||श्री||
भाद्रपदातील श्री गौरी/महालक्ष्मी?
एका समुहावर श्री गौरी/महालक्ष्मी या
भाद्रपदातील त्रि दिवसीय उत्सवा बाबत एक शंका विचारली गेली होती. शंका साधारण अशी
होती कि “गौरी ला माप ओलांडून आत आणतात पण माप तर सासरी गेल्यावर ओलांडतात, गौरी
तर माहेरवाशीन असतात?” आता हे माप ओलांडण्याचा प्रकार (श्री गौरी/महालक्ष्मी) कुठे,
कधी पासून केला जातो या बाबत मला तर काही माहिती नाही. पण समुहात गौरी/महालक्ष्मी
या बाबतही काही मते व्यक्त केली गेली. यावर मी केलेला विचार पुढे देत आहे. निश्चित
असा निष्कर्ष काढता येत नाही.
श्री गौरी/महालक्ष्मी या बाबत संभ्रम
आहे. काही गौरी म्हणतात तर काही महालक्ष्मी म्हणतात. श्री पार्वतीचे एक नाव गौरी
आहे म्हणून काहीजण याचा संबंध पार्वतीशी जोडून श्री गणेशाला घेवून जाण्यासाठी
येतात असे म्हणतात. पण मग दोन मुर्त्या का? पार्वती
तर एकच आहे. शिवाय मग सर्वांकडेच मूळ नक्षत्री गौरी बरोबर गणेश विसर्जन व्हायला हवे. कारण गणेशाला घेवून जाण्यासाठी गौरी येते तर सोबत न्यायला हवे. तसे तर सार्वत्रिक होत नाहीये.
महालक्ष्मी नावावरून श्री विष्णू पत्नी श्री लक्ष्मीशी संबंध जोडला जातो. परत मग दोन मुर्त्या का? तर येथे असा तर्क दिला जातो कि लक्ष्मीची जेष्ठ बहिण अलक्ष्मी अश्या दोघी असतात. पण अलक्ष्मीची पूजा केली जात नाही. श्री विष्णूनी त्यांना दिलेल्या वरदानाची जी कथा मला माहित आहे त्या नुसार या सणाचा संबंध नाही. श्री विष्णूंनी अलक्ष्मीला फक्त रविवारी पिंपळवृक्षात वास करण्याचे वरदान दिले. त्या वारी श्री विष्णू पिंपळवृक्षात वास करत नाहीत. रविवारी जो पिंपळाची पूजा करेल त्याच्या घरी अलक्ष्मीला वास करण्याचे वरदान दिले. लक्ष्मी व अलक्ष्मी दोघी एकाच वेळी एका ठिकाणी वास करत नाही. त्यामुळे या महालक्ष्मी म्हणजे या दोघी बहिणी नसाव्यात. पण काहींचे असे म्हणणे पडले कि “अलक्ष्मीला ची कुणी पुजा करत नाही पण विष्णुने अलक्ष्मीला दिलेल्या वचनाप्रमाणे या वरील तीन नक्षत्रावर आगमन, पुजा व विसर्जन केले जाते. अलक्ष्मीला तीन च दिवस विष्णुने दिलेत. नंतर वर्षभर नाही.”
काहीजन तिसरे असे सांगतात कि या गौरी/महालक्ष्मी म्हणजे श्री गणेशाच्या बहिणी आहेत. पद्मपुराना नुसार श्री गणेशाला एका बहिण आहे जी त्यांच्या पेक्षा मोठी व श्री कुमारस्वामी पेक्षा लहान आहे. तिचे नाव 'अशोक सुंदरी' आहे. श्री गणेशांच्या अन्य दोन बहिणींचा उल्लेख मिळतो. ज्योती देवी व मनसा देवी. कार्तिकस्वामी, अशोक सुंदरी, अय्यपा, ज्योती देवी (ज्वालादेवी), मनसा देवी व गणेश असा श्रीशिव संतती क्रम काही ठिकाणी सांगितला जातो. आता या तिघींपैकी कोणत्या दोघींची तीन दिवस गौरी/महालक्ष्मी म्हणून पूजा केली जाते याचा काही संदर्भ अजून तरी मला मिळाल नाही.
अशोक सुंदरी देवीची उत्पत्ती हि माता पार्वतीने संकल्पाने केली आहे. कल्पवृक्षाजवळ मुलीचा संकल्प केला असे कथा सांगते. अशोक सुंदरी स्वर्गाधिपती नहुषाची पत्नी व राजा ययातीची तथा शंभर कन्यांची माता आहे. ज्योतीदेवीची (ज्वालादेवी) उत्पत्ती भगवान शिवाच्या तिसऱ्या नेत्रातील दिव्य प्रकाशातून झाली. ज्योतीदेवीचा विवाह श्री सुर्यनारायण व देवी सरण्यू यांचा पुत्र नात्स्य याच्याशी झाला व यांना ‘सत्यवीर’ नावाचा पुत्र आहे. मनसादेवीचा जन्म भगवान शिवाच्या मस्तकातून झाला म्हणून मनसा नाव पडले तर कोणत्याही विषा पेक्षा या विषारी असल्याने ब्रम्हाने त्यांना विषहरी नाव दिले. मनसा देवीचा विवाह महर्षी जरत्कारूशी झाला व त्या ‘आस्तिक’ च्या माता आहेत. या आस्तिकानेच जनमेजयाच्या सर्पसत्रातून नागवंश वाचवला होता.
वरील तिन्ही तर्कापेक्षा मला असे वाटते
कि कदाचित या महालक्ष्मी म्हणजे श्री गणेशाच्या दोन्ही पत्नी रिद्धी, सिद्धी तर
नव्हे? पण मग क्वचितच काही ठिकाणी एकच मूर्ती पुजली जाते त्याच कसे करावे? बर या विचारला पुष्टी साठी काही पौराणिक संदर्भ मिळत नाहीये. बघू या
अजून काही संदर्भ कुणा कडून येतोय का ते. या उत्सवाचे मुहूर्तासाठी खालील लिंक वर
जावे. धन्यवाद.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा