गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८

काळवेळेचे गणित चुकते कसे ?- १/५.

||श्री||

काळवेळेचे गणित चुकते कसे ?

या विषयावरील अगोदरचे चार भाग वाचण्यासाठी कृपया पुढे दिलेल्या भागावर क्लिक करा.






पुढे चालू  भाग ५.....




      
           पारंपारिक ज्योतिषात बाधक, मारक स्थानांना जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व कृष्णमुर्ती पध्दतीतही आहेच. पारंपारिक मध्ये स्थानांपेक्षा त्यांच्या स्वामींना पुष्कळसे जास्त महत्व आहे. के.पी.मध्ये भावेश महत्वाचा कार्येश होईलच असे नाही. १,५,९(स्थिरराशी सोडून),११(चरराशी सोडून) हि स्थाने आयुष्य वर्धक असतात. लग्नाचा सब जर १,५,९,११ स्थानांचा कार्येश असेल तर दीर्घायुष्य (६६ च्या पुढे), तो जर २,७,६,८,१२ व बाधक स्थानांचा कार्येश असेल तर अल्पायुष्य (३३ वर्षा पर्यंत), किंवा वरील वर्धक व मारक दोन्हींचा कार्येश असेल तर मध्यायुष्य (३३ ते ६६) असेल.


आता विचाराधीन कुंडलीत काय येतेय बघुयात. नवमस्थान हे येथे बाधकस्थान आहे. लग्नाचा सब शनी १,५ व २,८,१२ म्हणजे तारक व मारक दोन्ही स्थानांचा कार्येश आहे त्यामुळे ३३ ते ६६ वयवर्षे हा मध्यायू आयुर्दाय यानुसार येतो. घडलेली घटना व सब ने दिलेला आयुर्दाय या वरून जन्मवेळ बरोबर असावी कारण गुरु आणि बुध दोघेही हाच आयुर्दाय देतात म्हणून “असावी” असे म्हणालो. सब शनी हा प्लुटो युतीत असल्याने व हि युती अष्टमात असल्याने आयुर्दाय मध्यायुच्या तोंडाशी येवून ठेपला. पण दशा गोचरचा सिग्नल मिळाल्या शिवाय घटना घडत नाही. त्यामुळे वरील कालखंडातील दशा प्रथम पाहू. 
        मध्यायू दरम्यान गुरु दशा शनी भुक्ती शुक्र विदशा ते बुध दशा बुध भुक्ती शनी विदशा होती. या दरम्यान गुरुदशा १२ वर्षे १० मास भोग्य होती, शनी दशा पूर्ण १९ वर्षे तर बुधदशा २ वर्षे २ मास भोग्य होती. गुरु २,९ शनी २,८,१२ व बुध २,८,१२ असे मारक कार्येशत्व आहे. यात मृत्यूस्थानाचे कार्येशत्व शनी व बुधा कडे आहे. म्हणजे कदाचित गुरु वगळला गेला असता. फोरस्टेप नुसार कार्येशत्व घेतले नाही तर गुरुही अष्टमाचा कार्येश होतो. मग चतुर्थस्थानाची मदत घेतली गेली असती. चतुर्थस्थान आयुर्दाय विचारात अंतकाळ दर्शवितो. शनी, बुध चतुर्थाचे कार्येश आहेत गुरुही होतो पण तो दृष्टी संबंधाने होत असल्याने शनी, बुध या बाबतीत बलवान ठरतात. तुम्ही म्हणाल सर्व भाव आलेच पाहिजे असे काही नाही. दशा अंतर्दशा विदशा साखळीत ते जुळवायचे असतात. बरोबर आहे तुमचे. आपण काळवेळेचे गणित चुकते कसे? या दृष्टीने तपासत आहोत म्हणून असे लिहित आहे. कल्पना करा समजा या विषयी विचारणा करण्यासाठी ज्यावेळी व्याधीचे निदान झाले त्यावेळी साधारणत: गुरु महादशा गुरु अंतर्दशेत जर कुणी ज्योतिषाकडे गेले असते किंवा त्यावेळी ग्रुपवर हा प्रश्न विचारला गेला असता तर, व जन्मकुंडली वरून भाकीत करायचे असते तर.... तर केवळ जो ग्रह जास्त मारक भाव दाखवतो त्याची दशा निवडली असती असे जरी केले नसते तरी गुरु बाहेर नक्कीच झाला असता. शनी आणि बुध पैकी निवड करतांना शनी प्रबळ ठरला असता. शनीच्या नक्षत्रात ग्रह नसल्याने तो ८ व १२ चा प्रथम दर्जाचा कार्येश आहे तर तो राहूच्या नक्षत्रात असल्याने ४ चा प्रथम दर्जाचा कार्येश आहे. म्हणजे शनी मोक्षत्रिकोणाचा प्रथम दर्जाचा कार्येश असल्याने व बुध मारक,बाधक भावांचा प्रथमदर्जाचा कार्येश होत नसल्याने शनी महादशेवर शिक्कामोर्तब झाला असता.



             जातकाचा मृत्यू गुरु दशा बुध भुक्ती शनी विदशेत झाला आहे. आता गुरु दशाच का? गुरूला गोचर सहाय्यक झाली असेल का कसे ते पुढे गोचरीत पाहूच. कुंडलीचे निरीक्षण काय सांगते? तर तिघांपैकी केवळ गुरूच बाधक स्थानाचा प्रथमदर्जाचा कार्येश होतो आहे कारण त्याच्या नक्षत्रात ग्रह नाही. शनीचा मारक दर्जा आपण बघितला. तरीही शनी अंतर्दशा मारक न ठरता बुध ठरली. आता गोचर बघायला हवे. त्या आधी ग्रहांचे गोचरी साठीचे फक्त मारक कार्येशत्व बघू. येथे आपल्या मदतीला शासकग्रह नाहीत. म्हणून हे करावे लागेल.
र – २,७,९                  चं – ६                   मं – 
बु –                                         गु – २,९                 शु – ६
श – २,४,८,१२               रा – २                   के – ९


गुरु मध्ये शनी भुक्ती ९/४/२०१४ ते २०/१०/२०१६ होती. या दरम्यान शनी विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा (१५/९/२०१६ ला ज्येष्ठा मध्ये) या नक्षत्रात होता. पैकी विशाखा व अनुराधाच आपल्या उपयोगाचे. २० जुलै २०१४ पर्यंत, १५ मार्च ते ३ ऑगष्ट २०१५, २६ मार्च ते १४ ऑगष्ट २०१६ शनी वक्री असल्याने बाद होईल. गुरु ९ डिसें.२०१४ ते ८ एप्रिल.२०१५, ९ जाने. ते १० मे २०१६ दरम्यान वक्री असल्याने हा काळ बाद होईल. आता शनी अंतर्दशेत तीन कालखंड मिळतात ज्यांचा आपल्याला विचार करावा लागेल.

१)    २१/७/२०१४ ते ८/१२/२०१४ यातील २१ जुलै ते २ सप्टें.२०१४ दरम्यान गुरु पुष्य नक्षत्रात होता म्हणजे मारक काळ होता. या दरम्यान शनी विदशा होती जी मारक होती.
२)     ४/८/२०१५ ते ८/१/२०१६ यातील ४/८ ते १३/९/२०१५ दरम्यान गुरु मघा मध्ये होता म्हणजे मारक नक्षत्रातून होता. ८/८ ते १३/९/२०१५ दरम्यान रवी विदशा होती. १६ ते ३० ऑगष्ट २०१५ दरम्यान रवी ही मघा नक्षत्रात होता. म्हणजे रवी विदशा मारक ठरू शकली असती. २७/११/२०१५ ते ८/१/२०१६ दरम्यान गुरु उत्तरा नक्षत्रात होता. हे ही मारक आहे. या दरम्यान चंद्र व मंगळ विदशा होती. दोघेही फक्त ६ या मारक भावाचे कार्येश आहे. या भावाचा विचार आजारपणासाठी होतो म्हणून हा काळ सोडता येईल. सोडलाच पाहिजे असे नाही.
३)    १५/८/२०१६ ते १४/९/२०१६ या दरम्यान गुरु उत्तरा नक्षत्रातच होता आणि त्याचीच विदशा होती. हा ही काळ मारक होता. 

             गुरु दशा शनी अंतर्दशेत मारक ठरू शकेल असा काळ होता तरीही वेळ आली नाही, आणि जेव्हा वेळ आली तेव्हा याच शनीची विदशा होती बुध अंतर्दशेत. गुरु बुधाच्या सब मध्ये असल्याने त्याने बुधा कडे व बुध शनीच्या सब मध्ये असल्याने त्याने शनी कडे कार्य सोपवले असे काही असेल का? असो त्या वेळेचे गोचर बघून कुंडलीचे परीक्षण थांबवू या. शनी मूळ नक्षत्रातून भ्रमण करत होता. केतू नवमाचा कार्येश आहे. गुरु विशाखा या स्वनक्षत्रात होता तो २,९ भाव कार्यन्वित करतो तर बुध हस्त या नक्षत्रात होता म्हणजे षष्ठ कार्यन्वित होता. गोचर शनी गुरुच्या (२,९) सब मध्ये तर गोचर गुरु शुक्राच्या (६) सब मध्ये होता. वरती आपण शनी भूक्तीत चंद्र, मंगळाची विदशा तो केवळ षष्ठ या मारक भावाचा कार्येश असल्याने सोडायचा विचार केला पण येथे तो आलाच. समजा प्रश्न विचारला गेला असता व शासक ग्रह घेतले गेले असते आणि ते गुरु,शनी,बुधच आले असते तरी दशेचा क्रम वरील शनी अंतर्दशेचा अनुभव पाहून हाच (गुरु-बुध-शनी) आला असता असे खात्रीने सांगू शकु?

              कृष्णमुर्ती पध्दतीत गोचरीत असा विचार केला जात नाही पण या कुंडलीच्या निरीक्षणात आलेली गोष्ट नमूद करतो इतकेच. ती अशी की शनी मारक ठरला पण त्याच्या अंतर्दशेत नाही, कारण त्याची अंतर्दशा होती तेव्हा गोचर शनी १ नोव्हे. २०१४ पासून भुक्ती संपे पर्यंत म्हणजे जवळपास दोन वर्षे वृश्चिकेत होता. शनी लग्न व अष्टम दोन्ही स्थानांचा सब आहे व कार्येशही. धनुत आल्यावर त्याची दृष्टी लग्न व आष्टम दोन्ही स्थानांवर आली इतर घटक अनुकूल होतेच. असो ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो हि प्रार्थना.




             लिहिता लिहिता पाच भाग झाले. आपण पोष्ट वाचल्या बद्दल  आपले आभार. ही पोस्ट करे पर्यंत तरी इथे ब्लॉग वर कमेंट आल्या नाहीत आपणही या कुंडलीचे निरीक्षण केले असेलच. आपल्या आभ्यासपूर्ण कमेंटची वाट पाहतोय. याच पध्दतीने अजून एक केस स्टडी करायचा मानस आहे, ह्याच विषयावर.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा