||श्री||
मागील लेख :- चुकीला माफी नाही.
यंदा कर्तव्य आहे.
कुंडलीत सप्तमावर सर्वात बलवान प्रभाव
शनिचा असून मंगळदोषही आहे. त्यामुळे विवाह उशीर समजू शकतो. पण इतका उशीर? कारण शनि
तृतीयेश असल्याने २५ ते ३६ या वयोगटात विवाह व्हायला हवा. या गटात २८,२९,३० हि
वर्षे मिळत होती किंवा अजून उशीर म्हटले तरी ३२ वे वर्ष होतेच. २८ व्या वर्षी मंगळ
म.द. राहू अ.द. २७व २ मास पर्यंत होती. राहू अंतर्दशेतील रवि, चंद्र, मंगळ विदशा २८
व्या वर्षाच्या सुरवातीला होत्या व तिघेही अनुकूल कार्येश आहेत. चंद्र विदशा योग्य
होती. मंगळ २,११ चा कार्येश आहे व त्याची महादशा ३३ व्या वर्षा पर्यंत होती. शनि
केतू वगळता बाकी ग्रह अनुकूल स्थानांचे कार्येश आहेत. शनिची अंतर्दशा २९ व्या
वर्षी व ३० व्या वर्षातील ३ महिने होती. तर केतू अंतर्दशा ३१ व्या वर्षातील ५
महिने होती. शनि १/११/२०१४ ते २५/०१/२०१७ दरम्यान वृश्चिकेत होता. शनीचे हे गोचर जे
२८,२९ व्या वर्षी होते जे विवाह अनुकूल होते. यात ३० व्या वर्षातील सुरुवातीचा
साधारण दीड मास येतो. २२ जून ते २५ ऑक्टो. २०१७ मध्ये लगेचच वक्री शनि परत
वृश्चिकेत होता, म्हणजे साधारण ४ एक मास. ३० व्या वर्षातील ६ मास शनि अनुकूल होता.
तसा धनुचाही शनि विवाहानुकुल होता. म्हणजे २८,२९,३० व्या वर्षी विवाहास गोचर शनिची
अडचण नव्हती. पण शनि राशीला नव्हता. वृश्चिकेचा शनि पनौती होता. १८/०६/२०१४ ते
१३/०७/२०१५ गुरु कर्केत होता जो विवाहानुकुल होता. २८ व्या वर्षातील शेवटची ६
महिने व २९ व्या वर्षाची सुरवातीचे ७ महिने धरा. पण गुरुही राशीला नव्हता. सिंहेचा
गुरु काही अनुकूल नव्हता. ११/०८/२०१६ ते ११/०९/२०१७ दरम्यान गुरु कन्येत होता.
कन्येचा गुरु अनुकूल होता व राशिलाही बरा होता. तुळेचाही गुरु अनुकूल व राशीला
उत्तम होता. ०३/०३/२०१७ ते २८/०२/२०१८ मंगळ म.द. बुध अंतर्दशा होती. बुध २,७ चा
कार्येश आहे. ०३/०३/२०१७ ते २२/०६/२०१७ व २५/१०/२०१७ ते
०२/१२/२०१७ हे
३० व्या वर्षातील काळ विवाहानुकुल होते.
(जातक स्त्री - ०३/१२/१९८७, ०७:४५, सांगवी, ता- बारामती.)
पण विवाह काही झाला नाही. लग्नेश सप्तमेश
अंशात्मक लाभयोग आहे. अनुकूलता असूनही विवाह झाला नाही कारण प्रयत्न, जपजाप्य कमी
पडले असतील किंवा मानसिकता अडथळा ठरला असेल. चंद्र मंगळ समसप्तक, प्रभावी नसलेला
चांडाळयोग आहे. (ते काही असले तरी)पण आपल्याला यामागे ग्रहताऱ्यांचा अडथळा शोधायचा
आहे. कारण ३७ व्या वर्षी ज्या राहू म.द. गुरु अ.द. केतू विदशेत विवाह झाला ती
विदशा विवाहानुकुल नव्हती. राहू २,७, गुरु २ चा कार्येश असले तरी विरोधी भावही
आहेत. काहीजन ८ ला विवाह पूरक मानतात केतू त्याचा कार्येश आहे तेवढेच समाधान.
अन्यथा केतू १,६,१०,१२ या विरोधी भावांचा कार्येश आहे. पण विवाह झाला हे तर खरे. ज्यावेळी दशा गोचर अनुकूल होते त्या वेळी विवाह झाला नाही व
ज्यावेळी विदशा (खरे तर)अनुकूल नव्हती त्यावेळी विवाह झाला?
सर्वाष्टकात व्दितीयात, सप्तमात फक्त २१ बिंदू
आहेत. ३० व्या वर्षी जो काल विवाहानुकुल म्हणून काढला ज्यावेळी दशा गोचर अनुकूल
होते. त्यावेळी शनिचे धनुतून गोचर होते जे सप्तमेशावरून होते, तसे अनुकूल होते.
भिन्नाष्टकात शनिला येथे फक्त दोनच बिंदू आहेत जे कमी आहेत. गुरुचे कन्या, तुळेतून
भ्रमण होते. भिन्नाष्टकात दोन्हीतही गुरूला ५,५ बिंदू आहेत जे बरे आहेत. भिन्नाष्टकात
गुरु तर बलवान होता पण शनि नाही. ३७ व्या वर्षी ज्या वेळी विवाह झाला त्यावेळी शनि
कुंभेत तर गुरु वृषभेत होता. भिन्नाष्टकात कुंभेत शनीला ५ बिंदू आहेत तर वृषभेत
गुरूला ६ बिंदू आहेत. दोघेही बलवान गोचरीत होते.
मंगळ महादशेत विवाह झाला नाही कारण भिन्नाष्टकात
मंगळ स्थित राशीत त्याला केवळ २ च शुभबिंदू आहेत तर सप्तमात ३ बिंदू. गोचर शनि
धनुत होता. शनि भिन्नाष्टकात येथे दोनच बिंदू आहेत हे आपण पाहिले आहेच, पण
महादशानाथ मंगळाला भिन्नाष्टकात येथे १ च बिंदू आहे. गोचर गुरूला मंगळ भिन्नाष्टकात
कन्येत ५ बिंदू आहेत त्या मुळे प्रयत्नाने कदाचित या काळात विवाह होऊ शकला असता.
पुढे तुळेत मंगळ भिन्नाष्टकात २ च बिंदू आहेत.
महादशानाथ राहू गुरुच्या राशीत आहेत आणि सर्व
ग्रहात सप्तमात गुरु भिन्नाष्टकात सर्वाधिक बिंदू आहेत तेही ६ बिंदू म्हणजे उत्तम
आहे. दुसरे म्हणजे राहू भिन्नाष्टकात सप्तमात ५ बिंदू सह व्दितीय क्रमांकावर आहे. राहू
गुरु दोघेही पंचमात आहेत व येथे स्वभिन्नाष्टकात प्रत्येकी ४,४ बिंदू मध्यम आहेत.
गोचर शनि कुंभेत होता व भिन्नाष्टकात ५ बिंदू होते तर गोचर गुरु वृषभेत ६ बिंदूसह
होता. गोचर राहू मीनेत होता. विवाह राहू महादशेत गुरु भूक्तीत २४/०६/२०२४ रोजी झाला. विदशा केतूची
होती. केतूला भिन्नाष्टकात सप्तमात ३ बिंदू म्हणजे कमी होते पण गोचर केतूने हि कमी
भरून काढली. केतुला कन्येत ५ शुभबिंदू आहेत. केतू राशीस्वामी बुधालाही भिन्नाष्टकात
सप्तमात ३ तर कन्येत ५ बिंदू आहेत.
विवाह झाला त्या वेळी शनि कुंभेत २५
अंशावर होता. शनिला प्रस्ताराष्टकात गुरु, मंगळ, रवि, चंद्र, लग्न यांनी शुभबिंदू
दिले आहेत. गोचर शनि चंद्राच्या कक्षेतुन जात होता. गुरु वृषभेत १३ अंशावर होता म्हणजे
रविच्या कक्षेत. गुरु प्रस्ताराष्टकात शनि, बुध वगळता इतर सर्व ग्रहांनी शुभबिंदू
दिलेत. शनि व गुरु दोघेही शुभ कक्षेतुन जात होते.
३० व्या वर्षी शनि धनुत होता. धनुत
त्याला मंगळ व रवि बिंदू देत आहेत. २५ जाने. ते २९ मार्च २०१७ शनि धनुत स्वकक्षेत
होता. नंतर गुरुच्या कक्षेत असतांना तो ६ एप्रिलला वक्री झाला. २२ जूनला तो
वृश्चिकेत लग्नाच्या कक्षेत आला ते २५ ऑग.ला लग्न कक्षेतच तो मार्गी झाला. २५
ऑक्टो.ला तो परत धनुत स्वकक्षेत आला. वृश्चिकेत लग्नाने शनिला शुभबिंदू दिला आहे.
आपण दशे नुसार जो काल काढला ३ मार्च ते २२ जून त्या दरम्यान शनि धनुत स्वकक्षेत
होता. धनुत शनिने स्वत:ला शुभबिंदू दिलेला नाही. नंतर २५ ऑक्टो. ते २ डिसें.२०१७
दरम्यानचा दशाकाळ विवाह अनुकूल होता. या काळात शनि स्वकक्षेत व गुरु च्या कक्षेत
होता. त्या मुळे शुभ फले दिले नाहीत. २२ जून ते २५ ऑक्टो. २०१७ शनि शुभकक्षेत
होता. या दरम्यान गुरु २८ जुलै पर्यंत बुधाच्या, २२ ऑग. पर्यंत चंद्राच्या व नंतर ११ सप्टें. २०१७ पर्यंत लग्नाच्या
कक्षेत होता. कन्येत बुध आणि लग्नाने गुरूला शुभबिंदू दिलेले आहेत. म्हणजे गुरूची
चंद्र कक्षा वगळता या कालावधीत शनि व गुरु दोघेही शुभकक्षेत होते. पण हा दशाकाळ
अनुकूल नव्हता ना महाराजा. ग्रहगणिता आधारे एखादे भाकीत करणे ते हि अचूक इतके सोपे
नाही. खूप माथापच्ची करावी लागते, वेळ
द्यावा लागतो, संयम, एकाग्रतेचा कस लागतो. यावर परत धार्मिक, सामाजिक, भौगोलिक व प्रासंगिक घटक परिणाम करतात ते वेगळेच. ते हि अवधान
बाळगावे लागते.
या प्रकरणात असे दिसून येते कि आपण नुसत कर्तव्य आहे असे म्हणून होत नाही तर ग्रह गोचरीची NOC असल्या खेरीज कर्तव्य पार पडत नाही.
पुढील लेख लवकरच ....



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा