बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५

AI Astro बाबत शंका.

||श्री||

मागील लेख:- जपान संभाव्य त्रासदी? 

AI Astro बाबत शंका.




सध्या नुसत्या जन्मतारखे वरून ज्योतिष शास्त्रावर विश्वास नसलेल्या व्यक्तीला तो अमुक अमुक काळा पासून एका व्यक्तीच्या प्रेमात व संबंधात आहे व एका वर्षा नंतर त्या व्यक्तीशी तुझा विवाह होईल, सोडून गेलेला प्रियकर/प्रियेशी परत तुझ्या कडे येईल. असे सांगून त्या व्यक्तीला अचंभित करून ज्योतिष शास्त्रावर त्याचा विश्वास बसवणारी अश्या आशयाच्या एका AI अॅपच्या जाहिरातीचा माझ्यावर भडीमार केला जातो आहे. अनेकांनीही हि जाहिरात पाहिली असेलच. संयोगाने अंकशास्त्राच्या नियमाचा एक व्हिडियो माझ्या पाहण्यात आला ज्यात जन्मतारखे वरून जातकाचा व्यवसाय/नोकरी कशात उत्कर्ष होईल त्याचे ठोक टाळे दिले होते. माझा थोडा फार अभ्यास असल्याने एक जन्मतारखेवर तो किती लागू होतो ते तपासून पाहिले. अर्थात एखाद्या उदाहरणा वरून लगेच काही निष्कर्ष काढणे योग्य नाही. राहिले AI अॅपचे तर त्यांना तुमचा सगळा डेटा उपलब्ध होतो. त्या वरून तुम्ही कुणाशी रिलेशनशिप मध्ये आहात/होता, कुठे माती खाल्ली हे कळने त्यांना अवघड आहे का? काहीजन आपले उत्पादने विकण्यासाठी थातुर मातूर ज्योतिष शिकून तेच 101% बरोबर असल्याचा दंभ मिरवत असतात.  त्याची जरा चिकित्सा करण्यासाठी हा प्रपंच. झोलाछाप ज्योतिषांची कमी होती आता त्यात भर टाकायला AI वाले आले. तुम्ही कुणाशी, काय बोलता, कधी पासुन बोलता, कुणाला कुठे भेटता, तुमचे खाजगी (असा तुमचा गैरसमज असलेले) फोटो, व्हीडोओ इ. माहिती यांना तुमच्या फोन च्या माध्यमातून मिळते. आत्ताच काही दिवसांपूर्वी असाच एक सिद्ध पुरुष गजाआड गेला जो त्याच्या कडे येणाऱ्या लोकांचा मोबाईल हॅक करून त्यांच सर्व खाजगी, सार्वजनिक पाहून त्यांना बोटं तोंडात घालायला लावायचा म्हणे. हे झाले AI अॅपचे. ‘चुहे को मिली हल्दी, मैं बडा पंसारी’ असे काही ज्योतिषी आपल्याला दिसतातच, मोठे मोठे (फक्त) दावे करतांना. व्हिडीओ करणारे तज्ञ असतातच याची काय हमी? आजकाल Like मिळवण्यासाठी कुणीही काहीही व्हिडीओ टाकतात. तर त्या व्हिडीओ नुसार मुलांक जर ७,,४ असेल तर व्यवसायात चांगले यश मिळते. सुरवात केल्या नंतर ५ ते ७ वर्षात मोठ्या धनलाभाची संधी मिळते. जर मुलांक १,,८ असेल तर नोकरीत यश मिळते. ३० च्या आत मनासारखी नोकरीचे योग येतात. एका मता नुसार १,,,,६ हे व्यवसायाचे अंक आहेत. तर एका व्यक्तीची तरी जन्म तारीख पाडताळून पाहू या. ज्याने त्याने आप आपली तापासून पहावी व वरील नियम जुळतो का नाही ते कमेंट मध्ये टाकावे. उगाच जन्मतारखांचा पाऊस पाडून माझ सांगा, माझ सांगा करू नका. मी उत्तर (फुकटात) देणार नाही. माझ्याच कडून विश्लेषण हव असेल तर त्याचे मोल अगोदर द्यावे लागेल. असो.         

 


     

या व्यक्तीच्या लोशो ग्रीड मध्ये ५ अंक नाही. पदवी परिक्षा दिल्या बरोबर २१ व्या वर्षी मार्च मध्ये जातक नोकरीला लागला. सप्टें. २००३ पासून जातकाने स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. मुलांक २ व भाग्यांक ९ आहे. म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय दोन्हींचाही अंक नाही. व्यवसाय सुरु केल्यावर अल्पावधीतच उत्कर्ष झाला. एक प्रकारे अश्रित असलेल्या या व्यक्तीचे ७ वर्षांत स्वत:चे घर झाले. घर घेतल्यावर ६ महिन्यातच विवाह केला. विवाहा नंतर २१ महिन्यात कन्या रत्न प्राप्त झाले. मुलीच्या जन्मा नंतर ४/५ महिन्यात दुसरे घर केले. स्वत:चे वाहन वगैरे झाले. भाड्याचे असलेले दुकान स्वत:चे झाले नंतर दुसरा गाळा घेवून विस्तारही केला. ग्रीड मध्ये क्रॉस होत नाहीये. गोल्डन अँरो तर पूर्ण रिकामा आहे. व्यवसाया साठी जो अँरो महत्वपूर्ण मानला जातो तोच रिकामा आहे. अजातशत्रू अंक ग्रीड मध्ये नाहीये. अंक शास्त्रा नुसार व्यवसायात अडचनी, बेरोजगारी असे फलित निघते.


मित्रांनो या व्यक्तीची जन्मकुंडली बलवान आहे. सिंह लग्न २९ अंशावर आहे. [काही सॉफ्टवेअर मध्ये कन्या लग्न येते. पण त्यामुळे ग्रहयोग अधिक बलवान होतात.] दशमेश शुक्र लाभात लाभेश युक्त. धनेश लाभेश बुध लाभात. योगकारक धनात. गुरु महादशा शनि अंतर्दशेत व्यवसाय सुरु केला. गुरु लग्नी आहे तर शनि व्दितीयात. गोचर गुरु लग्नी तर शनिचे लाभातून शुक्र बुधा वरून भ्रमण होते.


नक्षत्र गोचरीचा विचार केला तर जन्मस्थ गुरु हा नैधन नक्षत्री आहे. या गुरुच्या दशेत अचंभित करणारा आर्थिक उत्कर्ष झाला कसा? तर नक्षत्र स्वामी लाभात आहे. म्हणजे ग्रहाचा भाव संबंध प्रभावी ठरला. व्यवसाय सुरु केला तेव्हा गोचर गुरु साधन नक्षत्री होता परंतु साधारण २३ दिवसांनी तो गोचर गुरुही नैधन नक्षत्री आला. गुरु एका नक्षत्रात जवळपास ५ महिने असतो. त्यातच नेमका गुरु नैधन नक्षत्राच्या शेवटच्या अंशात असतांना वक्री झाला व ५ महिन्यांनी नैधन नक्षत्राच्या पहिल्या चरणाच्या अंतिम अंशात मार्गी झाला. म्हणजे व्यवसाय सुरु केल्या नंतर काही दिवसातच गुरु नैधन नक्षत्री आला व वर्षभर नैधन नक्षत्रीच होता. नक्षत्र गोचरी नुसार वर्षभर जातकाचा व्यवसायात जम बसायला नको होता. आर्थिक समस्या यायला पाहिजे होत्या. पण उलट जातकाचा उत्कर्षाचा आलेख चढताच होता. याच काळात जातकाने जुनी का होईना दुचाकी घेतली होती. जन्मस्थ ग्रहस्थितीने गोचरीवर मात केली असे म्हणावे लागेल. अंक ज्योतिष असो वा नक्षत्र गोचरी हे काही समग्र ज्योतिष नाही. ज्योतिष वटवृक्षाच्या फांद्या आहेत. काही ज्योतिषी जन्मस्थ ग्रहस्थिती कुचकामी मानतात तर काही अगदीच निरुपयोगी मानतात. एखाद्या पारंबीला लोंबकळून त्यालाच वटवृक्ष मानतात. गोचरीची महत्ता काहीच नाही असे मला म्हणायचे नाही. गोचरीची साथ मिळाली असती तर जातकाने जे काही मिळवले त्यात अजून भर पडली असती. पण फक्त नक्षत्र गोचरी किंवा अंक ज्योतिषाचा विचार केला तर चित्र नकारात्मक दिसते. 

पुढील लेख लवकरच......