गुरुवार, १७ जानेवारी, २०१९

विवाह केव्हा?-१

|| श्री||



विवाह केव्हा?-१.



जातकाची ओळख पटणार नाही याची शक्य तेवढी काळजी घेत आहे. जातकाचे नाव, फार वैयक्तिक, गोपनीय माहिती देत नाहीये. कुंडली मांडता यावी म्हणून जन्मटिपण देत आहे.

जाताक:- पुरुष. जन्म ता:- १५/९/१९८०, जन्म वेळ:- पहाटे २:३२, जन्म स्थान:- अक्षांश २३/१९ उत्तर, रेखांश ७३/०१ पूर्व. वडोदरा,गुज.
जातक माझ्या मित्र परिवारातला आहे. प्रश्न नेहमीचाच, सर्वांच्या सरावाचा. विवाह योग केव्हा? मी हा प्रश्न १९/०७/२०१४ रोजी १८:४४ ला नाशिक (२०/०२/२३ उ, ७३/४८/१० पु) येथे सोडवला होता. पण प्रश्न कुंडली वरून नव्हे तर जन्मकुंडली वरून. 




== ही पत्रिका मी १९/७/२०१४ रोजी सायं. ६:४४ ला म्हसरूळ, नासिक मुक्कामी सोडवली होती हे आधी नमूद केले आहेच. या वेळेच्या शासकग्रहांचा उपयोग मी जन्मवेळ शुद्धी करणा साठी व कालनिर्णया साठी केला बाकी जन्मकुंडली वरून मी प्रश्नाचे उत्तर काढले होते. पार्श्वभूमी अशी कि मी माझ्या एका मित्राच्या ऑफिसात गेलो असता तेथे त्याचा दुसरा एक मित्र बसलेला होता, गप्पा हाणत. सावळारंग असला तरी जातक दिसायला तरणाबांड (हॅडसम हो, ते जे प्रतीकात्मक चित्र दिले आहे ना, त्यातील वराला सावळारंग दिला कि तसा.), व्यवस्थित शिक्षण, नोकरीही बऱ्यापैकी, घराची परिस्थितीही तशी चांगली. तरीही लग्नाला उशीर होत होता त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधलेले हे महाशय बेचैन झाले होते, असे त्यांच्या गप्पातून जाणवत होते. या पूर्वीही तेथे आमची भेट झालेली असल्याने आमचीही ओळख झालेली होती. “अरे येडया कसले पसंतीचे कार्यक्रम करत बसतो, मी सांगतो तुला एखादी पोरागी पटव.” इती माझा मित्र. माझ्या कडे वळून “मी याची कुंडली पाहिली, मी सांगतो याला प्रेमविवाहाचे योग आहेत. हि आईला पसंत नाही, ती बहिणीला पसंत नाही, तर कधी बाप म्हणतो आपल्या तोलाचे नाही असे रडत बसतो.” माझा हा मित्र ज्योतिषाचा हौसी. अस त्याच्या बेचैनीला चाव्या मारायची थट्टा मस्करी चालली होती. मी तुझ्या ऑफिसला येतो एकदा असे जातक म्हणाला व त्या प्रमाणे आला. म्हणजे जातक विषया बाबत गंभीरही होता तर.  

         मित्राने पारंपारिक नुसार त्याची कुंडली तपासली होतीच, घरच्यांनीही कुठे, कुठे दाखवली होतीच. त्यामुळे मी कृष्णमुर्ती पध्दतीने पहावी असे तो म्हणाला. म्हणून मी जन्मटिपणा नुसार कुंडली बनवली. जातकाने दिलेल्या वेळे नुसार पत्रिका संगणकावर प्रगट झाली. प्रश्न विवाहा संबंधी असल्याने सप्तमाचा सब बघितला तो बुध होता. त्या वेळेचे शासक ग्रह L – गु, S – के, R – मं, D- श. यात बुध नव्हता. प्रश्न संबंधी भावाचा सब शासक ग्रहात नसता त्या नुसार जन्मवेळ संशोधीत करण्याची एक प्रथा आहे. गुरु वक्री शनीच्या नक्षत्रात असल्याने तो बाद होतो तर शनी जरी दुसऱ्याच दिवशी मार्गी होणार असला तरी त्या वेळी वक्री असल्याने जन्मवेळ शुध्दीकरणात सब म्हणून तो बाद होईल. शासक ग्रहात शनी असल्याने मंगळाचा विचार न करता बुधाचा पुढचा केतू हा सप्तमाचा सब घेतला व त्यानुसार जन्मवेळ पहाटे २:३७:२७ अशी घेतली व शिरसत्या प्रमाणे जातकास काही प्रश्न विचारून या जन्मवेळेची कुंडली बनवून कार्येश ग्रह काढले. जातकाचे तीन प्रश्न होते.
१) विवाह होणार आहे का? २) होणार असल्यास पारंपारिक विवाह कि प्रेमविवाह? ३) विवाह केव्हा? 



१)    सप्तमाचा सब केतू ७ व पूरक ५,८ भावांचा कार्येश असल्याने विवाह होईल. शनी तृतीयात असता विवाहास विलंब होतो. प्रश्न वेळी जातकाचे वय ३३ पूर्ण होते, म्हणजे तसा उशीर झालाच होता. जातकाचे म्हणणे होते आजून किती उशीर. लग्न होते कि नाही? त्यामुळे तुझा विवाह होईल असे म्हटल्यावर जरा खुलला. सप्तमाचा सब विरोधी स्थानांबरोबर, शनी, राहू, केतू व वंध्याराशी संबंधित असता विवाह होत नाही असे सांगितले जाते. ह्या कुंडलीत संशोधित सब केतू व्यंध्याराशीत आहे. जातकाने दिलेल्या वेळे नुसार सब बुध हाही व्यंध्याराशीत आहे. शनी सब घेतला तरी तोही व्यंध्याराशीत आहे. आपण घेतलेला सब केतू विवाहास आवश्यक भावांचा कार्येश आहे त्यामुळे विवाह होईल. तसे तर बुध व शनीही कार्येश होतात. बुध शनी युक्त, केतू शनीच्या राशीत त्यामुळे विलंब हे फळ मिळणारच होते, तिघांपैकी कोणीही सब असला तरी. 
२)    जातकाचा दुसरा प्रश्न हा मित्राने त्याला प्रेमविवाह होईल असे सांगितल्या मुळे होता. मित्राने पारंपारिक नुसार सांगितले होते. आपण आता केपी नुसार विचार करत आहोत. के.पी.चा या बाबत नियम असा कि पंचमाचा सब सप्तमाचा व सप्तमाचा सब पंचमाचा कार्येश असता प्रेमविवाह होतो. सप्तमाचा सब पंचमाचा कार्येश आहे पण पंचमाचा सब सप्तमाचा कार्येश होत नाही. त्या मुळे प्रेम विवाह नाही.
३)    प्रश्न समयी जातकाला बुधाची महादशा चालू होती. बुध रुलिंग मध्ये नाही. बुध महादशा ४२ पर्यंत आहे मग त्या नंतर विवाह होणार कि काय? हे सांगण्यापूर्वी अजून चाचपणी करणे गरजेचे आहे. अश्या वेळी एक सोय करून ठेवलेली आहे ती म्हणजे या क्लासिक रुलिंग प्लॅनेट बरोबर काही ग्रह स्वीकृत करण्याची मुभा. मी हे कार्ड वापरायचा निर्णय घेतला. प्रश्न समयी धनु लग्न होते व बुध सप्तमात असल्याने त्याची प्रश्नलग्नावर दृष्टी होती. बुध चवथ्या पायरीवर व्दितीयाचा कार्येश होतो त्या मुळे त्याची महादशा विवाहास अनुकूल आहे.
    प्रश्नसमयी अंतर्दशानाथ मंगळ शासक ग्रहात होता व मंगळ व्दितीयाचा कार्येश असल्याने विवाहास अनुकूल होता. एक दिवस आगोदरच शनी विदशा चालू झाली होती. शनी रुलिंग मध्ये आहे व तो व्दितीयाचा कार्येशही आहे तसेच दुसऱ्या दिवशीच तो मार्गी होणार होता. जवळ जवळ अजून दोन महिने त्याची विदशा भोग्य होती म्हणजे अगदी लग्न झाले जरी नाही तरी लग्न ठरण्यास वाव होता, हे शक्य होते. मी जातकास जर असे सांगितले असते कि येत्या दोन महिन्यात तुझे लग्न ठरणार, बघ तू नक्की पेढ्याचा पुडा घेवून मला सांगायला येणार,  तर त्तक्षणी माझ्या तोंडात बोलाचीच साखर टाकून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेला हा जातक वाजंत्री वाजवायला लागला असता.



तीन कारणांमुळे मी शनी विदशा निवडली नाही. पहिले कारण म्हणजे रुलिंग मध्ये शनी असल्याने तो अजूनही विवाहास विलंब असल्याचे खुणावत होता. दुसरे म्हणजे विवाहास अनुकूल २,७,११ भावांपैकी केवळ व्दितीय भावच कार्यान्वित होत होता. शासकग्रहाधारीत कालनिर्णय करतांना अशी लिंक मिळालीच नाही तर नाईलाज असतो पण इथे ते शक्य होते. लाभाची लिंक मिळत नसली तरी सप्तम या प्रमुख भावाची लिंक उपलब्ध होती. केतू ती कडी साखळीत गुंफत होता. तिसरे कारण म्हणजे एक दिवसा साठी का होईना शनी वक्री असून त्याच्या नक्षत्रातील गुरुही रुलिंग मध्ये असल्याने मी त्याची विदशा सोडायचे ठरवले. बुध महादशेत मंगळ अंतर्दशेत केतू विदशेत ४ नोव्हें. ते २५ नोव्हें. २०१४ दरम्यान विवाह संभव असे त्याला मी सांगितले. तरीही चार महिने म्हणजे विलंब नसल्याने तो खुश झाला. शासकग्रहांचा आधार घेत असल्याने गोचर पहायची जेहमत काही मी घेतली नाही.   
         
          एवढे करूनही अंदाज चुकला. प्रत्येकवेळा तो बरोबरच यावा अस काही नसत. माता पार्वतीचा शाप आहे तो ज्योतिषाला कधी कधी अनुभवाला येतोच. तरीही बरोबर आल्याचा आनंद असतोच ना. सप्टें.२०१५ च्या १ तारखेला मित्राच फोन आला. अरे आपण त्या ‘अबकड’ ची पत्रिका पाहिली होतीना, त्याचे लग्न ठरले. २५ डिसें.२०१५ विवाह तारीख ठरली. विवाह पारंपारिक होता. म्हणजे दोन प्रश्नांची उत्तरे बरोबर आलीत. आपण काढलेल्या अंदाजापेक्षा तब्बल एक वर्ष एक महिना उशिरा विवाह होतो आहे. संभाव्य कालावधीत जातकाचे लग्न सुध्दा ठरले नाही. प्रश्नाची फलश्रूती समजली होती त्यामुळे सहाजीकच त्याची समीक्षा केली तर मी अधिक बुचकळ्यात पडलो. बुध दशा राहू भुक्ती शनी विदशेत विवाह होतोय. बुध शनी चे ठीक आहे ते रुलिंग मध्ये होते. प्रश्नलग्ना पासून दूर असलेला हा राहू ना शासकग्रहांच्या युतीत ना दृष्टीत. त्याला रुलिंग मध्ये घ्यावा तर घ्यावा कसा? एवढच नाही तर हा राहू विवाहास अनुकूल ना मुख्य ना पूरक भावांचा कार्येश. किती म्हणजे किती अधिग्रहण करावे या राहुने? ज्याने देवाधीकांच्या डोळ्यात लीलया धूळ फेकून अमृतपान केले त्याच्या समोर माझ्या सारख्या भोळ्या भाबडया पामर मानवाचे काय, नाही का?


पुढील लेख लवकरच......

३ टिप्पण्या:

  1. योगेशजी राहुच कारयेशत्व पहा.१)युति २) दृष्टी ३)नक्षत्रस्वामी ४) राशीस्वामी .फोरस्टेप मधे ही कमतरता आहे.please note.बाकी लेख खुपच छान! goodluck

    उत्तर द्याहटवा
  2. सरजी, Nods are stronger than planets ह्या गुरुवर्य श्री.कृष्णमुर्तीच्या विधानाचा मी forestep वापरण्या पूर्वी के.पी नुसार विचार करे, पण या विधानाचाही प्रत्यय प्रत्येकवेळी नाही येत हेही खरे, अगदी रुलिंग मध्ये राहू असतांनाही. अश्या काही अनुभवांमुळे तर के.पी तही सुधारणेचा विचार होऊन त्यातही मेथडस आल्या. असो.

    विचाराधीन कुंडलीतच बघा ना, केतू रुलिंग मध्ये असून ७ या मुख्यभावाचा कार्येश असूनही त्याने नियमाची बूज राखली नाही. निदान विदशा तरी, पण नाही. केएसके नुसार बघू त्याने कोण कोणत्या नियमाची पायमल्ली केली ते.
    १)छायाग्रह हे ग्रहांपेक्षा बलवान असतात. (यात केतू हि आला)
    २)विषया संबंधित भावांपैकी कार्येशत्व असलेला ग्रह त्याच्या दशा/अंतर्दशा/विदशेत घटना घडते.
    ३)रुलिंग मध्ये असलेले ग्रह प्रत्यक्ष घटना घडतांना उपस्थित असतात.
    ४) एक मुलभूत नियम ‘ग्रह त्याच्या नक्षत्र स्वामी प्रमाणे फल देतो.’
    चौथ्या नियमा बाबत- छायाग्राहांबाबत कार्येशत्व प्रार्थमिकते बाबत मतभेद आहेत, ते बाजूस ठेवून. केतूचा नक्षत्रस्वामी मंगळ त्याला पंचम या पूरक भावाचा बलवान कार्येश बनवतो तर मंगळाची सप्तमावर चतुर्थ दृष्टी मुळे (केएसके निर्देशित) तो केतुला सप्तमाचा दुय्यम कार्येश बनवतो. राहूचा नक्षत्रस्वामी बुध त्याला ३,१२ व दृष्टी संबंधाने ९ चा कार्येश बनवतो. तृतीय स्थान (तसेच नवम) हे नोंदणी विवाह किंवा तत्सम विवाह दर्शविते. त्यामुळे ते पूरक भावात आले. सप्तमभावाचा मुख्यकार्येश (केएसके निर्देशां नुसार.) केतू होतो कारण त्याच्या नक्षत्रात ग्रह नाही. तरीही त्याची विदशा देखील फलीभूत झाली नाही तो राहू प्रमाणेच Node असूनही.

    उत्तर द्याहटवा