गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

गुरु शनि - ग्रह युद्ध

 || श्री ||

मागील लेख:- Hour आणि होरा.


गुरु शनि - ग्रह युद्ध






नुसत्या डोळ्यांनी गुरु शनि युती अशी दिसली. (वरील चित्रात पिवळ्या वर्तुळात.) शनीची कडा दुर्बिणीतून दिसते. त्या मुळे शनिची कडा स्पष्ट दिसणारे फोटो हे बनावट आहेत. निदान मोबाईल किंवा साध्या कॅमेरात तरी शनीची कडा येणार नाही. युती पूर्वीचा एक फोटो खाली देत आहे. दोन्ही फोटो इंटरनेट वरून साभार.  





आज दिनांक २१/१२/२०२० ला गुरु शनी युतीची ज्योतिष वर्तुळात चर्चा चालू आहे. आपणही या वर काही बाही लिहावे असे स्फुरण चढल्याने लिहिता झालो. शनी गुरूची हि युती क्रांतीसाम्यासह आहे. गुरु शनीची हि नुसती युती नाही तर हे ग्रह युद्ध आहे. जेव्हा दोन ग्रहांची युती होते व परस्परांच्या बिंबमध्यात दक्षिणोत्तर अंतर हे एक अंशा पेक्षा कमी असते तेव्हा ग्रह युद्ध झाले असे म्हणतात. गुरु शनीच्या बिंबमध्यात आज ६ कलांच्या आसपास इतके कमी अंतर आहे. त्यामुळे आज जी युती झाली ती ग्रहयुद्ध आहे. कोणत्याही युद्धा प्रमाणेच या युद्धातही कोणीतरी जयी होणार आहे. याचेही काही नियम आहेत. उत्तरे कडील ग्रह हा जयी असतो. गुरूची दक्षिण क्रांती २०/३०/४८ तर शनीची दक्षिण क्रांती २०/२४/४९ आहे अशी माहिती मिळाली. म्हणजे यात शनि उत्तरे कडे आल्याने तो जयी झाला. थांबा अजून अंतिम निर्णय झाला नाही. दुसरा नियम असा आहे कि जर दक्षिणेकडचा ग्रह जास्त तेजस्वी असेल तर तो जयी होतो. गुरु हा शनि पेक्षा जास्त तेजस्वी आहे त्यामुळे या ग्रहयुद्धात गुरु हा जयी झाला. मेदनिय ज्योतिषात ग्रह युद्धाकडे भूतलावरील युद्धाचे प्रातिनिधिक म्हणून पाहिले जात. 

ग्रहयुद्धांचे परिणाम लगेचच दिसतील असे नाही. ग्रहणाच्या फलिते ग्रहणाच्या आधी नंतर सहा सहा मिहीने कालावधीत अनुभवास येतात असे जाणकारांचे म्हणणे आहे. ग्रहयुद्धांचेही असेच समजायला हरकत नाही.

जातक पारिजात अध्याय दुसरा श्लोक १८ मध्ये ग्रहांच्या अवस्थांचे वर्णन करतांना ग्रहाभिभूतस्त्वतिपीडित  असे म्हटले आहे. ग्रहाभिभूत म्हणजे ग्रहाने झाकलेला. यानुसार एखादा ग्रह दुसऱ्या ग्रहाने झाकलेला असल्यास तो ग्रह पिडीत होतो. एक ग्रह दुसऱ्या ग्रहाने ग्रहयुद्धात झाकला जातो. म्हणजे शनि फक्त पराजित नसून पिडीतहि आहे. ग्रह युद्धाचे जे चार प्रकार आहेत, त्यातील सर्वात परिणामकारक भेदग्रहयुद्ध शनी गुरु मध्ये झाले आहे. ग्रह सूर्या भोवती भ्रमण करतात, या क्रियेत त्यांचे एकमेका मधील अंतर कमी जास्त होणे अपरिहार्य आहे, त्यात एवढे काथ्याकुट का करायचा असे वाटणे स्वाभाविक आहे. पण येथे आपण केवळ खगोलशास्त्राच्या दृष्टीने पाहत नाही तर आपला मंच ज्योतिषशास्त्राचा आहे तेव्हा त्या दृष्टीने पहाणार. या अगोदर १६२३ मध्ये अशी युती झाली होती, म्हणजे ३९७ वर्षांनी अशी युती होते आहे. दुर्मिळ खगोलीय घटनांचे परिणाम जातकात पाहण्या पेक्षा मेदनियेत पाहिले जात असत. सध्या पूर्ण जगापुढे असलेले संकट म्हणजे कोरोना महामारी. या दृष्टीने हि युती काय परिणाम करू शकते? त्याचा अंदाज लावू या. शनी हा मृत्यूकारक आहे तर गुरु हा जीव कारक. शनी गुरुच्या या युद्धात गुरु जयी आहे हे आपण आधी पाहिले आहेच. नेमके हि युती होण्या पूर्वी काहीच दिवस आगोदर या रोगाचे लसीकरण काही देशात चालू झाले. ज्या संस्था लस तयार करीत आहेत त्यातील बहुतांशी संस्थांनी संशोधन पूर्ण झाले असून वापरास तयार असल्याचे सांगितले आहे. जयी गुरुचा हा परिणाम म्हणता येईल. पण ज्या राशीत हि युती झाली त्या मकर राशीत गुरु नीचेचा आहे. कालपुरुष कुंडलीत हि रास दशम केंद्रात आली त्यामुळे गुरु निचभंग योगात आहे. रविच्या उत्तराषाढ नक्षत्रात कुंभ नवमांशी हि युती झाली आहे. त्या मुळे गुरु जरी जयी व निचभंग योगात असला तरी शनिचा प्रभाव आहेच. लसीकरण सुरु होतेय तोच युतीच्या एकदोन दिवस आधीच ब्रिटन मध्ये या कोरोणा संसर्गाचा नवीन घातक प्रकार उदयास आल्याची बातमी आली व आजच (२३/१२/२०२०) हा लेख लिहित असतांना अफ्रिकेतही या रोगाने आपले स्वरूप बदलले असल्याचे निदर्शनास आल्याची  बातमी आली. संशोधित लसी या नवीन प्रकारांवर परिणाम कारक ठरतील का? हि एक चिंता निर्माण झाली. पण मला वाटते या लसी काही बदल करून उपयुक्त ठरतील, कारण जीवकारक गुरु जयी असून त्याची षष्ठावर दृष्टी आहे. दुसरे म्हणजे ज्या नक्षत्रात हे ग्रहयुद्ध झाले तो रवी पंचमेश असून षष्ठेश बुध त्याच्या अंशात्मक युतीत असल्याने अस्तंगत आहे.  पंचमेश रवी व जीव कारक गुरु बली झाल्याने जागतिक कोरोणा महामारीवर संशोधित लसी यशस्वी होतील असा अंदाज आहे. गुरु जरी जयी असला तरी तो दक्षिणे कडे असल्याने शनि च्या प्रभावामुळे कोरोणाचे नवे प्रकार येत असले तरी शेवटी जयी तो जयी असल्याने त्यावरही मात होईल. अर्थात येथे आपण एकांगी विचार करतो आहोत पण आजचा आपला विषय गुरु शनि ग्रहयुद्ध असल्याने असे करणे क्रमप्राप्त आहे. गुरु शनि दोघेही न्याय, कायदा यांचे कारक आहे. त्यामुळे जागतिक न्याय, कायदे कानून यांवर नेमका काय परिणाम होईल सांगणे अवघड जातेय. सामान्यात: गुरु कायदे करणारा तर शनि त्या नियम कायदे बर हुकुम पालन व दंडाधिकारी असे म्हटले जाते. त्यामुळे कायदे कानून पालन यशस्वी न झाल्याने नवे कायदे कानून निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचे कारण मकरेचा शनि वादविवाद करणारा असतो तर मकरेचा गुरुच्या त्याच्या कारकत्वात दांभिकत्व येते. प्रादेशिक कायदे व धार्मिक कायदे यांत उल्लेखनीय संघर्ष संभवता.


ग्रह युद्धाकडे भूतलावरील युद्धाचे प्रातिनिधिक म्हणून पाहिले जात अस मी वरती म्हटले आहे. यात साधा सरळ हिशोब असतो तो म्हणजे जयी ग्रहाच्या अमंलाखालील देशाचा विजय होतो. जगभरातील कोणते देश प्रदेश शनीच्या व गुरुच्या अमंलाखाली आहेत त्यांची यादी करून त्यांच्यात जर काही संघर्ष मग कोणताही असो व्यापारी, सामरिक त्याचा अंदाज करता येईल. पण हे काम सोपे नाही. कारण देश-प्रदेशाच्या राशी यात मतांतर आहेत. आपआपल्या अनुभवा वरून त्या ठरवल्या गेल्यात. कुण्या एके काळी आपल्या कडे प्रदेशाच्या शासकाच्या राशी वरून या बाबत अंदाज वर्तवित. दुसरा मार्ग म्हणजे खगोलीय घटना घडली त्या वेळची त्या त्या प्रदेशातील क्षेत्र कुंडली बनवून अंदाज वर्तवणे. या पदधतीने बऱ्याचदा खगोलीय घटनेचे वेग वेगळ्या प्रदेशात भिन्न भिन्न अनुभव का येतात याचे उत्तर मिळते. तर आपण आता भारता कडे वळू.


गुरु शनी युती हि भारतात सुर्यास्ता नंतर साधारण १ तास दिसली. पण अंश कला विकलात्मक गणितागत युती भारताची राजधानी दिल्ली (७७/१२/२९पु. २८/३७/०२उ.) येथे रात्री ११:४०:४३ ला दाखवते. त्या वेळी सिंह क्षेत्र कुंडली येते. म्हणजे राजधानीच्या षष्ठात हि युती झाली. देशाचे शत्रू प्रबळ होऊन धूर्त खेळी करण्याची शक्यता असेल. कपट कारस्थान होईल. अचानक एखादे आर्थिक संकट, कोंडी शत्रू कडून केली जाऊ शकते. या वर पारंपारिक नीती, ज्ञान विद्वत्ता, बल या व्दारे मात केली जाईल. पाकिस्तान पेक्षा चीन वर बारीक लक्ष ठेवावे लागेल. कारण सनातन भारत हा शनीच्या अंमलाखाली येतो असे बहुतेक ज्योतिर्विदांचे मत आहे. तर चीन गुरुच्या अंमलाखाली येतो. भारताच्या धनु व मीन राशी मानणारे हि आहेत म्हणजे गुरुच्या अंमलाखाली. भारताची विद्वत्ता, शहाणपण, ज्ञान यामुळे असे मानले जाते. पण स्वतंत्र भारताची रास कर्क आहे म्हणून मी सनातन भारताची रास (धनु/मकर/मीन) मकर आहे असे म्हटले. ग्रहयुद्धात शनी पराजीत झाल्यावर भारताला नुकसान झाल्याचा अनुभव फेब्रुवारी २०१९ मध्ये आला आहे. ब्लॉग वरील ‘राष्ट्रशल्य’ हा लेख वाचावा. (लिंक - https://parisastrologer.blogspot.com/2019/02/18.html ) त्या वेळी शनी शुक्रा कडून पराजीत झाला होता. चीनची तूळ रास हि काही जन सांगतात, असो. आताच्या सिंह क्षेत्र कुंडलीत ६,८,१२ स्थाने संबंधित झाली आहेत त्यामुळे त्रासातून सुख, वाईटातून चांगले असा अनुभव संभवतो. शासकांना त्यांच्यातील काही जणांनकडून विरोध होऊ शकतो. विरोधकांना काही नुकसान संभवते. कर्क लग्ना नुसार शेतकरी आंदोलनातून जनतेला दिलासा मिळेल असे वाटते. २४ डिसेंबर नंतर सरकार या बाबत काही धाडशी निर्णय घेण्याची शक्यता आहे. काही कार्यवाही घडू शकते. गुरु शनि ग्रहयुद्धाचा परिणाम २/४/२०२१ पर्यंत संभवतो. धन्यवाद

पुढील लेख:- ज्योतिष विदुषीची कुंडली.
  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा