शनिवार, १९ ऑगस्ट, २०२३

पूर्व संचित - १

 

||श्री||

मागील लेख :- जन्मवेळ निश्चिती – २

पूर्व संचित – १



बहिणीने २ वर्षा पुर्वी नवीन घर घेतले. तिथे आल्या पासून तिच्या मुलांना काहीना काही समस्या आहेत.

मुलगा - १९/११/२०१४, ९:००, जगतपूर, राणीगंज, प्रतापगड, उ.प्र. 25°44'46.6"N 82°11'14.7"E

नोव्हें./डिसे. २०२२ मध्ये ब्लड कॅन्सरचे निदान झाले.


१०/०८/२०२३, १३:१२ è प्रश्न कुंडली वरून लगेचच त्यांना उत्तर दिले होते. आज अभ्यासाठी या मुलाची कुंडली घेतली आहे. आताचे शासक ग्रह आहेत L मं(रा), S चं, R शु(के), D गु.

षष्ठाचा सब राहू मंगळाचा प्रतिनिधी म्हणून शासक ग्रहात आहे तर खरा त्यामुळे सब राहू बरोबर आहे. पण जन्मस्थान उत्तरप्रदेशातील दूर खेडयात असून तिथे आजही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे शंका होती. तसेही मागचा मंगळ व पुढचा गुरु हे वक्री ग्रहाच्या नक्षत्रात आहेत. षष्ठ भाव वृषभेत १३/१८/४४ वर चंद्राच्या नक्षत्रात व राहुच्या सब मध्ये आहे. शासक ग्रहात चंद्र असल्याने अगोदरचा ग्रह सब घेण्याचा संकेत आहे. मंगळ तर वक्रीग्रहाच्या नक्षत्री आहे, त्या अगोदरचा चंद्र पण तो शासकग्रहात दोनदा नसल्याने त्याचा विचार करता येणार नाही. त्या अगोदर मग रविच्या नक्षत्रात बघावे लागेल, पण रवि शासकग्रहात नाही. त्यामुळे षष्ठाचा सब राहू बरोबर आहे हे मान्य करूया.

लग्नेश गुरु अष्टमात मारकेश, बाधकेश, परमशत्रू बुधाच्या नक्षत्री. राशीस्वामी कन्येचा चंद्र दशमात स्वनक्षत्री असला तरी राहू युतीत. कृष्ण दशमी ते शुद्ध पंचमीचा चंद्र बलहीन असतो येथे चंद्र कृष्ण व्दादशीचा आहे. त्यामुळे लग्नेश उच्चीचा असला तरी फारसा बलवान नाही. बालारिष्ट योगाला पूरक योग आहे हा. सर्वसाधारनपणे लग्नेश अष्टमात असता दीर्घायू योग मानला जातो पण तेथे तो कोणत्या परिस्थितीत आहे ते पहावे लागते. सहा ग्रह नवम ते व्दादश भावत आहेत हा अल्पायु योग ( ८ ते ३२ वर्षे) झाला. लग्नेशा पेक्षा अष्टमेश बलवान हा अल्पायुला पूरक योग झाला. जातकाचे वय ८ वर्षे ८ मास आहे. म्हणजे नेमके जातकाने बालारीष्ट ची मर्यादा ओलांडून अल्पायु कक्षेत नुकताच प्रवेश केला आहे. अल्पायु योगात घातक ठरणारी विपत दशा (येथे राहू दशा) जातकाला वयाच्या ७ वर्षे ८ मासा नंतर म्हणजे ०७/०८/२०२२ ला चालू झाली व जातकाला त्या नंतर ३/४ महिन्यातच रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. राहू महादशेत राहू अंतर्दशा १९/०४/२०२५ पर्यंत आहे. तर राहू विदशा ०२/०१/२०२३ पर्यंत होती ज्यात जातकाला कर्करोगाचे निदान झाले. राहू, शनि, केतू च्या दशा जातकाला घातक आहेत. राहू म.द. शनि अ.द. केतू विदशा जी २१/०७ ते २०/९/२०२८ दरम्यान असणार आहे तो काळ घातक ठरू शकतो.



लग्नेश अष्टमात, अष्टमेश दशमात, दशमेश लाभात, लाभेश व्ययात, व्ययेश लग्नी हा मालायोग झाला. यात ८,१२ स्थाने आल्याने व लाभेश शुक्र हा षष्ठेशही असल्याने हा योग ६,,१२ शी संबंधित व मारकेश शनि, बुधाशी संबंधित झाल्याने हा माला योग प्रतिकूल, कष्टदायक फळे निर्माण करतो आहे. साधारण माला योग खूप शुभ व दुर्मिळ मानला जातो. येथे मालायोग पापसंबंधी आहे व लग्नेश तितकासा बलवान नाही. बहुसंख्येने ग्रह दृश्यगोलार्धात आले आहेत त्यामुळे प्रभावी परिणाम देणारे आहेत.


लग्नेश त्रिकस्थानात निर्बली असता काही तारक योग आहेत. त्यापैकी एक म्हणजे धनु लग्नाला कर्केचा गुरु हा उच्च असल्याने तारक योग पण या बाबतीत आपण वरती पाहिले आहे. दुसरे म्हणजे लग्नेश त्रिकस्थानात त्रिकस्थानेशाने दृष्ट अथवा त्रिकस्थानात त्रिकस्थानेशाने युक्त असता तारक योग होतो. पण येथे हाच योग रक्ताच्या कर्करोगाला कारक ठरला आहे
, कसे ते पाहू. लग्नेश गुरु अष्टमात कर्केचा आहे, बरोबर. गुरु कर्करोगाचा एक कारक आहे व कर्करोगाची कारक मानल्या गेलेली रास कर्केत आहे. हा योग अष्टमात आल्याने कर्करोगाने मृत्यू संभवतो. मंगळ हा रक्ताचा कारक ग्रह त्याची अष्टम घातक दृष्टी गुरुवर. मंगळ व्ययत्रिकस्थानेश आहे. म्हणजे लग्नेश गुरु अष्टमात व्ययेश मंगळाने दृष्ट हा तारक योग होऊनही कारकत्वाने रक्ताचा कर्करोग झाला. वास्तविक कुंडलीत तारक योग आहेत पण कारकत्वाची फले मिळाली, का? योगा मुळेचे. एका योगा पेक्षा दुसरा योग बलवान ठरला, कोणता ? अभागी योग.

भाग्येश ६/८/१२ स्थानी असता अभागी योग होतो. जो या कुंडलीत झाला आहे, भाग्येश रवी व्ययात. त्यात हा रवी व्ययात अष्टमातील गुरुच्या नक्षत्री आहे. म्हणजे गुंफण बघा कशी झाली आहे. एकतर लग्नेश अष्टमात फक्त दिसायलाच बलवान. या बाबत वरती लिहिले आहेच. त्यात अभागी योग. रवी हा आरोग्य कारक, आत्मतेज कारक ग्रह तोच अभागी ठरला. शिवाय रवि त्याच्या मृत्यूस्थानी आहे. चर आत्माकारक गुरु आहे. नै.आत्माकारक हा चर आत्माकारकाच्या नक्षत्री व दोघेही त्रिक स्थानी.  दशमेश बुध लाभात मित्र राशीत आहे हा चांगला योग आहे पण बुधाचा राशीस्वामी शुक्र व्ययात अस्तंगत तर त्याचा नक्षत्रस्वामी गुरु अष्टमात. म्हणजे १,,१० चे स्वामी त्रिकस्थानाशी संबंधित झाले तर दुसरी कडे त्रिकस्थानेशा पैकी व्ययेश मंगळ मित्र राशीत षष्ठेश शुक्राच्या नक्षत्री, अष्टमेश चंद्र मित्र राशीत स्वनक्षत्री. १,,१० व ६,,१२ पैकी कोण बलवान हे ठरवणे जरा क्लिष्ट होतेय पण त्रिकस्थानांशी संबंधित होत असल्याने दु:खे, त्रास, अडचणी भोगाव्या लागतात. हे एवढ्यावरच संपत नाही तर सर्व सुखाचे आगर चतुर्थस्थान हि दुषित. येथे केतू बाधकेश बुधाच्या नक्षत्री. चतुर्थेश गुरूच आहे त्यामुळे भाव व भावेश दोन्ही बिघडले आहेत. वैराग्य, मोक्षकारक केतू इथे काय सुख देणार? देणार ना सुख, पण त्या सुखाच्या दाना साठी झोळी वेगळी लागते.

सुख स्थान हे मोक्षस्थानही आहे त्यामुळे वर चर्चेलेली ग्रह स्थिती बालारीष्ट/अल्पायु योगाला बळकट करते आहे. मोक्ष त्रिकोणाचे स्वामी मोक्षत्रिकोणाशी संबंधित आहेत. चतुर्थेश अष्टमात, व्ययेशाची चतुर्थावर व अष्टमावर दृष्टी. अष्टमेशाची चतुर्थावर दृष्टी. चतुर्थेशाची चतुर्थावर, व्ययावर दृष्टी. या पैकी चंद्र, मंगळाची दिप्तांश दृष्टी चतुर्थावर आहे. येनकेन प्रकारे ४,,१२ चा ४ शी संबंध केंद्रित झाला आहे. हा योग अध्यात्म सुख, मोक्ष ला चांगला आहे असे म्हणू शकतो. एखादाच नचिकेता, एखादेच आद्य शंकराचार्य युगा युगात होतात आणि आता सन्यासाश्रमही तसा राहिला नाही म्हणा. भाबडेपणाने असे वाटते कि या मुलाला सन्यासधर्माची दिक्षा दिली, एखाद्या योग्य गुरुच्या पायावर घातले तर अष्टमातील गुरु दिर्घायुष्य देईल. हे सांगावे तरी कसे म्हणा. आणि आता उशीर झाला आहे. आईचा मोहबंध सुटेल? मातेचा कारक चंद्र हा राहू युतीत आहे व त्याची चतुर्थावर दृष्टी आहे. अध्यात्मात प्रगती होईल? फक्त पंचमेश लग्नी या योगावर? कारक व नवमेश रवि बलहीन, गुरु अष्टमात, शनि व्ययात आहे पण अस्तंगत, कसे जमनार? पंचमेश व्ययेश मंगळाची कंटकस्थ केतूवर अंशात्मक दृष्टी, निवृत्तीपर त्रिकोणातील उच्च गुरूची केतूवर दिप्तांश दृष्टी निवृत्तीयोगास पुष्टी देतो आहे. अष्टमेश चंद्राची केतूवर अंशात्मक दृष्टी. चतुर्थस्थ केतू मोक्षकारक असतो त्यात इथे अष्टम, व्ययाचा संबंध. पूर्वजन्माचे तीव्र देहक्लेश लवकारात लवकर भोगून इहलोक सोडायचे पूर्वसाकृत घेवूनच जातक आल्याचे हि कुंडली दर्शवित आहे. लग्नेश, रवि, चंद्र तिन्ही केंद्र दुषित आहेत. पौगांडावस्थेत ज्यांच्यात थिऑसॉफिकल सोसायटीने प्रगत आध्यात्मिक शक्ति पाहिली होती ते जे.कृष्णमूर्ती म्हणतात “लेडबिटरला (विख्यात गूढवादी व थिऑसॉफिकल सोसायटीचे नेते) लागलेला त्यांचा (कृष्णमूर्तींचा) शोध हि त्यांच्या आयुष्यातील क्रांतिकारक घटना होती; अन्यथा लवकरच त्यांचा मृत्यू ओढावला असता.” पुढे दीर्घायुष्य प्राप्त करत वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी देह ठेवला.

असो, या मुलाची रोगाशी झुंझ यशस्वी होवो, सर्वांच्या प्रयत्नाला व प्रार्थनेला यश येवून मुलाला निरोगी दीर्घायुष्य लाभो या शुभचिंतनासह हा लेख इथे संपवतो. धन्यवाद.

पुढील लेख:- अष्टोत्तरी दशा.

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा