गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

फर्श से अर्श तक

||श्री|| 


मागील लेख:- आमिष भाग २

फर्श से अर्श तक




         आज उद्योगपती रामकृष्ण डालमिया यांचा जन्मदिवस आहे. ७ एप्रिल १८९३ ला राजस्थानातील चिडावा मध्ये त्यांचा जन्म गरिबी परिवारात झाला. ते सर्वात मोठे पुत्र होते. सुखास्थानातील शनी चे हे अशुभफळ. या स्थानातील शनि काही शुभफळे हि देतो ते पुढे येईलच. या स्थानातील शनि वक्री असून शत्रू नक्षत्री आहे, असा शनि मातापित्यास कष्ट देतो. पित्याने नशीब आजमावण्या साठी गाव सोडले पण जीवन कष्टदायकच व्यतीत झाले. रामकृष्ण तीव्र बुद्धीमत्ता व उत्तम स्मरणशक्तीवाले होते, गणितात हुशार होते. मिथुन लग्न व लग्नेश बुधाचा वर्गोत्तम मंगळाशी लाभ योग. लहानपणा पासूनच छोटेमोठे कामे त्यांनी केले. इथेही अष्टमेश शनि सुखस्थानात त्यामुळे अविरत कष्ट. सुरुवातीला सट्टेबाजारात ते पैसे लावत. त्यामुळे बदनामी तर झालीच पण लोकांचा त्यांच्यावर विश्वास नव्हता, बाजारात पत नव्हती. त्यांच्याशी कुणी व्यवहार करत नव्हते कि उधार देत नव्हते. एकदा त्यांनी वडील जिथे काम करत तिथले त्यांच्या जवळ असलेले ५०० रुपये चोरले, नंतर ते दुप्पट परत केले. परिस्थिती हालाखीची झाली होती, कोणत्याही कामात यश येत नव्हते. त्या काळात हजारो रुपयांचे कर्ज झाले होते. पंचमातील केतू युक्त हर्शल व दोघेही राहुच्या नक्षत्रात. पंचमेश शुक्र दशमात बुधाच्या नक्षत्री उच्चीचा त्यामुळे सट्टेबाजाराचे आकर्षण. वयवर्षे ७ त २७ दरम्यान शुक्र महादशा होती. हा काळ बहुधा शुक्र महादशेत मंगळ अंतर्दाशेचा असावा. मंगळ अ.द. १३ ते १४ दरम्यान होती. मंगळ व्ययात असून चंद्राच्या नक्षत्री आहे व चंद्र मंगळ षडाष्टक योग सप्तम व्यायातून होत आहे. जरी व्ययातील मंगळ जुगारी बनवतो व त्यात नुकसान देतो तरी या दरम्यान वय लहान वाटते म्हणून शंका. राहू अंतर्दशेचा हि काल असू शकतो पण लाभातील राहू असे फळ दिल असे प्रथमदर्शनी वाटत नाही. पण राहू शत्रू राशीत व मंगळ रविच्या पाप मध्यात आहे. लाभातील राहू जुगारी, गुन्हेगार बनवू शकतो. फायद्या साठी कोणत्याही थराला नेऊ शकतो. त्यामुळे हा काल राहू भूक्तीचा असावा असेही वाटते. एके ठिकाणी त्यांनी १८ व्या वर्षी उद्योग उभा केल्याचे सांगितलेले आढळते. शुक्र म.द. गुरु अ.द. १७ ते २० व्या वर्षी होती म्हणजे मार्च १९१० ते नोव्हें. १९१२ दरम्यान तर मग वरील जीवन चरित्र हे राहू भूक्तीत घडले हे निश्चित. अशात एकदा एका ज्योतिष पंडिताने त्यांचा हात पाहून त्यांना सांगितले कि पुढच्या आठवड्यात तुझ्या हातात १.५ लाख रुपये (त्या काळात) असतील अन त्यावेळी त्यांच्या खिशात ५० रु. सुद्धा नव्हते. पण भविष्य वाणी सत्य झाली.


Name: Ramkrishna Dalmia

Date of Birth: Friday, April 07, 1893

Time of Birth: 11:09:23

Place of Birth: Chirawa

Longitude: 75 E 39

Latitude: 28 N 13

Time Zone: 5.5

Information Source: Astrology of Professions (Pathak)

 

        अचानक चांदीचे भाव वाढले. त्यांनी खिशात पैसे नसतांना लंडन मधील ४ कंपन्यांतील ओळखीचा फायदा उचलत हजारो रुपयांची चांदी बुक करणे सुरु केले. वाढत्या चांदीच्या भावाने त्यांना खरोखर एका आठवड्यात दीड लाखाचा फायदा कमावून दिला. आलेल्या पैसातून त्यांनी उधारी चुकवूनही त्यांच्या जवळ बराच पैसा शिल्लक होता. लाभातील राहू अकल्पित लाभ घडवून आणतो, उद्योगपतींना चांगले यश देतो. हे फळ इथे प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे वरती आपण जो विचार करत होतो ती मंगळ अंतर्दशाच असावी. ०९ मार्च १९०७ मध्ये मंगळ अ.द संपली. बहुधा भाकीताचा काळ हा या दरम्यानचा असावा. २० च्या दशकात ब्रिटीश सरकारने चांदी बाबत बदललेल्या नियमाने डालमियांना फायदाच झाला. ते यातून मिळत गेलेला फायदा इतर व्यवसायात गुंतवत गेले. या नंतर मात्र त्यांना जिथे हात टाकतील तिथे अफाट यश मिळत गेले. २० ते ४० च्या दशका दरम्यान देशात जोमाने व्यवसाय विस्तार करत गेले. डालमिया इंडस्ट्री बीमा, बैंकिंग, मीडिया, केमिकल, एविएशन, आयरन, सीमेंट, वस्त्र उद्योग आणि खाद्य पदार्थ सहित वेगवेगळ्या प्रांतात त्यांनी हातपाय पसरले. २० च्या दशकाचा विचार केला तर शुक्र महादशा जाने.१९२० मध्ये संपते. या दशकात रवी म.द. पूर्ण व चंद्र म.द.तील काही भाग येतो. मग वरती जो आपण शुक्र म.द. मंगळ अ.द. चा विचार केला तो काळ शुक्र म.द. केतू अ.द. चा घ्यावा लागेल. शुक्राचा व केतूचा विचार वरती केला आहेच. केतू पंचमात वक्री हर्शल युक्त राहुच्या नक्षत्रात आहे. सट्टेबाजार तसाही केतूचा प्रांत नाही पण तो राहूच्या नक्षत्रात आहे त्यामुळे त्याने असे प्रतिकूल फळ दिले असावे. केतू भुक्ती नोव्हे.१९१८ ते जाने.१९२० दरम्यान होती. तसेच सप्टें.१९१८ ते नोव्हे.१९२० दरम्यान शनि चे तृतीयातील सिंहेतून भ्रमण होते त्या मुळे त्याची तृतीय दृष्टी पंचमावर येते व केतू भुक्ती दरम्यानच शनि वक्री हि होता. २६,२७ व्या वया दरम्यान हि भुक्ती व गोचर होते. २० ते ४० च्या दशका दरम्यान जी त्यांची फर्श से अर्श तक प्रगती झाली ती राहू मुळे कि रवि मुळे? कारण या दरम्यान त्यांना रवी, चंद्र, मंगळ महादशा होत्या. लाभातील राहू अकल्पित लाभ घडवून आणतो, उद्योगपतींना चांगले यश देतो. उद्योगधंद्यातील आवक पाहून काही जादूटोणा किंवा एखादे पिशाच्च वश केले कि काय? अशी शंका यावी असा तुफान उत्कर्ष हा राहू देतो असे एका पिढीतील ज्योतिष मानीत. तसे फळ या कुंडलीतही दिसून येते. केतू हा सन्यस्त तर राहू हा छत्रधारी असे म्हणतात. पण वर आपण पाहिलेच कि लाभातील हा राहू शुभ संबंधित तर नाही. पापमध्यात, शत्रू राशीत असलेला हा राहू गुरु युतीत आहे एवढेच. रवी दिग्बली असून कर्तृत्व,पराक्रमेश(तृतीयेश) आहे. तृतीयेश दशमात देखील हि फळे देवू शकतो. रवि देखील मित्र राशीत आहे. रवि, गुरु, मंगळ या कुंडलीत परममित्र आहेत. दशम, लाभ आणि व्यय यात मालायोग आहे आणि रवि या मालायोगाला कर्तृत्व, पराक्रमाची जोड देत आहे. त्यात रवि हा सत्ताधारी, राजकारक आहे. राज्यकर्त्यांनी बदललेल्या धोरणाचा फायदा यांना झाला हे अश्या रवी खेरीज दुसऱ्याचे फळ कसे असू शकेल? बर हा रवी शुभ संबंधीतही आहे. रवी लग्नेश बुधाच्या नक्षत्रात आहे व बुध रविच्या नक्षत्रात म्हणजे नक्षत्र परिवर्तन आहे, शिवाय रवि लग्नेश बुध युक्त आहे. उद्योगपतींना शनीचे देखील सहाय्य लागते. या कुंडलीत शनि जसा कष्टदायक आहे तसा भाग्यकारही. भाग्येश शनि व लग्नेश बुध दृष्टीपरिवर्तन योगात आहेत. हा शनी लग्नेशाच्याच राशीत व सप्तमातील धनेश चंद्राच्या नक्षत्री आहे. चतुर्थात शनि व रवी शनि प्रतियुती माता पित्यास कष्टदायक असली तरी लग्नेशाशी जो आपला राशीस्वामी असून नैसर्गिक मित्र आहे त्याला सुखदाता ठरेल असे आपण म्हणू शकतो ना? बर बुध शुक्र शनि नै.मित्र आहेतच पण या कुंडलीला ते त्रीकोनाधीपती आहेत आणि परस्पर संबंधित होत आहेत हा पराशरी नुसार शुभ योग म्हणावा. लग्नेश बुध निचभंग राजयोगात आहे. कारण ज्या शुक्रा कडून लग्नेशाचा नीचभंग होतो आहे तो शुक्र मालव्य पंचमहापुरुष योगात आहे आणि दशानाथ रवि हा या बुध व शुक्र युक्त आहे. धनेश चंद्र सप्तमात मित्र राशीत त्रिकोणातील केतूच्या नक्षत्री स्वामी गुरूशी त्रिकोणात आहे. सप्तमातील चंद्र उद्योगपतींना लोकप्रियता देतो. उत्पादने लोकप्रिय होतात. निदान त्यांच्या दोन कारखान्याच्या मुहूर्तमेढीचा कालावधी मिळाला. १९३२-३३ मध्ये त्यांनी बिहारच्या निर्मलकुमार जैन यांच्या भागीदारीत साखर कारखाना सुरु केला तर १९३५ मध्ये सिमेंटचा कारखान स्थापन केला. चंद्र म.द. बुध अ.द. नोव्हें. १९३१ ते एप्रिल १९३३ दरम्यान होती तर नोव्हें. १९३३ ते जुलै १९३५ दरम्यान शुक्र अंतर्दशा व पुढे रवि अंतर्दशा जाने.१९३६ पर्यंत होती.  


यांनी प्रचंड माया जमवली. त्या काळात ते खरबपती होते या वरून त्यांच्या अफाट संपत्तीची कल्पना करा. धनस्थान पापसंबंध विरहित आहे. (अगदीच नाही म्हणायला चंद्र मंगळ षडाष्टक आहे.) लग्नेश बलवान, दशमस्थान बलवान, लग्नावर धनेशाची कृपा. त्या काळात यांचे स्वत: चे खाजगी विमान होते व डालमिया नगर (राजस्थान) ते कोलकत्ता दरम्यान त्यांची खाजगी टेलिफोन यंत्रणा होती असे म्हणतात. या गोष्टी त्यांच्या समकालीन उद्योगपतीच काय संस्थानिकां कडेही नव्हत्या. त्यांनी जो वारे माप खर्च केला त्याला कारणीभूत व्ययातील मंगळ. माणूस तसा रंगेलही असावा, यांनी एकूण ६ विवाह केले. 


पहिला विवाह कमी वयात झाला पण त्या वेळी त्यांचे नेमके वय काय होते ते नाही समजले पण त्यांच्या पहिल्या पत्नीचे वय त्या वेळी १२ वर्षे होते हि नोंद आहे. तीन वर्षांनी पहिल्या पत्नीच्या मृत्यू नंतर त्यांचा दुसरा विवाह झाला. त्या नंतर घरच्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी अजून चार विवाह गुपचूप केले. तिसऱ्या पत्नीला त्यांनी लग्ना नंतर लगेचच दिल्लीत स्वतंत्र मोठे घर दिल्याचा उल्लेख आहे म्हणजे हा विवाह त्यांच्या वरील उर्जित काळात झाला असावा. सहाव्या पत्नीला तर ते लग्ना नंतर लगेच लंडन मध्ये स्थायिक करायचे म्हणत होते पण त्यांच्या आईच्या विरोधा मुळे त्याही पत्नीला दिल्लीत मोठे घर घेवून दिले. सहावी पत्नी विवाहाला या अटीवर तयार झाली कि या पुढे ते अजून विवाह करणार नाही तरीही या विवाह नंतर त्यांनी वन वर्ल्ड मूवमेंट सुरु केली व या पत्नी समवेत स्वत:च्या खाजगी विमानाने अनेक देश फिरले. या दरम्यान अमेरिकेत त्यांचे एका आंग्ल युवतीवर मन जडले पण हे प्रकरण लवकरच संपुष्टात आले. त्यांच्या या बहुपत्नीव्रताला कुटुंबियांचा विरोध होता खास करून त्यांच्या आईचा पण यांनी त्यांना कधी जुमानले नाही. एक प्रकारे मातेला जे मानसिक कष्ट झाले ते चतुर्थातील शनिचेच फळ म्हणायचे न काय. शैय्यास्थानातील मंगळ शुक्राच्या समराशीत आहे व चंद्राच्या प्रिय रोहिणी नक्षत्रात आहे. त्यामुळे हा जाताकास विलासप्रिय, कामासक्त बनवतो. व्दितीयेश चंद्र सप्तमात व्दिस्वभाव राशीत हा बहुभार्या योग म्हणता येईल. सप्तमेश गुरु राहू युती (हो हो तोच तो चांडाळयोग) एकनिष्ठ राहू देत नाही. लाभातील हा राहू सप्तमेश युतीत असल्याने जातीबाह्य, धर्मबाह्य विवाह दर्शवितो. यांची तिसरी पत्नी पंजाबी तर पाचवी पत्नी बंगाली होती. यांच्या संस्थे कडून दिला जाणारा पुरस्कार एका राजस्थानी कवयात्रीला मिळाला त्या समारंभात यांनी तिला पाहिले व दोन वर्षे तिची प्रियराधना करत राहिले व तिला विवाहाला राजी केले जी यांची सहावी पत्नी झाली. हा काळ १९४० नंतरचा असावा असे वाटते. 



पंडित ज.नेहरू यांच्या कुंडलीतही लाभात राहू आहे. काही गुण जुळत असूनही यांचे पटले नाही. स्वातंत्र आंदोलनालाही यांनी आर्थिक पाठबळ दिले. गांधीजींनी १९३० मध्ये मिठाच्या सत्याग्रहा पासून सुरु केलेले सविनयभंग आंदोलन जवळ जवळ पूर्णतया यांच्या आर्थिक पाठबळावर झाले असे म्हणतात तसेच यात त्यांनी सक्रीय सहभागही नोंदवला होता. सत्ताधारींना विरोध हे फळ रवि शनि प्रतीयुतीचे. गांधीजींचा अनुग्रह व जीन्नांशी घनिष्ठ मैत्री असूनही नेहरूंशी पंगा घेतला पण तो स्वातंत्र्या नंतर. (१९४७ नंतर त्यांचे ग्रह फिरू लागले होते. परिवारातही वाटणी झाली.) जाने.१९४३ ते जाने.१९६१ दरम्यान त्याना राहू महादशा होती ज्यात त्यांची दुर्दशा झाली व कारण ठरले नेहरू. नेहरूंशी टक्कर झाली त्याचे कारण म्हणजे हिंदू कोड बिल व गोवंश हत्या विरोध हे होत. ते विभाजन व शरणार्थींची दुर्दशा या साठी नेहरूंची उघडपणे निंदा करत पण प्रमुख कारण हिंदू कोड बिल ठरले. डालमियांनी स्वामी करपात्री महाराजां सोबत गोहत्या व हिंदू कोड बिलाला प्रखर विरोध केला. त्यांनी स्वामी करपात्रीं मागे आपले आर्थिक बळही लावले. स्वामींनी १९४८ मध्ये ‘राम राज्य परिषद’ हि राजकीय पार्टी स्थापन केली. यामुळे नेहरूंशी त्यांचे संबंध बिघडले. १९५५ व १९५६ मध्ये विरोधाला न जुमानता हिंदू कोड बिल चार भागात पास झाले. त्यानंतर १९५६ मध्ये डालमियांची चौकशी करण्यासाठी नेहरूंनी विवियन बोस आयोग नेमला. त्यांच्यावर करचुकवेगिरी, पैस्यांची व शेअरबाजारात अफरातफर इ. आरोप लागले. त्यांना आपल्या कंपन्या कवडीमोलाने विकाव्या लागल्या. तीन वर्षाचा कारावास भोगावा लागला. राहू महादशेत शुक्र अंतर्दशा जुलै १९५४ ते जुलै १९५७ दरम्यान होती. पुढे रवी अंतर्दशा जून १९५८ पर्यंत तर चंद्र अ.द. डिसें.१९५९ व मंगळ अ.द. जून १९६१ पर्यंत होती. कारावास बहुधा रवि ते मंगळ भुक्ती दरम्यान येईल. नक्षत्र गोचरी नुसार राहू महादशा साधन दशा होती तर राहू जन्म नक्षत्रात होता तरी त्या दशेत दुर्दशा झाली. नोव्हेंबर १९५५ ते फेब्रु. १९६१ दरम्यान त्यांना साडेसाती होती. साधारण वयाच्या ६५ ते ६८ दरम्यान त्यांना कारावास भोगावा लागला. शनि महादश शनि अंतर्दशेत (जाने.१९७७ ते जाने.१९८०) रवि विदशा (६/८/१९७८ ते ३०/९/१९७८) ८५ व्या वर्षी २६ सप्टें.१९७८ मध्ये त्यांचे निधन झाले. सप्टें.१९७७ ते नोव्हें.१९७९ दरम्यान अष्टमेश शनीचे तृतीयातून भ्रमण होते  तर गोचर राहूचे चतुर्थातून शनि वरून भ्रमण होते. 🙏

पुढील लेख:- विवाह.