मधे ५ वर्ष होतील त्या आधी ६ महिने घटस्फोट झाला.
    म्हणजे दुसरा विवाह एप्रिल २०१५ मध्ये झाला, तर पहिला विवाहाचा घटस्फोट नोव्हें.२०१४ मध्ये झाला. घटस्फोट साधारणता वय ६० वर्षे ८ महिन्यांनी राहू महादशा बुध भुक्ती शनी विदशेत (६/११/२०१४ ते २/४/२०१५) झाला असे सुरवातीला मानू या. (कारण नक्की तारीख माहित नाही म्हणून) तर दुसरा विवाह  साधारणता वय ६१ वर्षे १ महिन्यांनी राहू महादशा केतू भुक्ती केतू विदशेत (२/४/२०१५ ते २४/४/२०१५) झाला असे सुरवातीला मानू या.(पुन्हा कारण नक्की तारीख माहित नाही म्हणून)

जातकाचा जन्म १९५४ मध्ये डहाणू रोड सारख्या ग्रामीण म्हणता येईल अश्या भागातला. हा काळ अचूक जन्म वेळे विषयी साशंकता निर्माण करणारा आहे. त्या काळात जन्मवेळ अंदाजे/सदोष असण्याची शक्यता बऱ्या पैकी होती. त्यात चर्चित विषयाच्या घटनांच्या नेमक्या तारखा उपलब्ध नाहीत. उपलब्ध माहिती आधारे विश्लेषणाची इमारत उभी करूयात, काय चालतंय नव्ह? चालवायलाच हव (घ्या धकून).

धकून घ्यायला हरकत नाही, कारण ज्योतिर्विदांचा प्रश्न नेमका आहे तो म्हणजे “दोनी ही प्रेम विवाहच केले. ते कसे?” मी प्रश्न नेमका व स्पष्ट आहे म्हणालो ते का हे पुढे स्पष्ट होईलच, पण उपलब्ध माहितीवर धकून घेण्यासारखे आहे असे मी का म्हणालो? तर हा प्रश्न आपल्याला सांगतो आहे की कालनिर्णय करायचा नाहीये. कोणत्याही दशा, अंतर्दशा, विदशेत घटाना घडली असेना का त्याचाही विचार करायची आवश्यकता नाहीये (अज्जिबात नाही केला तरी आक्षेप नाही). पहिले सहजीवन किती काळ? (झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. जीवन गाणे गातच रहावे. गाण्याची लिंक पाठवू का?) नका हा विचार करू. घटस्फोट का झाला? ( याचाही विचार नाही करायाचा आहे हो.) ते बाकी जाउद्या हो फक्त आणि फक्त सांगा “दोन्ही ही प्रेम विवाहच केले. ते कसे?

त्याचे काय आहे ना पहिला प्रेम विवाह झाला. ठीक आहे झाला, ८० च्या दशकात हि काही एवढा बाऊ करण्याची बाब नव्हती. होत होते प्रेम विवाह तेव्हा. या विवाहाचा घटस्फोट झाला, प्रेम विवाहाचा घटस्फोट हा ८० च्या दशकात ( ३२ वेळा चावूनही चोथा न होणार विषय) असला तरी जातकाचा घटस्फोट २१ व्या शतकातील २० व्या दशकात झाला. या काळात घटस्फोटाचे विशेष कुणाला काही वाटत नाही. परत लगेच दुसरा विवाह करणेही आता फार विशेष नाही. दुसराही प्रेम विवाह? (दिल तो है दिल, दिल का ऐतबार क्या कीजिए, आ गया जो किसी पे प्यार क्या कीजिए?) या ८० च्या दशकातील विचार धारेची अंमल बजावणी आताचे नवतरुण लीलया करतील तर प्रश्न पडायचा प्रश्न नाही. तरीही आपण वाजवून घेतलेलं मडक ( खर तर न वाजवताच पण प्रेमाच हे मडक कस वाजवायच असते ते कोणाला माहित? मुळी ते “अय्या वाजवून घ्यायचे असते? हो का?”) फुटक निघाल्यावर दुसर मडक पसंद करायला अजूनही सहसा मॉम डॅड असतात, बहुदा पारंपारिक विवाह होतो. तिथे ६० च्या दशाकात जन्मलेला जातक ८० ची जडण घडण असलेली वयाच्या ६० नंतर पहिल्या प्रेमाला बाय बाय करून दुसऱ्या प्रेमाला हाय हल्लो करते (‘अग्ग बाई! सासूबाई’ ला लगेच दोष आणि डोस नका देवू, हि मालिका आत्ता कुठे आली आणि ती बहुदा प्रेमविवाहावर नाही) म्हणजे प्रश्न तर बनतायना बॉस.

पण हा प्रश्न आपण गॉसीप म्हणून नाही तर ज्योतिष दृष्टी कोनातून चर्चावयाचा आहे. पारंपारिक ज्योतिष नुसार या कुंडलीत प्रेम विवाहाचे योग आहेत? म्हणूनच म्हटले ज्योतिर्विदांचा प्रश्न नेमका आहे “दोन्ही ही प्रेम विवाहच केले. ते कसे?” ज्योतिषात या विषया वर काही नियम, योग आहेत? माझ्या परीने विश्लेषण करत आहेच, लवकरच पुढील भागात....
बाकी दिल तो है दिल.. गाण कुणाला पहायचे असेल तर व्हिडीओ लिंक वरती दिली आहेच.

पुढील लेख:- साठी उत्तरकांड भाग-२