सोमवार, २५ मार्च, २०२४

बघ माझी आठवण येते का? भाग- २

 

||श्री||

मागील लेख :- बघ माझी आठवण येते का? भाग-१.


बघ माझी आठवण येते का? भाग- २




“जा सिमरन जी ले अपनी जिंदगी|” अस म्हणणारा प्रियेशीचा बाप सगळ्यांच्याच नशिबी नसतो. केवळ एका व्यक्ती मुळे दोन प्रेमी जीवांची कायमची ताटातुट झाली. 

शशीने त्याची जी प्रेमकथा सांगितली त्यावरून असे वाटते कि ज्युलीचे शशी वर खरे प्रेम असावे कारण तिने केवळ स्वत:च्या किंवा शशीच्या प्रेमाचा, भावनांचा, जीवाचा विचार न करता त्याच्या कुटुंबीयांवरही आपल्यामुळे काही संकट न येवो म्हणून प्रेमाचा त्याग प्रेमा पोटी केला. प्रेमभंगाचे दुख:, नैराश्य आपण समजू शकतो. ३० व्या वर्षी सुरु झालेली प्रेम कहाणी ३२ व्या वर्षी समाप्त झाली, हि प्रेम कहाणी काही टीन एजर वयातली नाही कि काही अविचार केला किंवा भावनिक असंतुलन व्हावे. प्रेम असफल झाल्यावर शशीने घेतलेली भूमिका खेदजनक आहे. आजच्या काळात परो पारोचा घोष करत देवदास बनून फिरण्याची कोणीही अपेक्षा निश्चितच करणार नाही. त्यामुळे कालांतराने घरच्यांच्या समजावणी नंतर जातकाने विवाहाचा घेतलेला निर्णय स्वागताहार्यच होता. दुर्दैवाने तो ठरलेला विवाहही संपन्न होऊ शकला नाही. पण या पेक्षा दुखद शेवटच्या भेटीच्या वेळी शशीने ज्युलीशी व्यक्त केलेली त्याची आंतरिक भावना. आपले प्रेम सफल झाले नाही, तू साथ देत नाही पण आपण या पुढे निदान केवळ चांगले मित्र राहूया अशी भावना व्यक्त केली असती तर काही गैर वाटले नसतेही कदाचित. “कोई जब तुम्हारा हृदय तोड दे, तडपता हुआ जब कोई छोड दे, तब तुम मेरे पास आना प्रिये, मेरा दर खुला है खुला हि रहेगा तुम्हारे लिये|” असे खात्री वजा अश्वासन दिले असते तर ते एक वेळ भावनेच्या भरात समजू शकलो असतो. पण हे हि तसे योग्य नाही. विफल प्रेमा नंतर तुम्ही कुणाशी संसार थाटणार आहात आणि दार अश्या प्रेमी साठी खुले ठेवाणार आहात जी तुमचे प्रेम नाकारून गेली आहे. यात तुमच्या संसाराचा गाडा ओढणाऱ्या त्या दुसऱ्या चाकाचा काय दोष? तिच्याशी प्रतारणा का? का तिचा विश्वासघात?
 
असो आपण आपल्या विषया कडे परतू या. शेवटच्या भेटीत शशीने जे व्यक्त केले ते खेद जनक होते ते म्हणजे जातकाने प्रेम संबंध अबाधित ठेवण्या विषयी विचारले स्पष्ट म्हणजे विवाहबाह्य संबंधाची अपेक्षा जातक मनी धरून होता आणि आहे. ज्युलीला मैत्री टिकवायची होती पण शशीने गैरसमजाने म्हणा किंवा उद्विग्नतेने म्हणा किंवा वैफल्यग्रस्ततेने म्हणा त्याचा चुकीचा अर्थ काढला. मग ती भेट शेवटची ठरण्यात आणि नंतर शशीने ज्युलीशी संपर्क करण्याच्या प्रयत्नांना तिने प्रतिसाद न देणे हे तिने बरोबरच केले. प्रेमातही तिने मर्यादा ओलांडली नव्हती आणि आताही मना विरुद्ध का होईना स्वीकारलेल्या जोडीदाराशी प्रतारणा केली नाही. शशीही त्याचे स्वत:चे ब्रम्हचर्य अजून भंग न झाल्याची खात्री देतो आहे. आपले प्रेम आपल्याला मिळत नाही म्हटल्यावर अशी वासना, विकृती जातकाच्या मनात का आली? मनकारक चंद्राचा राहूशी असलेला संबंध. तुळेचा चंद्र राहुच्या नक्षत्री आहे. त्यामुळे नीती/अनीती, नैतिक/अनैतिक, कायदे/बेकायदे कसे हि पण मला मिळावे हि भावना निर्माण झाली. त्यात व्ययातील मंगळाच्या राशीतील शुक्र, लाभातील नीचेचा रवी यांची भर. प्रेमात शुचिता पाळली पण प्रेमभंग झाल्यावर प्रेमातील उदात्तता का गेली? कारण आत्मबल, निग्रह कमी पडला कारक रवि निच असल्याने.   

शशीच्या या विचारांमुळे म्हणा किंवा नशीब म्हणा पण पुन्हा एकदा जातकाचा हिरमोड झाला. प्रेमाच्या विफलते नंतर साधारण १० महिन्यांनी म्हणजे २२/०१/२०२३ च्या आसपास ३३ व्या वर्षी शशीचा विवाह ठरला, ज्याचा उल्लेख वरती केला आहे. या वेळी शनि म.द. चंद्र भुक्ती शुक्र विदशा ११/१२/२०२२ ते १७/०३/२०२३ दरम्यान होती. यांचे कार्येशत्व आपण पाहिले आहेच, मिश्र कार्येशत्व आहे. त्यामुळे ज्या दिशेने प्रयत्न झाले तसे फळ मिळाले. (अजून सुक्ष्म पहायचे असेल तर राहू सुक्ष्मदशा १४ ते २९ जाने. दरम्यान होती.) १२/०६/२०२३ हा शनि म.द. मंगळ अ.द. राहू विदाशेतील (९ मे ते ९ जुलै २०२३) मुहूर्त ठरला. मंगळाचे हि ,५,,१०,११ असे मिश्र कार्येशत्व आहे, तसेच राहूचे ,२,५,,१०,११. मुहूर्त गाठण्या अगोदरच विघ्न आले. 

याच राहुच्या विदशेत २२ मे ला शशीच्या वधूचा त्याला फोन आला कि “तू वेगळे घर घे, आपण स्वतंत्र राहू नाहीतर मी एका वर्षात घटस्फोट घेईल.” अरे हे काय वागण झाले? पसंती देण्या आगोदर तुम्ही एकमेकांना भेटला होतात तेव्हाच हे का बोलली नाही कि मी एकत्र कुटुंबात राहणार नाही. विवाह ठरवून गोष्टी इतक्या पुढे गेल्यावर हि मुलगी असे बोलते आहे. अजून लग्नघटीपात्र भरले नाही तोच घटस्फोटाच्या धमक्या? लग्नाला होकार देण्यापूर्वी भेटीत तू तुझ्या आपेक्षा का सांगितल्या नाहीत कि या मुलीला दुसरे एखादे उजवे स्थळ आले ज्याचा हिला लोभ सुटला. २७/२८ मे ला बैठक होऊन या वर पडदा पडला खरा व ठरल्या प्रमाणे विवाह पार पाडायचे ठरले पण परत एकदा अपमान नाट्याने डोके वर काढले. 

या वेळीही वधूचे पिताच कारणीभूत झाले. २ जूनला विवाहविधी विषयी विहिणी विहिणीचे फोन वर बोलणे चालू असतांना होणारे सासरे काही तरी अपमानजनक बोलून गेले आणि ३ जून ला जातकाने शेवटी ९ दिवसांवर आलेला विवाह एकदाचा मोडला. दशानाथांचे मिश्र कार्येशत्व दोन्ही अनुभवाला आले. प्रयत्न अनुकूलते साठी असतांना विरोधी कार्येशत्व कार्यरत कसे झाले? याला कारण जातकाच्या मनात असलेली वासना, विकृती तर कारणीभूत नाही झाली? शशीला आता असे वाटते कि माझे प्रेम मला परत मिळणार असावे म्हणून नियतीने हा विवाह मोडला. तिचा संसार कसा चालू आहे? तिला काही मुलबाळ आहे का? याविषयी शशीला काहीच माहित नाही असे तो म्हणत होता. ज्युलीच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत. त्या वेळी बाकी सर्व पाठींबा देत असतांना एका व्यक्तीचा विरोध मोडून विवाह करू शकले नाही. ती त्या वेळी दोन्ही कुटुंबाचा पाठींबा असतांना वडिलांचा दबाव, दहशतीवर मात करू शकली नाही आणि आता जातक हि अभिलाषा बाळगतो आहे कि ती माझ्या जीवनात परत येईल. तिचा घटस्फोट वगैरे होण्याची काही शक्यता आहे का? हे अनैतिक आहे. यात काहीच दोष नसलेला तिचा पती, जर संतती असेल तर ती यांची होरपळ का करायची? तिच्या वैवाहिक जीवनात काही समस्या यावी आणि तिने माझ्या कडे परत यावे किंवा विवाहबाह्य संबंध ठेवावे अशी कल्पना देखील करणे हे निर्मळ प्रेमाचे लक्षण खचित नाही. टिव्ह, ओ.टी.टी. प्लॅटफॉर्म वरील मालिकांचा प्रभाव हा. विफल प्रेमाचे दु:ख स्वत: श्रीकृष्णांनी देखील पचवले ना? श्रीराधेच्या विवाहा नंतर ते फिरून तिच्या जीवनात गेले नाही कि न तिचे अकल्याण चिंतिले.

काही वर्षांपूर्वी ‘गारवा’ नावाचा मराठी कविता अधिक गाण्यांचा एक अल्बम खूप लोकप्रिय झाला होता. त्यातील एक गाणे या स्थितीवर चपलख बसते. सोबत त्याची लिंक देवून विराम घेतो. 


 

पुढील लेख:- लाटेवर स्वार कि लाटेवर मात?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा