शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२०

प्रसूती मुहूर्त-१

|| श्री ||


प्रसूती मुहूर्त-१


विचारा अंती मलाही असे वाटते कि प्रश्न कुंडली वरून सिझेरिन साठी काढून दिलेली वेळ योग्य कि अयोग्य हे ठरवने बरोबर होणार नाही. त्यावरू ज्या ज्योतिषाने हि वेळ काढून दिली तो चुकीचा होता किंवा बरोबर होता हे ठरवणे मला योग्य वाटत नाही. ज्या वेळी ही शस्त्रक्रियेची वेळ त्याने काढली ती वेळ आपल्या कडे नाही (म्हणजे दिवस), त्याच्या पुढे असलेले आव्हान, मर्यादा याची आपल्याला काहीच कल्पना नाही.  बर जी वेळ त्याने काढली होती त्याचे तंतोतंत पालन झाले हे हि माहित नाही. सिझेरिन शस्त्रक्रीया करून जे आपत्य जन्माला आले ते जन्मटिपण हि नाही. त्या आपत्याचे जन्मटिपण वगळता श्री. माळीजी याच्या कडेही ती माहिती नाही. प्रश्नकर्त्याला ज्योतिषा कडे गेला ती तारीख व परिस्थिती आठवत असेल तर. पण या बाबत त्यांना त्रास देण्यापेक्षा व त्या वेळची परिस्थिती त्यांना अचूक आठवली का? या वर परत खल करत बसण्या पेक्षा मी दुसरा मार्ग अवलंबत आहे.
नाही, नाही तसे नाही मी परत अन्य कोणती वेळ घेवून ( प्रश्न सोडवतांनाची, प्रश्न ग्रुपवर आला तेव्हाची इ.इ. असे काही) विश्लेषण करणार नाहीये. तर अगोदरच्या कमेंट मध्ये म्हटल्या प्रमाणे सिझेरिन साठी वेळ (माफ करा मुहूर्त) काढून घेण्यासाठी माझ्या कडेही जातक येत असतात म्हटले होते. नुकताच काही महिण्या पूर्वी मुहूर्त काढून दिला ते या केसला सपोर्टेड पुढची केस स्टडी म्हणून देणार आहे. या केसच्या मुदत समाप्ती नंतर. धन्यवाद शुभदिन. 

ज्योतिष विषयी समुहावर एक प्रश्न विचारला गेला होता. वरील कमेंट त्यावर होती. त्या केस स्टडीची मुदत संपल्यानंतर

मित्रांनो नमस्कार
समूह संचालक श्री.माळी यांनी एक प्रश्न आपल्या पुढे मांडला होता. जातकाचा तो प्रश्न होता “प्रसूती शस्त्रक्रिये साठी चुकीची वेळ निवडली होती का?” याचे उत्तर प्रश्न कुंडलीवरून देणे मला पटले नाही. किंबहुना हा प्रश्न प्रश्नकुंडलीच्या परिघात येत नाही असे मला वाटले होते. याचे कारण मी सबंधित पोष्ट वर दिले आहे. प्रश्नकुंडली (किंवा जन्मटिपणा वरून असेल) वरून चुकीची वेळ काढली असा निर्णय करून त्या अज्ञात व्यवसाय बंधूला ‘महामूर्ख’ संबोधले गेले (कुटप्रश्न सोडवणाऱ्या कडून) तेही मला रुचले नाही. दोन वर्षा पूर्वी जातक शस्त्रक्रिये साठी मुहूर्त काढून घ्यायला एका ज्योतिषा कडे गेला, संततीचा स्वभाव त्रास दायक असल्याने आता त्यांना वेळ चुकीची निवडली कि काय असे वाटते. दोन वर्षा पूर्वी ज्या ज्योतिषा कडे गेले त्या वेळी काय परिस्थिती होती? त्या ज्योतिषा पुढे काय आव्हाने होती? ज्योतिषाने काढून दिलेल्या मुहूर्ताचे तंतोतंत पालन डॉक्टरांनी केले का? या विषयी काहीही जाणून न घेता कुंडलीतले दोष काढून (किंवा प्रश्न कुंडलीतले कुयोगा वरून) चुकीचा मुहूर्त असा शिक्का मारून ( कोण महामूर्ख होता, मी असतो तर ...) शेखी मिरवण्यात अर्थ नाही. म्हणून

म्हणून मी नुकतेच काही महिन्या पूर्वी काढून दिलेला प्रसूती मुहूर्त या मालिकेतील पुढचा कुटप्रश्न म्हणून मांडायचा ठरवले. डॉक्टरांनी मुहूर्ताचे पालन केले होते व त्या वेळची परिस्थिती स्मरणात असल्याने हि घटना या साठी मी निवडली. ४/११/२०१९ ला दुपारी. १:०८:३६ ला (स्थानांश- ७३/४८ पूर्व, २०/०२ उत्तर) फोन वरून प्रसूती मुहूर्त काढून देण्या विषयी विचारणा झाली. प्रश्न कर्त्याने “येत्या चारपाच दिवसात सिझेरिन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितल्याचे सांगितले. तुम्हाला नैसर्गिक प्रसूती द्यायची असेल व पत्नीची सहनशक्ती असेल तर तुमच्या जबाबदारीवर. पत्नीची किरकोळ तब्बेत आहे. एक संतती आहे व या पूर्वी दोनदा काही महिन्यांचे गर्भपात झाले आहे. एकदा तोल जावून पडल्याने गर्भपात झाला होता. आता पत्नीला असहनीय वाटते आहे. तिला धीर धरवत नाही. त्यामुळे आम्ही धोका न पत्करता सिझेरिन प्रसूती करायचे ठरवले आहे.”
कोणत्या मर्यादेत आपल्याला काम करायचे आहे याची पुरेशी कल्पना या वरून तुम्हाला आली असेल. ३१ जानेवारी ला विश्लेषण दिले जाईल. अजून कुणाला हि ‘प्रसूती मुहूर्त’ मालिका वाढवायची असेल तर स्वागत आहे. आपणही प्रसूती मुहूर्त काढून दिला असेल व त्याचे तपशील असतील तर ३१ जानेवारीला ‘प्रसूती मुहूर्त’ शीर्षकाने पोष्ट टाकावी. धन्यवाद.

जानेवारी च्या उत्तरार्धात समुहात जी केस स्टडी दिली ती काही प्रश्न कुंडली नाही. या वरून काही भाकीत करायचे नव्हते, एखादी घटना घडली कि नाही हे सांगायचे नव्हते, ना एखादी घटना केव्हा घडेल याचा कालनिर्णय करायचा होता. काही चूक किंवा बरोबर असा काही निर्णयही द्यायचा नव्हता. यात कुणी चूक ठरण्याची सुतराम शक्यता नव्हती. काय म्हणतात ते एकदम मख्खन केस होती. दही हि घुसळायची गरज नव्हती. लोणी नुसत हंडीतून काढून वाटीत टाकून द्यायचे होते. बSSSSस्स एक साधा मुहूर्त काढायाचा होता. मुहूर्त हि पारंपारिक ज्योतिष्याची खासियत, तरीही अमुक पद्धतीनेच मुहूर्त काढा असे काही बंधन नव्हते. आपापल्या पद्धतीने मुहूर्त काढून त्याची योग्यता पटवून द्यायची होती कि का हा मुहूर्त घेतला? एरवी जे काम चुटकी सरसी करतो त्या साठी तब्बल १५ दिवस समूहाच्या नियमा प्रमाणे आपल्या हातात होते. काय कुणी चुटकी वाजवली नाही. हि केस स्टडी मी या प्रकारच्या अगोदरच्या केस स्टडीच्या सपोर्ट साठी दिली होती. त्यात जातकाला शंका होती कि योग्य वेळ दिली गेली नाही. वेळ निवडली गेली त्यावेळची परिस्थिती इ.काही तपशील उपलब्ध नव्हते. म्हणून तपशील असलेली केस दिली. तरीही आपण मुहूर्त काढायला धजावलो नाही? जातकाल मी जो मुहूर्त काढून दिला तो कसा ते साग्रसंगीत देत आहे.
प्रसूती मुहूर्त काढणे म्हणजे विवाह, वाहन खरेदी, वास्तूशांती तत्तसम मुहूर्त काढणे नव्हे. जवळचा मुहूर्त नाही मिळाला म्हणून थांबले महिना दोन महिने किंवा सावकाश वर्षभर. हाती असलेल्या दोनचार दिवसातच काहीतरी जांगडगुत्ता जमवावाच  लागतो. म्हणून श्री. माळीच्या पोष्टवर आव्हानांचा विचार न करता योग्य अयोग्य ठरवणे मला रुचले नाही. तपशीला सह जेव्हा केस स्टडी दिला तेव्हा कुणीही धाडस दाखवले नाही ते का? मी असतो तर हा मुहूर्त दिला असता... असे कुणीही का लिहिले नाही? माफक आव्हान होते, शिवधनुष्य थोडी पेलायचे होते. जावूद्या मुद्द्यावर येतो तर ४ नोव्हें. पासून ५ दिवस मुदतीतला मुहूर्त काढून द्यायचा होता. विचारणा झाली तो दिवस सोडून पाच दिवस घेतले तरी ९ नोव्हें. पर्यंत मुदत आहे. या दिवसात प्रथम पंचांग शुद्धी कोणत्या दिवशी आहे ते पाहू. दाते पंचांग मी वापरले होते. दुसरा दिवस म्हणजे ५ नोव्हें. हा सामान्य दिवस होता आणि ८ नोव्हें. दु १२ नंतर चांगला होता बाकी ३ पूर्ण दिवस चांगले अथवा उत्तम होते. मातेच्या दृष्टीने बघितले तर चंद्र कुंभेत म्हणजे भाग्यात व नववा चंद्र शुभ असल्याने ६ व ७ पैकी दिवस घ्यायचे ठरवले. ४ तारखेला गुरु स्वराशीत आला होता हा एक चांगला योग आपसूकच मिळत होता. जन्मणाऱ्या आपत्याच्या दृष्टीने कुंभ हि रास चांगली आहे. वायू तत्वाची वैचारिक रास राशीचक्रात सर्वांत बुद्धीमान रास मानली जाते. यात धनिष्ठा, शततारका व पूर्वाभाद्रपदा हि नक्षत्रे येतात. मंगळाचे धनिष्ठा व राहूचे शततारका हि नक्षत्रे राक्षसगणी येतात तर गुरुचे पूर्वाभाद्रपदा हे मनुष्यगणी नक्षत्र आहे. गुरु न्याय, नीती, शहाणपण, ज्ञान. बुद्धिमत्ता, सामंजस्य यांचा कारक मानला जातो. त्यात मनुष्यगण हा सौम्यगुण देणारा असल्याने पूर्वाभाद्रपदा नक्षत्र पक्के केले. पूर्वभाद्रपदाचे तीनच चरण कुंभेत आहे. पंचांगात पाहिले तर ७ नोव्हें. गुरुवारी सकाळी ९:१५ ला चंद्र पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करत होता तर दुसऱ्या दिवशी पहाटे ५:२९ पर्यंत तो कुंभेत होता. २० तास १४ मी. इतका प्रदीर्घ कालावधी आहे. आता आपल्याला अपत्याचे लग्न निश्चित करायचे आहे.
पूर्वाभाद्रपदाचे प्रथम चरण मित्र नवमांशात येते तर दुसरे व तिसरे चरण शत्रू नवमांशी येते. म्ह्णून प्रार्थमिकता प्रथम चरणाला दिली. प्रथम चरण ७ नोव्हें.ला सकाळी ९:१५ ते दु. ४:०० पर्यंत होते. यात वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन लग्ने येतात. वृश्चिक लग्न सका. ९:४२ पर्यंत होते. या लग्नाला मारकेश शुक्र व अष्टमेश बुध लग्नी येतात जे आयुष्ययोग कमजोर करतात. पुढचे धनु लग्न विचारत घेता क्षणी एकदम उल्हासित झालो, कारण गुरु नुकताच धनु या आपल्या स्वगृही आला होता हे आपण पाहिले आहेच. हे लग्न घेतले तर? इथे प्रश्नचिन्ह लावायची गरजच नाही. का? काय विचारता. पंचमहापुरुष योगा पैकी एक हंसयोग होईल तोही लग्न स्थानी. लग्नेश पंचमहापुरुष योगात असणे तो हि हंसयोग म्हणजे अलभ्यलाभच. त्यात गुरुच्याच नक्षत्रातील कुंभरास. अध्यात्म, शिक्षण, सुसंस्कृतपणा जातकात कुटकुट के भरणार. भाग्येश रवी लाभात आहे हा हि उत्तमयोग साधतोय. रवी नीच आहे पण फिकर नॉट कारण तो निचभंग राजयोगात आहे. अधिकार,सत्ता देणारा मंगळ दिग्बली आहे आणि हो गुरुही दिग्बली असल्याने हंसयोग अधिकच बलवान झाला कि हो. अश्या बलवान गुरूची विद्या, कलत्र, भाग्य भावावर दृष्टी. ओ हो हो काय योग जुळून येतायेत. ‘दशो उंगलीया घी मे और शीर कढाई में’ असे झाले हे. आणि हे सर्व गुरुवारी मिळते आहे. व्याघ्रात दिनयोग व वनिज करण म्हणजे जननशांती नाही. गुरु जेमतेम ३३ कलांवर असल्याने या कुंडलीचे बलस्थान हंसयोग भावचलीतात पटकावणे सोपे नाही. एवढा ताण डॉक्टर वर देणे योग्य नाही (ते घेतील तेव्हा ना!). डॉक्टर झाले म्हणून काय झाले “क्या बच्चे (डॉक्टर बच्चा हं) कि जान लोगे क्या!”
आता हि जी वेळ काढली त्यात बनणारी कुंडलीत काहीच दोष नाही का? असे शक्य आहे का राव. पण आपल्याला मिळालेल्या मुदतीत शक्य तितके चांगले योग साधायचे होते, तसा प्रयत्न केला. या पेक्षा चांगला मुहूर्त साधता आला असता असे आता म्हणून काही उपयोग नाही कारण तो काढून तो मुहूर्त सर्वोत्तम कसा हे पटवून द्यायला समुहातील सदस्यांना तब्बल १५ दिवस मिळाले होते. मला तरी त्या वेळी उणेपुरे तीनचार तास काय ते मिळाले होते. पारंपारिक, केपी, अष्टकवर्ग, पाश्चत्य, जैमिनी अजून कोणती जी योग्य वाटेल त्या पद्धतीने काढायला काही अडकाठी नव्हती. आवश्यक ती किमान माहिती दिली होती.   
७/११/२०१९ गुरुवार सका. ९:४२ ते ११:४७ चा सुमुहूर्त दिला. मुहुर्त सांगितल्या नंतर “..मग गुरुजी काय आणून देवू तुम्हाला पेढे कि बर्फी? आपल तस काही नाही. सगळ सारखच. एक जिज्ञासा उगी बाकी काही नाही हं. हॅ हॅ हॅ..” जातकाने ज्या वेळी फोन केला होता त्याच वेळे वरून त्यांचा पुढचा प्रश्न ‘संततीचे लिंग?’ याचे दिलेले उत्तर बरोबर आले. विशेष म्हणजे काढून दिलेला मुहूर्त डॉक्टर आणि दैव दोघांनीही तो पाळला. जातकाने ७/११/२०१९ सका.११:०४ ला नाशिक मुक्कामी कन्या रत्न प्राप्त केले. काहीही गुंतागुंत न होता बाळ बाळंतीण दोघेही सुखरूप व स्वस्थ.  

पुढील लेख लवकरच..... 

       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा