गुरुवार, १० डिसेंबर, २०२०

रवीपुत्र यमाग्रज

 || श्री||

मागील लेख :- स्कीझोफ्रेनिया आणि कुंडली भाग-१.


रवीपुत्र यमाग्रज




एका ज्योतिष समुहावर खालील प्रश्न विचारला गेला. यावर खरे तर दोनचार ओळीत लिहून विषय संपवणार होतो पण लिहिता लिहिता वाढोणी लेख झाला.  

खगोलशास्रीय कारण सांगितले तर काही प्रश्न उपस्थित होतील. उदा.

१) जर हे संदर्भीय मानले तर इतर ग्रह हे पौराणिक दृष्ट्या रवी पुत्र का नाही?

२) पौराणिक रवी च्या इतर पुत्रांचे खगोलीय संदर्भ लावलेत का? उदा. रवीपुत्र विवस्वान ज्याच्या वंशात श्रीराम जन्मले. तसेच भाग्यदेव हि रविपुत्र आहेत.

३) पौराणिक कथे नुसार यम आणि यमी (उर्फ-यमुना) हे जुळे भावंड आहेत. मग यम जर खगोलीय पिंडाच्या संदर्भात पाहिला तर यमुना नदी कशी?

४) यम व शनी खगोलशास्त्रीय कारण मिमांशा नुसार पाहिले तर यम व शनीच्या खगोलस्थिती मध्ये दोन दानवांचा पौराणिक संदर्भ काय?

अर्थात वरच्या सारखे प्रश्न मी जे अनुमान लावत आहे त्या नुसार पडतील. अजून दुसरे काही अनुमान कोणी लावत असेल तर त्या नुसार कदाचित नसतील ही. ठीक आता माझे अनुमान सांगतो.

सूर्यमालेतील बटूग्रह (हो बटूग्रह संज्ञेत याला घातलं आहे, ग्रहातून त्याला वगळण्यात आलेय.) प्लुटो याचे भारतीय नामकरण यम करण्यात आले आहे. सूर्यमालेतील कायपरच्या पट्ट्यातील सर्वात मोठा बटुग्रह. प्लुटोचे यम असे भारतीय नामकरण करण्या मागे खरे तर भारतीय पौराणिक कथा नाही तर रोमन पौराणिक कथा कारण आहे. ग्रीक पाताळभूमीची देवता हेडेस चे दुसरे नाव प्लुटो आहे. या हेडेसदेवतेचे कार्य मृत्यूदेवता म्हणून सांगितले गेले आहे. काळ्या व थंड ग्रहासाठी सुचविले गेलेले हे नाव लॉवेल वेधशाळेला आवडले. वेधशाळेचे संस्थापक पर्सिव्हाल लॉवेल यांच्या नावाचे अद्याक्षर यात येतात हे दुसरे एक कारण. असो मुद्या कडे वळू. मृत्युदेवतेचे नाव असल्याने अर्थात आपल्याकडे (इतर काही संस्कृती मध्ये हि त्यांच्या कथांप्रमाणे ) या ग्रहाला यम हे नाव योजले गेले. यम व यमी या जुळ्या भावंडाच्या त्वचेचा वर्ण काळा सांगितला गेला आहे.

यम व शनी हे भारतीय पौराणिक कथे नुसार रवी पुत्र आहेत. शनी यमाचे मोठे बंधू आहेत म्हणून व्यासांनी त्यांचा उल्लेख यमाग्रज असा केला आहे. खगोलीय दृष्टीकोनातून शनीचे स्थान रवी पासून प्लूटोच्या अगोदर आहे. त्यामुळे त्याला अग्रज म्हणता येईल. दुसरी गोष्ट शनीचे आकारमान व वस्तुमान प्लूटोच्या कैकपट जास्त आहे. प्लुटो शनीच्या एका चंद्र पेक्षाही लहान आहे (आपल्या चंद्रा पेक्षाही प्लुटो लहान आहे.) असे म्हणतात. आकारमान, वस्तुमान, चंद्रांची संख्या या नुसार शनी दादा आहे. 

पुराणात यमाची जुळी बहिण यमिला नदी सांगितले आहे. प्लुटोला तीन चंद्र आहे. त्यातील एक चेरॉन. पण शास्त्रज्ञ त्याला प्लुटोचा चंद्र मानण्या बाबत संभ्रमात आहेत. चेरॉन प्लुटोपेक्षा थोडा मोठा आहे. चेरॉन प्लुटो हे व्दिमान प्रणालीतले (binary systems) आहेत त्यामुळे शास्त्रज्ञ त्यांना बटु जुळे ग्रह म्हणतात.

आपल्या सूर्यमंडलातील चार ग्रहांना वायू दानव म्हटले जाते. गुरु, शनी, हर्षल(अरुण/इंद्र/प्रजापती), नेपच्यून(वरुण) हे ते चार वायू दानव ग्रह आहेत. शनी आणि प्लुटो(यम) दरम्यान हे अरुण, वरुण हे दोन दानव ग्रह आहेत. पौराणिक कथे नुसार मात्र हे चारीही दानव नाहीत तर देवता आहेत. ग्रीक पुराना नुसारही हे दानव नाहीत तर देवता आहेत. हर्षल व नेपच्यून यांची संरचना बरीचशी मिळती जुळती आहे. मग यम व यमी म्हणजे हे हर्षल व नेपच्यून मानले तर? शनी वायू तत्वाचा ग्रह आहे व आधुनिक खगोल शास्त्रज्ञांच्या वायू दानव समुहात आहे. हर्षल, नेपच्यून याच समुहात असले तरी हर्षल वायू तत्वाचा व नेपच्यून जलतत्वाचा ग्रह ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या आहे. हिंदू अथवा ग्रीक पुराणात यांना देवताच मानले आहे. या ग्रहांची नावे (हर्षल, नेपच्यून, प्लुटो) आपल्याकडे जागतिक खगोल संघटनांनी यांना दिलेल्या ग्रीक देवतांच्या कार्याशी अनुरूप दिली गेली आहेत. हर्षला आपल्याकडे एक वाक्यता नाही. त्याला प्रजापती हे नाव दिले जे ब्रम्हाचे पुत्र आहेत. अरुण हे नाव कशा आधारे योजले ते कळले नाही. अरुण हे सूर्याचे सारथी आहे ते सूर्यपुत्र नाहीत. इंद्र हे नाव युरेनस या ग्रीक देवतेशी साम्यधर्मावरून दिले आहे. हर्षलाला अवकास आणि स्वर्गाची अधिपती युरेनस या ग्रीक देवतेचे नाव दिले आणि हिंदू मान्यते नुसार स्वर्गाची देवता इंद्र आहे. हिंदू पुराणानुसार शनी रवीपुत्र आहे पण ग्रीक पुराणानुसार शनी इंद्रपुत्र आहे, तर गुरु शनीपुत्र आहे. नेपच्यून हे रोमन पुराणातील समुद्र देवतेचे अर्थात जलदेवतेचे नाव आहे. हिंदू धर्मात वरुण हे जलदेवता आहेत.  ग्रीक पुराना नुसार वरुण (नेपच्यून) हे गुरु (ज्युपिटर) व यम(प्लुटो) यांचे भाऊ आहेत म्हणजे शनी पुत्र आहेत.

व्यासांनी शनीला निलांजल म्हटलं आहे शनि, हर्शल, नेपच्यून या तिन्ही ग्रहांचा खगोलीय वर्ण निळा आहे. टंकलेखनाला विराम देता देता दोन गोष्टी अजून सांगतो. एक म्हणजे नुसत्या डोळ्यांनी पाहू शकणारा सूर्यमालेतील शेवटचा ग्रह शनि नसून हर्षल आहे. खूपच मंद का होईना पण कधी काळी तो नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत होता म्हणे. पण त्याला ग्रह न समजता प्राचीन लोक एक तारा समजत होते. दुसरी गोष्ट म्हणजे प्लुटोला (यम) बटूग्रहातूनही काढून टाकण्याचा काही विभूतींचा प्रयत्न चालू आहे म्हणे. त्याला उपग्रहाचा दर्जा देण्याचा विचार आहे, तो म्हणजे प्लुटो हा आपल्या पूर्ण सूर्यमालेचा चंद्र आहे असे म्हणणे आहे. कारण इतर ग्रहांची सूर्या भोवती कक्षा हि साधारणता एका प्रमाण प्रतलात आहे. ज्याला इलिप्टिक(ecliptic) प्रतल असे म्हणतात. पण प्लुटोची कक्षा हि या प्रतलाला छेद देणारी आहे (१७ अंश) जसा एखाद्या ग्रहाचा उपग्रह(चंद्र) ची कक्षा हि त्या ग्रहाच्या सूर्यभ्रमण कक्षेला छेद देणारी असते त्या प्रमाणे. प्लुटोला काही कुणी एका खुर्चीवर बसू देत नाही ब्वॉ.


 

पुढील लेख:- सोमवार नंतर मंगळवारच का येतो?

1 टिप्पणी: