||श्री||
नक्षत्र शंका
ज्योतिष
समुहातील एका ज्योतिष अभ्यासक मित्राने प्रश्न टाकला होता.
नमस्कार !
कर्क राशीतले बुधाचे आश्लेषा नक्षत्र हे तीक्ष्ण का म्हणतात ?
वास्तविक गुरू, शुक्र, बुध, चंद्र हे ग्रह तर शुभ ग्रह आहेत. शनी महातम्यातले प्रत्येक
ग्रहाच्या ओव्या तर त्या ग्रहांच्या गुणधर्माला यथार्थ लागू पडतात ....
कृपया शंका समाधान करावे,
ही विनंती.
समुहातील
अभ्यासकांनी काही मते मांडली. मी त्यावर दोनचार ओळी खर्डू म्हटले पण लिहितांना डोक्यातील
टिकटिक वाढत गेली आणि लेख तयार झाला. आता तीनचार परिच्छेद झाले म्हणून लेख
म्हणायचे, नाहीतर विचारचक्र कळलेखनबद्ध झाले एवढेच.
नक्षत्रांची नाडी आणि स्वामी हे दोन घटकच आवर्ती आहेत बाकीचे घटक तसे नाहीत.
आश्लेषाची देवता सर्प म्हणून ते तीक्ष्ण तर आर्द्रा, ज्येष्ठा, मूळ हि नक्षत्रे सुद्धा तीक्ष्ण आहेत पण सर्वांची देवता एकच नाही. आर्द्रा ची
देवता शंकर आहे जी उग्र देवता आहे परंतु नक्षत्र तीक्ष्ण आहे. (भरणी, मघा, पूर्वा,
पूर्वाषाढ, पूर्वभाद्रपदा हि उग्र नक्षत्रे आहेत.) बुधाचेच ज्येष्ठा नक्षत्राची देवता इंद्र आहे तर
मूळ नक्षत्राची देवता निऋती आहे. निऋती हि मृत्यू, शोक यांची देवता आहे जिचे वाहन
कावळा आहे. शंकर, निऋती यांचा तीक्ष्णतेशी संबंध समजू शकतो पण इंद्र जो पर्जन्याची देवता आहे
आणि ज्येष्ठा हे पृथ्वी तत्वाचे नक्षत्र आहे. पर्जन्याची जी नक्षत्रे आहेत
त्यापैकी कोणाचीही देवता इंद्र नाही, अगदी त्यातील जलतत्वाच्या नक्षत्रांपैकीही? तीक्ष्णचा इथे अर्थ दारुण असा घेतला
जातो म्हणजेच वाईट. हि नक्षत्रे व्यभिचार, भांडणे, घात, पशुहत्या, भयंकर कृत्ये यांच्या साठी विचारात घेतात. आश्विनी, पुष्य, हस्त आणि अभिजित हि क्षिप्र संज्ञाक नक्षत्रे आहेत. क्षिप्र म्हणजे लहान मग
अवकाशात यांची व्याप्ती कमी आहे का? हे पहावे लागेल. ग्रहांना
नक्षत्रांचे स्वामित्व दिले आहे ते गुण, लक्षणे यांच्या साधर्म्या नुसार
नाही. असा विचार करून स्वामित्व ठरवले गेले असते तर बुध ज्याचे दुसरे नावच सौम्य
आहे त्याला मृग, चित्रा, अनुराधा, रेवती या मृद संज्ञाक नक्षत्रांचे स्वामित्व द्यायला हवे होते.
ग्रहांना राशी वाटपाची एक संकल्पना आहे तशी नक्षत्र वाटपाची दिसून येत नाही.
अवकहडा चक्र जे कृत्तिके पासून सुरु होते. कृत्तिका हे रविचे नक्षत्र आहे जो
ग्रहांचा राजा आहे त्याला पहिला मान दिला. त्यानंतर चंद्र जो राजग्रह आहे त्याचे
रोहिणी नक्षत्र. पुराणात जरी चंद्र हा पुरुष आहे तरी ज्योतिषात तो स्त्री ग्रह
आहे. पुराणात तर ब्रम्हाचे पुत्र प्रजापती दक्ष यांच्या २७ कन्या म्हणजे
ब्रम्हाच्या नाती या चंद्राला दिल्या आहेत ज्यांची नावे नक्षत्रांना दिली आहेत.
ज्यातील रोहिणी हि त्याची सर्वात प्रिय पत्नी आहे. पुराणानुसार सर्व नक्षत्रांचे
स्वामित्व चंद्रा कडे जाते. असो त्या नंतर सेनापती मंगळाला मृग नक्षत्र इथपर्यंत
जमते पण त्या नंतर देवगुरु बृहस्पती यायला हवे होते किंवा युवराज बुध पण मधेच राहू
आहे. युवराज बुधा अगोदर सेवक शनिला मानांकन दिले आहे. उतरंड काही जुळत नाही. दुसरे
असे कि अवकहडा नावात कृत्तिका ते आश्लेषा या सात नक्षत्रांचाच विचार केला आहे. नक्षत्र
आवर्तन सारणी तर नऊची आहे?
मग प्रश्न असा पडतो कि मूळ अवकहडा चक्राचे आवर्तन सातचे होते का? म्हणजे राहू केतू वगळून. अभिजित सह २८ नक्षत्राचे सात ग्रहात वाटप, प्रत्येकी ४ नक्षत्रे. नंतर कालांतराने राहू केतूलाही नक्षत्रप्रदेशाचे अधिपत्य देण्यासाठी पुनर्रचना केली गेली व अभिजित नामक नक्षत्रप्रदेश खालसा करून ९ चे विभाग केले गेले? राशी स्वामित्व व नक्षत्र स्वामित्व यांचा मेळ नाही. म्हणजे बघा रवी व गुरु वगळता बाकी ग्रहांच्या राशीत त्यांचे नक्षत्रच नाही. रविच्या सिंहेत त्याच्या उत्तरा नक्षत्राचे पहिले चरण तर गुरुच्या मीनेत त्याच्या पूर्वभाद्रपदाचे चवथे चरण आहे, एकच चरण आहे पूर्ण नक्षत्रही नाही. राशी या नंतर आल्या तर मग त्यांच्या राशी ठरवतांना स्वामित्व असलेल नक्षत्र पूर्ण येईल अशी किमान एकतरी राशी त्या ग्रहाच्या पदरात टाकणे स्वाभाविक असतांना तसे का झाले नसावे? निदान ग्रहाला मुलत्रिकोण राशी दिल्या त्यावेळी तरी त्यांच्या स्वनक्षत्राचा विचार का केला गेला नाही? अपवाद चंद्र वगळता बाकी ग्रहांच्या स्वराशी पैकीच मुलत्रीकोन राशी आहे. चंद्राची मुलत्रिकोण राशी वृषभ आहे ज्यात त्याचे रोहिणी नक्षत्र पूर्ण आहे. रविच्या सिंह राशीत त्याच्या उत्तरा नक्षत्राचे पहिले चरण आहे व सिंहच त्याची मुलत्रिकोण राशीही आहे. गुरुच्या मीन राशीत त्याच्या पुर्वाभाद्रपदा नक्षत्राचे शेवटचे म्हणजे चौथे चरण आहे तरीही त्याची मुलत्रिकोण राशी आहे धनु आहे. एकट्या चंद्राचीच मूलत्रिकोण राशी स्वराशी नाही, रोहिणी त्याची प्राणप्रिय सखी असल्याने असेल असे.
पुराणात नक्षत्र हे परलोका (दिव्यलोक) पैकी एक लोक आहे, जसे देवलोक,
गंधर्वलोक, यमलोक तसे नक्षत्रलोक (शिवपुराण – श्री कार्तिकस्वामी जन्मकथा). जपानी संस्कृतीतही
नक्षत्रलोक, ग्रहलोक संकल्पना असल्याचे
मागे कधीतरी वाचले होते. सूर्य, ताऱ्यावर दिव्य सृष्टी असून इहलोकातील पुण्यकर्माच्या
स्वरूपा नुसार दिव्यदेह प्राप्त होऊन सूर्यादी ग्रह, तारे, नक्षत्र यांच्या वरील
नगरात नागरिकत्व मिळते. ह्या सृष्टी समकालात अस्तित्वात असूनही मर्त्य दृष्टी व
साधनांनी दिसत नाहीत. श्रेष्ठ योगी दिव्यदेह (सूक्ष्म देह) धारण करून या लोकात
फेरफटका मारू शकतात. हिंदू संस्कृतीतही हि संकल्पना आहेच. आजच्या भाषेत बोलायचे
झाले तर हि जी नक्षत्रे आहेत त्यातील एखाद्या ताराकुलात (सूर्य कुळात) पृथ्वी
सदृश्य ग्रहावर जीवन असावे. त्या जीवन समुहाचे जे गुणधर्म, लक्षणे असतील व्यवहारगुण
असतील साधारण तशी गुणधर्मे नक्षत्रांना दिली असतील तर? चिंतक, तत्ववेत्ते हेच काय
बालमन सुद्धा काही कल्पना रचत असतात. मामा बनवलेल्या चंद्राला बालमन गुरुजही
बनवते. या थोडा फेरफटका मारून लहानपणात "या वाऱ्याच्या बसुनी विमानी....", लिंक खाली देतच आहे.
.png)
माननीय सुंदर लिहल पण उत्तर कुठे दिली आहेत? लेख आवडला माझ्या ही मनात यातले काही प्रश्न होते
उत्तर द्याहटवा"गुण साधर्म्या मुळे ग्रह व नक्षत्र सांगड घातलेली नसावी. नक्षत्रांचे स्वत:चे स्वामी ग्रहा पासून वेगळे असे गुणधर्म असू शकतात." असे सार काढावे लागेल.
हटवा