शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२

मकर संक्रमण २०२२ – नाशिक

 || श्री|| 


मागील लेख:- बोलकी कुंडली – १


मकर संक्रमण २०२२ – नाशिक


मेदनिय ज्योतिषात तसा मी क्वचितच लिखाण करतो. ज्योतिष वर्गात मेदनियाचे पाठ संपल्यावर नमुना कुंडलीचा अभ्यास करायचा होता. या वेळी जागतिक किंवा राष्ट्रीय पातळीवर बघण्या पेक्षा स्थानिक पातळीवर बघुया असे मनात आले आणि ते फारसे अवघड नाही कारण इथे सिंहस्थ मेळा भरत असल्याने नाशिकची सिंह रास सर्वमान्य आहे. मकर संक्रांती लगेचच असल्याने रविचे मकर संक्रमण अभ्यासासाठी घेतले. रवि निरायन मकरेत १४ जाने. २०२२ ला दु. २:२९ ला प्रवेश करतो आहे. या वेळी नाशिकला वृषभ लग्न ८ अंश १२ कला ३८ विकला वर उदित असणार आहे. नाशिकची सिंह रास असल्याने मकर संक्रमणाचे गोचर घेवून अभ्यास करायचे निश्चित केले. १४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी पर्यंतचा काल आपल्याला या वरून बघता येईल.

मंगळ १६ जाने. २०२२ पर्यंतच चतुर्थात असणार आहे. मंगळ केतू चतुर्थात असल्याने जमिनीचे वादविवाद/भांडणतंटे या काळात वाढण्याची शक्यता आहे. भूमी, वाहन, पाणी या वरून वादविवाद किंवा काही हिंसक घटना, स्फोटक घटना घडण्याची शक्यता आहे. आग, तोडफोड, गॅस सिलेंडरचा स्फोट इ. सारख्या घटनेमुळे नुकसान संभवते. पिकपाणी हातातून जाण्याचा संभव असेल. पंचमात शुक्र असल्याने या काळात नाशिक मध्ये मुलींचा जन्मदर वाढण्याचा संभव असेल. पंचमात शुक्र पाप मध्यात आल्याने हि धोक्याच सुचना आहे. कोरानाच्या पार्श्वभूमीवर विचार करता तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका संभवतो. १४ जाने. ते १२ फेब्रु. २०२२ हा कालावधी नाशिकच्या दृष्टीने संवेदनशील राहील.

षष्ठात रवी शनि बुध प्लूटो हे चार ग्रह आहेत. त्यामुळे नाशिक मधील राजकारणातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. एखाद्या नेत्याच्या विरोधात वातावरण निर्माण होऊ शकते. सरकारी तिजोरीवर ताण येवू शकतो. एखादा घोटाळा उजेडात येण्याची शक्यता आहे. सप्तमात गुरु आल्याने व्यापारी वर्गाला चांगले दिवस असतील. पराकीयां बद्दल जनतेच्या मनात सौदार्ह्यपूर्ण भावना असतील. दुध, अन्न, भाजीपाल यात भेसळीचे प्रमाण वाढण्याची शक्यता. दुषित, विषारी अन्ना मुळे मुले बाधित होऊ शकतात.

विद्यामान नाशिक महानगर पालिकेचा कार्यकाळ संपत आला आहे व फेब्रुवारी मध्ये निवडणुका होत्या.  १२ फेब्रुवारीच्या आत निवडणुका झाल्यास विद्यामान सत्ताधारी पक्षाला नुकसान होण्याचा संभव असेल. महापौर पद भूषविण्याची संधी पुन्हा एकदा महिलेला मिळू शकते. विरोधी पक्षाला फुटीचा सामना करावा लागू शकतो.

पुढील लेख:- दिल्ली टू गोवा.


1 टिप्पणी:

  1. १)२५/०१/२०२२ दु २:३० म्हसरूळ येथे काकासाहेब देवधर कॉलेज परिसरात शालेय वाहतूक करणाऱ्या चालू व्हॅनला आग लागल्याची घटना घडली. म्हसरूळ हद्दीत काकासाहेब देवधर कॉलेज समोर स्कूल व्हँन क्रमांक एम एच 15 जी व्ही7667 ही व्हॅन पाच मुलं आणि एक महिला घेऊन जात असताना अचानक गाडीत फायर अलार्म वाजू लागला. गाडी चालकाच्या प्रसंगावधानाने सर्व विद्यार्थी सुखरूप असून कुणालाही इजा झालेली नाही. फायर ब्रिगेड च्या गाडीने येऊन आग विझवली आहे स्कूल व्हँनचे जळून नुकसान झाले आहे. https://youtu.be/4oJ2zfkpqK8
    २) नाशिक महानगरपालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळला आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २५/०१/२०२२ रात्री १०:०० वा. सुमारास घडल्याचे समजते. https://youtu.be/kKnq1CDvcNY
    ३) नाशिकच्या केटीएचएम कॉलेजसमोर बुधवारी रात्री अपघात झाला. या अपघातात 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी मध्यरात्री (27 जानेवारी) तो घरी जात होता. रात्री दीड वाजेच्या सुमारास जुन्या गंगापूर नाक्याकडून अशोक स्तंभाकडे आपल्या स्वतःच्या मोटरसायकलने (एम एच 15 एक जी 9625) जात असताना गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालया समोरील डिव्हायडर वर स्वतः धडक दिल्याने त्याच अपघात झाला.
    ४) ०४/०२/२०२२ नाशिकमध्ये SMBT मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या बसचा चालकाचा ताबा सुटल्याने पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात २५ ते २५ विद्यार्थी जखमी झाले आहे. ५ ते ६ जास्त गंभीर झाले.
    https://youtu.be/hWt92iihZsU
    ५)३१/०१/२०२२ विवाह समारंभ आटोपून नाशिककडे परतणाऱ्या आयशर ट्रकला दुसऱ्या आयशर ट्रकने धडक दिली. वैजापूर तालुक्यातील शिवराई फाट्याजवळ पहाटे 3 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून २२ पेक्षा अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक एमआयडीसी अंबड येथील वऱ्हाड जालना जिल्ह्यातील अंबड येथे लग्नाला गेले होते.
    ६) नाशिकच्या जेल रोड परिसरात एका तरुणीचा गॅस गळतीमुळे मृत्यू झाला आहे. बाथरूम मधील गॅस गिझर मधून गॅस गळती झाल्याने या तरुणीचा गुदमरून मृत्यू झाला आहे. साक्षी अनिल जाधव (वय 22 वर्ष) असे मृत तरुणीचे नाव आहे.
    https://youtu.be/w-qnymqRuEw
    ७) २५/०१/२०२२ - नाशिक महानगर पालिकेत म्हाडा भूखंडाचा एक हजार कोटीचा घोटाळा. मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पातील (4 हजार चौरस फुटापेक्षा जास्त बांधकाम) 20 टक्के घरे हे आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असतात. मात्र, नाशिकमध्ये असे अनेक बिल्डरांनी केलेच नाही. अशा बिल्डरांवर महापालिकेने ‘एनओसी’ अर्थातच ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे, https://youtu.be/K4kxtYeyLSQ
    ८) ०५/०२/२०२२ शिवशाही बस उड्डाणपुलाच्या पोलवर आदळून अपघात; एकाचा मृत्यू- सहा जखमी. अधिक माहिती अशी की, आज दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शिवशाही बस नाशिकहून औरंगाबादकडे निघाली होती. या दरम्यान औरंगाबाद नाक्यावर बस आली असता बस उड्डाण पुलाखालील पोल नंबर 44 वर आदळली. तर या अपघातात रस्त्यावरील एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
    https://youtu.be/frtfBhxa_Tw

    ९) ०२/०२/२०२२ - नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहती मधील कॅपॅसिटरचे उत्पादन करणारी निलराज इंडस्ट्रीज या कंपनीला भीषण आग लागली होती. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. बुधवारी (दि.२) पहाटे ५ ते ५: ३० वाजेच्या दरम्यान सदर कंपनीला आग लागली होती.
    https://youtu.be/Ls831RztMzY
    ०३/०२/२०२२ - नाशिकमधील वाडीवऱ्हेमधल्या केमिकल कंपनीला आग.
    https://youtu.be/jGvw_kVJt18

    १०) ११/०२/२०२२ - नाशिकहून नंदुरबारला जाणाऱ्या MH15BL3445 ह्या बसने एक 21 वर्षीय विद्यार्थिनीला चिरडल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच सीबीएसच्या सिग्नल वर ही दुर्दैवी घटना घडली आहे. रस्ता ओलांडत असतांना या विद्यार्थिनीला एसटी बसने चिरडलं.

    उत्तर द्याहटवा